lp20विविध भाषांचे सिनेमे, सिने इंडस्ट्रीतले दिग्गज, लोकप्रिय कलाकार, ‘मुंबई’ या विषयावरच्या शॉर्ट फिल्म्स आणि बरंच काही.. या सगळ्याचा अनुभव घेता आला तो सोळाव्या ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ या सोहळ्यात. चर्चेत असलेले सिनेमे बघण्याची गर्दी, ते झाल्यावर त्यावरील चर्चा, पसंती-नापसंतीच्या प्रतिक्रिया या सगळ्यामुळे आठ दिवस या फेस्टिव्हलचं वातावरण सिनेमामय झालं होतं. या आठ दिवसांच्या उत्साहाचा हा अनुभव..

चित्रपट चाहते दर आठवडय़ाला वाट बघत असतात ती शुक्रवारची. कारण सोपं आहे. बॉलीवूड असो किंवा मराठी सिनेमे असोत या चाहत्यांची थिएटरबाहेर शुक्रवारी लागलेली रांग ही ठरलेली. यामध्ये इंग्लिश सिनेमेही मागे नाहीत. बॉलीवूडसारखाच हॉलीवूडचाही पगडा आपल्याकडे आहेच. त्यामुळे या हिंदी-मराठी सिनेमांच्या रांगेत या इंग्लिश सिनेमांचीही भाऊगर्दी होत असते. सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांच्या अशाच मोठमोठाल्या रांगा दिसत होत्या त्या वर्सोव्हा इथल्या बडय़ा थिएटर्समध्ये. निमित्त होतं ते सोळाव्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलचं. अर्थात मामि फेस्टिव्हलचं. हिंदी, मराठी, इंग्लिश सिनेमांव्यतिरिक्त इतर भाषांमधले सिनेमे बघायची मेजवानी म्हणजे सिनेमांचा हा उत्सव, म्हणजेच मामि फेस्टिव्हल..! मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषांव्यतिरिक्त फ्रेंच, स्विडिश, इराणी, जर्मन, स्पॅनिश, जापनीज, चायनीज, रशियन अशा अनेक परदेशी भाषिक सिनेमांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होता. तर तमिळ, मल्याळम, बंगाली, कन्नड असे काही प्रादेशिक भाषिक सिनेमेही यात होते. असा हा सिनेमांचा उत्सव गेल्या आठवडय़ात वेगवेगळ्या बाजाच्या, रंगांच्या सिनेमांनी रंगला होता. प्रेक्षकांचाही तितकाच उत्साही प्रतिसाद या फेस्टिव्हलमध्ये बघायला मिळाला.

सकाळी दहा ते रात्री दहा असे रोज पाच सिनेमे दाखवले जायचे. दुपार किंवा संध्याकाळच्या शोजना जितकी गर्दी व्हायची तितकीच सकाळ आणि रात्रीच्या शोला व्हायची. जो सिनेमा बघायला जाणार त्याविषयीची चर्चा रांगेत उभं राहून एखाद्या अनोळखी व्यक्तीशी केली जात होती. शेवटी तिथे आलेल्या प्रेक्षकांचं प्रेम हे एकच. अर्थात सिनेमा..! त्यामुळे ‘ये मूव्ही कैसा होगा डोंट नो.. बट आय हर्ड इट्स नाइस वन..’ किंवा ‘तुम्ही रिझव्‍‌र्हेशन केलंय का? माझं नाहीये.. पण, बघायचाय मला हा सिनेमा’ किंवा ‘मी दुसऱ्यांदा बघतोय हा मूव्ही.. चांगला आहे’ अशी अनेक वाक्यं कानावर पडत होती. काही सिनेमांसाठी इतकी गर्दी होती की, रिझव्‍‌र्हेशन नसलेल्या अनेक सिनेमांना सिनेमा न बघता तसंच परतावं लागलं. ‘बॉयहूड’, ‘मॉमी’, ‘किल्ला’, ‘कोर्ट’ अशा सिनेमांबाबत असं घडलं. ‘आम्ही आत पायऱ्यांवर बसू..पण, आम्हाला आत घ्या’, ‘उभं राहून बघतो, पण आत येऊ द्या’ अशा विनवण्या लांब रांगेत उभे असलेले सिनेमाप्रेमी करत होते.

lp21

‘किल्ला’, ‘गुडबाय टू लँग्वेज’, ‘कोर्ट’, ‘कमिंग होम’, ‘टू डेज वन नाइट’, ‘शी इज लॉस्ट कंट्रोल’, ‘पार्टी गर्ल’, ‘मॉमी’, ‘सेंट लॉरेन’, ‘बॉयहूड’, ‘मॉमी’, ‘रंगा पतंगा’, ‘नागरिक’, ‘चौरंगा’ अशा अनेक सिनेमांची चर्चा होती. त्यामुळे या सिनेमांसाठी थिएटरबाहेर मोठमोठाल्या रांगा लागलेल्या असायच्या. गंमत म्हणजे या मोठय़ा रांगा बघून काहीजण कोणता सिनेमा बघायचा हे ठरवत होते. आपल्याला जो सिनेमा बघायचा आहे त्यासाठी आगाऊ रिझव्‍‌र्हेशन करणं आवश्यक होतं. पण, अनेकांचं असं झालं की, रिझव्‍‌र्हेशन एका सिनेमासाठी, पण बघितला दुसराच कोणता तरी. याचं कारण म्हणजे ती भली मोठी रांग. ही रांग प्रेक्षकांना आकर्षून घेण्यात यशस्वी झाली होती हेही खरं. ‘गुडबाय टू लँग्वेज’ सिनेमासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. याचं कारणही तसंच काहीसं होतं. लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपने हा सिनेमा बघण्याबाबत सुचवलं होतं. त्यामुळे साहजिकच प्रेक्षक या सिनेमाकडे वळले. पण, सिनेमा बघून झाल्यावर मात्र अनेकांची निराशा झाली. ‘गुडबाय टू लँग्वेज’ हा सिनेमा भाषा आणि मानवी भावभावनांवर बेतलेला आहे. पण अनेकांच्या तो पचनी पडला नाही. सिनेमानंतर थिएटरच्या आवारात अशीही चर्चा होती की, ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट सिनेमा जास्त अ‍ॅब्स्ट्रॅक्ट बनवला की तो जड जातो.’ त्यामुळे चर्चा असलेल्या सिनेमांमधल्या या सिनेमाने मात्र काहींची निराशा केली.

आणखी एका सिनेमाविषयी फेस्टिव्हलमध्ये बोललं जात होतं. तो म्हणजे ‘किल्ला’. या मराठी सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. फार आकर्षक, चकचकीत न करता साध्या, सोप्या भाषेत हा सिनेमा तयार केलाय. लहान मुलांचं भावविश्व गोड भाषेत रेखाटलंय. गोष्ट आहे आई आणि मुलाची. आई नोकरी करणारी आणि मुलगा सातवीत. वडील नाहीत. आईच्या झालेल्या बदलीमुळे त्या दोघांना गुहागरला यावं लागतं. चिनू अभ्यासात हुशार, वागण्या-बोलण्यात समंजस, त्यामुळे आईला त्याची तशी काळजी नाही. सगळं आलबेल सुरू असताना दोघांच्याही आयुष्यात जे घडतं त्यावरून सिनेमा पुढे जातो. त्या घटना एकमेकांना न सांगता स्वत:शीच संघर्ष करत ते त्यातून बाहेर पडतात, स्वत:लाच पडलेली उत्तरं स्वत:चं कशी सोडवतात हे उत्तम रेखाटलंय. कोकणातल्या समुद्राचा पुरेपूर आणि यथायोग्य उपयोग करून घेतला आहे. लहान मुलं आणि अमृता सुभाष यांचा अभिनय उत्तमच झालाय. शाळेतले सगळे प्रसंग प्रेक्षकांना त्यांच्या बालपणी हमखास घेऊन जातात. या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळचा एक किस्सा असा. या सिनेमाची खूप चर्चा होती. त्यामुळे स्क्रीनिंग वेळी तिथे गर्दी होणं अत्यंत स्वाभाविक होतं. तसं झालंही. रिझव्‍‌र्हेशन करणारे एकेक जण आत जाऊन आपापली जागा पटकावत होते. रिझव्‍‌र्हेशन न केलेल्यांना मात्र आपल्याला आत सोडतील की नाही याबाबत धाकधुक होती. सिनेमाला दहा मिनिटं राहिलेली असताना रांगेत उभे असलेले प्रेक्षक ‘आम्ही आतमध्ये त्या पायऱ्यांवर बसतो, पण आत सोडा’ असं बोलायला लागले. शेवटी सुदैवाने त्यांच्यावर अशी पायऱ्यांवर बसायची वेळ आली नाही. त्यांना आत जायला मिळालं आणि या सुंदर कलाकृतीचा अनुभव घेता आला. शाळेमधल्या सगळ्या प्रसंगांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत होता. आपणही असं बालपणी केलंय, हा अनुभव ते घेत होते. सिनेमाच्यम स्क्रीनिंगला आईची भूमिका साकारणारी अमृता सुभाष हजर होती. सिनेमा बघण्यासाठी जशी थिएटरबाहेर रांग लागली होती तशी रांग नंतर अमृताचं कौतुक करण्यासाठी तिच्यापुढे लागली होती. तिनेही सगळ्यांशी गप्पा मारल्या. थिएटरमधल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका चांगला होता की तिने सिनेमाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांना फोन करून तो प्रतिसाद ऐकवला. या सिनेमाच्या सगळ्या कलाकारांना एकत्रित असा स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला. तसंच सिल्व्हर गेट वे ऑफ इंडियाची दुसरी सर्वोत्कृष्ट फिल्म ठरण्याचाही मान या सिनेमाने पटकावला.

या फेस्टिव्हलमध्ये ‘कोर्ट’ या सिनेमानेही बाजी मारली. या सिनेमाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तर, सिनेमाच्या सगळ्या कलाकारांना एकत्रित असा स्पेशल ज्युरी मेन्शन पुरस्कार मिळाला. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे कोर्टात चालणारा ढिसाळ प्रकार. नेमकं हेच या सिनेमात दाखवलं गेलंय. या सिनेमाचं वैशिष्टय़ म्हणजे यातले ठरावीक कलाकार सोडले तर इतर सगळे कलाकार पेशाने कलाकार नाहीत. आणि म्हणूनच सिनेमा वास्तवाकडे झुकतो. या सिनेमाच्या प्रत्येक सीनसाठी जवळपास ३० ते ४० टेक्स घेतले जात असल्याची माहिती दिग्दर्शक चैतन्यने दिली. आपला सिनेमा आहे म्हणून फक्त त्याच्या स्क्रीनिंगला जायचं अशी सर्वसाधारणपणे मानसिकता असते. पण, काही कलाकारांच्या बाबतीत हे खोटं ठरलं. अमृता सुभाष, संदीप कुलकर्णी हे त्यांच्या सिनेमांसह इतरांचंही कौतुक करायला हजर असायचे. अमृता ‘कोर्ट’च्या स्क्रीनिंगला उपस्थित होती. सिनेमा झाल्यावर तिने इतर प्रेक्षकांप्रमाणे प्रश्न-उत्तराच्या सेशनमध्येही सहभाग घेतला.

lp23

बालपणीची आठवण करून देणारा आणखी एक सिनेमा फेस्टिव्हलमध्ये बघायला मिळाला. ‘द पनिशमेंट’.. या तमिळ सिनेमाचंही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. विषय गंभीर असला तरी शाळेशी संबंधित असल्यामुळे सगळ्यांना जवळचा वाटला. शाळेत अनेकदा अनेकांनी मार खाल्ला असेल, शिक्षा भोगली असेल. नेमका हाच विषय सिनेमात रेखाटला आहे. शाळेतल्या शिक्षकांचं काम हे उत्तम शिक्षण देण्याचं असतं. पण, काही वेळा मुलांनी शिस्त पाळली नाही की त्यांच्यावर डाफरलं जातं, मारलं जातं. पण, या मारण्याचे अनेकदा खोलवर परिणाम होतात. या सिनेमातही असंच आहे. एक शिक्षिका एका मुलाला मारते. त्याचे होणारे परिणाम त्या शिक्षिकेला भोगावे लागतात. थोडक्यात, शिक्षा म्हणून मुलांवर हात उगारल्यावर त्या शिक्षेचे परिणाम काही वेळा शिक्षकांनाही भोगावे लागतात. कधीकधी त्यात शिक्षिकेची चूक नसतेही, काही वेळा मुलांचीही नसते. तरी त्याचे परिणाम हे भोगावे लागतात. गंभीर विषय उत्कृष्ट मांडणीसह दिग्दर्शक ब्रम्माने रेखाटला आहे.

हिंदीमध्ये ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जाम’, ‘कॉफी ब्लूम’ आणि ‘डोंबिवली रिटर्न’ या सिनेमांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘बुद्धा इन..’मध्ये आजचा तरुण, सोशल मीडिया आणि देशासाठी काहीतरी करायची तयारी असं सगळं यात आहे. एमबीएच्या एका विद्यार्थ्यांचं एक सोशल मीडियावर कॅम्पेन हिट होतं. त्याला असं वाटू लागतं की, देशासाठी काही करायचं असेल तर सोशल मीडियाचा चांगला वापर होऊ शकतो. त्याचे सर त्याला एक आव्हान देतात. एका पॉटरी क्लबमध्ये येणारा पैसा थेट आदिवासी भागांमध्ये कसा जाईल यासंबंधी एक मार्केटिंग प्रोजेक्ट करायला सांगतात. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर तो ते प्रोजेक्ट तयार करतोही. पण ते नाकारलं जातं. त्याक्षणी त्याला यातलं राजकारण कळू लागतं. तो या सगळ्याशी कसा संघर्ष करतो, लढा कसा देतो याचं चित्रण केलं आहे. पर्यायाने आजच्या युवा पिढीचं दर्शन यातून होतं. या पिढीला नेमकं हवं तरी काय हेही योग्य रीतीने दाखवला आहे. सिनेमा पुस्तकाच्या धडय़ांप्रमाणे उलगडत जात असल्यामुळे प्रेक्षकांना समजायला सोपा वाटतो. त्यामुळे एखादं पुस्तक वाचल्यागत सिनेमा पुढे सरकतो. ही सिनेमाची जमेची बाजू. म्हणूनच प्रेक्षकांनीही सिनेमाला पसंती दिली. नक्षलवादी, आदिवासी यांच्या प्रश्नांवर वेगळ्या दृष्टिकोनाने सिनेमा तयार केल्यामुळे सिनेमा लक्षात राहतो.

‘डोंबिवली रिटर्न’ या सिनेमाचंही खूप कौतुक झालं. यामध्ये सामान्य माणसाची कथा आहे. ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ अशी म्हण मध्यमवर्गीय सामान्य मराठी माणूस नेहमी म्हणत असतो. तसा तो वागतोही. पण या जगात आपला टिकाव लावायचा असेल तर थोडे छक्के-पंजे करायला शिकलं पाहिजे हे यातून सांगितलं आहे. अनंत वेलणकर या सर्वसामान्य माणसाची ही कथा. सिस्टीमच खराब आहे, असं म्हणून सतत या ‘सिस्टीम’ला दोष दिला जातो. पण या सिस्टीममध्ये आपण शिरलो आणि मिळालेल्या पॉवर, पोझिशनचा योग्य रीतीने वापर करायचा ठरवलं तर ही सिस्टीम पुन्हा स्वस्थ बसू देत नाही. या सगळ्या कात्रीत सापडलेल्या अनंत वेलणकरची ही गोष्ट. तो यातून कसा बाहेर पडतो, स्वत:च्याच विचारांशी कसा लढा देतो, हे चित्रण केलं आहे. अभिनय, दिग्दर्शन, संगीत या सगळ्यात सिनेमाने बाजी मारली आहे. सिनेमाची संपूर्ण टीम स्क्रीनिंगच्या वेळी हजर होती. संदीप कुलकर्णीचा एक चाहता खास नाशिकहून हा सिनेमा बघायला आला होता. याच वेळी प्रश्न-उत्तर सेशनमध्ये संपूर्ण टीमला प्रश्न कमी आणि सिनेमा कौतुकाच्या प्रतिक्रिया जास्त येत होत्या. या सिनेमाच्या नावामुळे ‘डोंबिवली फास्ट’संबंधी प्रश्न कोणी विचारला नसता तरच नवल होतं. त्यावर संदीप कुलकर्णी म्हणाले, ‘‘दोन्ही सिनेमांचा एकमेकांशी संबंध नाही. ‘डोंबिवली फास्ट’चा ‘डोंबिवली रिटर्न’ हा दुसरा भाग नाही. हा संपूर्ण वेगळा सिनेमा आहे. ‘डोंबिवली फास्ट’मधल्या नायकाचा संघर्ष खूप अग्रेसिव्ह होता. मात्र ‘डोंबिवली रिटर्न’मधला नायक हा स्वत:शीच, आतून झगडतो.’’ वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्ये ‘कॉफी ब्लूम’चाही नंबर लागतो. गोष्ट अगदी साधी. देव आपली दक्षिण भारतात असलेल्या घराकडची पारंपरिक वारसा असलेली कॉफी इस्टेट घरच्यांच्या नकळत विकतो. कालांतराने त्याच्या आईचं निधन होतं. त्यानंतर तो पुन्हा ती इस्टेट मिळवण्याचे प्रयत्न सुरू करतो. या कथेची गुंफण अतिशय उत्तम प्रकारे केली आहे. साधा, सोपा विषय वेगळ्या मांडणीने हाताळल्यामुळे चार चाँद लागलेत.

परदेशी भाषिक सिनेमांमध्ये ‘फिव्हर’ या फ्रेंच आणि ‘ब्रोकन हिल ब्ल्यूज’ या स्वीडीश सिनेमांनीही पसंती मिळवली. दोन्ही सिनेमे टीन एजर्स मुलांवर आधारित आहेत. या वयात त्यांचा जगाशी होणारा वैचारिक संघर्ष, त्यांची बदलती विचारसरणी, त्यांचं भावविश्व अशा गोष्टी सिनेमात रेखाटल्या आहेत. दोन्ही सिनेमे शांत प्रवृत्तीचे असले तरी खूप काही सांगून जातात. या विषयाकडून पुढे जात ‘द ट्री’ हा स्लोव्हेनिया देशातला सिनेमा एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. त्यांचं घर देशाच्या अशा एका ठिकाणी स्थिरावलं आहे जिथून बाहेर पडताना अनेकदा विचार करावा लागतो. बाहेर पडलो तर परत जिवंत घरी येण्याची खात्री नाही. त्या घरात एक आई आणि तिची दोन मुलं. एक लहान मुलगा. आणि दुसरा वयात आलेला. या तिघांच्या कल्पना, भावविश्वाची ही कहाणी. आपण इथून बाहेर का पडू शकत नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधणारा तो लहान मुलगा, त्या मुलाला आणि वयात आलेल्या मुलाला सांभाळण्यासाठी धडपडणारी आई आणि वयात आलेल्या मुलाचा संघर्ष असं सगळं यात आहे. सिनेमा तिघांच्या तीन वेगवेगळ्या गोष्टींमधून उलगडत जातो. ‘आय अ‍ॅम नॉट हीम’ हा टर्कीश सिनेमाही खूप काही न बोलता बरंच काही सांगून जातो. लग्न झालेल्या मध्यमवयीन माणसाची ही कथा. एका कॅन्टीनमध्ये काम करणारा हा माणूस तिथल्याच एका तरुणीकडे आकर्षिला जातो. तीही त्याच्याशी मैत्री करते. तिचा नवरा तुरुंगात असतो. या दोघांमध्ये शारीरिक संबंधांना सुरुवात होऊन ते मानसिकरीत्या एकमेकांच्या जवळ येतात. याच दरम्यान ती मरते आणि पुढे त्याने न केलेल्या गुन्ह्यंची शिक्षा तो भोगत जातो. या सगळ्याचा तो शोधही घेतो. या त्याच्या शोधकामाचा हा सिनेमा. कमी संवाद पण एकेक पात्राचं व्यक्त होणं अभिनयातून झळकतं.

सिनेमांबरोबर फेस्टिव्हलचं आकर्षण होतं ते सिने इंडस्ट्रीतल्या बडय़ा लोकांची उपस्थिती. आमिर खान, अनुराग कश्यप, माधुरी दीक्षित, परिणीती चोप्रा, वाणी कपूर, इशा गुप्ता, अनुष्का शर्मा अशा अनेक
प्रस्थापित कलाकारांची उपस्थिती लाभली होती. एरवी कलाकारांना केवळ बघण्यासाठी झुंबड लागलेली असते. मात्र इथे कलाकारांचं अभिनय कौशल्य, मार्गदर्शन, विविध विषयांवरचे विचार हे सगळं अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. फेस्टिव्हलमध्ये असणाऱ्या सिनेमांच्या नवोदित कलाकार, दिग्दर्शकांचं इंडस्ट्रीतले प्रस्थापित कलाकार, दिग्दर्शक कौतुक करत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते. प्रेक्षकांसाठी काही सिनेस्टार्ससोबत संवादात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. अर्जून कपूर, एकता कपूर, विशाल भारद्वाज, विक्रमादित्य मोटवाने, इम्तिआज अली, श्याम बेनेगल, नर्गिस फक्री अशी मंडळी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होती. केवळ सिनेमांनाच नव्हे तर अशा कार्यक्रमांनाही प्रेक्षकांनी गर्दी केली होती. फेस्टिव्हलच्या समारोपाच्या वेळी माधुरी दीक्षित म्हणाली की, ‘‘सिनेमा हे लोकांना आणि देशांना जोडण्याचं माध्यम आहे. ‘मामि’सारखे फेस्टिव्हल महत्त्वाची भूमिका बजावतायत. जगभरातले चांगले सिनेमे लोकांना दाखवले जातात, त्यांना पुरस्कार दिले जातात, ही चांगली गोष्ट आहे. या क्षेत्रात येणाऱ्या नवनवीन कलाकार, दिग्दर्शकांना मार्गदर्शन करण्याची आपली जबाबदारी आहे.’’ तर आमिर खान याने सांगितलं, ‘‘मी या फेस्टिव्हलच्या पहिल्या वर्षांचा एक भाग होतो. मला त्यावेळेचा तो सगळा उत्साह, जोश आठवतो. अनेक अडचणींवर मात करून हा फेस्टिव्हल उत्तमरीत्या यशस्वी करणाऱ्या अनेकांचे मी आभार मानतो.’’

lp22

फेस्टिव्हलमधला ‘डायमेन्शन्स मुंबई’ या शॉर्टफिल्म स्पर्धेला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो. याही वर्षी या स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. कॉलेजमधल्या मुलांनी केलेल्या या पाच मिनिटांच्या शॉर्टफिल्म्सचं खूप कौतुक झालं. मित्रपरिवार, कुटुंबीय असे सगळेच आपापल्या मुलाचं, मित्राचं कौतुक करायला तिथे हजर होते. त्यामुळे ही स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईवर आधारित शॉर्टफिल्म्समध्ये ‘बॉलीवूड बझार’, ‘बाँड्री’, ‘बॉम्बे 70’, ‘बंबइय्या’, ‘चटईवाला’, ‘जिवाची मुंबई’, ‘मरीन ड्राइव्ह’, ‘महानगरी’, ‘अनफिट’, ‘सेल्फी’ अशा एकूण वीस शॉर्टफिल्म्स स्पर्धेत उतरल्या होत्या. यामध्ये बाजी मारली ती ‘बॉम्बे 70’ ने. या फिल्मने सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी ‘सिल्वर गेट-वे ऑफ इंडिया ट्रॉफी’ हा पुरस्कार पटकवला. तर यानंतरच्या उत्कृष्ट शॉर्टफिल्म्स ठरल्या ‘अनफिट’ आणि ‘सेल्फी’. मुंबईवर आधारित शॉर्टफिल्म्स बनवण्याच्या स्पर्धेत तरुणांचा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कौतुकास्पद होता.

काही सिनेमांचं स्क्रीनिंग रद्द केल्यामुळे अनेक प्रेक्षकांची निराशा झाली. आणि ते चर्चेत असलेल्या काही सिनेमांपासून वंचित राहिले. पण तरी आठ दिवसांच्या या फेस्टिव्हलमध्ये सिनेमाप्रेमींनी वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे बघून आपली झोळी भरून घेतली हे नक्कीच!