जूनअखेरीपासून टीव्हीवर नव्या कार्यक्रमांची लाट पसरणार आहे. यात हिंदी चॅनल्स रिअॅलिटी आणि कथाबाहय़ कार्यक्रमांकडे, तर मराठी चॅनल्स कौटुंबिक मालिकांकडे झुकलेले दिसताहेत.

चॅनलवर कधी, कोणता शो सुरू करायचा हे पक्कं ठरलेलं असतं. सभोवताली घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेत टीव्हीवर येणाऱ्या शोजची आखणी केली जाते. म्हणूनच आयपीएल, निवडणुका, वर्ल्ड कप, परीक्षा, बिग बजेट सिनेमा किंवा प्रतिस्पर्धी चॅनलच्या मोठय़ा बॅनरचा शो, येणारा काळ अशा अनेक घडामोडींचा विचार कोणताही नवा शो येत असताना केला जातो. काही वेळा काही चॅनल्स अशा काळातही नवे शोज आणण्याचं आव्हान स्वीकारतात; पण अपेक्षेप्रमाणे कार्यक्रमांना फारसं यश मिळत नाही. वर्षभरात ठरावीक कालावधीत ठरावीक शोज सुरू होण्याचा साचा आता प्रेक्षकांनाही ठाऊक झालाय. म्हणूनच जून उजाडला की, प्रेक्षक वाट बघतात ती नव्या शोजची. आयपीएल हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण. साधारणत: एप्रिल-मेमध्ये आयपीएल सुरू असताना नवीन शोज सुरू करण्याचं धाडस मोजकेच चॅनल्स करतात. यंदा मात्र काही नव्या शोजची एंट्री या दोन महिन्यांमध्ये झाली. यात मालिकांची संख्या जास्त आहे; पण पुढच्या दोन महिन्यांमध्ये हिंदी चॅनल्सवर येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रिअॅलिटी शो, पौराणिक मालिका यांचं प्रमाण जास्त आहे, तर मराठीमध्ये मालिकांचा ओघ जास्त असल्याचं दिसून येतंय.
दोन वर्षांपूर्वी जूनमध्ये तीन बिग बजेट रिअॅलिटी शो एकाच दिवशी सुरूझाले होते. साधारणपणे, मोठय़ा बॅनर आणि बजेटचे दोन शो एकाच दिवशी सुरू होत नाहीत; पण त्या वेळी ‘झलक दिखला जा’, ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’ आणि ‘डीआयडी सुपरमॉम्स’ असे तीन शोज एकाच दिवशी सुरू झाले होते. या वर्षी ‘इंडियन आयडॉल’ हा कार्यक्रम आधीच मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाला, तर ‘डीआयडी सुपरमॉम्स’चा सीझन गेल्या आठवडय़ातच संपला. ‘झलक दिखला जा’ हा शो मात्र जुलैमध्ये सुरू होतोय. या नवीन कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या मालिकांसह पौराणिक, ऐतिहासिक मालिकांचाही समावेश आहे. मराठीमध्ये कौटुंबिक, प्रेमकथा अशा विषयाच्या मालिका भेटीस येतील. जूनअखेरीसपासून सुरू होणारा नव्या कार्यक्रमांचा सिलसिला प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे.
डेली सोपचा मोठा इतिहास आहे. तशीच त्याची प्रेक्षकसंख्याही अफाट आहे. त्यामुळे त्याला पर्याय शोधणं तसं कठीणच. तरीसुद्धा टीव्ही या प्रयोगशील माध्यमाने रिअॅलिटी शोची वाट धरली आणि एकेक रिअॅलिटी शोज बिग बजेटच्या रांगेत बसू लागले. असेच काही शोज येत्या काही दिवसांत येऊ घातलेत. स्टार प्लसवर ‘डान्स प्लस’ हा नवा शो सुरू होतोय. डान्सिंग मास्टर रेमो डिसूजा या शोचा परीक्षक असेल, तर याच शोसाठी सुपरस्टार हृतिक रोशनसोबतही चर्चा सुरू आहे. जर हृतिकने या शोमध्ये परीक्षक म्हणून येण्यास स्वीकार केला, तर हा त्याचा दुसरा रिअॅलिटी शो असेल. याआधी त्याने ‘जस्ट डान्स’ या शोचं परीक्षण केलं होतं. हृतिक आणि रेमो या दोघांचाही चाहतावर्ग खूप आहे. त्यामुळे दोघे या शोमध्ये एकत्र आले, तर शोचं यश फार लांब नक्कीच नाही. जुलैमध्ये सुरू होणाऱ्या ‘डान्स प्लस’ या शोसोबतच आणखी नृत्यावर आधारित शो कलर्सवर सुरू होतोय. ‘झलक दिखला जा’ हा लोकप्रिय शो नव्या परीक्षकांसह लवकरच सुरू होतोय. यंदा डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित ही परीक्षकांच्या खुर्चीत बसणार नाही, तर तिच्या जागी चॉकलेट हिरो शाहिद कपूर असल्याची चर्चा आहे. तसंच रेमो डिसूजाही ‘झलक..’च्या या सीझनमध्ये परीक्षण करताना दिसणार नाही. त्याच्याऐवजी कोरिओग्राफर गणेश हेगडेची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. करण जोहर मात्र या शोचं परीक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे ‘झलक..’चं यंदा परीक्षकांमध्ये झालेल्या बदलामुळे नवं स्वरूप प्रेक्षकांना बघायला मिळेल. नृत्यप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने मेजवानी असणार आहे, कारण ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक..’सह झी टीव्हीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा शोदेखील सुरू होत आहे. यांच्याही परीक्षकांच्या संचात बदल झालेले आहेत. मुद्दसर, पुनीत आणि गैती हे कोरिओग्राफर्स परीक्षक, तर मिथुन चक्रवर्ती ग्रँडमास्टर म्हणून शोमध्ये दिसतील.
अलीकडे सास-बहू ड्रामा असलेल्या मालिकांसह पौराणिक, ऐतिहासिक मालिकांनाही प्रेक्षकवर्ग चांगलाच मिळू लागला आहे. पूर्वीच्या ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘श्रीकृष्णा’ अशा मालिकांनी ते सिद्ध केलंच आहे. पण, मधल्या काळात मालिकेचा हा बाज फारसा पाहायला मिळत नव्हता. पण, लाइफ ओकेच्या ‘देवों के देव महादेव’ या मालिकेने प्रेक्षकांना पुन्हा पौराणिक मालिकांकडे वळवलं. हिंदीत ‘भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप’, ‘जोधा-अकबर’, ‘महाभारत’, ‘सम्राट अशोक’, ‘महाकुंभ’, ‘संकटमोचन महाबली हनुमान’, तर मराठीत ‘जय मल्हार’, ‘तू माझा सांगाती’ अशा पौराणिक, ऐतिहासिक, संतांवरील मालिकांची लाट पुन्हा आली. आता यामध्ये भर पडतेय ती ‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकेची. कर्णाची संघर्षमय जीवनगाथा सांगणारी ही नवी मालिका लवकरच सोनीवर सुरू होत आहे. कृष्णावर बेतलेली एक मालिका येत्या काही दिवसांत झी टीव्हीवर सुरू lp64होईल. ‘राधा कृष्ण’ असं या मालिकेचं नाव. या मालिकेचं वैशिष्टय़ असं की, विषय कृष्ण हा असला तरी मालिका राधाच्या दृष्टिकोनातून मांडली जाईल. त्यामुळे कृष्णविषयक नव्या दृष्टिकोनाची मालिका झी टीव्हीवर बघायला मिळेल. तर सब टीव्हीवर पौराणिक विषय घेऊनच एक आधुनिक स्वरूपाची मालिका येतेय. ‘कृष्ण कन्हैया’ ही मालिका पौराणिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारचा मेळ घालणारी असेल.
लाइफ ओकेवर ‘एक नयी उम्मीद-रोशनी’ ही डॉक्टरांच्या आयुष्यावर आधारित मालिका येत आहे, तर स्टार प्लसवर ‘बत्तमीज दिल’ ही प्रेमकथा सांगणारी मालिका सुरू होतेय. कथाबाह्य़ कार्यक्रमांमध्ये ‘द अनुपम खेर शो’ कलर्सवर जुलैअखेरीस किंवा ऑगस्टमध्ये सुरू होतेय. बॉलीवूड ताऱ्यांसोबत गप्पा मारण्याचा ‘कॉफी विथ करन’ हा शो लोकप्रिय झाला होता. त्याचे अनेक सीझन झाले. तशाच धाटणीचा पण, थोडा देसी स्टाइलचा ‘द अनुपम..’ हा शो दुसरा सीझन घेऊन येतोय. या कार्यक्रमाचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे त्याचा दुसरा सीझन लवकरच सुरू होतोय. या वेळी बॉलीवूडचे मोठे स्टार यात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे यंदाच्या सीझनला चार चाँद लागतील असं दिसून येतंय. अँड टीव्ही या नव्या चॅनलवर एक मालिका आणि एक रिअॅलिटी शो असे दोन कार्यक्रम नव्याने सुरू होतील अशी माहिती मिळाली. दोन्हींचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे.
मराठी चॅनल्स मात्र सास-बहू मालिकेत रमले आहेत असं दिसतं. झी मराठीवर जुलैमध्ये एक कौटुंबिक प्रेमकथा एका मालिकेतून सादर होईल. चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे ही नवी जोडी मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तर कलर्स मराठीवर ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका लवकरच सुरू होतेय. मृणाल दुसानिस आणि संतोष जुवेकर हे दोघं प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. दोन चॅनलवर दोन नव्या जोडय़ा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या जोडय़ांमधले चारही कलाकार लोकप्रिय आहेत. थोडक्यात, हिंदीत मालिकांपेक्षा रिअॅलिटी किंवा कथाबाह्य़ कार्यक्रमांकडे कल दिसून येतोय. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांसाठी कार्यक्रमांचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. ज्यांना मालिकांमध्ये रस आहे ते मराठी चॅनल्सकडे वळतील, असं चित्र समोर आहे. एक मात्र निश्चित, या नवनव्या कार्यक्रमांमुळे विशेषत: रिअॅलिटी शोजमुळे पुन्हा एकदा चॅनल वॉर रंगेल अशी चिन्हं आहेत.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com