गणेशोत्सव म्हणजे झगमगाट, रोषणाई, उत्साह, आनंद आणि तो साजरा करण्यासाठी डॉल्बी तसंच भारतीय वाद्यांचा प्रचंड आवाज. सार्वजनिक पातळीवर ही ध्वनिमर्यादा किती असावी याचे न्यायालयाने घालून दिलेले र्निबध पाळण्यासाठी नसतात असाच आपल्याकडे बहुतेकांचा समज आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यभरात यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा पाळण्याच्या पातळीवर नेमकं काय झालं याचा आढावा आणि ध्वनिप्रदूषणाच्या पातळीवर जाणीवजागृती करणारे ‘व्हिसल ब्लोअरर’ काय म्हणतात?

श्रावणाची चाहूल लागली की खाणारे हात आखडतात, पण वाजवणाऱ्या हातांना खुमखुमी येते. कधी हे हात ढोल ताशांचे असतात तर कधी ते बँजो वाजविणारे तर कधी झांजपथकांचे तर कधी डीजे वाजविणारे असतात. सगळ्यांनाच चेव येतो आणि शहरातील मोकळ्या मैदानावर सर्वाची हातसफाई सुरू होते. दहीहंडीपासून ते नवरात्रीपर्यंत मग या साऱ्याच वाद्यांचा एकच गदारोळ माजून राहतो. ट्रकवर लादलेल्या ध्वनिक्षेपकांच्या मोठाल्या भिंती, एकाच गणपतीपुढे चार-पाच ढोल पथकांच्या रांगा आणि भरीस भर म्हणजे या सर्वाला ऊर्जा मिळावी म्हणून जनरेटरची सोय. गणेश विसर्जन मिरवणुकीचं असंच काहीसं चित्र गेले काही वर्षे आपल्याकडे सामान्यत: दिसून येत आहे. विसर्जन मिरवणुकीत हा सारा गदारोळ इतका टिपेला पोहचतो, की या देशात ध्वनिप्रदूषण रोखणारा कायदा आहे की नाही असाच प्रश्न पडतो. विशेष बाब म्हणजे हा प्रश्न निर्माण करण्यात आधुनिक वाद्यांचा जसा सहभाग आहे, तसाच किंबहुना जरा जास्तीच पारंपरिक वाद्यांचादेखील आहे. आरोग्यशास्त्र संमत आणि कायद्याने आखून दिलेल्या आवाजाच्या पातळीपेक्षा दुपटीने आवाज करणारी ही साधनं हा गणेश विसर्जन मिरवणुकीचा जणू काही अविभाज्य घटक आहेत. अर्थात गेल्या पाच-सात वर्षांत ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागरण आणि कायद्याचा दट्टय़ा वाढल्यामुळे असेल, पण अनेक ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होताना दिसते. मात्र वेळेची मर्यादा पाळताना, आवाज पातळीच्या मर्यादेला फाटय़ावर मारले जात आहे. जणू काही दहा दिवसांची सारी खुमखुमी मिरवणुकीच्या एका दिवसात रस्त्यावर उतरलेली दिसून येते. यंदाच्या गणेशोत्सवात राज्यभरात हेच चित्र होते.
यामागे आपल्याकडे मुळातच नागरी कर्तव्यांबद्दल असलेला दुर्लक्षिततेचा स्वभाव हा कारणीभूत आहे. दुसरे असे की, कधी तरी आम्ही आवाज केला तर काय होते, होईल सवय आवाजाची. अशी एक सर्वसामान्य भूमिकादेखील दिसून येते. तर शासकीय यंत्रणांची अनास्था हीदेखील तितकीच महत्त्वाची ठरते. म्हणजेच अजूनही आपल्याला या विषयाचे वैज्ञानिक गांभीर्य पुरते आलेले नाही असेच म्हणावे लागेल.
जेव्हा ध्वनिप्रदूषणाबद्दल ७०-८० च्या काळात चर्चा होऊ लागली तेव्हादेखील असेच अज्ञान कारणीभूत होते. तेव्हा पहिला प्रश्न होता ध्वनिप्रदूषण म्हणजे काय, कसे दिसते, त्याचा परिणाम काय असे अनेक प्रश्न विचारले होते. पाण्याचे, हवेचे प्रदूषण माणसाला लगेच जाणवते ते त्याच्या शरीरावर होणाऱ्या त्वरित परिणामांमुळे. पण ध्वनिप्रदूषण नेमके तुमच्यावर काय परिणाम करते हे असे त्वरित दाखविणे शक्य नाही. त्यामुळेच अदृश्य असे हे प्रदूषण नेमके काय परिणाम करते हे मांडणेच तेव्हा खूप कठीण होते, महत्त्वाचे होते. डॉ. यशवंत ओक यांनी १९८५ साली अ‍ॅण्टी नाइज पोल्यूशन कमिटी, मुंबईच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणावर जाहीरपणे भूमिका घेतल्यावर काही प्रमाणात लोकांना ते पटू लागले.
ध्वनिप्रदूषणाच्या परिणामाबद्दल डॉ. यशवंत ओक सांगतात, ‘‘आवाजाचे प्रदूषण हा आपला अदृश्य लपलेला शत्रू आहे. आवाजाची विवक्षित पातळी ओलांडल्यामुळे मानवी शरीरावर त्वरित परिणाम होत नसले तरी कालांतरानंतर होणारे परिणाम गंभीर स्वरूपाचे असतात. सर्वात महत्त्वाचा परिणाम हा तुमच्या श्रवणशक्तीवर होतो आणि हळूहळू तुम्हाला बहिरेपण येते. गोंगाटाची, ध्वनिप्रदूषणाची सवय होणं म्हणजे तुम्हाला बहिरेपणाची सवय होण्यासारखे असते. तुमच्या आयुष्यातील शांततेचा भंग झाल्यामुळे चिडचिड होते. तुमच्यातील िहसकपणा वाढू लागतो. त्यातूनच मग रक्तदाबासारखे विकार हे चोर पावलांनी शिरतात. मानसिक शांतता ढळते, त्याचा परिणाम शरीरावर हमखास होतो. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व घडते ते तुम्हाला नको असताना हे आवाज तुमच्या कानावर आदळत असल्यामुळे. कोठेतरी वाजत असणारा डीजे, बांधकाम, औद्योगिक क्षेत्रातील काम अशा अनेक गोष्टी केवळ तुम्ही त्या परिसरात राहता म्हणून तुम्हाला सहन कराव्या लागत असतील, तर तुम्ही जुलुमाचे श्रोते ठरता आणि विकारांना बळी पडता. हे आपल्याला घटनेने दिलेल्या शांततेने जगण्याच्या मूलभूत अधिकारा (कलम २१) विरुद्ध आहे. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणाचे परिणाम काय होतात हे जागतिक आरोग्य संघटनेने १९८० सालीच सिद्ध केले आहेत, त्याकडे आपण अक्षम्य असे दुर्लक्ष करत आहोत असेच म्हणावे लागेल. सर्वसामान्य माणसासाठी रात्री दहा ते सकाळी सहा ही झोपण्याची वेळ आहे. तर दिवसा आपली नैमित्तिक कामे पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी त्याला आवश्यक ती शांतता गरजेची आहे. त्यानुसार आवाजाची पातळी मर्यादा आखून देण्यात आली आहे. ती पाळणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात आपल्याकडे वरील आजारांचे प्रमाण वाढत जाणार हे नक्की.’’
अर्थात हे आपल्या समाजाला पचणे जड होते. डॉ. ओक यांनी जेव्हा ध्वनिप्रदूषणाबद्दल आवाज उठविला तेव्हा त्यांना जी शेकडो पत्रे आली, त्यांतील अनेक तक्रारींतून हाच सूर जाणवला होता. कोणी मंडळाला यावर्षी घरावर स्पीकर लावू नका म्हटल्यावर भांडण झाले होते, तर एका वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाने आवाजाबद्दल तक्रार केली असता त्याच्या घरावर दगडफेक झाली होती. अर्थात आज तीस वर्षांनंतर परिस्थितीत थोडातरी फरक पडला असल्याचे दिसून येत आहे. लोकांना सध्या वेळेचे तरी किमान भान आले आहे. पण विवक्षित वेळी आवाज पातळीची मर्यादा पाळायची असते हे मात्र अजून तरी पूर्णपणे पटलेलं आहे असे दिसत नाही असे डॉ. ओक आणि आवाज फाऊंडेशनच्या सुमेरिया अब्दुलाली नमूद करतात.
इतकेच नाही तर आज जी पारंपरिक वाद्ये मोठय़ा प्रमाणात वाजवली जात आहेत त्यांनी देखील आवाजाची मर्यादा ओलांडली आहे असे डॉ. ओक सांगतात. यालाच दुजोरा देताना आवाज फाऊंडेशनच्या सुमेरिया अब्दुलाली सांगतात, ‘‘गेल्या काही वर्षांत ढोल ताशांच्या पथकांची आवाज पातळी तपासली असता ती १०० च्या आसपास आढळून आली आहे. तर बँजो पथकांची आवाजाची पातळीदेखील १००-१०५ डेसिबलच्या आसपास आहे.’’
याचसंदर्भात पुण्यातील श्रवणशास्त्रज्ञ डॉ. कल्याणी मांडके सांगतात, ‘‘ढोल-ताशे हे आपल्याकडे लाऊड स्पीकरला पर्याय म्हणून वापरले जात आहेत. त्यातूनदेखील मोठय़ा प्रमाणात आवाज निर्माण होतोच. ढोल-ताशांच्या आवाजाचा जसा इतरांवर परिणाम होतो त्यापेक्षा अधिक धोका आहे तो वादकांना. आवाजामुळे त्यांचे संपूर्ण शरीर व्हायब्रेट होत असते. अगदी गाडीतून उतरलो तरी आपलं शरीर आंबलं आहे असे जे आपण म्हणतो ते आपल शरीर व्हायब्रेट होण्यामुळे असते. तसेच ढोल वादक जेव्हा आपल्या पोटावर ढोल बांधतो तेव्हा त्याच्या शरीरातील सर्वच ऑर्गन्स व्हायब्रेट होतात, विशेषत: पोटातील ऑर्गन्स वरखाली, पुढेमागे हलतात. डॉल्बी समोर उभे राहिल्यास छातीच्या फासळ्या हलल्यासारखे जाणवते. ते खरं तर तुमच्या शरीराचे व्हायब्रेशन असते. शरीराचे असे व्हायब्रेट होणे हे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे भविष्यात आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.’’ मणक्याचे आणि किडनीसंदर्भातील प्रश्न निर्माण होतात हे अभ्यासाने सिद्ध झाले असल्याचे डॉ. कल्याणी मांडके सांगतात.
म्हणजेच केवळ डीजेच नाही तर त्याला पर्याय म्हणून आपण जे काही वापरत आहोत त्यानेदेखील प्रदूषण होतच आहे. ढोल ताशा पथकातील वादक एक दोन महिने सराव करतात. ही वाद्ये वाजविताना निर्माण होणाऱ्या कंपन लहरी त्यांच्या शरीरावर देखील परिणाम करतात. त्यातून पाठदुखी सारखे आजार कायमस्वरूपी जडू शकतात, असे डॉ. ओक नमूद करतात.
दुसरा मुद्दा असा की प्रत्येक आवाजाला लो आणि हाय फ्रिक्वेन्सी असते. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या आपण केवळ आवाजाच्या तीव्रतेवर बोलत आहोत. पण ताशाच्या आवाजातून निघणारी हाय फ्रिक्वेन्सी शरीरास घातक असते.
गेल्या तीस वर्षांच्या प्रयत्नानंतर ध्वनिप्रदूषणासंदर्भात जो कायदा झाला आहे तो अंतिमत: प्रत्येक माणसाच्या फायद्याचाच आहे. पण तरीदेखील आवाज पातळी मर्यादा उल्लंघनाचे प्रकार घडताना दिसतात. त्याचे कारण आपल्या मानसिकतेत आहे. आपले उत्सव असेच साजरे करायचे असतात हेच आपण पाहात आलो आहोत. जितका आवाज मोठा तितका आनंद अधिक असे पक्के समीकरण आपल्या डोक्यात बसले आहे. किंबहुना आता तर तो मंडळा मंडळातील ईर्षेचा, प्रतिष्ठेचा विषय बनत चालला आहे. त्यामुळे आवाज मर्यादेत हवा हे आकलन होण्यास आणखीन वेळ लागेल असे तज्ञांचे मत आहे. आज आपल्या समाजात दोन घटक कार्यरत आहेत. एक ज्याला ध्वनिप्रदूषणाचे महत्त्व पटले आहे आणि दुसरा जो अजूनही त्याच उत्सवी मानसिकतेत असणारा. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी पहिल्या गटातील अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. आवाजाची पातळी मोजण्याचे यंत्र हाती घेऊन अनेक कार्यकर्ते उत्सवांच्या काळात फिरत असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील गेल्या काही वर्षांपासून नियमित नोंदी घेत असते. मात्र मंडळ कारवाई करू शकत नाही तर ते अधिकार पोलिसांना आहेत. पोलिसांनी देखील आवाजाची पातळी मोजण्यास सुरुवात केली आहे. उत्सवाच्या दरम्यान मंडपावर कारवाईचे प्रकार घडतात, मात्र मिरवणुकी दरम्यान मात्र पोलीस काहीसे हतबलपणेच उभे असलेले दिसतात. सध्या ध्वनिप्रदूषणाचा समावेश शालेय अभ्यासक्रमातदेखील करण्यात आला आहे. त्यातूनच शांतता प्रिय नवी पिढी घडू शकेल. अर्थात हा कायदा होण्यास आणि त्याचे परिणाम दिसण्यास तीस वर्षे लढावे लागले तेव्हा कोठे आजची परिस्थिती दिसत आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

प्रदूषण रोखणारी दिवाळी प्रतिज्ञा –
कायदा झाला असला तरी जनजागरण ही कायमस्वरूपी प्रक्रिया असल्यामुळे डॉ. ओक यांनी पुढाकार घेऊन मराठी विज्ञान परिषद आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या माध्यमातून दिवाळीतील फटाक्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. भविष्यातील पिढीला जागरूक करण्यासाठी दिवाळीतील प्रदूषण रोखणारी ही प्रतिज्ञा २००५ पासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घेतली जाते.

तुम्हीच मोजा ध्वनी प्रदूषण –
ध्वनी प्रदूषण होतय हे लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करावे यासाठी आवाज फाऊंडेशनने विस्तृत माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे. तक्रार कोणाला करायची, त्याचा पाठपुरावा कसा करायचा ही माहिती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्मार्ट फोनच्या साहाय्याने आपणच आपल्या परिसरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजू शकता. अ‍ॅण्ड्रॉईड प्रणालीवर आधारीत अ‍ॅपच्या आधारे आपण अगदी सहजपणे ही पातळी मोजून त्याची नोंद संस्थेच्या फेसबुक पेजवर व डेटा सेंटरमध्ये करु शकता.