चित्रपटाची म्हणून एक भाषा असते. सादरीकरण असते. तुमची गोष्ट कशी आहे याबरोबरच ती कशी मांडली गेली यावर चित्रपटाचे एकंदरीत गणित अवलंबून असते. कथा, संवाद, संगीत या आणि अशा अनेक घटकांना एकत्रित बांधणारे दिग्दर्शकीय कौशल्य यातून चित्रपटाचा एकत्रित असा परिणाम प्रेक्षकांवर होत असतो. त्यातील कोणताही एखादा घटक जसा कमी-जास्त होईल त्या प्रमाणात चित्रपटाचा म्हणून एकत्रित परिणाम कमी-जास्त होतो. त्यामुळे उत्तम कथासूत्र, मुख्य कलाकाराने जीव ओतून केलेली भूमिका असं असूनदेखील विषय पुरेसा भिडत नाही. असं काहीसं उन्हातल्या मनात या चित्रपटाचं झालं आहे.

ग्रामीण भागाचं भगभगीत वास्तव दाखविणारी ही कथा तशी चारचौघांच्या आयुष्यात घडणारी नेहमीचंच पालुपद मांडणारी नाही. शालेय वयातच वडिलांच्या मृत्यूचं दु:ख उरावर घेऊन शाळेला सोडचिठ्ठी द्यावी लागलेला तात्याच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष यात रेखाटला आहे. शालेय शिक्षणात हुशार असणाऱ्या तात्याला वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर चुलत्याच्या जाचामुळे शालेय शिक्षण पूर्ण करता येत नाही. परिस्थितीचे असंख्य चटके सोसूनदेखील त्याच्या मनात कटुता नसते. पडेल ते काम करण्याची तयारी, प्रामाणिकपणा, लोकांशी अतिनम्रतेनं वागणं या सर्वाचा जग फायदा उठवतं. चुलता जमीन बळकावतो. पण तात्याच्या नेक स्वभावाने त्याला साहाय्यक तलाठी म्हणून कामदेखील मिळतं. तेथेपण त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा उठवला जातो. सरकारी धान्याच्या हेराफेरीचा आरोप होतो आणि तात्याला पोलिस पकडतात. आजवर कोणत्याही आघाताने न खचलेला तात्या या आघाताने पुरता खचतो आणि पुरता उद्ध्वस्त होतो. अर्थात त्याच्या नेकपणामुळे त्याला आधारदेखील मिळतो.

ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Loksatta entertainment Murder Mubarak movie released on Netflix channel
अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री

तात्या हे तसं पाहिलं तर ग्रामीण भागात आढळणारं नियमित व्यक्तिमत्त्व. पण त्याच्या आयुष्यात झालेले आघात हे त्या नियमिततेच्या पलीकडचे आहेत. त्याला वेड लागणं. त्याच्या जिवलग मित्राचा आधार लाभणं. त्यातून त्याचं पुन्हा उभं राहणं. मुलांचं आयुष्य घडविणं हे सारं पठडीबाहेरचं आहे. किंबहुना यातच कथेचं सार आहे. मात्र हे सारं मांडण्यासाठीच जे माध्यम निवडलं गेलंय त्याचा प्रभावी वापर केला गेला नाही. खरं तर इतर चित्रपटांसारखी छान छान कपडे ल्यालेली टिपिकल गरिबी येथे नाही. किंबहुना चित्रीकरणाचा सारा बाज हा थेटपणावरच बेतला आहे. पण मांडणीमध्ये भरकटला आहे. प्रसंगांची जोडणी, कथानकाचा प्रवाहीपणा, प्रभावी संवाद या आघाडीवर चित्रपट मार खातो.

manatla-unhatएक गोष्ट मात्र खासकरून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे तात्याची भूमिका केलेल्या कैलाश वाघमारेचं जीव ओतून केलेलं काम. ‘शिवाजी अंडरग्राउंड..’ या नाटकातील कैलाशचा हा पहिलाच चित्रपट. त्यातील भूमिकेशी तो समरस झाला आहे. त्याची देहबोली, संवाद हे सारं प्रभावी आहे. पण त्याला सादरीकरणाची जोड मिळाली नसणे हे शल्य सतत जाणवत राहते. नेहमीप्रमाणे किशोर कदम यांनी प्रसंगानुरूप एकदम भन्नाट कविता दिल्या आहेत. तलाठी आणि तात्याचा जिवलग मित्र म्हणून त्यांनी कामदेखील उत्तम केलं आहे.

चित्रपटातील कवितांनी अनेक प्रसंग उलगडण्यास खूपच मदत झाली आहे. चित्रीकरणाची वास्तव स्थळं हे या चित्रपटाची उजवी बाजू म्हणावी लागेल. मात्र एका चांगल्या कथानकाला सादरीकरणाची तितकीच दर्जेदार जोड नसेल तर काय होतं तसं हा चित्रपट पाहताना वाटतं. पण ग्रामीण भागातील वास्तवाची झणझणीत अनुभूती मात्र यात आहे. पण तरीदेखील चित्रपटातल्याच कवितेतली एक प्रभावी ओळ कायम आठवत राहते. ‘‘तसं सगळंच चांगलं चाललेलं असतं आसपास, तरी काही सुटत चालल्याचा का होत राहतो भास?’’ चित्रपट पाहताना हेच काहीतरी सुटत गेल्याचा भास न होता जाणीव होत राहते.

निर्मिती संस्था – आनंद सागर प्रॉडक्शन
निर्माती – विजयश्री पाटील
दिग्दर्शन – पांडुरंग जाधव
कथा – संजय पाटील
पटकथा – विद्यासागर अध्यापक, पांडुरंग जाधव
संवाद – विद्यासागर अध्यापक
छायाचित्रण – नागराज दिवाकर
संकलन – नीलेश नवनाथ गावंड
गीत – विश्वराज जोशी
संगीत – राहुल मिश्रा
गायक, गायिका – आदर्श शिंदे, रंजना जाधव-माने
पाश्र्वसंगीत – अश्विन श्रीनिवासन
कलाकार – समीर धर्माधिकारी, कैलास वाघमारे, मिताली जगताप, किशोर कदम, नागेश भोसले, रुचिता जाधव, छाया कदम, अमोल नाईक, प्रमोद फडतरे, बालकलाकार हंसराज जगताप, मंथन पाटील, ओविशिखा पाटील
सुहास जोशी