कालिदासाचं मेघदूत हे महाकाव्य म्हणजे संस्कृत साहित्यामधला अनमोल ठेवा. आपल्या प्रिय पत्नीला मेघाच्या मार्फत निरोप पाठवणारा यक्ष मार्गात येणाऱ्या विविध नद्या, नगरं, थांबण्याची ठिकाणं यांची अशी वर्णनं करतो आहे की ते तपशील टिपणाऱ्या कालिदासाचा अचंबा वाटावा.

‘मरग तावच्छृणु’ म्हणजे, तुझ्या प्रयाणाचा मार्ग ऐक, असं म्हणून यक्षाने अलकेचा मार्ग सांगायला सुरुवात केली. कालिदास हा निसर्गकवी आहे. निसर्गाविषयी विलक्षण आत्मीयता असल्याने त्यातल्या अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीसुद्धा त्याच्या नजरेतून सुटत नाहीत. आणि मग या सगळ्याचा सुयोग्य वापर तो आपल्या साहित्यात करतो.
महिना पावसाळ्याचा, मार्ग अलकेचा आणि सिद्धहस्त कवी; सगळाच योग कसा छान जुळून आला. कोणी आपल्याकडे येणार असेल तर त्याला आपण जसा अगदी बारकाईने, त्यातल्या सर्व खाणाखुणांसह मार्ग सांगतो, अगदी तसाच पत्ता यक्ष मेघाला देतो. पण रामगिरी ते अलका एवढा मोठा प्रवास कंटाळवाणा होणार नाही याची काळजीही घेतो-
खिन्न: खिन्न: शिखरिषु पदं न्यस्त गन्तासि यत्र
क्षीण: क्षीण: परिलघु पय: ष्टद्धr(२२९ोतसां चोपयुज्य।।
स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळी साधण्याचं योग्य कौशल्य यक्षात आहे. म्हणून आपला संदेश आधी न सांगता तो मेघाला म्हणतो, ‘‘मला कल्पना आहे प्रवास खूप मोठा आहे, त्यात तू आकाशगामी, म्हणजे कुठे थांबायचं तरी पंचाईत होईल अशी भीती तुझ्या मनात असेल. पण त्याची तू काळजी करू नकोस. जेव्हा जेव्हा तू थकशील तेव्हा वाटेत अनेक पर्वत असल्यामुळे काही क्षण तिथे थांबून तुझा थकवा दूर झाला की तू पुढे जा. या साऱ्या प्रवासात तुझ्यातलं ‘जीवन’ कमी होत जाईल. पण त्याचीही काळजी करू नकोस. जागोजागी खळाळत्या प्रवाहांचं, नद्यांचं पथ्यकारक पाणी तुझी वाट पाहात असेल त्याचा तू आनंदाने आस्वाद घे.’’
कालिदास असो, बाण असो नाहीतर आणखी कोणी संस्कृत कवी असो, या साऱ्यांचा अनेक विषयांचा अभ्यास त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. अर्थात काव्यनिर्मिती करण्यापूर्वी स्थावर-जंगम अशा जगत् व्यवहारांचे ज्ञान, छंद, व्याकरण, समानार्थी शब्दकोश, इतिहास, पुराणकथा, चार वर्ग, चार आश्रम, नृत्य-नाटय़-चित्र शास्त्र, गजशास्त्र, अश्वशास्त्र, कृषिशास्त्र अशा अनेक शास्त्रांचे ज्ञान कवीला असले पाहिजे असा दंडकच होता. उठलं आणि उगीच काहीतरी खरडलं असं पूर्वी मान्य नव्हतं. ‘परिलघु पय: ष्टद्धr(२२९ोतसां चोपयुज्य’ येथे कालिदासाचा आयुर्वेदाचा अभ्यास दिसून येतो. ष्टद्धr(२२९ोतस् म्हणजे झऱ्यांचं दगडांवर आपटत खळाळून वाहणारं पाणी. हे पाणी त्यातील जड क्षार खाली बसल्यामुळे हलकं होतं, परिलघु होतं. म्हणून पचायलाही सोपं असतं. त्यामुळे अशा पाण्याला आयुर्वेदात पथ्यकर मानलं आहे. कालिदासाने परिलघु पय: असं म्हणून दोन गोष्टी साधल्या. पथ्यकर असल्यामुळे हे पाणी पिण्यात कोणताच धोका नाही. आणि मेघाला आकाशातून भ्रमण करायचं आहे, तो जड होऊन जसा चालणार नाही तसाच तो रिकामा होऊनही चालणार नाही. अलकेपर्यंत जर त्याला पोचायचं असेल तर त्याच्यात पाणी असणं आवश्यक आहे. पण हे पाणी जड असेल तर तो तिथेच ओथंबून खाली येईल. त्यामुळे हे हलकं पाणीच त्याच्यासाठी योग्य आहे.
इथून तू उत्तर दिशेकडे जेव्हा प्रवास करू लागशील तेव्हा वाटेतल्या सिद्धांच्या स्त्रिया तुझा भव्य आकार पाहून ‘अरे, पवन हे पर्वतशिखर तर वाहून नेत नाही ना’ अशा विचाराने तुझ्याकडे मोठय़ा कौतुकाने बघतील. निसर्गातलं एक ‘विलक्षण’ यक्ष इथे सांगतो. मेघ हा इंद्राचा सेवक. अर्थातच आपल्या स्वामींच्या प्रत्येक गोष्टीचं अगदी त्याच्या धनुष्याचंही कौतुक त्याला असणार,
रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत्पुरस्ता
द्वल्मीकाग्रात्प्रभवति धनु:खण्डमाखण्डलस्य।
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते
बर्हेणेव स्फुरितरुचिता गोपवेषस्य विष्णो:।।
अनेक रत्नांच्या प्रभेचं मिश्रण असणारं आखण्डल असं इंद्राचं धनुष्य तुला मुंग्यांच्या वारुळावर पाहायला मिळेल. त्या इंद्रधनूची प्रभा जेव्हा तुझ्या कृष्णकांतीवर पडेल तेव्हा गोपाच्या वेशात मस्तकावर मोरपीस धारण करणाऱ्या विष्णूप्रमाणे तू शोभशील.
विष्णूच्या सगळ्या रूपातील मोहक रूप आहे ते गोपवेशातील कृष्णाचं. त्या बालगोपालाच्या खोडय़ा, त्याचा तो काळासावळा वर्ण आणि त्याच्या कपाळावरचं ते मोरपीस कृष्णाचं हे लोभस रूप सर्वाना आकर्षित करतं. कालिदासाच्या मनात तेच रूप आहे. म्हणूनच कृष्णाच्या मोरपीस लावलेल्या लोभसवाण्या रूपात तो मेघाला बघतो.
गोपवेशात वारुळावर इंद्रधनुष्य ही कविकल्पना म्हणून इतर वेळी सोडून दिली असती, पण या विलक्षणाचा उल्लेख मारुती चितमपल्लींनी ‘जंगलाचं देणं’ं या पुस्तकात केला आहे. वारुळाचे नर व मादी असे प्रकार असतात. पावसाळ्यात मादी वारुळात विविध रंगांच्या अळंबींची बाग फुललेली असते. ही बाग फक्त मादी वारुळावर फुलते. असं वारूळ त्यांना एका गोंडानं दाखवलं होतं. सृजनाचा तो सोहळा पाहूनच कदाचित या निसर्गपुत्रांनी वारुळाचे नर व मादी असं वर्गीकरण केलं असावं. असेच विविध रंगी अळंब्यांनी फुललेलं वारूळ पाहून आकाशातून जाणाऱ्या मेघाला ते वारुळावरचं इंद्रधनुष्य वाटलं असावं. चितमपल्लींना ते वारूळ पाहून मेघदूतातील ‘रत्नच्छायाव्यतिकर’ या श्लोकाचं स्मरण झालं होतं. निसर्गातलं हे अद्भुत सांगून झाल्यावर यक्ष मेघाला थोडासा दक्षिणेकडे वळून मग मात्र वेगाने उत्तरेकडला प्रवास सुरू करण्यास सांगतो.
तुझ्या येण्याने दावाग्नी शांत झाल्यामुळे काननाम्रकूट तुला आपल्या मस्तकावर आनंदाने धारण करेल. त्याने तुझा प्रवासाचा क्षीणही कमी होईल. आम्रकूट हा मेघाचा पहिला पडाव आहे. ‘बघ मी सांगितल्याप्रमाणे तुला जागोजागी विश्रांतीस्थानं आहेत बरं का.’ यक्ष जणू काही मेघाला अशी ग्वाही देत आहे. हा कृष्णवर्ण मेघ जेव्हा काननाम्रकुटावर विसावेल तेव्हा वैभव धारण करणाऱ्या वसुंधरेच्या सुवर्णस्तनासारखा शोभून दिसेल. पृथ्वी ही वसुंधरा आहे. वसू म्हणजे वैभव. वैभव हे प्रामुख्याने सोन्यात गणले जाते. म्हणून वसुंधरा ही सुवर्णमयी आहे. अशा या वसुंधरेचे पर्वत हे स्तन आहेत. आम्रकूट शब्दातच पर्वतावरील आम्रवर्णाचा निर्देश होतो. या आम्रवर्णाचं सुवर्णवर्णाशी असलेलं साम्य पाहून कालिदास पर्वतस्तनमंडले ही उपमा पूर्ण करतो.
आम्रकूट हे विश्रामाचं ठिकाण असलं तरी मेघाला तिथे फार काळ रमता येणार नाही. ‘स्थित्वा .. मुहूर्तम्’ अगदी क्षणभर थांब आणि पुढे जाता जाता तुझ्यातील जलाचा शिडकाव कर. तुझ्यातील जलाचा भार कमी झाल्यामुळे तुझा वेग वाढेल. येथे तुला दिसेल रेवा. रेवा म्हणजे नर्मदा. नर्मदेच्या पात्रात विविध रंगांचे असंख्य दगड आहेत. भव्य अशा विंध्यगिरीवर मोठाल्या दगडांच्या अडथळ्यामुळे तिचे प्रवाह सर्वत्र विखुरले आहेत. कालिदासाला हे सारं चित्र हत्तीच्या अंगावरील रंगीबेरंगी झुलीसारखं दिसतं.
या वेळेपर्यंत मेघाचा भरपूर प्रवास झालाय. शिवाय जांभळीच्या झाडांसारख्या अडथळ्यांनी मेघाला आपल्यातील पाणी मुक्त करायला भाग पाडल्यामुळे तो थोडासा रिकामा झाला आहे. भारतीय संस्कृतीत त्यागाचं महत्त्व फार आहे. त्यामुळेच मेघातलं सत्त्व कमी झालं. तरी त्यांनी निश्िंचत राहावं म्हणून यक्ष मेघाला म्हणतो, ‘‘रिक्त: सर्वभवति हि लघु: पूर्णता गौरवाय.’’ मेघा तुझ्यातील पाणी कमी झाल्यामुळे तू शोक करू नकोस. कारण दुसऱ्याला देण्यातच तर मोठेपणा आहे. शिवाय तू कृश झालास तरी काही हरकत नाही. कारण रेवेचं तुरट पाणी घेऊन तू पुन्हा पहिल्याप्रमाणे होशील. कालिदासाला काव्यातून स्वत:ला ज्ञात असणाऱ्या विविध ज्ञानशाखा मांडण्याचा मोह आवरत नाही. तस्यास्तिक्तैर्वनगजमदैर्वासितं .. तोयमादाय गच्छे:। वनगजांच्या मदस्रवाने तुरट झालेलं रेवेचं पाणी घेऊन तू पुढे जा, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आयुर्वेदाचा अभ्यास त्याच्या मनात निश्चित आहे. कारण आयुर्वेदातले कडू काढे घेऊन अशक्तपणा दूर होतो, तसाच तूही पुन्हा मूळ प्रकृतीला जाशील. जलपूर्ण मेघाची नेहमी मदगजाशी तुलना केली जाते. त्यामुळे तुझ्यातील जलरूपी मदस्रव कमी झाला तरी रेवेत मिसळलेल्या हत्तीच्या मदस्रवाने ती उणीव भरून निघेल, असेही आश्वासन यक्ष मेघाला देतो.
मेघ हे मोरांचं उद्दिपन आहे. आकाशात काळे मेघ जमू लागले म्हणजे आपला सारा पिसारा फुलवून लांडोरीला आकर्षित करू पाहतात. हे निसर्गातील सुंदर वास्तव ज्ञात असलेला यक्ष मेघाला सांगतो, ‘‘माझ्या कार्यासाठी तू वेगाने पुढे जात असशील तरी तुझ्या येण्याने आनंदित झालेले मोर तिरक्या नजरेने प्रत्येक पर्वतावर तुझे स्वागत करतील तेव्हा त्यांना टाळून पुढे जाणं योग्य नाही.’’
निसर्गातल्या छोटय़ा छोटय़ा बदलांचीसुद्धा हळुवार दखल घेणारा कालिदास मेघाच्या आगमनाने दशार्ण प्रदेशातील बदल सहजपणे काव्यात गुंफतो. हा सारा प्रदेश केतकीपुष्प फुलल्याने सुगंधित झाला आहे, कावळे आपली घरटी बांधण्यात गुंग झाले आहेत आणि सारा वनप्रदेश पिकलेल्या जांभळांनी शोभून दिसत आहे.
शृंगार हा काव्याचा प्राण आणि मेघ हा नेहमीच ‘कामार्त.’ अशा या मेघाला त्याची कामना पूर्ण करण्याची संधी या दशार्ण प्रदेशात मिळणार आहे. दशार्णाची राजधानी विदिशा. वेत्रवती ही तिथली प्रमुख नदी. पण साऱ्याच नद्या मेघदूतात वेगवेगळी रूपं धारण केलेल्या सुंदर स्त्रीच्या रूपात उभ्या राहतात. प्रियतम मेघाच्या येण्याने आनंदित झालेली वेत्रवती प्रियकराच्या स्वागतासाठी नटणाऱ्या वासकसज्जा नायिकेच्या रूपात सामोरी येते. भुवई हळूच तिरकी करून तुझ्याकडे ती लाजत दृष्टिक्षेप टाकेल तेव्हा बिनदिक्कत तू तिचं अधरपान कर. तिच्या काठावर ओणावून तू तिचं जल प्राशन करशील तेव्हा ते केवळ जलप्राशन नसून तुझी वाट पाहणाऱ्या प्रियतमेच्या मुखाचे अधरपान असेल. आनंदाने उद्दीपित झालेल्या वेत्रवतीच्या अंगावर उठणाऱ्या उर्मी तुला स्त्रीच्या भृभंगाचे स्मरण करून देतील. आणि मग असं मनसोक्त अधरपान केल्यावर तू काही काळ नीच पर्वतावर विश्रांती घे. या पर्वतांच्या गुहा-गव्हरांतून पसरणारा सुगंध तुला या नगरीतल्या कामी पुरुषांनी पण्यस्त्रियांबरोबर केलेल्या शृंगाराचं स्मरण करून देईल. प्रेम हे सुंदर असतं, पण त्याच्या मधुर स्मृती अधिक सुंदर असतात. त्यामुळे या गुहांतून झालेल्या शृंगाराच्या खुणा तुला वेत्रवतीशी केलेल्या शृंगाराचा पुन: प्रत्यय देतील. आणि मग असा आंतर्बाह्य़ आनंदित झालेला तू पुन्हा एकदा ‘विश्रान्त: सन्व्रज’ मार्गक्रमणाला सुरुवात कर.
दशार्णानंतर येते ती उज्जयिनी. या उज्जयिनीचं वर्णन कालिदासाने इतकं रंगून केलं आहे की ते वाचून कालिदास उज्जयिनीचा असावा असं अनेक विद्वानांचं मत आहे. दक्षिण दिशेला नर्मदेपासून पश्चिमेला माही व उत्तरेकडे चर्मण्वती अशा पसरलेल्या अवंतीची क्षिप्रा नदीच्या काठी वसलेली राजधानी उज्जयिनी.
खरं तर उज्जयिनी मेघाच्या वाटेत येत नाही. पण तरीसुद्धा यक्ष ‘वक्र: पन्था यदपि भवता प्रस्थितस्योत्तराशां’ मार्ग वाकडा करून उत्तरेला उज्जयिनीस जाण्यास मेघाला सांगतो. ‘वक्र: पन्था’ असं यक्ष म्हणतो, कारण रामगिरी ते अलकेच्या वाटेवर उज्जयिनी येत नाही. मुद्दाम थोडी वाट वाकडी करून पश्चिमेकडे गेल्यासच अलका लागते आणि तरीही यक्ष तिकडे जाण्यास सांगतो. ‘हा मार्ग मी तुला सांगितला नाही तर माझ्याकडून तू फसवला गेलास असं तुला वाटण्याची शक्यता आहे. म्हणून अलकेला लवकर जाण्याची घाई कितीही असली तरी तू उज्जयिनीला जा’, असं तो सांगतो.
असं काय आहे उज्जयिनीत?
मेघाबरोबर असणाऱ्या विजेचा लखलखाट बघून चकित झालेल्या उज्जयिनीतील स्त्रिया भिरभिरत्या नेत्रांनी तुझ्याकडे बघतील. त्यांचे ते नेत्रकटाक्ष हे तुझे उद्दीपन आहे. आणि मग तुझ्या येण्याने आनंदित झालेली निर्विन्ध्या तिच्या जलावरील तरंगांवर एका ओळीत आलेल्या पक्ष्यांच्या रूपातील मेखलेचे दर्शन तुला घडवेल, आपल्या जलातील भोवऱ्यांचा नाभिप्रदेश दाखवून तुझ्यासमोर आपली कामेच्छा व्यक्त करेल. तेव्हा तू तिचा निश्िंचतपणे उपभोग घे. कारण, ‘स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु’ शृंगारिक चेष्टा ही स्त्रियांची प्रेमातील पहिली अभिव्यक्ती आहे.
स्त्रीच्या मोकळ्या केसांचा पसारा असा असतो की त्याला ‘संभार’ म्हणतात. पण तेच केस वेणीत गुंफले तर किती कमी होऊन जातात? थोडा पुढे गेलास की अगदी तशीच तुझ्या विरहात वेणीभूत झालेली सिंधू तुला दिसेल. आपल्या विरहात आपली प्रेयसी कृश होणं हे आत्यंतिक प्रेमाचं लक्षण नाही का? तेच तुझं सौभाग्य आहे. त्यामुळे ती पुन्हा पूर्ववत होईल असा उपचार तूच कर बाबा!
विरहावस्थेतील प्रेयसीची योग्य ती देखभाल घेऊन पुढे गेल्यावर मेघाला दर्शन होणार आहे ते श्रीविशाला अवन्तीचं. अवन्तीत विशिष्ट प्रकारच्या शाला असल्याने ती विशाला आहे. जागोजागी उदयनकथा सांगण्यात गुंगलेले कथाकार दिसले म्हणजे निश्चितपणे अवंती आली असे समजावे. येथेच वत्सराज उदयनाने प्रद्योतराजाची लाडकी कन्या पळवली. या नगरीचं वैभव एवढं मोठं की अवंती म्हणजे स्वर्गाची पृथ्वीवरील प्रतिनिधी. सुवर्णासारख्या तालवृक्षांच्या उद्यानांनी या नगरीच्या सौंदर्यात भर घातली आहे. अशा या वैभवशाली नगरीत ‘क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति’. खूप पुण्य करावं आणि स्वर्गात जावं, अनेक उपभोग घ्यावेत. असे उपभोग घेताना थोडंसंच पुण्य उरल्यावर त्या व्यक्तीला पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जातं. स्वर्गीय सुखाचा अनुभव घेण्यासाठी अशा पुण्यशील व्यक्ती येतात त्या अवंतीमध्ये. म्हणूनच ती दिव: कान्तिमत्खण्डमेकम्. स्वर्ग म्हणजे उपभोग. ही नगरीही अशीच उपभोगात रमलेली असते. निसर्गही असा की या साऱ्या वातावरणात भर घालत असतो. इथला वारा शंृगाररसाने स्त्रियांना आलेली ग्लानी दूर करण्यासाठी तत्पर. एखाद्या प्रियकराने आपल्या हळुवार बोलण्याने प्रेयसीचा अनुनय करून तिला उल्हसित करावं त्याप्रमाणे या नगरीजवळच्या क्षिप्रानदीवरून वाहणारे, कमलांमुळे सुगंधित झालेले, सारसांच्या मधुर कूजनाने श्रवणीय असलेले मंद वारे सुरतक्रीडेने दमलेल्या स्त्रियांची ग्लानी दूर करतात. मेघ हा धूम, ज्योति:, सलिल आणि मरुत यांचा संनिपात आहे. यातील धूम आणि तोही सुगंधित मेघाला अवंतीत प्राप्त होणार आहे. येथील स्त्रिया न्हाऊन झाल्यावर आपले केस वाळवायचा संस्कार करण्यासाठी सुगंधित धुपाचा वापर करतात. जाळीदार गवाक्षांतून बाहेर पडणारा हा धूर तुला पुन्हा तुझा मूळ आकार प्राप्त करून देईल. आणि मग पुन्हा मूळ भव्य आकार प्राप्त करून तू जेव्हा त्रिभुवनांचा स्वामी असणाऱ्या चंडीश्वराच्या स्थानी पोचशील तेव्हा,
भर्तु: कण्ठच्छविरिति गण: सादरं वीक्ष्यमाण:
पुण्यं यायास्त्रिभुवनगुरोर्धाम चण्डीश्वरस्य।
हलाहल पिण्याने कृष्णकंठ असलेल्या आपल्या स्वामीच्या कंठाशी असलेलं तुझं साधम्र्य पाहून शिवगण तुझं अत्यंत आदराने दर्शन घेतील.
यानंतर यक्ष मेघाला आणखीही महत्त्वाची सूचना करतो. आपला निरोप वेळेवर पोचण्याची कितीही घाई असली तरी मेघाला मिळणाऱ्या पुण्यात आपल्या कार्यामुळे कुठेही वाण पडू नये यासाठी यक्ष सदैव जागरूक आहे. म्हणूनच तो मेघाला सांगतो,
अप्यन्यस्मिञ्ज्लधर महाकालमासाद्य काले
स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानु:।
कुर्वन्संध्याबलिपटहतां शूलिन: शृघनीया
मामन्द्राणां फलमविकलं लप्ससे गर्जितानाम्।।
या उज्जयिनीत एका महान कार्यात सहभागी होण्याचं भाग्य मेघाला मिळणार असल्याने यक्ष मेघाला सांगतो, तू महाकालेश्वराला कोणत्याही वेळी जरी पोचलास तरी सायंकाळपर्यंत तेथेच राहा. सायंकाळी होणाऱ्या शिवाच्या पूजेत तुझी गर्जना जेव्हा ढोलाचं कार्य करेल तेव्हा त्याचं संपूर्ण फळ तुला लगेचच मिळेल.
इथे पुराणातल्या एका कथेचा कालिदासांनी छान उपयोग करून घेतला आहे. शिवाने गजासुराला मारल्यावर त्याचं कातडं वस्त्र म्हणून स्वीकारलं आणि नृत्य केलं आणि तेव्हापासून तेच परिधान करून बसला आहे. कोणतीही स्त्री मग ती अगदी पार्वती असो, आपला नवरा नीटनेटका दिसावा-असावा असं तिला वाटतच असतं. पार्वतीने त्याचं असणं जसं आहे तसं स्वीकारलं आहे. पण इथे शिवाने गजासुराचं जे चर्म वस्त्र म्हणून स्वीकारलं आहे ते आहे ओलं. ते ओलं असल्यामुळे त्यातून अजूनही रक्त ठिबकत असतं. हे सारं चित्र इतकं बीभत्स आहे की काही बोलत नसली तरी पार्वतीला त्या सगळ्या प्रकाराची थोडी भीती, थोडी घृणा मनात आहे. त्यामुळे कालिदास म्हणतो, ‘तुझा आकार आणि वर्ण दोन्ही गजासुराच्या कातडय़ाशी साधम्र्य दाखवणारं! तुझ्या तिथे जाण्याने ते रक्त गळणारं किळसवाणं वस्त्र जाऊन तूच शिवाचं नवीन वस्त्र आहेस असा भाव पार्वतीच्या मनात येईल. निदान आजच्या दिवसापुरतं तरी शिवाचं ते भयंकर रूप तुझ्यामुळे नाहीसं झालं म्हणून ती आनंदित होईल, तुझ्याकडे स्नेहपूर्ण कटाक्ष टाकेल. प्रत्यक्ष जगज्जननीचा कटाक्ष म्हणजे तिचा कृपाशीर्वादच! आणि याहून मोठं फळ ते कोणतं?’
अशा प्रकारे शिवाची सेवा करून, शिवगणांचा स्नेह आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून तू पुन्हा एकदा नगरीत प्रवेश कर. आता अंधार पसरू लागला आहे तेव्हा नगरीत प्रवेश करताना तू तुझ्यासह असणाऱ्या विजेचा अधूनमधून हलका प्रकाश पाड. त्यामुळे आपल्या प्रियकरांना भेटायला निघालेल्या अभिसारिकांना रात्रीच्या काळोखात त्यांचा मार्ग दिसेल. हा प्रकाश देताना या सुंदरी घाबरतील असा फार गडगडाट करून तू बरसू नकोस.
अशा प्रकारे उज्जयिनीत शृंगार, भक्ती अशा दोन परस्पर भिन्न रसांचा अनुभव एकाच वेळी मेघाला मिळणार आहे. पण हा सगळा उपभोग घेत असताना किंवा शिवाच्या पूजेच्या वेळी पत्नी विद्युतबरोबर पटनादाने दमून गेलेला असा तू भवनवलभात म्हणजेच छपराच्या वळचणीला बसून रात्रभर विश्रांती घे.
काही क्षणांपूर्वी महाकाय गजासुराशी साधम्र्य दाखवणारा मेघ एखाद्या छपराच्या वळचणीला कसा काय बसू शकेल, असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. पण इंद्राचा सेवक असलेला मेघ आपल्या सिद्धी बाळगून आहे. त्यामुळेच कोणत्याही वेळी कोणतेही रूप तो धारण करू शकतो. म्हणूनच यक्ष त्याला आता सौम्य रूप धारण करून विश्रांती घ्यायला सांगतो. विश्रांती घेतानासुद्धा तुला माझ्या कार्याचा विसर मात्र पडू देऊ नकोस, असं बजावून सांगायला यक्ष विसरत नाही.
रात्रभर धुक्याची हलकी दुलई सर्वत्र पसरून गेली आहे. पण हे निसर्गचित्र कवीच्या मनात मात्र वेगळीच जाणीव करून जातं. यक्ष मेघाला अशी छान विश्रांती झाल्यावर सूर्याचा मार्ग अवरुद्ध न करता पुढे जाण्यास सांगतो, कारण ‘रात्रभराच्या विरहाने व्याकूळ झालेल्या कमलिनीच्या मुखावरील अश्रू हळुवारपणे पुसण्याची घाई सूर्याला झाली असेल’.
आतापर्यंत तुझी भेट अवखळ वेत्रवतीशी, तुझ्या स्मरणात वेणीभूत झालेल्या सिंधूशी झाली. आता मात्र तुझी भेट होणार आहे अत्यंत गंभीर अशा उदात्त नायिकेशी. तेव्हा तूही थोडा गंभीर होऊन या नायिकेला भेटायला जा.. (क्रमश:)

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..

या लेखातील ‘मेघदूता’ची दोन चित्रे ‘कालिदासानुरूपम्’ या वासुदेव कामत यांच्या चित्रमालिकेतील आहेत.