lp18घरोघरी फिरून लोकांच्या घरची उरलेली औषधं गोळा करून ती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे ओंकारनाथ आता मेडिसीन बाबा म्हणूनच ओळखले जायला लागले आहेत.

दिल्लीच्या रस्त्यावर एक माणूस दिसतो. त्याच्या अंगातला नारिंगी रंगाचा सदरा व त्यावर लिहिलेला मजकूर असतो- फिरती औषध बँक. ओंकारनाथ आणि त्या माणसाचा मोबाइल नंबर. वयाची पंचाहत्तरी उलटून गेलेले हे गृहस्थ दररोज काही किलो मीटर पायपीट करत लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याकडे विनावापर पडून असलेली, पण एक्सपायरीडेट न उलटलेली औषधे जमा करतात. त्यांच्या चालीकडे पाहिले तर ते कष्टाने चालत आहेत हे लक्षात येते, पण त्यांच्या उत्साहाला खळ नाही हेही जाणवते. जागरूक लोक त्यांना फोन करून बोलावून घेतात. हेच पाहाता आज रूपकिशन राम यांचा फोन आला होता. त्यांच्या घरात औषधांचा मोठा ढीगच साठला होता. त्यांच्या वडिलांना आता डायलेसीस करून घ्यावे लागत होते. त्याची सुरुवात होण्यापूर्वी त्यांना अनेक डॉक्टरांना दाखवले होते. प्रत्येक डॉक्टराने पूर्वीची औषधे बदलून नवी औषधे सांगितली होती. अशी न वापरलेली गेलेली बरीच औषधे साठलेली होती. रूपकिशनच्या पत्नीची हृदयशस्त्रक्रिया झालेली होती. शस्त्रक्रियेपूर्वीची त्यांची औषधेही पडून होती. ती सर्व औषधे आज ओंकारनाथना मिळाली होती.
ओंकारनाथ ७७ वर्षांचे आहेत. चालताना त्रास होतो तरी ते फेरी चुकवत नाहीत. आज तर त्यांची थैली भरली होती. म्हणून घरी जाण्यासाठी ते बसमध्ये चढले. तिथल्या प्रवाशांना त्यांनी आपले कार्ड दिले व औषधे पडून असतील तर दान करण्यास सांगत राहिले.
५० वर्षांपूर्वी ते उदयपूरहून कामाच्या शोधात दिल्लीला आले. एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना लॅब मदतनीसाचे काम मिळाले. एक दिवस घरी परतत असताना त्यांच्यासमोर एक अपघात झाला. करकरदुमा येथील मेट्रोचे उंचावरचे बांधकाम होत असताना ते कोसळले व त्यात अनेक मजूर जखमी झाले. त्यांना गुरू तेजबहादूर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जखमींच्या मदतीकरता ओंकारनाथही तिथे पोचले. तिथली परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. तेथील कर्मचारी काही जखमींना दाखल न करून घेता घरी जाण्यास सांगत होते! का तर हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा नव्हता. साध्या वेदनाशामक गोळ्याही त्यांना दिल्या जात नव्हत्या. हॉस्पिटलला हवी असणारी औषधे विकत आणण्याची परिस्थिती त्या गरीब मजुरांची नव्हती. ते तसेच तडफडत होते.
सुन्न होऊन घरी आल्यावर त्यांचे विचारचक्र फिरू लागले. अशा वेळी उपयोगी पडणारी मेडिसीन बँक कुठे आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण पदरी निराशाच आली. त्यांना आठवले, आपल्याकडे काही औषधे पडून आहेत. अडल्यानडल्यांना त्यांचा उपयोग होऊ शकेल यासाठी काय करता येईल याचा विचार ते करू लागले.
काही वेळा डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणल्यावर त्यातील काही शिल्लक राहतात. काही सरकारी हॉस्पिटलमध्ये वापरली न गेलेली औषधे परत घेतात. पण बहुतेक जण केवळ ती औषधे परत करण्यासाठी तिकडे जाण्याकडे दुर्लक्ष करतात. ती औषधे पडून राहतात. फुकट जातात. सर्वच केमिस्ट उरलेली औषधे परत घेत नाहीत. घरोघरी पडून राहिलेली औषधे मागून आणून, गोळा करून ती गरजूंना देण्यासाठी औषध बँक सुरू करावी हे त्यांनी ठरवले. ते कामाला लागले. त्यांनी कार्डे छापून घेतली. जातायेता लोकांच्या लक्षात यावे म्हणून सदऱ्यावर मजकूर रंगवून घेतला. लोक भिकारी समजतील हा विचार झटकून टाकला. कामाला सुरुवात झाली. रोजच्या फेरीत औषधे जमू लागली. त्यांच्या घराची एकमेव खोली औषधांनी भरू लागली. त्यांच्या नोंदीसाठी त्यांनी कॉम्प्युटर आणला. त्यात प्रत्येक औषध कुठून मिळाले, त्याची एक्सपायरी डेट हे भरले जाऊ लागले. त्यातील जी औषधे गरजूंकडे गेली त्याच्या नोंदी होऊ लागल्या. कोणत्याही वेळी कोणते औषध शिल्लक आहे की नाही हे कळू लागले. त्यांची पत्नी अगोदर साशंक होती. नवऱ्याने वणवण फिरावे हे तिला रुचत नव्हते. पण उपयुक्तता पटल्यावर तीही घरातली मदत करू लागली.
त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखून लोक हस्ते परहस्ते आर्थिक मदत करू लागले. त्यांचा संसार चालू राहिला. कॉम्प्युटरच्या जोडीला फ्रीज आला. त्यात इंजेक्शनच्या कुप्या विसावू लागल्या. कधी कॅन्सरवरची महागडी औषधे त्यांच्याकडे येऊ लागली. उत्तराखंडच्या जलप्रलयानंतर त्यांनी तिकडे औषधांच्या पेटय़ाच पेटय़ा पाठविल्या.
कामाचा व्याप वाढतो आहे त्यासाठी आपण एखादी एनजीओ तयार करावी असा विचार ते करत आहेत. कामाच्या भरात त्यांचा संपर्क काही एनजीओंबरोबर आला. या संस्था काही डॉक्टरांना मदतीला घेऊन गरीब वस्तीत जातात. तिथे वैद्यकीय तपासण्या करून त्यांना विनामूल्य औषधे देतात. त्या धर्तीवर आपणही एखादी संस्था स्थापन करून कामाचा विस्तार करावा हा विचार आता जोर धरत आहे. दिल्लीत विशाल मेगा मार्टची १५० विक्री केंद्रे आहेत. त्यांनी न वापरली गेलेली औषधे जमा करण्या करता त्यांच्या दुकानातून पेटय़ा ठेवल्या आहेत. त्यातून जागृती होत आहे. तिथे जमलेली औषधे ओंकारनाथना मिळतात. गरिबांसाठी गरिबांची मेडिसीन बँक असली पाहिजे या विचाराने हे मेडिसीन बाबा झपाटलेले आहेत. त्यांच्या पोषाखावरून व घरोघर फिरण्याच्या वृत्तीतून मुले त्यांना मेडिसीन बाबा नावाने ओळखू लागले आहेत. त्या नावात त्यांना आनंद आहे.
दिगंबर गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com