मराठी साहित्यात नवं काहीच येत नाही, पुलं, वपु यांच्यापलीकडे ते गेलेलं नाही अशी आपल्याकडे ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र नवं अवकाश घेऊन येणाऱ्या नव्या दमाच्या कादंबऱ्यांची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जाते, त्याचं काय?

मराठी वाचनसंस्कृतीच्या त्याच त्या दुष्टचक्रात अडकण्यामुळे स्वीकारण्यासाठी भाषक बहुपर्याय उपलब्ध असलेल्या आगामी पिढीला मराठीजवळ आणणे अवघड होईल आणि आपले सगळेच साहित्यसंचित नापासांमध्ये मोडेल, असा काळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. पारंपरिक वाचन व्यवहारातील दोषांसोबत एका ताज्या अलक्षित आणि आजच्या भाषिक-व्यावहारिक जगाचे अस्सल रुपडे दाखविणाऱ्या साहित्यकृतीचा आढावा..

वाचन गुरवांची फळे
जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे एका कादंबरीचा ऐवज असतो आणि या ऐवजाला मांडण्यात ज्या अल्पसंख्य चिवट व्यक्ती यशस्वी होतात, त्यांना आपण लेखक म्हणतो. लिहिण्याच्या किंवा साहित्याच्या कक्षेबाहेरील अनंतासमान असलेली सर्वसाधारण घटकांची साखळी कायमच्या ‘रायटर्स ब्लॉक’मध्ये अडकलेली असते. वाचणाऱ्याच्या जगामध्ये न वाचल्या गेलेल्या अपरंपार साहित्याची दोन आयुष्य पुरूनही न संपणारी यादी असते, तर न वाचणाऱ्याच्या खिजगणतीतही ‘साहित्यजगत’ नामक कुठलीही संकल्पनाच अस्तित्वात नसते. या अशा परस्पर विरोधाभासी प्रवृत्ती एकाच समाजात सगळ्याच खंडांत-राष्ट्रांत अस्तित्वात असल्या, तरी आगामी काळात मराठीत त्या सर्वाधिक असणार आहे. नव्वदपूर्व-उत्तर काळात मराठी पालकांनी मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचे फॅड ही दोन हजारोत्तर काळातील सर्वसाधारण घटना बनून गेली. मातृभाषिक तिटकारा उत्पन्न करण्याची दुटप्पी मराठी संस्कृती नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत आणि साहित्यिकांपासून समाजसेवकांपर्यंत सगळीकडे दिसते. जिची आदली पिढी मराठीचे फुकाचे गोडवे गाते आणि पुढली पिढी फेसबुक आणि गुगलवर चुकीच्या मराठीत व्यक्त होण्यालाही भाषिक सेवा मानते. आर्थिक घटकही सध्या इंग्रजी शिक्षणाच्या प्रेमामध्ये अडसर ठरत नाही. इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यात वाईट काहीच नाही. मात्र ‘भाषिक मातेरे’ झालेली पिढी तयार होणे, हा सर्वात मोठा धोका आहे. इंग्रजी भाषेचे अर्धज्ञान आणि मातृभाषेचे त्याहून कमी ज्ञान असलेली ही इंग्रजी शिक्षित आगामी पिढी कुणाचे मराठी साहित्य वाचेल आणि कोणत्या कादंबरीला उचलून धरेल, हा पंधरा ते वीस वर्षांनंतरचा सर्वात मोठा प्रश्न असेल. भाषक वृत्तपत्रांसमोर तर तेव्हा तरुण पिढीतील वाचकांना ओढण्याचे भीषण आव्हान असेल. गेल्या सात-आठ वर्षांत ‘स्कीम’वाल्या वृत्तपत्रांमुळे कधी इंग्रजी वृत्तपत्रांच्या वाटेला न जाणाऱ्या घरांत मराठीसोबत इंग्रजी दैनिके दाखल होऊ लागली. ती किती वाचली आणि पाहिली तरी जातात का, तो मुद्दा वेगळा. पण पुढे रद्दीभाव जास्त मिळतो म्हणून मूळ मराठी दैनिके घेण्याचे बंद होऊन इंग्रजी दैनिके ‘कानामागली’ होऊ लागली. जाहिरातरिकाम्या, मजकूरभरल्या सचित्र आणि ग्लॉसी पानांमुळेही या दैनिकांचे मराठी घरांतील अस्तित्व वाढले. ते पुढील काळात आणखी वाढेल, यात शंकाच नाही. तेव्हा साहित्य संमेलनांपासून ते साहित्यनिर्माणापर्यंत सगळ्याच मराठीची बोंब उडेल आणि साऱ्याच कादंबऱ्या नापास झालेल्या असतील, हे भयावह भविष्य आहे.

शालेय पातळीपासून ते पदव्युत्तर मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांच्या फळीने, सुजाण वाचकांच्या पिढीने आणि समीक्षकांमधल्या वाचन गुरवांनी नवकथाकारांची पाच नावे आणि त्यापलीकडे कोकण, मराठा, विदर्भाची ‘भावविभोर’ रूपे मांडणाऱ्या दहाएक नावांपलीकडे मराठी साहित्य नसल्याची समज या पिढीला करून दिली. असे वाचन गुरव या पिढीला लाभले नसते तर बरे झाले असते.

मराठीला या घाऊक साडेसातीचा ज्वर फार आधीपासून झालेला आहे. पूर्वी ठरावीक सोवळे जपणारी नियतकालिकांची परंपरा आणि त्याविरोधात तयार झालेली अनियतकालिकांची परंपरा, यांतून तयार झालेल्या साहित्याची आज काय स्थिती आहे, याची त्या कुणा एकाची बाजू घेणाऱ्या गटालादेखील कल्पना नसावी. थोर प्रकाशनांच्या अतिथोर लेखकांच्या पहिल्या आवृत्त्या अद्याप सहज दुकानांत धूळ खात असलेल्या सापडू शकतील. मराठीत ‘मैलाचा दगड’ मानल्या जाणाऱ्या (आणि तिच्या बहुतांश विरोधकांच्या मते या दोन शब्दांपैकी कुठलाही एकच शब्द तिला लागू असलेल्या) ‘सात सक्कंत्रेचाळीस’ची आवृत्ती संपायला सत्तावीस वर्षे जावी लागली आणि त्याचे शेवटच्या वर्षीचे मानधन ११ रुपये फक्त असल्याचे नुकतेच किरण नगरकर यांनी नमूद केले आहे. ही मराठीतील माइलस्टोन कादंबरीची अवस्था असेल, तर मग इतरांचे काय? नव्वदपूर्व-नव्वदोत्तर-दोन हजारोत्तर माइलस्टोन नसलेल्या कादंबऱ्यांच्या कहाण्याचं भीषण वास्तव कादंबरीचा विषय होऊ शकतील.
नव्वदीपूर्व काळात जन्मलेल्या आणि जागतिकीकरणाच्या कचाटय़ात सापडूनही अनवधानाने साहित्यात रुची निर्माण झालेल्या पिढीच्या अभिरुचीविस्ताराची आणि साहित्यिक जाणिवांची कुठल्याही पिढीने अनुभवली नसेल, इतकी कुतरओढ झाली. भरगच्च नियतकालिकांसारखे साहित्यिक वाटाडे १९९५-९६च्या अस्ताला लोप पावले होते. जे वाटाडे उपलब्ध होते, त्यांच्या मर्यादाप्रांगणामध्ये या नवसाहित्यरुची धारकांना स्थान नव्हते. त्यामुळे दहावीच्या दरम्यान ‘श्यामची आई’पासून ‘स्वामी’, ‘मृत्युंजय’, ‘ययाति’, ‘समग्र सावरकर’, ‘बटाटय़ाची चाळ’, ‘पार्टनर’ अशा ‘मोठय़ा वाचकांनी’ सांगितलेल्या मार्गावर साहित्य वाचत त्यापासून काडीमोड घ्यायचा, अशी या काळात उगविणाऱ्या वाचकांची दुरवस्था झाली.

नापास मुलांची गोष्ट सांगणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमध्ये जागतिकीकरणाने शिक्षणयंत्रणेच्या बदललेल्या स्पर्धात्मक रचनेत एका विद्यार्थी पिढीचाच कसा गळा घोटला जात आहे, त्याचे समग्र आकलन आहे.

शालेय पातळीपासून ते पदव्युत्तर मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांच्या फळीने, सुजाण वाचकांच्या पिढीने आणि समीक्षकांमधल्या वाचन गुरवांनी नवकथाकारांची पाच नावे आणि त्यापलीकडे कोकण, मराठा, विदर्भाची ‘भावविभोर’ रूपे मांडणाऱ्या दहाएक नावांपलीकडे मराठी साहित्य नसल्याची समज या पिढीला करून दिली. असे वाचन गुरव या पिढीला लाभले नसते तर बरे झाले असते. किमान समग्रातून हाती लागेल, त्याचा शोध घेत या पिढीला चांगल्या साहित्याची स्वत:ची व्याख्या करता आली असती. पु. लं., व. पु., शिवाजी सावंत यांच्यासोबत कुणी श्री. दा. पानवलकरांच्या चित्रभाषिक कथांची शिफारस करताना दिसत नाही. त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहातील ‘काबुलीवाला’, ‘एका कोळियाने’ या कथा आणि बाकीच्या कथांची शीर्षकेही थेट तत्कालीन लोकप्रिय साहित्यावर ओढलेले आसूड आहेत. हा कथाकार आणि त्याच्या काळापुढल्या खणखणीत कथांसोबतच अनिल डांगे, ए. वि. जोशी, शरश्चंद्र चिरमुले या एक काळ सातत्याने कथाप्रवाहात असलेल्या लेखकांना आज किती वाचले जाते? कोकणातल्या ठरलेल्या कथा-कादंबरीकारांच्या नावांची सर्वाना ओळख असते. बाळकृष्ण प्रभूदेसाई, या सत्यकथा, मौजेतच कोकणाच्या पाश्र्वभूमीवर कथा लिहिणाऱ्या कथाकाराची दखलही कुठे घेतल्याचे दिसत नाही, तर आठवण कोण काढेल?
जुन्यांपैकी दहा-पंधरा लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांव्यतिरिक्त फार कष्टाने इतर लेखकांच्या कथा-कादंबरीचे साहित्य आज खपत आहे. नव्या वेगळ्या वाटेचे लेखन करणाऱ्या मुंबई-पुण्याबाहेरील प्रकाशनांचे साहित्य विकत घेऊन वाचण्यासाठी वाचकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाचनालयांमध्येही अनेक शिफारसी या लेखनगुणांऐवजी नावांच्या लोकप्रियतेनुसार केले जात असल्यामुळे मराठी साहित्याचा वाचनव्यवहार एकाच प्रकारच्या दुष्टचक्रात गेली कैक वर्षे अडकलेला आहे.

एक अडकलेली कादंबरी
दरवर्षी मानाचे चार दिवाळी अंक शोधून काढल्यास विशिष्ट नावांचे त्यातील अस्तिव हे डोळे बंद करूनही सांगता येऊ शकते. त्याच ‘छान’ लेखकांचे तेच ‘छान’ अनुभव किंवा त्याच त्या विषयांना चरख्यातून काढून घेऊन चावून चोथा झालेले ‘सखोल चिंतनीय’, मानवी जीवनाशी, नातेसंबंधांशी भिडणारे वगैरे, भावभावनांच्या टोकाशी जाणारे असे एकंदर साहित्य धीरगंभीर वाचक नावाच्या घटकावर लादले जाते. नवीन लेखक तयार होत नाहीत. योग्य मजकूर सापडू शकत नाही, हे मान्य. पण मग नंतर या दिवाळी अंकातील साहित्याला पुढे नव्या कथासंग्रह, कादंबऱ्यांमध्ये रूपांतरित करण्यात हे जुनेच लेखक आघाडीवर असतात आणि मग त्याच शिळ्या कढीचा भुरका मारत वाचकाला साहित्यप्रेम वगैरे जपण्याची कसरत करावी लागते.
याला अपवाद असणारे काही नवे गुणी साहित्यिक मुंबई, पुण्यासोबत नागपूर, लातूरसारख्या भागांतून येत आहेत. तसेच अपवादाच्या प्रमाणात साहित्याच्या प्रांगणात आपले अस्तित्व शोधण्यासाठी धडपडत आहेत. लातूरच्या विवेक कुलकर्णी यांचे त्यात सर्वात वरती घ्यावे असे नाव आहे. नापास मुलांची गोष्ट सांगणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमध्ये जागतिकीकरणाने शिक्षणयंत्रणेच्या बदललेल्या स्पर्धात्मक रचनेत एका विद्यार्थी पिढीचाच कसा गळा घोटला जात आहे, त्याचे समग्र आकलन आहे. शिक्षणसंस्थांपासून ते घरातील प्रतिकूल वातावरणाने लादलेले अवजड ओझे न पेलवू शकणाऱ्या या पिढीची ही नकारात्मक तरी खरीखुरी सृष्टी दाखविणारी गोष्ट लोकप्रिय झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र काही प्रमाणात तिची चर्चा झाली होती. त्यातील रांगडय़ा निवेदनामुळे आणि ‘लातूर पॅटर्न’ या दहावी-बारावीच्या निकालकाळातील एकेकाळी फारच परवलीच्या बनलेल्या शब्दामुळे. ‘लातूर पॅटर्न’ कादंबरीत ग्लोकल पिढीची जी खदखद आली त्याचेच विस्तारित रूप नव्या आणि पारंपरिक रूपात प्रसिद्ध न झालेल्या ‘अनरउबिक’ या कादंबरीत आहे. वादग्रस्त आशय-विषयामुळे पारंपरिक पुस्तकाऐवजी ई-बुक स्वरूपात काढावी लागलेली विवेक कुलकर्णी यांची ही अचर्चित आणि अलक्षित कादंबरी कथानिवेदनाच्या शैलीपासून ते कादंबरी लिखाणाच्या प्रक्रियेचा तिरसट आणि विलक्षण प्रयोग आहे. मराठी साहित्यातील आजवरच्या प्रयोग-प्रयोगांच्या नावाखाली वाटेल त्या आशयगुंत्याला वाचकांच्या अंगावर सोडणाऱ्या कादंबऱ्यांसारखी ती नाही. तिला कथेची सुरुवात मध्य ही रचना आहे, पण तिच्यात अंत हा घटक पूर्णपणे वजा झालेला आहे.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या धोरणांचा नागरिकांवर प्रत्यक्ष कोणता भला-बुरा परिणाम झाला हे तीक्ष्ण प्रतिनिधीद्वारे मांडणे या कादंबरीचा उघड हेतू आहे. पण कादंबरीच्या घाटाशी प्रयोगांचा खेळ करण्याचाही येथे भरपूर सोस दिसत आहे. इंदिरा गांधींच्या हत्यादिवसापासून ते अण्णा हजारे-केजरीवाल यांच्या २०११ सालच्या आंदोलनापर्यंतचा हा प्रवास अगणित क्रांतिकारी घटनांचा आहे. घराघरांत त्याचे पहिले पडसाद आर्थिक सुबत्तेपासून, टीव्हीच्या छोटय़ा पडद्याला लाभलेल्या चॅनल श्रीमंतीपर्यंत थेट जाणवणारे होते. या काळात जन्मलेली अग्रेसर पिढी संस्कार-कुसंस्कार, नीती-अनीती, चांगले-वाईट यांच्या नव्या व्याख्या तयार करणारी होती. एकाच वेळी उपग्रह वाहिन्यांचा मारा, डॉट. कॉमच्या फुग्यावर स्वार झालेली संगणक साक्षर-अर्धसाक्षर जनता, मोबाइलोत्तर गॅजेट्सचा सुळसुळाट आणि गुगलॅक्चुअल जगाशी एकरूप होताना सपाट जगाची प्रतिनिधी बनलेल्या या पिढीच्या जगण्याचे सार, भाषिक आचार आणि वैचारिक कामभ्रष्टपण यांचे थेट स्वरूप कुठल्याही कादंबऱ्यांमध्ये उलगडले नव्हते.
पंधराएक वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटांतील नायिकेने दिलेल्या (अगदीच मुळमुळीत) बोल्ड दृश्यांचे समर्थन करताना चित्रपट समीक्षक आवर्जून ‘तिने पटकथेला न्याय देणारी भूमिका वठवली’, ‘ती दृश्ये पटकथेची गरज होती’ अशा छापाची वर्णने येत असत. त्या धर्तीवरच आपल्या नव्वदोत्तर साहित्याचे वर्णन करायचे झाल्यास, त्या कथेची गरज असल्यासारख्याच वर्णनांचा वापर असलेला कामव्यवहार त्याचे वैशिष्टय़ होते. थोडीशी उणी-अधिक वर्णने म्हणजे लेखक-लेखिकेचे लोकप्रिय होण्याचे भांडवल होते. मात्र त्याच काळात इथला थेट जगण्यातील व्यवहार ‘स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ बनला होता. छोटय़ा पडद्यावरील देशी-विदेशी वाहिन्यांतून ओसंडणारे स्वातंत्र्य, मुक्ततेचे तरुणडोस यांचा पगडा संकरित मानसिकतेला तयार करणारे होते. गेल्या दशकातील ‘शाळा’ या कादंबरीचा कालपट जाणीवपूर्वक सत्तर-ऐंशीचे दशक आला आहे. याच दशकातील ‘शाळा’ मांडणेही अवघड गेले असते आणि त्याला वाचकांनी पचविणेही अवघड गेले असते. (पु. लं. देशपांडे यांच्या चाळपिढी प्रतिनिधींचेच वास्तव वर्णन दाखविणाऱ्या किरण नगरकरांच्या ‘रावण आणि एडी’ला समजून घेण्याचीही मन:स्थिती दशकापूर्वी आपल्याकडे तयार नव्हती.) त्यामुळे खऱ्या अर्थाने या पिढीची भाषिक, सर्वव्यवहारिक आणि वैचारिक दिशा (किंवा दशा) दर्शविणारी कादंबरी म्हणून ‘अनरउबिक’ या तिकडम कादंबरीकडे पाहावे लागेल.
इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवशी लातूरमध्ये जन्म घेणारी या कादंबरीची नायिका हर्षां हिच्या आयुष्यातील उण्यापुऱ्या सत्तावीस वर्षांच्या आयुष्याचा पट कादंबरीत येतो तो सरळ साध्या गोष्टींनी नाही. सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांनी इथल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या जगण्यावर कोणते ओरखडे काढले त्याचा शोध घेत. त्यात मराठी कादंबरी आणि साहित्याची जशी चर्चा येते, तशीच अनवधानाने साहित्याच्या वाटेला गेलेल्या पिढीच्या बदलत जाणाऱ्या साहित्यविचारांबद्दलही चर्चा होते. प्रथितयश, नामवंत साहित्यिकांच्या गोळीबंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहित्यावर ‘फोकनाड’तेचा शिक्का मारला जातो. किंवा लोकप्रिय कादंबरीच्या नावांचे विडंबन केले जाते. कधी थेट समीक्षकांनी केलेल्या टिप्पण्यांचा समाचार घेतला जातो, तर कधी निवेदनाच्या खेळामध्ये कथेतील पात्रांबद्दल दुमत तयार केले जाते. कथानकाच्या एका रेषेतून दुसऱ्या रेषेपर्यंत जाण्याच्या पारंपरिकतेला फाटे देत येथे वेगळाच विरचनावादी मार्ग स्वीकारला जातो. कधी तद्दन पटकथेच्या स्वरूपात दृश्यांचा मारा कथानक पुढे सरकविण्यासाठी केला जातो.
दोन हजारोत्तर पिढीवर चित्रपटांचा आणि दृश्यिक वातावरणाचा सर्वात मोठा प्रभाव आहे, कारण आधी डझनांहून अधिक चित्रपट वाहिन्या, २००३ ते २०१० पर्यंत जोमाने तळागाळापर्यंत पोहोचलेली ‘सीडी-डीव्हीडी’ क्रांती आणि आता कवडीमोल झालेल्या इंटरनेटमुळे टोरंट्स आणि हबसंस्कृतीचा विस्तार यामुळे अनंतासमान दृश्यमारा या पिढीवर झालेला आहे. ‘मेमेन्टो’ या विरचनावादी चित्रपटाचा विवेक कुलकर्णी यांच्यावर असलेला प्रभाव कादंबरीच्या प्रकरण रचनेवरून जाणवतो. पण वेळोवेळी येणाऱ्या दृश्यिक रचनेत लेखकाचे टोकाचे सिनेमाप्रेम स्पष्ट होत जाते.
जन्मल्यापासूनच हर्षांच्या अग्रेसरतेचा अतिशयोक्त प्रवास पुढे तिच्या तरुणपणातील ‘अँग्री यंग वुमन’ होण्यात दाखविला जातो. ‘मुलींनी ब्रा का घालायची?’ सारख्या बंडखोर प्रश्नांपासून सुरुवात झालेल्या हर्षांचा विस्तारित स्वरूपातील समलिंगी संभोग यात वर्णनांकित केला जातो. कादंबरीमध्ये वेगवेगळ्या निवेदकांनुसार हर्षांच्या आयुष्यातील टप्प्यांचा भाग येत असला, तरी तो एका परिपूर्ण कथेचे समाधान देऊ शकत नाही, कारण या कादंबरीला आधीच सांगितल्यानुसार सुरुवात आणि मध्य आहे, मात्र शेवट येथे वजा आहे.
उदारीकरणाच्या पहिल्या दशकांत हातात पैसा खुळखुळू लागल्यानंतर आलेली सुबत्ता, परदेशी मालिकांनी, वाहिन्यांनी दिलेली उच्च जीवनशैलीची ओळख यांचा समाजाच्या जगण्यावर झालेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम येथे गडद स्वरूपामध्ये येतो. किल्लारीमधील भूकंप, शालान्त परीक्षांमध्ये लातूर पॅटर्न लोकप्रिय होण्याचा काळ, ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवर घडविलेला हल्ला यांच्याबरोबरच अण्णा हजारेंचे आंदोलन यांचा निव्वळ दृश्यार्थी पिढीने काढलेला अन्वयार्थ येथे येतो. अतिथेट वर्णने आणि विरचनावादी रचना हा या कादंबरीचा गुणात्मक भाग आहे. गंमत म्हणजे आदल्या पिढीला ते पटतील की नाही, रुचतील की नाही, या भीतीच्या दबावात न येता, बेधडकपणे त्यांची मांडणी करण्याचे धाडस या लेखकाने दाखविले आहे. त्यासाठी या कादंबरीतील सर्व प्रयोग कौतुकपात्र ठरतात. मात्र याच गुणांना दोष ठरवत या कादंबरीला पारंपरिक स्वरूपात छापण्याचे धाडस मराठीतील प्रकाशकांनी केले नाही, हे कादंबरीचे आणि आजच्या साहित्यस्वरूपाचे मोठे दुर्दैव आहे.

‘अनरउबिक’ ही कादंबरी ‘माइलस्टोन’ कादंबऱ्यांच्या पंक्तीमध्ये बसवावी इतकी थोर नसेल कदाचित, पण तिने दाखविलेल्या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिची विखंडित रचना ही आजच्या काळाशी पूर्णपणे सुसंगत आहे.

मराठी साहित्यावर थेट विचार आणि त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या तडाख्यात भल्या-बुऱ्या परिणामांना घेऊन जगणाऱ्या पिढीचे वर्णन जर आजच्या पिढीसमोर येऊच दिले नाही, तर त्यांची वैचारिक वाढ खुंटलेलीच राहू शकेल, याचा विचार कुठल्याही प्रकाशकाने केलेला दिसत नाही. सामान्यांच्या जगण्याने कितीही पचविले असले तरी
अद्याप मराठी कादंबरीने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले नसल्याचे मोठे उदाहरण ‘अनरउबिक’ या कादंबरीच्या अडकलेपणाने दिले आहे.
‘अनरउबिक’ ही कादंबरी ‘माइलस्टोन’ कादंबऱ्यांच्या पंक्तीमध्ये बसवावी इतकी थोर नसेल कदाचित, पण तिने दाखविलेल्या सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिची विखंडित रचना ही आजच्या काळाशी पूर्णपणे सुसंगत आहे. उदारीकरणापूर्वी आयुष्यभर एक घर, एक नोकरी, लग्न, मुले या एकसुरी कौटुंबिक रचनेच्या टप्प्यांमध्ये या दीड-दोन दशकांमध्ये किती बदल झाला आहे, याचे भवतालात जे दर्शन घडते, त्याचेच रूप ‘अनरउबिक’ दाखविते. ‘अनरउबिक’ या ग्रीक शब्दाचा अर्थ हा श्वासाशिवाय जगणारे जीव असा आहे. त्याचा कादंबरीच्या (असलेल्या किंवा नसलेल्या) आशयाशी काय अर्थ आहे, हा ज्याचा त्याने लावावा. मात्र जागतिकीकरणाच्या राक्षसाने राज्यातील शहर भागांमधील या पिढीवर जे गारूड केले आहे, त्याचे त्रिमितीय दर्शन घेण्याची संधी मात्र या पुस्तकाच्या ई-बुक आवृत्तीमुळे मिळू शकते. आपल्या ग्लोकल जाणिवांची लिटमस चाचणी करून घेण्यासाठी ही कादंबरी उपयुक्त ठरू शकते.
आजच्या घडीला या पिढीतील वाचन गुरू, वाचन गुरव, साहित्य प्रसारक, शिक्षक-प्राध्यापक, नियतकालिके, साहित्य वृत्तपत्रकार यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे, ते योग्यता असलेल्या लेखकांच्या कादंबऱ्या नापासांच्या यादीत जाऊ न देण्याचे. गेल्या पिढीने केलेल्या प्रमादांनी साहित्यविश्वाची रूपरेषा जी आज आहे तशी, डबक्यासमान झाली. मूठभर साहित्यिक आणि दाढीभर साहित्य हळदावलेल्या भामटय़ांमुळे तयार झालेले आजचे चिमुकले मराठी साहित्यविश्व समृद्ध करायचे असेल, तर वाचकांपासून मराठी भाषेशी अवधानाने आणि अनवधानाने संबंध असणाऱ्या सर्वच घटकांनी साहित्यात येणाऱ्या सर्व नव्या आणि वेगळे काही सांगू पाहणाऱ्या प्रवाहांना पचविण्याची ताकद तयार करायला हवी. अन्यथा मराठी वाचनसंस्कृतीच्या त्याच त्या दृष्टचक्रात अडकण्यामुळे स्वीकारण्यासाठी भाषिक बहुपर्याय उपलब्ध असलेल्या आगामी पिढीला मराठीजवळ आणणे अवघड होईल आणि आपले सगळेच साहित्यसंचित नापासांमध्ये मोडेल, असा काळ येईल.