रिमेक आणि सीक्वेलच्या लाटेबरोबरच हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह तयार झाला आहे. सिंधूताई सपकाळ, डॉ. प्रकाश आमटे, पान सिंग तोमर, मिल्खा सिंग, फुलनदेवी, मेरी कोम आदी व्यक्तींवर चरित्रपट म्हणजेच ‘बायोपिक’ चित्रपट आले. भगवान दादा यांच्यावरही मराठी ‘बायोपिक’ची जुळवाजुळव होत असल्याचे वृत्त आहे. संजय दत्तवरही ‘बायोपिक’ चित्रपटाची घोषणा राजकुमार हिरानी यांनी केली आहे. अनंत महादेवन यांचा ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा बायोपिक खूपच गाजला होता. त्याबद्दल ते म्हणतात की, ‘बायोपिक’ करावासा वाटणे असाच आजचा काळ आहे. कारण तद्दन बॉलीवूड मसालापटांचा आता प्रेक्षकांनाही कंटाळा येत आहेच. त्याशिवाय अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देत गेलेल्या व्यक्तीचा ध्यास, तिचे कष्ट, संघर्ष, आयुष्यातील नाटय़ हेच इतके भुरळ घालते की काल्पनिक कथानके त्यापुढे तकलादू वाटू लागतात. म्हणूनच की काय अनंत महोदवन यांनी ‘गौर हरी दास्तान’ नावाचा हिंदी चित्रपटही त्याच नावाच्या एका व्यक्तीवर तयार केला आहे. हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. एकूणात, ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह तयार झाला असून अशा चित्रपटांचे यश-अपयश स्वतंत्रपणे मोजावे लागणार आहे.
‘बायोपिक’ चित्रपटांच्या मांदियाळीत आता २१ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध दिग्दर्शक केतन मेहता यांचा ‘मांझी दी माऊण्टन मॅन’ हा नवा हिंदी चित्रपट आहे. यापूर्वी १९९३ साली केतन मेहता यांनी विजय तेंडुलकर यांच्या पटकथेवर ‘सरदार’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील ‘बायोपिक’ केला होता. परंतु, त्यावेळी ‘बायोपिक’ हा शब्द फारसा प्रचलित नव्हता.
‘मांझी दी माऊण्टन मॅन’च्या प्रमुख भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी आहे. परंतु, त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करणे गरजेचे आहे ते म्हणजे या चित्रपटाद्वारे भारतीय तसेच जगभरातील प्रेक्षकांसमोर दशरथ मांझी नावाची व्यक्ती आणि तिचे जीवनकार्य येणार आहे.
काल्पनिक कथानके, काल्पनिक व्यक्तिरेखा यामुळे सगळा कल्पनेचा खेळ रंगविण्याचे पुष्कळ प्रयत्न अनेक चित्रपटांतून करण्यात आहेत. परंतु, त्याहीपेक्षा अधिक संघर्ष, अधिक नाटय़ एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असते याचा शोध घ्यावा, असे आता दिग्दर्शक-निर्मात्यांना तीव्रतेने वाटू लागले आहे हेही महत्त्वाचेच म्हणावे लागेल.
दशरथ मांझी हे बिहार राज्यातील गया जिल्ह्य़ातील गेहलौर या छोटय़ाशा गावात राहणारे मजूर होते. पर्वतराजींमध्ये वसलेले हे गाव आहे. १९५५-६० सालात दशरथ मांझी यांची पत्नी आजारी पडली आणि त्या काळात वैद्यकीय सुविधा, डॉक्टर उपलब्ध नव्हते. वैद्यकीय सुविधांसाठी लोकांना त्या काळी ७० किलोमीटर दूर असलेल्या वझिरगंज येथे जावे लागायचे. इतक्या दूर जाणे दशरथ मांझी यांना शक्य होऊ शकले नाही. परिणामी वैद्यकीय सुविधेअभावी दशरथ मांझी यांची पत्नी फाल्गुनी देवी यांचे आजारपणातच १९५९ साली निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर शोकाकुल झालेले दशरथ मांझी यांनी तेव्हा मनोमन एक गोष्ट ठरवली आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा केला, स्वत: कष्ट उपसले. मांझी यांनी दूरवरचे ५५ किलोमीटरचे अंतर कमी कसे करता येईल याचा विचार करून प्रचंड गेहलौर घाटीमधील पर्वत खोदून त्यातून रस्ता तयार करण्याचा एकटय़ाने निश्चय केला. फक्त हातोडा आणि छिन्नी एवढीच अवजारे घेऊन मांझी यांनी गेहलौर पर्वत खोदला आणि हे काम एकटय़ाने सतत २२ वर्षे म्हणजेच १९६० सालापासून ते १९८२ सालापर्यंत केले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी या जोरावर दशरथ मांझी यांनी २२ वर्षांत गेहलौर घाटीमधून ३६० फूट लांब, २५ फूट खोल, ३० फूट रुंदीचा रस्ता तयार करून वझिरगंजपर्यंतचे ५५ किलोमीटरचे अंतर १५ किलोमीटरवर आणले. त्यांच्या या सत्य घटनेवरच ‘मांझी दी माऊण्टन मॅन’ हा चित्रपट आहे. फाल्गुनी देवीच्या भूमिकेत अभिनेत्री राधिका आपटे झळकणार आहे.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com