‘जे दु:ख आपण भोगलं ते इतरांच्या वाटय़ाला न येवो’ असा विचार करणं हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्टय़! कालिदासाने याच श्रेष्ठ विचाराने मेघदूताचे समापन केले.

यक्षाला खात्री आहे, दिवसा कोणत्या ना कोणत्या कार्यात स्वत:ला अडकवून एकाकीपणा दूर करून घेतला तरी रात्रीच्या वेळी सारी विरहवेदना, एकटेपणा पत्नीच्या मनात उफाळून येणार. तिची त्या वेदनेतील अवस्था यक्षाच्या डोळ्यासमोर उभी राहात आहे,
‘विरहाच्या तीव्र वेदनेने अशक्त झाल्यामुळे एका कुशीवर झोपलेली ती पूर्व क्षितिजावरील बारीक कलेच्या रूपात उरलेल्या चंद्राप्रमाणे दिसेल. कोणे एकेकाळी एकमेकांच्या संगतीत एका क्षणात संपल्यासारख्या वाटणाऱ्या रात्री आता मात्र तिला न संपणाऱ्या वाटत असतील. स्वप्नात तरी माझी भेट होईल अशा अपेक्षेने ती झोपेचा विचार करत असेल पण दुर्दैवाने डोळ्यातून अखंड वाहणाऱ्या अश्रूंनी तेही सौभाग्य तिच्या वाटय़ाला येणार नाही. तिच्या उष्ण व दीर्घ नि:श्वासांनी एकेकाळी कोवळ्या पालवीसारखा लालसर असणारा तिचा अधरोष्ठ आता पांढरा पडला असेल.’
‘माझ्या विरहात स्वत:कडे तिने अजिबात लक्ष न दिल्याचे तुला तिच्याकडे पाहताच लक्षात येईल. नीट वेणीफणी न केल्याने एक वेळ मऊशार असलेले केस आता रखरखीत झाले असतील, मी नसल्याने केसात फुलं माळण्याचा प्रश्नच येणार नाही आणि असे हे सौंदर्य गमावलेले गालावर पुन:पुन्हा येणारे ‘एकवेणी’तील केस ती आपल्या नाजूक पण नखं न कापलेल्या हातांनी दूर करत असेल. थोडक्यात स्वत:कडे तिचं अगदीच दुर्लक्ष झालेलं असेल. अशा त्या माझ्या प्रियेच्या केसांची वेणी मी माझ्या हातांनी हा शाप संपला की घालीन.’
यक्षपत्नीला पूर्व दिशेच्या चंद्रकलेची सुयोग्य उपमा कालिदासाने दिली आहे. पूर्वेला दिसणारी चंद्रकला ही मावळतीची आहे. म्हणूनच तेजहीन आहे. यक्षपत्नीचं हे सारं वर्णन संस्कृत साहित्यातील प्रोषितभतृका नायिकेचं आहे. ‘एकवेणी’ हे प्रोषितभतृका नायिकेचं एक महत्त्वाचं लक्षण. विरहावस्थेत केसांचा शृंगार विसरल्यामुळे एकवेणी धारण करणाऱ्या पत्नीची वेणी, पती परत आल्यावर स्वत:च्या हातांनी सोडून पुन्हा घालत असे. त्या केसांचा साज-शृंगार करत असे.
या विरहकाळात आपला संदेश मेघाने प्रिय पत्नीला देऊन आनंदित करावे अशी यक्षाची स्वाभाविक अपेक्षा आहे. पण तो संदेश देताना कोणताही धसमुसळेपणा मेघाकडून व्हायला नकोय, म्हणून घराशी गेल्याबरोबर मेघाने संदेश द्यावा आणि निघून यावं असं यक्षाला वाटत नाही. मग तो सांगतो, ‘माझा संदेश द्यायला तू जाशील तेव्हा शयनगृहाच्या वातायनावर बसून आत डोकाव. तिची मगाशी मी तुला सांगितलेली अवस्था माझ्यासाठी सुखावह नक्कीच नसली तरी तिच्या मी केलेल्या वर्णनात कोणतंही अतिरंजन तुला दिसणार नाही आणि तिची ही अशी अवस्था पाहून मला खात्री आहे तुझ्याही डोळ्यात अश्रू येतील. कारण ‘प्राय: सवर भवति करुणावृत्तिराद्र्रान्तरात्मा’ मृदू हृदयाच्या लोकांचं हेच तर लक्षण आहे.’ तू जेव्हा वातायनावर बसशील तेव्हा शुभशकुनाचा संकेत तिला होईल. काजळ नसलेले तिचे अश्रुपूर्ण नेत्र शुभसूचक फडफडायला लागतील तेव्हा माशांच्या फिरण्याने थरथरणाऱ्या नीलकमलाप्रमाणे दिसतील.’
‘कदाचित तिला थोडय़ा वेळासाठी निद्रासुख अनुभवास येत असेल. या कालावधीत माझ्या मीलनाचा स्वप्नानुभव ती घेईल. अशा वेळी वीजेचा कडकडाट करून तू तिच्या सुखाच्या आड येऊ नकोस. तिच्या सुखाचा हा कालावधी केवळ याममात्र म्हणजे तीन तासांचा असेल. त्यानंतरसुद्धा तिला गडगडाटाने उठवण्यापेक्षा आपल्या शीतल जलकणांचा हलका शिडकावा करून उठव. उठल्यावर तिची नजर वातायनावर बसलेल्या तुझ्याकडे जाईल. तेव्हा त्या मानिनीशी आपल्या विद्युतरूपी शब्दांनी संभाषण करायला सुरुवात कर. सर्वप्रथम तिला तिच्या सौभाग्याची, सुभाग्याची जाणीव करून दे,
भर्तुर्मित्रं प्रियमविधवे विद्धि मामाम्बुवाहं
तत्संदेशैर्हृदयनिहितरागतं त्वत्समीपम्।
यो वृन्दानि त्वरयति पथि श्राम्यतां प्रोषितानां
मन्द्रस्निग्धध्र्वनिभिरबलावेणिमोक्षोत्सुकानि॥
‘अगं, तू अविधवा आहेस. तुझ्या प्रिय पतीचा संदेश घेऊन आलेल्या मला त्याचा अगदी जवळचा मित्र समज. मी तो मेघ आहे जो आपल्या घनगंभीर तरीही श्राव्य अशा आवाजाने दूर देशी असलेल्या प्रवाशांना आपल्या स्त्रियांची एकवेणी सोडण्यास प्रवृत्त करतो.’
नसíगक वस्तूंना चेतना देऊन त्यांच्याकडून मानवी कार्य करून घेण्यात कालिदास पारंगत. तो मेघाला दूत करतो तर विजेलाही चेतनागुण देतो. कुमारसंभवात नेत्र बनून तीच वीज पार्वतीच्या तपाची साक्षीदार होते तर येथे वाणी बनते.
शापाच्या दिवसापासून यक्ष पत्नीला यक्षाची कोणतीच बातमी मिळालेली नाही. हा काळ आठ महिन्यांचा आहे. या कालावधीत जीवनाचं ‘आलंबन’ तिच्यासाठी उरलं आहे किंवा नाही ते तिला कळलच नव्हतं. त्यामुळे ‘अविधवा’ हे विशेषण एका क्षणात तिला जगण्याचा आधार देऊन जाते आणि वेणिमोक्ष होणार हा विश्वास ते जगणं आनंददायी करतो. या वेणीमोक्षातून विरही प्रेमीजनांना जवळ आणण्याचं मेघाचं महत्कार्य अधोरेखित होतं.
निर्वविादपणे मेघदूत ही कविकल्पना आहे, कवीची स्वत:ची निर्मिती आहे. पण कालिदासाच्या साहित्यावरील ज्येष्ठ टीकाकार मल्लिनाथाच्या मते निश्चितपणे रामाने हनुमंताकरवी सीतेला पाठवलेल्या संदेशाचा प्रभाव होता. अनेक ठिकाणी याची प्रचीती येते. मी तुझ्या पतीचा जवळचा मित्र आहे असं म्हटल्यावर यक्षपत्नीचे केलेले वर्णन रामायणातल्या सीतेच्या वर्णनाशी जुळते. यक्ष आपल्या पत्नीची सरळ सरळ सीतेशी तुलना करताना दिसतो. तो म्हणतो,
इत्याख्याते पवनतनयं मथिलीवोन्मुखी सा
त्वामुत्कण्ठोच्छ्वसितहृदया वीक्ष्य संभाव्य चव..॥
जेव्हा तू तिला भर्तुर्मित्रं .. माम् विद्धि असं म्हणशील तेव्हा मथिलीप्रमाणे चेहरा वर करून तुझ्याकडे कौतुकाने पाहील. रामायणात देखील झाडावर बसलेल्या हनुमंताकडे सीतेला चेहरा उचलून पाहावे लागले होते. तिचे असे लक्ष गेल्यावर सर्वप्रथम तू तिला मी रामगिरीवर कुशल असून तिचे कुशल-मंगल विचारल्याचे सांग. आपल्या पत्नीची विरहावस्था केवळ कल्पनेने अनुभवणाऱ्या यक्षाला आपलीही दूरवस्था पत्नीने ऐकावी असे वाटते. कारण स्वाभाविक आहे. ज्याच्या विरहात आपण तळमळत आहोत तोही आपल्या विरहात तसाच तळमळत आहे ही जाणीव विरहातला ताप सह्य़ करणारी असते. यासाठी यक्षाचा विरह शब्दरूपात पत्नीसमोर येतो. केवळ दुर्दैववशात तुझ्यापासून दूर असलेला, विरहात होरपळणारा, बारीक झालेला, दु:खाने नि:श्वास टाकणारा, तुझ्या भेटीची उत्कंठा असलेला, तुझ्याच प्रमाणे अश्रू गाळणारा मी तुझ्या सगळ्या अवस्थांतून जात आहे. यक्षाची अवस्था पाहून वाटतं खूप दूर असुनसुद्धा यक्ष जणू काही आपल्या पत्नीच्या रूपात एकरूप होत आहे.
दोघांमधले छोटे छोटे प्रसंग यक्षाला अगदी जसेच्या तसे स्मरत आहेत,
शब्दाख्येयं यदपि किल ते य: सखीनां पुरस्ता
त्कर्णे लोक: कथयितुमभूदाननस्पर्शलोभात्।
सोतिक्रान्त: श्रवणविषयं लोचनाभ्यामदृष्ट
स्वामुत्कण्ठाविरचितपदं मन्मुखेनेदमाह॥
‘बघ आठवतं तुला, तुझ्या सख्या समीप असताना सगळ्यांच्या देखत सांगण्यासारखी गोष्टसुद्धा, तुझ्या मुखाला स्पर्श करण्याच्या अभिलाषेने, मी तुला कानात सांगितली होती. आज मात्र तो तुझ्या दृष्टीपासूनच नव्हे तर श्रवणापासूनसुद्धा फार दूर गेला आहे. पण त्याचे शब्द तू माझ्या मुखाने ऐक. पुढले नऊ श्लोक यक्षाचा संदेश आहे..
‘मी तुझी सडपातळ देहयष्टी श्यामा नावाच्या वेलीत, तुझे नेत्रकटाक्ष बावरलेल्या हिरणीमध्ये, तुझा केशसंभार मोराच्या पिसाऱ्यात आणि तुझे भ्रुभंग नदीच्या तरंगात पाहतो. पण प्रिये या सगळ्याला मर्यादा आहेत. जे सौंदर्य तुझ्या ठायी एकवटलं आहे ते मला अनेक ठिकाणी शोधावं लागत असल्याने माझे प्रयत्न निर्थक आहेत.’
संस्कृत साहित्यात स्त्रीच्या सडपातळ देहाची तुलना श्यामा वेलीशी, नेत्रांची हरिणीच्या नेत्रांशी आणि केशसंभाराची मोरपिसाऱ्याशी केली जाते. ज्याला उपमा द्यायची ते उपमेय व ज्याची उपमा द्यायची ती श्रेष्ठ गोष्ट उपमान असते. थोडक्यात स्त्री उपमेय व बाकीच्या गोष्टी उपमान असतात. पण यक्षपत्नी इतकी सुंदर आहे की कालिदासाने हा सारा क्रमच उलटा केला आहे.
‘मगाशी सांगितलेल्या साऱ्या गोष्टी जेव्हा निर्थक ठरतात तेव्हा धातूच्या रंगांनी मी तुझे चित्र रामगिरीच्या शिळांवर काढून स्वत:ला तुझ्या पायांवर झोकून देऊ पाहतो, पण दुर्दैवाने त्याच वेळी डोळ्यात पुन:पुन्हा उभ्या राहिलेल्या अश्रूंनी ती भेटही होऊ शकत नाही.’
‘तुझ्याप्रमाणेच मला क्वचित झोप लागते आणि मग स्वप्नात मी तुला बाहुपाशांत घेण्यासाठी हात पसरतो तेव्हा माझं दुर्दैव पाहून तिथे असलेल्या वनदेवतासुद्धा मोत्यांसारखे आपले अश्रू किसलय म्हणजे कोवळ्या पालवीवर गाळतात.’
‘हिमालयातील नुकतीच पालवी फुटलेल्या देवदारूमधून येणाऱ्या आणि दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मी आिलगन देतो ते केवळ तुझ्या शरीराला स्पर्शून आल्यामुळे सुगंधित झाले आहेत म्हणून.’
वरील सर्व श्लोकांत विरहवेदना कमी होण्यासाठी सदृशावलोकन, चित्रकर्म, स्वप्नदर्शन आणि आिलगन अशी जी विनोदनं सांगितली आहेत त्याचा उपयोग करत कालिदासाने यक्षाची व्यथा नेमकेपणाने मांडली आहे. शकुन शास्त्रात देवतांचे अश्रू जमिनीवर पडणे ही फार मोठी आपत्ती मानली जाते. म्हणून कालिदासाने त्यांचे अश्रू जमिनीवर पडू न देता किसलयांवर म्हणजेच कोवळ्या पालवीवर पाडले आहेत. ह्य़ातच यक्ष व यक्षपत्नीचा शुभकाल व्यक्त होतो.

मेघदूत हे विरहकाव्य! आणि त्यासाठी वापरलेलं वृत्त मंदाक्रांता. ‘मंद आक्रांत’ हळूहळू पुढे जातं ते मंदाक्रांता. शिवाय हे वृत्त प्रवास, पाऊस आणि करुण प्रसंगांचं वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. यक्षाची करुण वेदना, पाऊस देणारा मेघ आणि दौत्याच्या निमित्ताने मेघाचा प्रवास साऱ्या गोष्टी अगदी एकवटून आल्या असताना मंदाक्रांता वृत्ताशिवाय दुसऱ्या वृत्ताचा विचार कालिदासाच्या मनात कसा येईल?

‘वनदेवता आपले अश्रू जमिनीवर पडू न देता मीलनाचा शुभसंदेश देत असली तरी या दीर्घ रात्री काही एखाद्या क्षणाप्रमाणे होणार नाहीत किंवा दिवसाचा ताप कमी होणार नाही त्यामुळे तुझ्या वियोगात केवळ मानसिक ताप वाढत चालला आहे. ही सारी अशी अवस्था असली तरी मी माझी काळजी घेत आहे म्हणून तू फार दु:ख करू नकोस. आजची विपन्नावस्था जाऊन पुन्हा एकदा संपन्नस्थिती प्राप्त होणार कारण ‘नीचर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण’ रहाटगाडगं वर-खाली होतच राहातं.’
‘यक्षाचा हा शाप संपणार आहे सर्परूपी र्पयकावरून भगवान विष्णू उठतील तेव्हा. हा काल आता केवळ चार महिन्यांचा उरला आहे आणि त्यानंतर विरहकालात ज्या ज्या सुखाला दोघं पारखे झाले आहेत ती सुखं पुरेपूर उपभोगू.’ सुखाचा उपभोग घेण्याचं वचन यक्ष मेघाद्वारे आपल्या पत्नीला देत आहे.
एवढं सारं सांगितल्यानंतर आता दूताची परत फिरायची वेळ आली तरी अजूनही आपल्या पत्नीच्या मनात त्याच्याविषयी शंका असेल असे भय यक्षाच्या मनात आहे आणि आपल्या कार्यासाठी एवढय़ा दूपर्यंत प्रवास करणाऱ्या, दोघांच्याही जीवनाचं आलंबन असणाऱ्या आपल्या ह्य़ा मित्रावर पत्नीनी संशय घ्यावा ही गोष्ट काही यक्षाला पटत नाही आणि मग तो एक गु मेघाला सांगतो. येथे कालिदासवर असलेला रामायणाचा प्रभाव दिसतो. हनुमंताला सीता कदाचित रावणाचा कामरूप सेवक समजण्याची भीती रामाच्या मनात होती आणि असं झालं तर सीता त्याच्याशी संभाषण करणार नाही हे रामाला माहीत होते. त्यामुळे रामाने हनुमंताला इतरांना अज्ञात असा केवळ त्या दोघांमधला एक प्रसंग सांगितला. अगदी त्याचप्रकारे यक्षाने त्या दोघांमधला नाजूक प्रसंग मेघाला आपल्या पत्नीला सांगायला सांगितला,
‘माझ्या गळ्याला मिठी मारून गाढ निद्रेत असताना अचानक रडत उठलीस. मी अनेकदा विचारल्यावर, दुष्टा स्वप्नात तू दुसऱ्या स्त्रीच्या मागे लागल्याचं पाहिलं, असं लाजून सांगितलं होतंस.’ अगदी तुमच्यातलं हे गोड गुपित ज्याअर्थी यक्षाने मला सांगितलं त्याअर्थी मी त्याचा किती जवळचा मित्र आहे याविषयी आता तू कोणतीच शंका धरू नको. आणि हो, जाता जाता मी एकच सांगतो,
फार दीर्घ विरहाने प्रेम नष्ट होतं असा दुष्ट लोकांनी पसरवलेला प्रवाद तुम्हा दोघांकडे पाहून गाडला पाहिजे असं मला वाटतं, कारण आता माझं स्पष्ट मत आहे की खऱ्या प्रेमीजनांच्यात ते अधिकच वृद्धिंगत होतं’
येथे दूर असूनसुद्धा दोघांतलं प्रेम वृद्धिंगत होत असल्याचं कौतुक जसं यक्षाला आहे, तसंच कदाचित तुझा पती तुला विसरला असं लोक आपल्या पत्नीला सांगत असतील अशी भीती त्याच्या मनात आहे. म्हणून तो त्यांच्यातील प्रेमाची ग्वाही मेघमुखातून देतो. आता एक शेवटची विनंती परत फिरण्यापूर्वी तो मेघाला करतो,
‘हे मेघा, तुझ्या प्रिय सखीच्या दु:खात माझा निरोप सांगून तू ते हलकं केलंस. आता प्रात: कुन्दप्रसवशिथिलं जीवितं धारयेथा: सकाळच्या वेळी शिथिल झालेल्या कुंदफुलाप्रमाणे असलेल्या माझ्या आयुष्यासाठीही प्रार्थना कर, त्याच वेळी तिचा संदेश मला दे.
उपमा अलंकार वापरावा तो कालिदासानेच. येथे सकाळच्या वेळच्या कुंदफुलाची यक्षाला दिलेली उपमा ‘उपमा कालिदासस्य’ ही उक्ती सार्थ ठरवते. कुंदफुलं रात्री उगवतात आणि सकाळच्या वेळी अलगद गळून पडतात. शापाची रात्र सरत आली असली तरी कुठल्याही क्षणी गळून पडणाऱ्या त्या कुंदफुलासारखी यक्षाची नाजूक अवस्था झाली आहे. आपण गळून पडण्याआधी तिचा संदेश मिळाला तर उरलेले थोडे दिवस कशीबशी तग धरता येईल. त्याच्याच जोडीला मेघाच्या प्रार्थनेमुळे जगण्याचं पाठबळ मिळेल. यक्षाचा संदेश या ठिकाणी संपतो.
प्रत्येक ग्रंथाचा उपक्रम आणि उपसंहार म्हणजे आरंभ आणि अंत हा एकमेकांशी जुळणारा असावा, असा संस्कृत साहित्याचा नियम आहे. कालिदास साहित्यशास्त्राचा अभ्यासक आहे. सगळ्या नियमांचं पालन तो कटाक्षाने करतो. मेघदूताच्या आरंभी मेघाला दूत म्हणून पाठवताना आपण वेडेपणा करत आहोत याची यक्षाला जाणीव आहे म्हणूनच तो म्हणतो,
धूमज्योति: सलिलमरुतां संनिपात: क्व मेघ:
संदेशार्था: क्व पटुकरण: प्राणिभि: प्रापणीया:।
संभाषणात कुशल अशी व्यक्ती दूत म्हणून पाठवणं कुठे आणि धूम, तेज, पाणी आणि वारा यांपासून बनलेला निर्जीव मेघ कुठे? पण कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्र्च्ोतनाचेतनेषु अरे कामार्ताला चेतन आणि अचेतन यांतील फरक कळला असता तर हा वेडेपणा मी केला असता?
दूत म्हणून मेघाला पाठवण्याआधी आपण ही शंका घेतली होती हे यक्षाच्या लक्षात आहे आणि म्हणून संदेश सांगून झाल्यावर तो म्हणतो,
‘हे सौम्या, तू काही बोलत नाहीस. तुझ्या बंधूचं हे कार्य तू स्वीकारलंस असं मी समजू का? अर्थात तुझ्याकडून मला उत्तराची अपेक्षा नाही, कारण तुझ्याकडे पाण्याची याचना करणाऱ्या चातकाला तू नि:शब्दपणे पाणी देतोस. श्रेष्ठ लोक न बोलता कार्य करतात. तुझं श्रेष्ठत्व मी जाणतो. तू देवराज इंद्राचा खास सेवक, पुष्करावर्तासारख्या महान कुळातला त्यामुळे तुझी नि:शब्दता हाच तुझा होकार मी मानला आहे.’
कृतघ्न होणं ही भारतीय परंपरा नाही मग यक्ष त्याला अपवाद कसा असेल? रामगिरीपासून अलकेपर्यंत केवळ आपल्यासाठी प्रवास करत गेलेल्या ह्य मेघाला त्याच्या महत्कार्याचं फळ द्यायला यक्ष विसरत नाही.
‘मला जाणीव आहे, तुझ्या योग्य कार्य काही मी तुला दिलेलं नाही. तू मात्र हे कार्य स्वीकारलंस ते माझ्यावरील प्रेमाखातर किंवा माझ्याविषयीच्या अनुकंपेतून. मित्रा, माझा संदेश देऊन झाल्यावर मग मात्र तू तुला हव्या त्या प्रदेशात प्रवास कर. आणि हो, जो वियोग माझ्या वाटय़ाला आला तसा तुझी पत्नी विद्युतेपासून तुझा वियोग कधी न होवो.’
‘जे दु:ख आपण भोगलं ते इतरांच्या वाटय़ाला न येवो’ असा विचार करणं हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्टय़! कालिदासाने याच श्रेष्ठ विचाराने मेघदूत संपवलं आहे. स्वत:च्या वाटय़ाला आलेलं पत्नीविरहाचं दु:ख मेघाच्या वाटय़ाला कधीही न येवो या सदिच्छेने मेघदूत हे काव्य संपतं. एकशे अकरा श्लोक म्हणजे चारशे चव्वेचाळीस चरणांचं मेघदूत संपतं तेव्हा वाचकांच्याही मनात पाझरत जाणारी विरहातील वेदना अलगद शांतरसात परिवíतत होते. पती-पत्नीतील एकनिष्ठ प्रेम पाहून वाचक एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचतो.
वियोग किंवा विरह हा कधीच चटकन न संपणारा. मेघदूत हे विरहकाव्य! आणि त्यासाठी वापरलेलं वृत्त मंदाक्रांता. ‘मंद आक्रांत’ हळूहळू पुढे जातं ते मंदाक्रांता. शिवाय हे वृत्त प्रवास, पाऊस आणि करुण प्रसंगांचं वर्णन करण्यासाठी वापरलं जातं. यक्षाची करुण वेदना, पाऊस देणारा मेघ आणि दौत्याच्या निमित्ताने मेघाचा प्रवास साऱ्या गोष्टी अगदी एकवटून आल्या असताना मंदाक्रांता वृत्ताशिवाय दुसऱ्या वृत्ताचा विचार कालिदासाच्या मनात कसा येईल?

मेघदूत काव्य मेघसंदेश याही नावाने ओळखले जाते. मेघदूतावर जवळपास पस्तीस टीका लिहिल्या गेल्या. भगवद्गीता आणि बायबलच्या खालोखाल टीका लिहिलं गेलेलं पुस्तक म्हणजे मेघदूत! दूतकाव्य लिहिणारा कालिदास हा पहिला कवी. त्याच्या या दूतकाव्याची मोहिनी एवढी मोठी की त्यानंतर अनेक दूतकाव्यं लिहिली गेली, पण काव्यप्रतिभेत ती मेघदूताजवळसुद्धा पोचली नाहीत.
मेघाचा सारा मार्ग उंच आकाशातून जाताना दिसतो. अनेक ठिकाणी याची प्रचीती येते. मेघाच्या मार्गात सगळीकडे स्त्रियांचे डोळे वर करून टाकलेले नेत्रकटाक्ष, उंचावरून वल्मीकाग्रावर दिसणारं इंद्रधनुष्य, आम्रकूट किंवा कोणत्याही पर्वताच्या शिखरावर काही क्षण विश्रांती घेऊन पुढचा प्रवास, पांढऱ्या शुभ्र नदीवर ओथंबून आलेला कृष्णमेघ हा मोत्याच्या सरातील नीलमण्याप्रमाणे भासणे हे चित्र फार उंचीवरून पाहिल्याशिवाय स्पष्ट होणार नाही. काव्यातील यांसारख्या संदर्भावरून काही विद्वानांच्या मते कालिदासाने हा सारा प्रवास विमानातून केला असावा तर काही लोकांच्या मते कालिदासाने केवळ कल्पनेतून हा प्रवास केला असावा. कालिदास खरंच विमानातून फिरला का? याविषयी सकृद्दर्शनी अजून तरी कोणताही पुरावा उपलब्ध नाही. अर्थात त्यामुळे कालिदासाचं महत्त्व कुठेच कमी होत नाही. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीला अनुसरून कालिदासाने आकाशस्थ मेघाचा सारा प्रवास फार उंचावरून करवला आहे. कोणी म्हणेल की, त्यात काय मेघ आकाशात असल्याने त्याच्याकडे डोळे वर करूनच पाहावे लागेल किंवा मेघ पर्वतशिखरावर राहाणार यातही काही विशेष नाही. अगदी बरोबर. पण मेघाला दिलेली मोत्याच्या सरातील नीलमण्याची उपमा ही फक्त अतिउंचावरूनच लक्षात येणारी गोष्ट आहे. त्यामुळे कालिदास प्रत्यक्ष विमानाने फिरला किंवा प्रतिभेच्या द्वारे आकाशगमन करून आला यातील काहीही झालं असलं तरी या प्रवासात तो कुठेही खाली आलेला दिसत नाही.
मेघाच्या मार्गाबरोबर आपणही एका वेगळ्या उंचीवर जातो. हा प्रवास असाच सुरू राहावा असं वाटत असतानाच काव्य संपतं तेव्हा आपणही काव्यप्रतिभेच्या एका उच्च आनंदात रममाण झालेले असतो.
(समाप्त)