आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहावे, अशी मंडळी समाजातून हळूहळू कमी होत असतानाच डॉ. अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे नाव भारतीयांसमोर आले. त्यांचे प्रचंड कर्तृत्व, मनाला थेट स्पर्शून जाणारे त्यांचे बोलणे, थेट संवाद साधणे, मुलांशी असलेले नाते, तरुणांवर असलेला दुर्दम्य विश्वास आणि व्हिजनचा आधार घेत महासत्ता होण्याचे देशवासीयांसमोर ठेवलेले स्वप्न.. यामुळे प्रत्येक भारतवासीयाला ते आपले वाटत होते. सर्वधर्मीय सामान्य भारतीयाने जिवापाड प्रेम केलेले अलीकडच्या काळातील एकमेव राष्ट्रपती असाच डॉ. कलाम यांचा उल्लेख करावा लागेल. एरवी राष्ट्रपती म्हणजे सत्ताधारी पक्षाचे रबर स्टॅम्प असाच शिक्का या पदावर बसलेला होता. त्या सर्वोच्च पदाला त्यातून मोकळे करण्याचे काम डॉ. कलाम यांनी केले. मरगळलेल्या भारतीय मनांना त्यांनी चेतवले आणि प्रेरणाही दिली. डॉ. कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर देशाला झालेला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वैज्ञानिक आणि देशवासीय यांच्यामध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले. हस्तिदंती मनोऱ्यात आणि वातानुकूलित प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या तमाम वैज्ञानिकांना त्यांनी जाणीव करून दिली की, अंतिमत: हे संशोधन ज्या सामान्य भारतीयांसाठी करता आहात, त्यांच्याशी तुमचा संवाद असलाच पाहिजे. संशोधक-वैज्ञानिकांनी बाहेर पडावे, थोडे खाली उतरावे आणि समाजासोबत संवाद साधावा, असा त्यांचा आग्रह होता. देशातील सर्वोच्च वैज्ञानिक आणि सर्वोच्च पदावरील व्यक्तीचे हे आवाहन खूप काम करून गेले. त्यानंतर तर देशभरातील वैज्ञानिक प्रयोगशाळांतून बाहेर पडून समाजात मिसळताना पाहायला मिळाले. एक वैज्ञानिक देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो तेव्हा नेमका कोणता कायापालट होतो, ते या देशाला त्या निमित्ताने पाहायला मिळाले. कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या डॉ. कलाम यांना सर्वोच्च पदावर बसविणे हे अटलबिहारी वाजपेयी सरकारचे सर्वात मोठे योगदान होते.
डॉ. कलाम यांच्या वैज्ञानिक कर्तृत्वाची आणि लहान मुलांशी असलेल्या नात्याची व देशवासीयांसाठी प्रेरणास्थान ठरल्याची चर्चा खूप झाली. पण राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्याने देशाला किती फायदा झाला, याची चर्चा मात्र तेवढी झाली नाही. कारण त्या संदर्भातील त्यांचे कर्तृत्व देशवासीयांपर्यंत नेमके पोहोचलेच नाही. यातील पहिला किस्सा आहे तो २६ जुलैच्या महाप्रलयानंतरचा. या महाप्रलयानंतर पाहणी करण्यासाठी डॉ. कलाम मुंबईत आले होते. कोणत्याही दुर्घटनेनंतर पंतप्रधान, राष्ट्रपती पाहणी करतात तसेच काहीतरी असेल असे नोकरशहांना वाटले असावे. त्यामुळे त्यांनी एक खूप छान चकचकीत सादरीकरण तयार केले. त्यात मिठी नदीला कसे दरवाजे लावणार, मग पूर कसा येणार नाही. आला तरी मनुष्यहानी व वित्तहानी कशी टळेल आणि मिठी कशी स्वच्छ करून त्यातून जलवाहतूक सुरू करणार अशा अनेक वल्गनांचा समावेश होता. पण ते करणाऱ्यांना विसर पडला होता की, हे सादरीकरण तल्लख बुद्धीच्या व चाणाक्ष निरीक्षण शक्ती असलेल्या एका वैज्ञानिकासमोर होणार आहे. हे सादरीकरण सुरू असताना डॉ. कलाम यांच्या चेहऱ्यावर हसू होते. भयानक दुर्घटनेच्या सादरीकरणात ते हसू काहीसे विरोधाभासात्मक वाटत होते. सादरीकरण संपल्यावर डॉ. कलाम यांनी विचारले की, काही राहिले आहे का सांगायचे. कारण मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही मघाशी म्हणालात की, मिठीला दरवाजे बसवणार. मला जे विज्ञान कळते, त्यानुसार मिठीची खोली अमुक इतकी असेल आणि तिथल्या पाण्याचे आकारमान अमुक इतके असेल तर त्याचे गणित तोंडावर करत त्यांनी सांगितले की, मग त्याच्या प्रवाहाचा वेग अमुक इतका असायला हवा. पण तुम्ही तर म्हणालात की, दरवाजाची लांबी अमुक गुणिले तमुक आहे. तर हे गणित केले आणि त्याला विज्ञानाचा नियम लावला तर हा दरवाजा काही सेकंदात प्रवाहासोबत फेकला जाईल. हे कसे काय रोखणार? अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती कारण त्यांच्याहीपेक्षा गणित आणि विज्ञान पक्के असलेला वैज्ञानिक समोर होता.. नंतरची २० मिनिटे कलाम सरांचा तास मंत्रालयात झाला आणि आम्ही ‘लोकसत्ता’त बातमी केली, मंत्रालयात कलाम सरांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा! हा फरक असतो, वैज्ञानिक राष्ट्रपती झाल्याचा. कारण तुम्ही चकाचक सादरीकरणाचा भूलभुलैया उभा करून त्यांची दिशाभूल करू शकत नाही.
राष्ट्रपतीपदी डॉ. कलाम यांच्यासारखा द्रष्टा वैज्ञानिक आल्यामुळे झालेला दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे देशातील वैज्ञानिक प्रयोगशाळांतून उतरून देशाच्या विविध भागांत फिरू लागले. हे सारे अचानक कसे काय झाले, याचा शोध घेतला तेव्हा प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. चिदम्बरम यांनी उलगडा केला. ते म्हणाले, अरे, या देशामध्ये खूप चांगली मंडळी कानाकोपऱ्यात काम करतात. मग ते चांगले काम देशवासीयांपर्यंत पोहोचावे म्हणून पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र लिहितात. पूर्वी त्या पत्रांचे काय होत होते माहीत नाही. पण कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर पत्र न् पत्र वाचले जायचे. त्यातील महत्त्वाची पत्रे ते स्वत: वाचत. विज्ञान, वैज्ञानिक प्रयोगांशी संबंधित पत्रे वाचल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी वैज्ञानिकांना त्या ठिकाणी पाठवत. सरकारी कामामध्ये अनेकदा कागदावरच काम होते. एक छान कागदी अहवाल तयार केला जातो. पण डॉ. कलाम यांच्या बाबतीत असे शक्य नव्हते. कारण ते वैज्ञानिक होते. वैज्ञानिक प्रश्नांना अहवालानंतर सामोरे जावे लागणार, याची सर्वानाच कल्पना होती. त्यामुळे संशोधकच काय पण त्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येक अधिकारी स्वत: त्या ठिकाणी मग ते कितीही दुर्गम ठिकाण का असेना प्रत्यक्ष जायला लागला. कारण तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले असेल तरच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे शक्य होते.
अशाच एका पत्राचा शोध डॉ. कलाम यांनी वैज्ञानिकांना घ्यायला लावला. त्यासाठी बिहारच्या दरभंगा जिल्ह्य़ातील दुर्गम ठिकाणी असलेल्या डॉ. दोशी यांच्या प्रयोगाची छाननी करायला लावली. डॉ. दोशी दुर्गम भागात काम करायचे जिथे वीज नव्हती. त्यांना एकदा प्रश्न पडला की, घराच्या बाजूने वाहणारा ओढा बारमाही असतो. त्यावर वीज तयार करता येईल का. विज्ञानाचे तत्त्व सर्वत्र लागू व्हायला हवे. फारतर काय होईल कमी प्रमाणात वीजनिर्मिती होईल. ते कामाला लागले आणि त्यांच्या कल्पनेतून भारतातील पहिला मायक्रो हायड्रो म्हणजे अल्पवीजनिर्मिती करणारा जलविद्युत प्रकल्प आकारास आला. वैज्ञानिकांच्या छाननीमध्ये हा प्रकल्प व्यवस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. कलाम यांनी बारमाही लहानसे प्रवाह असलेली आणि वीज नसलेली देशातील ठिकाणे शोधण्याचे आदेश दिले. त्यात त्यांना असे लक्षात आले की, काश्मीरमधील उडी (याला उरी असेही म्हणतात) या भागात अशीच स्थिती आहे. मग सर्व सैन्यदलांचे प्रमुख असलेल्या डॉ. कलाम यांनी हे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर या भागात राबविण्याचे आदेश भारतीय लष्कराला दिले. पूर्वी अंधारात असलेले उडी आता प्रकाशमान झाले आहे. एक वैज्ञानिक सर्वोच्च ठिकाणी पोहोचला की, देश असा प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करू लागतो!
डॉ. कलाम यांच्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने म्हणूनच त्यांचे स्मरण प्रेरणादायी ठरावे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती होण्यापूर्वीची गोष्ट. नवी मुंबईच्या एसआयईएस संकुलामध्ये एक कार्यक्रम होता. त्या वेळेस ते भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहत होते. विज्ञानविषयक वार्ताकन करणारा पत्रकार म्हणून अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना जाण्याचा व गप्पा मारण्याचाही योग आला होता. गेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये मात्र ते सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करत होते. जगातील सर्वाधिक बलशाली राष्ट्र व्हायचे किंवा जागतिक महासत्ता व्हायचे तर आपल्याकडे म्हणजेच भारताकडे व्हिजन असायला हवी.
सर्वसाधारणपणे व्हिजन या शब्दाचा मराठी अनुवाद करताना आपण दूरदर्शीपणा असा ढोबळ अर्थ लावतो. पण डॉ. कलाम यांना जी व्हिजन अपेक्षित होती, ती या दूरदर्शीपणाहूनही वेगळी अशी गोष्ट असावी, असे त्यांच्या भाषणांतून सातत्याने जाणवायचे. म्हणून ई-मेलवरून संपर्क साधत त्या दिवशी कार्यक्रमाआधीची पाच मिनिटे त्यांच्याकडून मागून घेतली. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या १० मिनिटे आधीच त्यांची भेट झाली. थेट प्रश्न केला, तुम्हाला अपेक्षित व्हिजन म्हणजे नेमके काय? त्यावर ते म्हणाले, ‘‘एखादी गोष्ट अस्तित्वात नसतानाही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून विज्ञानातील तत्त्वे आणि वैज्ञानिक तर्कशास्त्राच्या आधारे भविष्याची आखणी किंवा बांधणी करणे म्हणजे मला अपेक्षित व्हिजन होय.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘ही व्याख्या झाली, पण अद्याप मनात नेमके स्पष्ट होत नाहीए..’’ असे सांगितल्यावर मात्र मग ते शिक्षकाच्या भूमिकेत शिरले आणि म्हणाले, ‘‘दोन उदाहरणे सांगतो. मग मला नेमके काय म्हणायचे, ते तुला कळेल.’’
ते म्हणाले, ‘‘मी एकदा प्रयोगशाळेत रात्री उशिरापर्यंत काम करत होतो, त्या वेळेस भारतीय अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाचे जनक असलेले डॉ. विक्रम साराभाई प्रयोगशाळेत चक्कर मारण्यासाठी आले. रात्री उशिरापर्यंत काम करताना पाहून त्यांनी विचारणा केली, ‘काय करतोयस.’ मी त्यांना म्हटले, सर मला उपग्रह तंत्रज्ञानामध्ये रस आहे. त्यावर ते म्हणाले, ‘एक काम कर.. तू कामाला लाग आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या तिसऱ्या टप्प्याचे डिझाइन करायला घे.’ खरे तर माझ्यासाठी ते तसे अनपेक्षित होते. जगातील पहिल्या टप्प्याचे डिझाइन अमेरिका आणि रशियाने यशस्वी केले होते. दुसऱ्या प्रगत टप्प्यावर त्यांचे काम सुरू होते आणि जगातील तिसरा टप्पा अस्तित्वात यायचा होता. अशा वेळेस माझ्यासारखा मुलगा तिसऱ्या टप्प्याचे काम कसे करणार, असा प्रश्न मला पडला होता. तो मी डॉ. साराभाई यांना विचारलाही. त्यावर ते उत्तरले, अरे सोपे आहे. व्हिजन ठेवले की, काम होते. तुला विज्ञान व वैज्ञानिक तत्त्व माहीत आहे, आता वैज्ञानिक तर्कशास्त्राचा वापर कर आणि कल्पकता व सृजनशीलतेचा वापर कर, यालाच व्हिजन म्हणतात. डिझाइन चुकणार नाही.. असे म्हणत डॉ. साराभाई निघूनही गेले. मी मात्र गडबडलो होतो. पण त्यांनी दिलेला व्हिजनचा कानमंत्र घोकून काम करायला सुरुवात केली.
सुमारे दोन वर्षांनंतर डॉ. साराभाई एकदा माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘अरे, ते तिसऱ्या टप्प्याच्या डिझाइनचे काम कुठपर्यंत आले.’ मी त्यांना म्हटले, सर केवळ डिझाइन तयार आहे. त्यावर ते म्हणाले, ‘उद्या कॅनडाचे शिष्टमंडळ येणार आहे, त्यांच्यासमोर त्याचे सादरीकरण कर. त्यांच्याकडे दुसरा टप्पा विकसित झाला आहे. तिसऱ्या टप्प्याचे डिझाइन त्यांना आवडले तर आपण ते त्यांना विकू आणि त्यातून आपल्या देशाला परकीय चलन मिळेल. त्यातून अधिक चांगले संशोधन करता येईल.’ माझ्यापेक्षा त्यांनाच माझ्यावर जास्त विश्वास होता. दुसऱ्या दिवशी मी सादरीकरण केले आणि कॅनडाने तिसरा टप्पा भारताकडून विकत घेतला.
त्यानंतर माझा रोल बदलला होता. मी चेन्नई आयआयटीमध्ये शिकवत होतो. आणि रात्रीच्या वेळेस प्रयोगशाळेत चक्कर मारत होतो. त्या वेळेस तीन-चार तरुण काही काम मन लावून करत असल्याचे दिसले. मी त्यांना विचारले, ‘काय करताय?’ त्यांना सुपर कॉम्प्युटर अर्थात महासंगणकामध्ये रस होता. मग मी त्यांना म्हटले की, केवळ वाचन काय करताय. प्रत्यक्षात तयार करा, महासंगणक. ते म्हणाले, ‘सर, कसा करणार?’ मी त्यांना म्हटले, व्हिजन ठेवा, काहीच अशक्य नाही. मग मी त्यांना तेच वैज्ञानिक तत्त्व, वैज्ञानिक तर्कशास्त्राचे गणित समजावून सांगितले.
या दोन्ही घटनांचा फायदा असा झाला की, अमेरिकेने भारताला उपग्रह तंत्रज्ञान प्रथम नाकारले तेव्हा माझे गुरू डॉ. साराभाई यांच्या प्रेरणेने, त्यांनी दिलेल्या व्हिजनने तयार केलेला तिसरा टप्पा आपल्याकडे तयार होता. त्यामुळे आपल्याला अमेरिकेने तंत्रज्ञान नाकारण्याचा फारसा फरक पडला नाही. आणि नंतर अमेरिकेने महासंगणकाचे तंत्रज्ञान नाकारले तेव्हाही फिकीर नव्हती, कारण चेन्नई आयआयटीमध्ये त्या तरुणांनी महासंगणक तयार केलेला होता. तरुणांमध्ये तुफान ऊर्जा असते त्याला व्हिजनची जोड दिली की, काम भागते. हेच व्हिजन मला देशाच्या संदर्भात अपेक्षित आहे. कारण ते असेल तर अमेरिकाच काय जगातील कोणत्याही देशाची तमा बाळगण्याची गरज आपल्याला भासणार नाही. मला स्वबळावर उभा राहिलेला भारत पाहायचाय. व्हिजन ठेवा. व्हिजन हाच आपला गुरू. हे व्हिजन प्रत्येक भारतीयाला असेल तर आपल्याला महासत्ता होण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही..’’ पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, ‘‘आता तुला कळले असेल मला काय म्हणायचेय ते!’’
असा हा एक शिक्षक, सामान्यांचा असामान्य गुरू एक महत्त्वाचा धडा सहज देऊन गेला.
समस्त भारतीयांनी आणि सर्व धर्मीयांनी जिवापाड प्रेम केलेले डॉ. अब्दुल कलाम गुरुपौर्णिमेच्या चार दिवस आधीच गेले, त्यावेळेस ही आठवण पुन्हा ताजी झाली. त्यांना अपेक्षित असे ते व्हिजन प्रत्येक देशवासीयाने राखणे आणि महासत्ता होण्याच्या दिशेने देशाने मार्गक्रमण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल!
01vinayak-signature

Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!