lp16तारकांच्या नृत्याची अदा, विनोदी स्किट्स, खुमासदार सूत्रसंचालन, कलाकारांसह मान्यवरांची उपस्थिती, पुरस्कारांची रेलचेल, भव्य सेट आणि दुबई. निमित्त होतं; मराठी इंटनॅशनल सिनेमा अ‍ॅण्ड थिएटर अ‍ॅवॉर्ड्स’ अर्थात मिक्ताचं. ‘कलर्स मिक्ता २०१५’ हा दिमाखदार सोहळा दुबईत जल्लोषात पार पडला. क्रिकेट, व्हॉलीबॉल मॅच, पुरस्कार सोहळा, अरेबिअन नाइट्स, भेटीगाठी यांमुळे प्रत्येक कलाकार जिवाची दुबई करत होता. त्याचा हा खास वृतान्त.

मराठी सिनेमा कात टाकू लागला आहे, हे म्हणूनही आता जमाना झाला. हे वाक्यच आता कात टाकू लागलंय असं वाटतंय. याला कारण म्हणजे मराठी सिनेमांमध्ये झपाटय़ाने होणारा बदल. बदल हा पूर्वीपासून होतच होता. पण, त्याचा वेग आता वाढलाय. केवळ सिनेमांच्या विषयांमध्येच बदल होत नसून त्याच्या सादरीकरणातही तुफान बदल होताना दिसतोय. हिंदीशी तुलना होतेय. बजेट हा महत्त्वाचा घटक बाजूला सारला तर विषय लक्षात घेता हिंदीच्या तोडीस तोड विषय मराठी सिनेमांमध्ये दिसून येताहेत. हा बदल हळहळू सादरीकरणाकडेही वळू लागलाय. सिनेमा रंगबेरंगी तर झालाच, शिवाय चकचकीतही होऊ लागला. सिनेमे आकर्षक ‘दिसू’ लागल्यानंतर त्यांच्या पुरस्कार सोहळ्यांची रचनाही बदलली. अशा सोहळ्यांच्या lp17संख्येतही वाढ झाली. एका वर्षांत अनेक पुरस्कार सोहळे आयोजित केले जाऊ लागले. सगळेच मानाचे आणि सन्मानाचे. या सगळ्या सोहळ्यांमध्ये थोडा वेगळा विचार करून आयोजित करण्यात आला ‘मराठी इंटरनॅशनल सिनेमा अण्ड थिएटर अवॉर्ड्स’; अर्थात, मिक्ता पुरस्कार सोहळा. या
सोहळ्याचे मुख्य संचालक असलेले महेश मांजरेकर यांनी परदेशात मराठी सिनेमा, नाटकांचा गौरव करण्याची आगळीवेगळी संकल्पना मांडली आणि ती गेली पाच वर्षे सातत्याने साकारही केली. मिक्ता पुरस्काराचं यंदाचं पाचवं र्वष. पहिल्या वर्षी दुबईत या सोहळ्याची शानदार सुरुवात झाली होती. त्यानंतर लंडन, सिंगापूर, मकाऊ अशा ठिकाणी मराठी सिनेमा-नाटकांना सन्मानित करण्यात आलं. यंदाच्या पाचव्या वर्षी पुन्हा एकदा दुबईतच या सोहळ्याचा थाट बघायला मिळाला. ‘कलर्स मिक्ता २०१५’ची धूम दुबईत सलग पाच दिवस जोरदार सुरू होती.
दुबईत अवघी मराठी इंडस्ट्री अवतरली होती. मुंबई-पुण्यात असूनही कामाच्या व्यापामुळे न भेटणारे कलाकार मिक्ता पुरस्कार सोहळ्यामुळे दुबईत एकत्र जमले होते. मग सुरू झाल्या गप्पा. ‘तुझं नाटक बघितलं. आवडलं मला खूप’, ‘ए, त्या सिनेमातलं तुझं काम खूप छान झालंय.’, ‘आता नवीन काय प्रोजेक्ट्स सुरू आहेत’, ‘आपण भेटत जाऊ या मुंबईतही अधूनमधून’ अशा गप्पा, सूचना, सल्ले, मजा, मस्करी कलाकारांमध्ये सतत सुरू होतं. ‘सेल्फी’ प्रकरण इंडस्ट्रीत फार मुरलंय हे प्रकर्षांने दिसून येत होतं. सोशल मीडिया सॅव्ही कलाकारांचीही आपल्या इंडस्ट्रीत कमी नाही हेही जाणवलं. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचे फोटो काढून जो तो स्वत:चं फोटो कलेक्शन करत होता. पुरस्कार सोहळ्यात एकमेकांच्या परफॉर्मन्सविषयीही विचारणा होत होती. दोन वेगवेगळ्या सिनेमांच्या सेटवरचे किस्से रंगवून सांगण्यात काही कलाकार माहीर असतात. त्यामुळे अनेकदा ठिकठिकाणी गप्पा, किस्से यांची मैफल सुरू होती. दुसऱ्या दिवशी तिथल्या फेरारी थीम पार्कमध्ये कलाकारांनी धमाल केली. राइड्स, अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये कलाकार रमले होते. मराठी कलाकारांची लोकप्रियता दुबईपर्यंत पोहोचल्याचा प्रत्यय येत होता. फेरारी थीम पार्कमध्ये काही मराठी लोकांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत फोटोग्राफी आणि ऑटोग्राफीची संधी सोडली नाही. पार्कमधली कलाकारांची क्रेझ उल्लेखनीय होती.

lp18राज ठाकरेंनी सांगितली आठवण
कथा-पटकथा लेखक सलीम खान यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर राज यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मी असताना मला सलीम यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. मी जेव्हा जेव्हा संकटात होतो तेव्हा मला मदत करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. एकदा ते मला भेटायला आले होते. मी काळजीत आहे हे बघितल्यावर ते मला फक्त ‘तू खूप मित्र खूप जमवले आहेस. ते जप. काळजी करू नकोस’ असं म्हणाले. सलीमजींच्या या वाक्याने मला खूप बरं वाटलं. ते वाक्य मला आधार देऊन गेलं. सलीमजींनी मला नेहमीत मदत केली आहे. आधार दिला आहे. अनुभवाने आणि वयाने मोठे असल्यामुळे अनेकदा मार्गदर्शनही केलं आहे.’

lp21
‘मिक्ता पुरस्कार सोहळा’ आणि क्रिकेटची मॅच नाही असं होणं केवळ अशक्य. त्यामुळे यंदाच्या पाचव्या वर्षीही दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये कलाकारांची क्रिकेटची मॅच रंगली. दुबई दौऱ्याची सुरुवात या मॅचमुळे होणार असल्याने सगळेच कलाकार खूप उत्सुक होते. काही बघण्यासाठी, काही खेळण्यासाठी तर काही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. या दौऱ्याचा पहिलाच दिवस असल्याने सगळे जण एकमेकांना मनसोक्त भेटून घेत होते. भेटीगाठी झाल्यानंतर मॅच सुरू झाली. मिक्ता इलेव्हन आणि लय भारी अशा दोन टीम तयार झाल्या. रितेश देशमुख कर्णधार असलेल्या लय भारी या टीममध्ये सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, शरद केळकर, राजेश शृंगारपुरे, उपेंद्र लिमये, महेश लिमये, सुशांत शेलार, मयूरेश पेम, शशांक केतकर असे कलावंत होते. तर मिक्ता इलेव्हन या टीमचे कर्णधार महेश मांजरेकर हे होते. यांच्या टीममध्ये अंकुश चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, सुनील बर्वे, प्रवीण तरडे, अजित परब, भालचंद्र कदम, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार होते. दोन्ही टीममधले कलाकार उत्तम खेळलेच पण, मॅचची रंगत चढली ती पुष्कर श्रोत्री, हृषीकेश जोशी आणि जितेंद्र जोशी यांच्या खुमासदार कॉमेंट्रीने. कलाकारांची खिल्ली उडवत, फिरकी घेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सगळे कलाकारही त्यांच्यावर होणारी टीका, फिरकी खेळाडू वृत्तीने घेत मॅच खेळत होते. कॉमेंट्रीच्या अधेमधे मिमिक्रीचा आधार घेत जितेंद्रने माइकचा ताबा घेतला. अमोल पालेकर, उपेंद्र लिमये अशा अनेकांची मिमिक्री करत कॉमेंट्री मसालेदार केली. यालाच जोडून लेखक प्रवीण तरडे निर्मात्यांशी स्क्रिप्ट देताना कसे बोलतात, नवीन संकल्पनांविषयी कसे सांगतात याची नक्कल करून दाखवली. कॉमेंटेटर आपली जबाबदारी चोख बजावत असताना दुसरीकडे कलाकारही उत्तम खेळत होते. उत्तम फलंदाजी केल्यानंतर बाद झालेल्या लय भारी टीममधल्या दिग्दर्शक संजय जाधव यांचं सगळ्यांकडून कौतुक झालं. प्रेक्षकांमध्ये क्रिकेटप्रेमी कलाकार खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. प्रिया बापट, उमेश कामत, मृण्मयी देशपांडे, सोनाली खरे, अदिती सारंगधर, वीरेन प्रधान, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, प्रतीक्षा लोणकर, अश्विनी एकबोटे, मोहन आगाशे, श्रीरंग गोडबोले, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे असे अनेक जण प्रेक्षकांमध्ये बसून मॅच एन्जॉय करत होते. क्रिकेट मॅच खेळणाऱ्यांनी आणि न खेळणाऱ्यांनीही मनसोक्त एन्जॉय केली.
क्रिकेट मॅचच्या यशानंतर दुसऱ्याच दिवशी कलाकारांची व्हॉलीबॉलची मॅच आयोजित केली होती. अबू धाबीच्या अल रहा बीच हॉटेल या ठिकाणी बीचवर ही मॅच ठेवली होती. बीचवर व्हॉलीबॉलची मॅच हा मिक्ता सोहळ्यासाठी पहिलाच अनुभव असल्यामुळे सगळेच कलाकार या मॅचचा मनमुराद आनंद घेत होते. दुबईतलं संध्याकाळचं थंड वातावरण, बीच, दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याचा उत्साह, इंडस्ट्रीतले अनेक मित्र खूप दिवसांनी एकत्र भेटल्याचा आनंद या सगळ्यामुळे त्या मॅचमध्ये रंगत आली होती. वैशिष्टय़ म्हणजे या मॅचमध्ये अभिनेत्रीही मागे राहिल्या नाहीत. अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, श्रुती मराठे, पूजा सावंत, मृण्मयी देशपांडे, मनवा नाईक, प्रिया बापट, दीपाली सय्यद, सोनाली कुलकर्णी अशा काही अप्सरांनीही या मॅचमध्ये सहभाग घेतला. व्हॉलीबॉल खेळता येत असो वा नसो सगळे मिळून एकत्र असण्याच्या आनंदामुळे कलाकारांचा खेळण्याचा उत्साह दिसून येत होता. मॅच सुरू होण्याआधी या खेळाची किमान माहिती असणारे कलाकार हा खेळ येत नसलेल्यांना मार्गदर्शन करताना दिसत होते. ‘हे असं नाही तसं करायचं’, ‘बॉल अशा पद्धतीने वर फेकायचा’, ‘आता मी सुरुवात करते’ अशा वाक्यांची बीचवर रेलचेल सुरु होती. अखेर खेळायला सुरुवात झाली. चार टीम तयार केल्या. प्रत्येक टीमला एकेक असे चार वेगवेगळ्या रंगांचे टीशर्ट्स दिले गेले. खोपकर दबंग, कलानिधी फायटर्स, भांडारकर बुल्स, अँजीलो लायन्स अशा चार टीम खेळायला सज्ज होत्या. अभिनेत्यांसह अभिनेत्रींनीही या खेळात चांगलीच चमक दाखवली. एखादी सव्‍‌र्हिस चुकली किंवा फसली की त्यावर मनमोकळेपणाने हसणं, मस्करी करणंही सुरू असायचं. पुन्हा एकदा हृषीकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी यांनी त्यांच्या विशेष शैलीत याही मॅचची कॉमेंट्री केली. या वेळी त्यांना साथ दिली ती अभिनेत्री मानसी नाईक हिने. हसतखेळत हा खेळ पूर्ण झाला. या मॅचमध्ये बाजी मारली ती महेश मांजरेकर यांच्या अँजीलो लायन्स या टीमने. या चुरशीच्या मॅचनंतर एकमेकांना भेटणं, गप्पा मारणं सुरूच होतं.

मिसेस मुख्यमंत्र्यांची सुरेल मैफल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस याही पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होत्या. केवळ हजेरी न लावता त्यांनी काही गाणी सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘चांदण्यात फिरताना’, ‘मस्त कलंदर’, ‘पिया तू अब तो आ जा’ अशी गाणी त्यांनी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिन्ही गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्यांच्या गजरात रसिकश्रोते अमृता यांच्या गाण्यांना दाद देत होते.

lp22इंडस्ट्रीतल्या नायिका एकमेकींच्या मैत्रिणी कधी असूच शकत नाही, असं सर्रास म्हटलं जातं. पण हे खोटं ठरवलं मराठी नायिकांनी. परस्परांमधले हेवेदावे बाजूला सारत एकमेकींशी बोलताना दिसत होत्या. व्हॉलीबॉलची मॅच सुरू होण्याआधी अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, अदिती सारंगधर, श्रुती मराठे, मानसी नाईक, दीपाली सय्यद, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, पूजा सावंत, भार्गवी चिरमुले या तारकांचा गप्पांचा फड रंगला होता. तिथेही किस्से, आठवणी सांगणं असं सुरूच होतं. मग टाळ्या देणं, जोरजोरात हसणं, चिडवणं अशी धमाल या तारकांच्या टेबलवर सुरू होती. हेच खेळीमेळीचं वातावरणं पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी दिसून येत होतं. ग्रीन रूममध्ये तयार होताना एकमेकींच्या हेअरस्टाइल, कॉस्च्युम, मेकअपचं कौतुक सुरू होतं. तर काही वेळा सल्लेही दिले जात होते. परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमही ग्रीन रूममध्ये सुरू होता.
मराठी इंडस्ट्री आता ग्लॅमरस होऊ लागली आहे यात शंका नाही. त्यातच हे ग्लॅमर जास्त उठून दिसतं ते कोणत्याही सोहळा किंवा पार्टीमध्ये. असंच ते खुलून दिसत होतं दुबईत. मिक्ता हा मराठीतला एक ग्लॅमरस पुरस्कार सोहळा. सोहळ्यासाठी खास थीम ठरवण्यात आली होती. लाल, काळा किंवा पांढरा असे रंग सोहळ्यासाठी ठरवले होते. त्यामुळे सोहळ्यात सगळे कलाकार या तीन रंगांमध्ये हरवले होते. कोणी लाल,
काळा-पांढरा अशा रंगांची साडी नेसली होती, तर कोणी लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. कोणी खास या सोहळ्यासाठी ब्लेजर घेतलं होतं, तर कोणी ट्रेंडी दिसावं म्हणून पठाणी कुर्ती घातली होती. तारे-तारकांच्या या रंगीबेरंगी कपडय़ांमध्ये दुबईतील अल नसर लिझर लँड या ठिकाणी हा कार्यक्रम रंगला होता. सई ताम्हणकर ही इंडस्ट्रीतली एक फॅशन दिवा. वेगवेगळ्या भूमिका करीत ती फॅशन आयकॉनही ठरली. तिचा हाच फॅशन सेन्स मिक्तामध्येही दिसला. बॉलीवूडचा आघाडीचा फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे याने डिझाईन केलेला आठ लाखांचा ड्रेस पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. तर सोनाली खरे हिने इंडो-वेस्टर्न या थीमवर लाल-काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तिचं हट के कॉम्बिनेशनही सगळ्यांच्या लक्षात राहिलं. सुखदा खांडकेकर हिची केशरचना तिला खुलून दिसत होती, तर पूजा सावंत हिचा लाल रंगाचा टय़ुब गाऊन तिच्या उंचीला शोभून दिसत होता. गाऊनचा पर्याय नव्या सोनाली कुलकर्णीनेही निवडला. मृण्मयी देशपांडेने सिंपल बट स्वीट राहणं पसंत केलं. काळ्या रंगाचा नी लेथ वन पीस घातला होता. अमृता खानविलकरचा गाऊनही आकर्षक होता. अभिनेत्यांमध्येही लाल, काळा, पांढऱ्या रंगाच्या ब्लेझर्सचे वैविध्य दिसून येत होते. तर काहींचा पारंपरिक होण्याकडे कल होता. यात अवधूत गुप्तेच्या कुर्त्यांचा उल्लेख करावा लागेल. एकुणात, पुरस्कार सोहळ्यात इंडस्ट्री विशिष्ट रंगांमध्ये खुलून दिसावं यासाठी रंगांची ही थीम. त्यामुळे इंडस्ट्री खऱ्या अर्थाने रंगीबेरंगी झाली होती.

सलीम खान यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित
‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सलीम खान यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब मिक्ता पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईत आलं होतं. स्वत: सलीम खान, पत्नी सुशीला चरक, दुसरी पत्नी हेलन, सोहेल खान, अरबाज खान ही अभिनेता-निर्माता असलेली मुलं, मुलगी अर्पिता खान, जावई आयुष शर्मा असे सगळेच या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते. केवळ पुरस्कारासाठीच न थांबता खान कुटुंबीय सोहळ्याचा मनमुराद आनंद घेत होते.

lp23पुरस्कार सोहळा जल्लोषात पार पडल्यानंतर अबु धाबीच्या एका रिसॉर्टमध्ये कलाकारांनी आपला मोर्चा वळवला. पुरस्कार सोहळा निर्विघ्न पार पाडावा म्हणून मिक्ताची टीम काही दिवसांपासून मेहनत घेत होती. तसंच कलाकारांनीही त्यांच्या परफॉर्मन्ससाठी मेहनत घेतली होती. या सगळ्या मेहनतीचा शीण घालवण्यासाठी त्यांची पावलं या रिसॉर्टकडे वळली. या रिसॉर्टमध्ये अरेबिअन नाइट्स बघायला मिळाली. तिथली पारंपरिक नृत्य, बॅले डान्स, तिथले खाद्यपदार्थ, परंपरा अशा सगळ्याचं चित्रण तिथे बघायला मिळालं. सगळे कलाकार रिलॅक्स मूडमध्ये होते. त्यांच्या परंपरेचं संगीत लागल्यावर अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी आणि पुष्कर श्रोत्री या तिघांनीही रंगमंचावर धाव घेतली आणि बिनधास्त, मनमोकळे नाचू लागले. मराठी इंडस्ट्रीसह तिथे आलेल्या इतर प्रेक्षकांनाही त्यांचा उत्स्फूर्त परफॉर्मन्स आवडला. तिथल्या पारंपरिक खाद्यपदार्थाचा कलाकार मंडळी मनमुराद आनंद घेत होते. सेल्फी, फोटो, गप्पा, गाणी हे तिथेही सुरू होतं. चार दिवसांचा हा सोहळा दुबईत थाटात साजरा झाला.
चैताली जोशी