आजच्या धावपळीच्या जमान्यात लोकांना वाचायला वेळच मिळत नाही, तरुण पिढीला वाचनाची गोडी नाही, अशा विधानांना उत्तर ठरतील अशा दोन ग्रंथालयांची ही नोंद घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने..

पुस्तक, वाचन हे म्हटलं तर मराठी माणसाच्या आवडीचे, म्हटलं तर ‘टाइमपास’चेही विषय. परंतु याच आवडीला, विषयाला वाचनालयांच्या रूपानं व्यावसायिक जोड देत त्याचा विस्तार करण्याची कल्पना डोंबिवलीच्या ‘फ्रेण्ड्स वाचनालया’चे पुंडलिक पै यांना तब्बल २५ वर्षांपूर्वी सुचली आणि त्या योजनेचं फळ म्हणजे डोंबिवलीत त्यांनी निर्माण केलेलं वाचनालयांचं जाळं. एवढंच नव्हे तर मुंबई, पुणे आणि नाशिक इथल्या जाणकार वाचकांसाठी त्यांनी ऑनलाइन लायब्ररी सेवाही गेली काही वर्षे यशस्वीरीत्या राबवलीय. याचाच पुढचा भाग म्हणजे, पै यांनी नववर्षांचा मुहूर्त साधून १ जानेवारी २०१५ रोजी एकाच दिवसात एक हजारांहून अधिक वाचकांची नोंदणी करण्याचा यशस्वी संकल्प पूर्णत्वासही नेला..
कर्नाटकातल्या उडपीजवळ कुंदापूर इथं पुंडलिक पै यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. कुंदापूर गावातलं वातावरण तसं जुन्या पद्धतीचं. त्यामुळे वाचन, अध्ययन आदी छंदांना साहजिकच मर्यादा होत्या. गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एकच वाचनालय होतं. याच वाचनालयानं वाचनाच्या आवडीचं बीज माझ्या मनात रुजवलं, पै सांगत होते. मात्र, कुंदापूरसारख्या गावात राहत असल्यामुळे कानडी, तुळू भाषांचाच प्रभाव अधिक. परंतु वाचनालयामुळे या दोन भाषांव्यतिरिक्त कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आदी भाषांची सहजी ओळख झाली आणि त्याही भाषा पै यांना चांगल्या अवगत झाल्या. पै नंतर मुंबईत आले. मुलुंडच्या व्हीपीएम शाळेत एसएससी परीक्षा १९८१ मध्ये उत्तीर्ण झाले. नंतर १९८६ मध्ये बी.कॉम.ची पदवी मिळविली आणि त्यानंतर त्यांच्या मनात नोकरी न करता पूर्णवेळ वाचनालय चालवायचं होतं. त्या व्यवसायात उतरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. डोंबिवलीच्या टिळक नगर विद्यामंदिरासमोरच एका लहानशा जागेत पै यांनी अवघ्या १०० पुस्तकांचं वाचनालय सुरू केलं. त्या वेळी सदस्य होते ७२. अनामत रक्कम २५ रुपये आणि मासिक वर्गणी होती १५ रुपये. आज हे आकडे अत्यंत लहान वाटत असले तरी त्या वेळी निश्चितच मोठे होते आणि तरीही सुरुवातीला ७२ डोंबिवलीकरांनी वाचनालयात आपली नावं नोंदवून एक प्रकारे पै यांना उत्तेजन दिलं.
वाचनालयाच्या व्यावसायिक कारकिर्दीचा श्रीगणेशा पै यांनी अशा प्रकारे केला. जवळजवळ दीड दशक त्याच ठिकाणी पै यांची वाटचाल सुरू होती. वाचनालयाचा वेलू दिवसेंदिवस वाढत होता. पै यांनी या व्यवसायात उडी घेतली, तेव्हा डोंबिवलीत दीडशेहून अधिक लहानमोठी वाचनालयं होती. परंतु पुस्तकांची उपलब्धता, वाचकांच्या अपेक्षा, त्या अपेक्षांची पूर्तता यामध्ये काहीतरी गल्लत होत असल्याचं पै यांना सतत जाणवत होतं. त्याचमुळे आपल्या वाचनालयांच्या शाखा वाढवायला हव्यात, असं त्यांना वाटू लागलं आणि त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली पश्चिमेला गोपी चित्रपटगृहाजवळ त्यांनी दुसरी शाखा सुरू केली. ते वर्ष होतं २००४. त्यानंतर २००५ मध्ये पूर्वेला गांधीनगरच्या तिसऱ्या शाखेचा श्रीगणेशा झाला. रामनगरमध्ये २००६ या वर्षी पुढची शाखा सुरू झाली. डोंबिवली पश्चिमेलाच जोंधळे हायस्कूलजवळ २००८ मध्ये आणखी एक शाखा सुरू झाली. जोशी हायस्कूलजवळ २०१३ मध्ये पुढच्या शाखेतून वाचक सदस्यांना पुस्तकं मिळायला लागली. त्याआधी २००८ मध्ये ऑनलाइन वाचनालय सेवा सुरू झाली होती. वाचनालयं सुरू केली त्या वेळी त्यांचा एवढा विस्तार होईल, असं वाटलं नव्हतं. त्यामुळे हे सर्व श्रेय डोंबिवलीच्या सुजाण सदस्यांचं, वाचकांचंच.. पै मनमोकळेपणानं सांगतात. आज पै यांच्या वाचनालयात अक्षरश: लाखो पुस्तकं असून त्यामध्ये ऐतिहासिक, संदर्भ ग्रंथ, राजकीय, समाजशास्त्र, आत्मचरित्रात्मक, कथा, कादंबऱ्या, तसेच मराठी, इंग्रजी, हिंदूी, गुजराती, कानडी भाषांमधील मासिकं, साप्ताहिकं आदी विविध साहित्यप्रकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे इंग्रजी पुस्तकंही मोठय़ा संख्येनं असून कोणाही वाचकानं एखादं पुस्तक सुचवलं की ते आपल्या वाचनालयात आणण्यावर पै यांनी कायमच भर दिलाय.
एकीकडे वातावरण बदलत होतं. वाचकांचा पूर्ण पाठिंबा होता आणि आजही आहेच, असं सांगतात. पै यांना नवीन बाबी खुणावत होत्या. अर्थात वाढत्या पसाऱ्याबरोबरच सगळेच खर्चही वाढत होते. या खर्चाची तोंडमिळवणीही कठीण ठरत होती. अक्षरश: हजारोंच्या (सध्याची संख्या १८ हजार ८००) संख्येने सदस्य असले तरी आणखी काहीतरी करण्याची कल्पना पै यांच्या मनात आली होती आणि त्याचंच फलस्वरूप म्हणजे एकाच दिवसात किमान एक हजार सदस्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट पै यांनी आपल्यासमोर ठेवलं आणि गेल्या वर्षी साधारण दिवाळीनंतर त्याच्या पूर्तीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी आपले सर्व कार्यालयीन सहकारी, सर्व सदस्य, मित्र परिवार, डोंबिवलीतील बँका, संस्था, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संघटनांशी संपर्क प्रस्थापित केला. मधल्या काळात वाचनालय सोडून गेलेल्या जुन्या सदस्यांनाही प्रतिष्ठेचा मुद्दा न करता संपर्क साधला. विविध ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरीसारख्या संस्थांनाही विनंती केली. अनेकांना जातीनं पत्रं पाठविण्यात आली. ‘तुम्ही किमान एकतरी सदस्य आणा’, पै यांनी जातीनं प्रत्येक सदस्याला गळ घातली. पै यांच्या ‘फ्रेण्ड्स वाचनालया’समोर एकच उद्दिष्ट होतं, १ जानेवारी २०१५ या दिवशी किमान एक हजार सदस्यांची नोंदणी करणं.. त्या दृष्टीनं अथक प्रयत्न सुरू झाले. असले उपक्रम यशस्वी होतील का, अशा शंका काहीजणांनी काढल्याही.. परंतु पै यांनी त्यास न बधता आपली संकल्पपूर्ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कंबर कसली.
अखेरीस ३१ डिसेंबर २०१४ रोजी या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याची घटिका जवळ आली होती. दुसऱ्या दिवशीच्या उत्सवाची पूर्वतयारी पूर्ण झाली. १ जानेवारी २०१५ रोजी सर्व वाचनालयं सकाळी साडेसात वाजता सुरू करून सदस्यांच्या नोंदणीस प्रारंभ झाला. माधुरी भट या टिळकनगरच्या भगिनी पहिल्या सदस्या सकाळी पावणेसातच्या सुमारासच वाचनालयात उपस्थित होत्या. या उपक्रमाच्या त्या पहिल्या सदस्या ठरल्या. भट यांना भगवद्गीतेची प्रत भेटीदाखल देण्यात आली. दुसरे सदस्य होते, ग्रंथालीचे प्रभाकर भिडे. त्या दिवशी रात्री साडेनऊपर्यंत अव्याहतपणे सर्व शाखा सुरू ठेवण्यात आल्या. एक हजारांची संख्या पूर्ण होईल की नाही, याची नाही म्हटलं तरी सर्वानाच धाकधूक वाटत होती. याचं कारण सदस्यांची नोंदणी दुपापर्यंत तुलनेनं कमी प्रमाणात होत होती. टिळकनगर शाखेत दुपारी बारा वाजेपर्यंत अवघे १०८ सदस्य नोंदविण्यात आले. सायंकाळी सर्व शाखांमधील सदस्यांची संख्या झाली ४००. परंतु साडेपाचनंतर मात्र चित्र पालटलं आणि दर मिनिटास एक या दरानं सरासरी सर्व शाखांमध्ये सदस्यांची नोंदणी झपाटय़ानं होऊ लागली. अखेरीस त्या दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास १०२१ सदस्यांची नोंद झाली आणि पै यांनी एक विक्रमपूर्ती केली. त्यांच्या या कार्याची सर्व वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांनी दखल घेतली.
एका दिवसात एक हजारांहून अधिक सदस्यांच्या नोंदणीची नोंद लिम्का बुकमध्ये व्हावी, या इच्छेपोटी लिम्का बुकच्या मध्यवर्ती कार्यालयात पै यांनी सर्व विस्तृत तपशील पाठविला असून त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाची त्यांना प्रतीक्षा आहे. या उपक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून शुभेच्छापत्रे मिळाल्याचं पै यांनी नमूद केलं. या एकूण व्यापाकडे व्यवसायापुरतंच बघून चालत नाही, तर वाचनालय, पुस्तक, वाचन यांची मनापासून आवड हवी, आणि ही आवडच आपल्याला इथपर्यंत घेऊन आली आहे, असं पै आवर्जून सांगतात…
अभय जोशी