मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची संख्या वाढतेय. गेल्या शुक्रवारी ‘पन्हाळा’, ‘मनातल्या उन्हात’, ‘कॅरी ऑन मराठा’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. यात आणखी चौथा चित्रपट ‘हायवे’सुद्धा प्रदर्शित होणार होता. परंतु काही कारणास्तव ‘हायवे’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या शुक्रवारी तर विविध विषयांवरचे एकूण चार मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आतापर्यंत मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांतून झळकलेले अभिनेते प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलेला ‘देऊळ बंद’ हा बडा मराठी चित्रपट यात आहे. प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर त्याशिवाय आर. विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे- गेम की शिणेमा’, निशांत सपकाळे दिग्दर्शित ‘ढिंचॅक एण्टरप्राईज’ आणि राजेश रणशिंगे दिग्दर्शित ‘जाणिवा’. ‘जाणिवा’ या चित्रपटात सत्या मांजरेकर प्रमुख भूमिकेत झळकला आहे. आजच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चारही चित्रपटांची शीर्षके पाहिली तरी चार चित्रपट चार निरनिराळ्या विषयांचे आणि आशयदृष्टय़ाही वैविध्यपूर्ण आहेत हे लगेच समजते.

आता ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या काही चित्रपटांविषयी निश्चितच उत्सुकता निर्माण झाली आहे.
ऑगस्टमधील पहिल्याच शुक्रवारी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘निळकंठ मास्तर’ हा निराळ्याच नावाचा चित्रपट प्रदर्शित होतोय. ट्रेलरवरून तरी हा चित्रपट प्रभावी असावा असे मानायला हरकत नाही. विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे आदींच्या भूमिका असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळावरचा आहे. १९४५ सालात घडणारे कथानक गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटात दाखविले आहे. प्रेम, युद्ध यात नेहमीच वादळे येतात, अशी काहीशी टॅगलाइन असलेला हा चित्रपट उत्कंठावर्धक असण्याची शक्यता आहे. ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अजय-अतुल या संगीतकार जोडीने या चित्रपटाचे संगीत केले आहे. स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या तरुणांची कथा असे साधारण याचे स्वरूप दिसते.
आणखी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘भय’ असे या चित्रपटाचे शीर्षक असले तरी भूतपटांच्या प्रकारातला नाही. याबाबत दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी सांगितले की, भूतपट अजिबात नसलेला हा निराळा चित्रपट आहे. प्रत्येक माणसाला कसली ना कसली तरी भीती वाटत असते. परंतु काही माणसांना भीतीने पछाडलेले असते. मुंबईसारख्या महानगरांतील प्रचंड रहदारीची भीती काहींना वाटते तर काहींना आपल्यामागे कुणी तरी आपला पाठलाग सतत करतोय असे वाटत राहते. कुणाला ऑफिसमधील सगळे जण सतत केवळ आपल्याचविषयी काहीबाही बोलत राहतात असेच वाटत राहते. ‘पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया’ या आजाराची जाणीव करून देणारा हा चित्रपट असेल. भातणकर म्हणाले की, पॅरानॉईड स्किझोफ्रेनियाचे जवळपास नऊ प्रकार आहेत. परंतु हे नऊ प्रकार प्रेक्षकांना समजावून सांगणे म्हणजे चित्रपट रटाळ होण्याची शक्यता होती. म्हणून यातले काही प्रकार मुख्य भूमिकेच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहेत. विचित्र आवाज ऐकू येणे, आपल्याच कोषात जगताना ‘स्प्लिट पर्सनॅलिटी’ एकाच माणसात असणे असे अनेकविध प्रकार आहेत. म्हणूनच आम्ही हा विषय निराळ्या पद्धतीने हाताळला आहे. यात प्रेमकथा आहे, बिल्डर आहेत, मुंबई पोलीस आहेत, गुंड आहेत असे सारे काही आहे. नितीन सुपेकर यांनी तीन दिवसांच्या कालावधीत ‘भय’ची कथा लिहून काढली आहे, असेही दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी आवर्जून नमूद केले. त्याशिवाय असा चौकटीबाहेरचा विषय चित्रपटांतून हाताळण्यासाठी संजय खटार-नवरे यांच्यासारख्या निर्मात्यांनी धाडस दाखविले म्हणूनच हा चित्रपट करू शकलो असेही भातणकर यांनी सांगितले.
अभिजित खांडकेकरने ‘पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया’च्या रुग्णाची प्रमुख भूमिका साकारली असून स्मिता गोंदकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर राज्यभरातील निदान १०० लोकांना तरी आपण या प्रकारच्या आजाराचे रुग्ण असू शकतो याची जाणीव होऊ शकेल, असे प्रतिपादनही भातणकर यांनी केले. सतीश राजवाडे, विनीत शर्मा यांच्याही ‘भय’मध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘गुरुकुल’ नावाचा चित्रपटही औत्सुक्यपूर्ण असण्याची शक्यता वर्तविता येते. हा चित्रपटही
७ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाविषयी उत्सुकता वाटण्याचे कारण म्हणजे रोमेल रॉड्रिग्स या एके काळच्या पत्रकाराने प्रथमच मराठीत चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सामाजिक-नाटय़ या प्रकारातील हा चित्रपट असून नागेश भोसले, विद्याधर जोशी, असित रेडिज, प्रशांत मोहिते, स्वप्निल जोशी आदी कलावंत यात आहेत. रोमेल रॉड्रिग्स हे काही इंग्रजी बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक म्हणून गाजले आहेत. त्याचबरोबर २६/११ हल्ल्यावरील राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटाचेही ते लेखक आहेत.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com