अलिकडच्या काळात वर्षांला सव्वाशे एवढय़ा मोठय़ा संख्येने मराठी चित्रपट दरवर्षी निर्माण होत आहेत. अगदी राष्ट्रपती पुरस्कारही मिळवत आहेत, पण तरीही त्यांचं व्यवसायाचं गणित कुठे तरी चुकतं आहे. असं का?

नुकतंच मराठी चित्रपटाच्या प्राइम टाइमवरून बरंच वादळ उठलं. ‘कोर्ट’ या चित्रपटासंबंधात चर्चाही झाली. ‘मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पाठ का फिरवतो?’ याविषयी दूरदर्शनवर मते मांडली गेली आणि प्रेक्षकांनी मराठी ‘सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पाहावा’ अशी करुणाही भाकली गेली. एक सिनेमाशौकिन व एक लेखक म्हणून मी विचार करू लागलो. काही प्रश्न स्वत:लाच विचारले व त्यांची उत्तरे स्वत:च शोधली.
कोल्हापूर-जयप्रभा स्टुडिओ- भालजी स्टुडिओ-भालजी पेंढारकर- दादासाहेब तोरणे- व्ही. शांताराम-प्रभात, राजकमल अशा चित्रपट निर्माण संस्था, अशी उत्तुंग परंपरा सांगणारा आमचा मराठी चित्रपट असा पदोपदी का ठेचकाळतोय, डोळय़ांत अश्रू का आणतोय? खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तरीही आपण थोडक्यात मराठी चित्रपटांचे प्रश्न समजून घेऊ या.
चित्रपटाचा आत्मा म्हणजे चित्रपटाची कथा- कथेकरिता चित्रपट बनवायचा असतो. चित्रपटासाठी कथा लिहायची नसते. ‘सांगत्ये ऐका’, ‘पिंजरा’, ‘नटरंग’ यांच्या कथाच दिलखेचक आहेत. कथेसाठी आम्ही लेखकाकडे जातो का? उत्तम लेखकांची पुस्तके वाचतो का? व्ही. शांताराम यांचे प्रत्येक चित्रपट उत्तम लेखकांच्या कथांवर आधारित आहेत. उत्तम कथेवर मेहनत घ्यावी लागते. ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट का चालला? सर्व थरांतील प्रेक्षकाला कथा रुचली पाहिजे, भावली पाहिजे. ठरावीक प्रेक्षकांकरिता चित्रपट निर्माण केला तर तो खालच्या थरापर्यंत कसा पोहोचेल? काही चित्रपट तर ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर काढले गेले. मागील तीस-चाळीस वर्षे ‘विनोदी चित्रपट’ या सदराखाली आम्ही खर्च केली आणि विनोदाची पातळीच तळाला नेली. सामाजिक प्रश्न, त्याचं गांभीर्य, वैचारिक प्रधानता काही राहिलीच नाही. ‘माणूस’, ‘कुंकू’, ‘शेजारी’चं गांभीर्य कुठं गेलं? सवंग लोकप्रियता ही मराठी चित्रपटाला मारक ठरली आहे. दिग्दर्शकाची भूमिका- चित्रपटाचा प्राण म्हणजे दिग्दर्शक. चित्रपटाची कथा सर्वसामान्यांपर्यंत कशी पोहोचवायची याचं तंत्र आणि मंत्र दिग्दर्शकाजवळ असतं व असावं लागतं. ही एक उपजत कला असते. सरावाने ती साध्यही होऊ शकते, पण उपजत ज्ञान, जन्मजात वरदान हे काही वेगळंच असतं. व्ही. शांताराम, बी.आर. चोप्रा, ताराचंद बडजात्या, बिमल रॉय, अनंत माने, राजा परांजपे ही प्रमुख नावे म्हणजे जन्मजात दिग्दर्शक. आताचे ‘जोगवा’, ‘नटरंग’, ‘अस्तित्व’ या चित्रपटांचे दिग्दर्शक खऱ्या अर्थाने दिग्दर्शक म्हणावे लागतील. दिग्दर्शकाला उत्तम कथा निवडता आली पाहिजे, ती कळली पाहिजे, ती तळागाळापर्यंत नेता आली पाहिजे. सर्व थरांतील प्रेक्षकांच्या नाडय़ा त्याच्या हातात असाव्या लागतात. अलीकडे दिग्दर्शनाची हौस भागविणे हा प्रकार दिसतो. दिग्दर्शनाच्या हौसेखातर चित्रपट भुईसपाट होताना दिसतो. यात प्रेक्षकांची चूक कशी म्हणता येईल? एखाद्याला कलाकार म्हणून पुढे आणण्यासाठी बळेच कथा रचून, चित्रपट काढून तो चालत नाही. प्रेक्षक हुशार आहे. तो स्वत:चा वेळ व पैसा खर्च करून चित्रपट पाहाणार आहे, हे विसरता कामा नये. चित्रपटाच्या कथेत प्राण ओतणं हे जन्मजात दिग्दर्शकालाच शक्य होत असतं. तसं नसल्यास एका चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर निवृत्त व्हावं लागतं. सुमार चित्रपट कोण पाहाणार? आमच्या चित्रपटाचा दर्जा आम्ही का तपासू नये? आत्मपरीक्षण का करू नये?
सध्याचे गीत-संगीत उत्तम आहे, पण नृत्य म्हणून जो अंग हलवण्याचा प्रकार आहे, तो जाणकार प्रेक्षकाला नको आहे. ‘जोगवा’तली गीते- संगीत- नृत्य प्रेक्षकाला भावली आहे. गीतांचे शब्द, त्या शब्दांचा अर्थ, त्यांचे संगीत व त्याला अनुसरून नृत्य अपेक्षित असतं. आजच्या नृत्याचा व गीतातील शब्दांचा काडीचाही संबंध नसतो. उथळ टिकत नसतं. अभिजात असावं लागतं. तसंच तेच-तेच चेहरे पाहून प्रेक्षकाला कंटाळा येतो. नवीन चेहरे व नवीन अभिनय चित्रपटाला तारू शकतो.
आजकाल टॅलेंट वाया चाललं आहे. नव्या टॅलेंटला वाव नाही. ‘फँड्री’, ‘धग’, ‘ख्वाडा’चे निर्माते- दिग्दर्शक यांनी जी लढत दिली, ती त्यांना का द्यावी लागली, याचा अभ्यास झाला पाहिजे. अनेक अडथळय़ांना पार करण्यातच वेळ जातो आहे. नियम-सवलती सुटसुटीत पाहिजेत. नवख्या दिग्दर्शक, निर्माता, वितरक यांची दमछाक होते आहे. दर्जेदार लेखक व लेखन कुजत आहे.
आजचे प्रश्न- निर्मितीपेक्षा जाहिरात व प्रमोशनसाठी दुप्पट-तिप्पट पैसे खर्च करावे लागतात. हे असं का? याचा विचार कोण करणार? थिएटर उपलब्ध होत नाहीत. का होत नाहीत? लग्न-मंगल कार्यालयांचे इतर वेळी थिएटर म्हणून उपयोग करता येणार नाही का? काय अवघड आहे यात? थिएटरला पूर्ण सवलती देता येणार नाहीत का? आज मराठी चित्रपट मुंबईतच एकवटलाय. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मराठी चित्रपटनिर्मिती मुंबईतून बाहेर काढता येणार नाही का? रामोजी फिल्मसिटी कशी निर्माण झाली? आम्हाला का शक्य नाही? चित्रपटाला अनुदान मिळते का? मिळालेच तर ते कोणाकोणाला मिळाले? त्यांनाच का मिळाले? ‘फँड्री’, ‘धग’, ‘ख्वाडा’ अशा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांच्यासाठी आम्ही भरीव असे काय केले? नवीन लेखक- पटकथा लेखक, निर्माते, दिग्दर्शक यांना खरंच सहज सुलभ वाव मिळतो का? सेन्सॉर बोर्डावर कुणाची वर्णी लागते? त्यांना त्यातलं काय कळतं का? मागे एका कवयित्रीला सेन्सॉर बोर्डावर घेतलं. कविता करणं व चित्रपट तंत्र कळणं, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. काही दिवसांपूर्वी प्राइम टाइम म्हणजे नेमके काय व तो कोणता, हेच नीट सांगता येईना. याला काय म्हणायचं?
आज अनंत अडचणींतून मराठी चित्रपट पुढे जातो आहे. यातून खरंच मराठी चित्रपटाचं भलं करायचं असेल, तर जाणकार व सरकार यांनी एकत्र बसून त्याच बैठकीत तोडगा काढला पाहिजे. नुसती चर्चा नको. इथे नको त्या लोकांची लुडबुड नको आहे. या खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व वितरक यांची बैठक घेऊन आजच्या मराठी चित्रपटांत प्राण फुंकले तर मराठी चित्रपट निश्चित ताठपणे उभा राहील. अशक्य काहीच नाही. आज जो-तो आपल्या भल्याचा विचार करून मुद्दा रेटताना दिसतोय; पण सर्वसामान्य व सर्व थरांतील प्रेक्षकांचा विचार कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे आज प्रेक्षकांनाच म्हणावं लागतंय की, ‘आमचा सिनेमा थिएटरमध्येच जाऊन पहा!’ हे असं म्हणणं कमीपणाचं नाही का? उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन, उत्तम गीते, उत्तम संगीत, नवनवीन कलाकार यांच्या साहाय्याने थोडेच पण उत्तम चित्रपट निर्माण केले, तर प्रत्येक खेळ थिएटरवर हाऊसफुल होईल. अवघड नाही. शांतारामबापूंनी हे करून दाखवलं. आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आम्हाला हे फार अवघड नाही. असे झाले तर ‘प्रभातकाल’ पुन्हा अवतरल्याशिवाय राहणार नाही.
विकास नागावकर – response.lokprabha@expressindia.com

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”