lp28ब्लेड रनर म्हणून नावाजल्या गेलेल्या ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्डच्या हत्येसाठी शिक्षा झाली तेव्हा सगळ्या जगाला धक्का बसला. पण लेखकाच्या मते ऑस्करकडे माणूस म्हणून बघायला हवं. आणि त्याचबरोबर त्याचा जगावेगळा पिस्टोरियस अ‍ॅडिटय़ूडही समजून घ्यायला हवा.

नुकतेच ऑस्कर पिस्टोरिअस वाचून झालं. खरंतर ऑस्कर या व्यक्तिमत्त्वाविषयी इतकं कुतूहल मनात होतं की, त्यामुळेच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली पण ऑस्करच्या संघर्षकथेत जसेजसे आपण पुढे सरकतो तसेतसे त्याच्या स्वभावातले व संघर्षांतले ‘झपाटलेपण’ नकळत आपल्यात संचारत जाते आणि आपणही त्या ‘झपाटलेपणाने’ हे पुस्तक वाचत राहतो. आणि एका अद्भुत, विलक्षण .. मराठीत अजून काय शब्द असेल तो.. अशा एका अवस्थेत आपण भारावून जातो. एक प्रचंड ऊर्जा आपल्यात संचारत असल्याचा अनुभव हे पुस्तक वाचताना मला आला. आणि या भारावलेल्या अवस्थेत ‘पुस्तक संपलंसुद्धा?’ असा प्रश्न आपल्याला पडावा इतके आपण ऑस्करमय होऊन जातो हे पुस्तक वाचताना.

खरंतर संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटय़ाला येणार असतो, आलेला असतो. प्रत्येकासाठी तो अत्यंत कठीण काळ असतो. त्यामुळे अमुकाचा संघर्ष जास्त आणि तमुकचा कमी असं कधी होत नाही, मग तरीही ऑस्करची संघर्षकथा आपणास वेगळी का वाटावी? किंवा ती वेगळी का आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठीच हे पुस्तक वाचायला हवं. याचं मला मिळालेलं उत्तर म्हणजे त्या ऑस्करच्या शब्दात सांगायचं तर ‘पिस्टोरिअस अ‍ॅटिटय़ूड’! होय. हो या विचार पद्धतीमुळेच ती कथा वेगळी आणि अद्भुत वाटते.

साधारणत: कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या जीवनाचा मागोवा घेताना कुठल्या गोष्टी समोर येतात तर सतत आपल्यासमोर येताना दिसते ते हेच की.. ती व्यक्ती किती गरीब होती, तो कसा खचला होता, त्याची सामाजिक, आर्थिक परिस्थिती किती वाईट होती.. अशा या अनेक उणिवांचा, अभावांचा वारंवार उल्लेख आणि भांडवल करून त्या व्यक्तीची यशोगाथा समोर आणली जाते. म्हणजे निव्वळ प्रतिकूलतेतच विकास! असा एक चुकीचा समज आज पसरत आहे. सतत आपण आपल्या यशाचं माहात्म्य वाढवण्यासाठी आपल्या वाटय़ाला आलेल्या प्रतिकूलतेचा, अभावांचा, उणिवांच्या कुबडय़ा करतो. ऑस्कर पिस्टोरिअस वाचताना आपल्या या ‘अपंग’ मानसिकतेलाच तो पहिला धक्का, छेद देतो. कारण तो कुठेही त्याच्या पाय नसल्याबद्दल, अपंगत्वाबद्दल रडत नाही की तक्रार मांडत नाही, त्याचं यश हे त्याच्या कर्तृत्वाने मिळालेलं आहे त्यासाठी तो त्याच्या अपंगत्वाच्या कुबडय़ा करीत नाही. हा क्रांतिकारी विचार घेऊन तो लढत राहतो.

ऑस्करच्या संपूर्ण लढय़ात त्याचा वेगळेपणा हाच आहे. त्याला त्याच्या अपंगत्वासाठी कुठे सवलत नकोच आहे. तो उलट म्हणतो की ‘माझी क्षमता पाय असणाऱ्या सर्वोत्तम धावपटूसोबत स्पर्धा करण्याची आहे. तेव्हा मलाही सामान्यांसारखं वागवा!’ ऑस्करचा हा अ‍ॅटिटय़ूड नक्कीच आपल्याला वेगळा वाटतो, धक्का देतो. एकीकडे आपण सतत आपल्या प्रतिकूलतेचं भांडवल करीत स्वत:ला उपेक्षित, हतबल, अभावग्रस्त म्हणून सिद्ध करणायची केविलवाणी धडपड करतो आणि मग आपलं ‘यश’ मोठं होतं. पण ऑस्कर या सगळ्यापलीकडे जाऊन एक वेगळा विचार घेऊन लढत राहतो. मुळात तो त्याचं अपंगत्वच नाकारतो. कारण तो म्हणतो ‘‘मला नेहमी एक नॉर्मल सर्वसाधारण आयुष्य जगायचं होतं. खरं सांगायचं तर मी स्वत:ला कधी विकलांग मानलंच नाही. हां, आता माझ्या बाबतीत काही मर्यादा आहेत, पण त्या काय कुणाही बाबतीत असतातच. आणि कुणामध्ये जशा काही विशेष प्रतिभा असतील किंवा कौशल्य असतील तशी माझ्यातही आहेतच की’’ हाच तो ‘पिस्टोरिअस अ‍ॅटिटय़ूड’! जो वाचताना, अनुभवताना कुठेतरी आपल्यातील खुजेपणाची, मानसिक अपंगत्वाची जाणीव आपणास आपोआप होत राहते आणि ऑस्कर हिरो का ठरतो आहे याचा प्रत्यय येतो.

ऑस्करच्या या संपूर्ण संघर्षकथेत कुठेही अभिनिवेश वा आत्मप्रौढी जाणवत नाही. त्याचा जीवनसंघर्ष तो अत्यंत सहज, हसत खेळत आपणासमोर मांडतो. विशेष म्हणजे या सगळ्यात कुठेही आपल्या मनात अपंगांविषयी ‘सहानुभूती’ निर्माण करत नाही तर ‘आदराची’ भावना निर्माण व्हावी असाच त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याच्या अपंगत्वामुळे त्याला झालेल्या शारीरिक मानसिक त्रासाबद्दलदेखील अत्यंत मिश्कील शब्दात तो वर्णन करतो. हे वाचताना आपल्याला त्याच्यातील सकारात्मक दृष्टिकोनच भावतो. कुठेही तो त्याचा जीवनानुभव वाचकाला वेदनादायी होणार नाही याची काळजी घेतो हे त्याला अगदी सहज साधता आले आहे. पण आपल्याला ते अचंबित करून जाते. साधारणत: आत्मचरित्र लिहिताना जो व्यक्तिनिष्ठपणा येऊन नितळ चिंतनाबाहेर न येण्याचा धोका असतो त्यापासून ऑस्कर खूपच लांब राहतो. त्याच्या जीवनात घडलेल्या चुका, उणिवा यांविषयीसुद्धा तो मुक्तपणे, प्रांजळपणे कबुली देतो. ही खरंतर एक कलाच म्हणावी पण ती त्याने सहज साधली आहे.

‘‘माझ्या वैयक्तिक निराशेतून सुरू झालेला शोध माझी लढाई यांनी आता विषमतेविरुद्धच्या लढय़ाचं रुप घेतलं होतं म्हणून माझ्यासारख्या सगळ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून किंवा कधी तरी पुढे भविष्यात ज्याला खेळायचंय किंवा इतर काहीतरी करायचंय त्याला समानतेची वागणूक व दर्जा मिळावा म्हणून मी ही लढाई जारी ठेवली.’’

ऑस्करची कथा वाचायला सुरुवात केली की तो आज जो काही घडलाय तसा तो ‘युनिक’ का आहे याचा शोध त्याच्या बालपणीच्या आठवणी वाचताना आपल्याला लागतो. दु:ख, प्रतिकूलता, मनाविरुद्ध घडण्याच्या काळातही स्वत:ला स्थिर कसं ठेवता येतं, त्यातही निराश न होता चांगलं काय ते शोधता येतं या सगळ्याच बाळकडूचं, ‘पिस्टोरिअस अ‍ॅटिटय़ूड’ ऑस्करच्या रक्तात भिनला तो त्याच्या आई-वडील अन् भावंडांमुळेच 

lp27असं आपल्याला लक्षात येतं. साधारणत: कुठलंही ‘व्यंग’ घेऊन जन्माला येणाऱ्या मुलाविषयी आपल्याकडे जेव्हा त्याचे पालकच नकारात्मक भूमिका घेताना पाहायला मिळतात तेव्हा समाजाकडून त्याची उपेक्षा होणारच असते. आणि ते मूल त्या क्षणी स्वत:तला आत्मविश्वास हरवून बसतं आणि आयुष्यभर स्वत:च्या वैगुण्याबद्दल न्यूनगंड बाळगत स्वत:ला संपवतं. मात्र ऑस्करचे आई-बाबा आपल्याकडे जन्मलेलं मूल नॉर्मल नक्कीच नाही या धक्क्यातून स्वत:ला सावरतात आणि त्यानंतरची ऑस्करसंदर्भातील त्यांची प्रत्येक गोष्ट ऑस्करला बळ देणारी, उभं करणारी ठरते. मला वाटतं आपलं मूल वैगुण्यासह जन्माला आलं म्हणून निराश होणाऱ्या व त्याचा दोष नसताना त्याला नाकारणाऱ्या पालकांसाठी ऑस्करचे आई-बाबा ‘रोल मॉडेल’ म्हणावेत. त्याच्या कथेची सुरुवातच त्याच्या आईने त्याला पाय गेल्यानंतर लिहिलेल्या पत्राने होते त्यात तिने छोटय़ा ऑस्करला जे लिहिलं आहे त्यानेच खरंतर त्याला विश्वविजेता होण्याचं स्वप्न दाखवलं आणि जगण्याचा आनंद विजय किंवा पराजय यात नाहीच तर तो प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात आहे. हा संस्कार त्याच्या रक्तात इतक्या लहानपणीच भिनला त्यामुळेच तो विश्वविक्रमी होऊ शकला आहे. त्याच्या लहानपणीच्या आठवणी वाचताना पाय नसलेल्या ऑस्करविषयी नकळत आपल्या मनात ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असा विचार आल्याशिवाय राहत नाही. त्याच्या बाबांनी त्याला लिहिलेल्या पत्रातही एका बापाने मुलाच्या अपंगत्वाविषयीसुद्धा किती सकारात्मक राहून विचार करावा हे वाचून आपण थक्क होतो. ते लिहितात – ‘बाळाचे पाय थोडे वेगळे वाटताहेत’ – मी पायात काहीतरी चुकीचं आहे असं म्हणालो नव्हतो तर म्हणालो की ते वेगळे आहेत. या त्यांच्या वेगळ्या व सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विचारानेच ते त्याला सारं काही देऊ शकलेत ज्याने तो निव्वळ सर्वोत्कृष्ट धावपटू नव्हे तर सर्वोत्कृष्ट जीवनपटू होऊ शकला आहे.

त्यांचा हा सगळा संघर्ष एका व्यक्तीचा संघर्ष म्हणून राहातच नाही हेही त्याच्या कथेचं वैशिष्टय़ सांगता येईल. याचं कारण तो जेव्हा त्याच्या हक्कासाठी भांडतो, लढाई करतो तेव्हा केवळ ते त्याचं व्यक्तिगत भांडण म्हणून वाद म्हणून तो याकडे पाहत नाही तर तो स्वत: म्हणतो की ‘‘माझ्या वैयक्तिक निराशेतून सुरू झालेला शोध माझी लढाई यांनी आता विषमतेविरुद्धच्या लढय़ाचं रूप घेतलं होतं म्हणून माझ्यासारख्या सगळ्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून किंवा कधी तरी पुढे भविष्यात ज्याला खेळायचंय किंवा इतर काहीतरी करायचंय त्याला समानतेची वागणूक व दर्जा मिळावा म्हणून मी ही लढाई जारी ठेवली.’’ त्याच्या या प्रामाणिक तळमळीतून त्याचा संघर्ष कोण्या एका व्यक्तीचा न राहता ‘वैश्विक’ होतो आणि आपणही सहज त्यात सामील होतो. केवळ स्वत:च्या सोयी, सवलती, फायदा, यशाचा विचार न करता प्रामाणिकपणे लढणारा ऑस्कर इथेही सामाजिक बांधीलकीचं भान आपणास देऊन जातो. स्वत:च्या संघर्षांला समानतेचा लढा म्हणवताना किंवा भूसुरुंग मुक्तीचे उपक्रम राबवताना कुठेही समाजसेवेचा बेगडीपणा तो आणत नाही हे विशेष म्हणावे लागेल.

खरंतर ही ऑस्करची कथा असली तरी ज्यांच्या आत्मिक ऊर्मीतून, प्रयत्नातून ही कथा मराठीत वाचायला मिळाली त्या कथेच्या अनुवादक सोनाली नवांगुळ यांनाच या सगळ्याचं श्रेय जातं. त्या त्यांच्या भूमिकेत म्हणतात तसं त्यांचं आणि ऑस्करचं अपंगत्व भिन्न असलं तरी त्यांची अन् ऑस्करची विचार पद्धती, भावना, वेदना एक आहेत आणि एक संवेदनेचं नातं त्यांना एक करतं, नव्हे जगातील सगळ्यांना आणि ऑस्करला जोडणारं असं हे संवेदनेचं नातंच त्यांना त्याच्याबद्दल लिहायला प्रेरित करून जातं. मला वाटतं त्यांनी ऑस्कर आपल्यापर्यंत पोहोचवताना त्या ऑस्कर जगल्या आहेत. तेव्हा त्यांचा जीवनसंघर्ष त्याच्या जीवनाचीच छोटी प्रतिकृती म्हणावी लागेल. त्यांनी अत्यंत आत्मीयतेनं हे पुस्तक लिहिलंय याचा क्षणोक्षणी आपल्याला प्रत्यय येत राहतो.

ऑस्करची ही कथा वाचणारी प्रत्येक व्यक्ती इतकीच भारावून जाईल जितका मी वाचताना आणि लिहिताना भरावलो आहे. पण या सगळ्यानंतर एक ‘धोका’ या ठिकाणी मला आवर्जून सांगायचा आहे. खरंतर तो प्रत्येक यशस्वी, वेगळ्या व्यक्ती, महापुरुष, खेळाडू यांच्या वाटय़ाला आलेला आहे. तो धोका असा की, आपण अशा अद्भुत, विलक्षण, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाविषयी वाचलं, त्यांना भेटलो, ऐकलं की साधारणत: आपण पटकन ‘ते’ आणि ‘आपण’ अशी फाळणी करून मोकळे होतो. म्हणजे त्या व्यक्तीचा जीवनाप्रवास आपणास भावतो, आवडतो, आपण प्रभावितदेखील होतो, पण आपण त्यांना आपल्यापासून ‘वेगळं’ करतो. ऑस्करला हेच नको आहे. तो त्याच्या क्षेत्रातील एकमेवाद्वितीय असेलही, पण तो आपल्या प्रत्येकाला हा संदेश देतोय की ‘तुम्हीसुद्धा तुमच्या तुमच्या जीवनात स्पेशल आहात ..’ तेव्हा ऑस्करला आपण माणूस म्हणून स्वीकारूयात, त्याला ‘देवत्व, वेगळेपण’ देण्याच्या भानगडीत पडणे ‘तो वेगळाच आहे आपल्यातील नाहीच’ असं म्हणून त्याच्या संघर्षांचा, लढय़ाचा अपमान आपण करू नये. उलट ‘तो तसा मी’ असा ‘पिस्टोरिअस अ‍ॅटिटय़ूड’ बाळगत आपणही वेगळ्या वाटा निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हेच त्याला एक वाचक म्हणून आपल्याकडून अपेक्षित असावं तेच त्याच्या लिखाणचं मुख्य प्रयोजन असावं असं मला मनापासून वाटतं.

इतकं सगळं वाचून झाल्यावर एका कटू प्रसंगाविषयीची आठवण आपणास होणार नाही असं नाही. त्यातही विषय ऑस्करसारख्या माध्यमांच्या दृष्टीने चर्चित आणि काहीसा वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा असेल तर ‘ती’ बातमी आपल्या डोक्यात भुणभुण करत राहते. होय तीच बातमी दिनांक १४ फेब्रु. २०१३ ची. सर्वच वृत्तपत्र व वाहिन्यांवर ‘ब्लेड रनर ऑस्करने केली प्रेयसीची हत्या’ ही बातमी ज्या दिवशी मी वाचली त्याच्या सात दिवस आधी हे पुस्तक माझ्या वडिलांनी मला भेट दिलं होतं.. ही बातमी वाचण्याआधी आपल्यापैकी सगळ्यांनीच त्याच्या विषयी चांगलं वाचलं, ऐकलं होतं. आणि आचानक असं भलतंच..! आपण सगळेच ‘शॉक’ झालो पण मी नॉर्मल होतो. मला ती बातमी फार प्रभावित नाही करू शकली. कारण माझं ते पुस्तक वाचून झालं होतं. असं का? याचं उत्तर मात्र आपणास ते पुस्तक वाचूनच मिळेल. मी आधीच म्हटलेय ऑस्कर ‘माणूस’ आहे. आणि त्याचं माणूसपण आपण स्वीकारलं तर त्या घटनेने आपण क्षणभर आश्चर्यचकित होऊ , पण प्रभावित नाही. आपण ती घटना सहज घेऊ शकतो. एका व्यक्तीचं व्यक्तिगत जीवन काय असावं, कसं असावं हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. तेव्हा ऑस्करच्या जीवनात जे काही घडतंय मला वाटतं माणूस म्हणून आपण त्या सगळ्याकडे बघितलं तर प्रत्येकाच्या जीवनात जसे चढ-उताराचे प्रसंग असतात तसेच ते त्याच्याही जीवनात आले. तो चूक की बरोबर हे आपण इथे बसून ठरवणं आणि म्हणून ऑस्करला नाकारणं एकूणच ‘‘प्रामाणिकपणे जीवनाच्या संघर्षांला भिडणाऱ्या, त्यासाठी लढणाऱ्या व त्यातही सकारात्मक विचारांच्या बळावर यश-अपयश यापलीकडेही जगण्याचा खरा आनंद घेता येतो हे सिद्ध करणाऱ्या जगातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वावर अन्याय झाल्यासारखं होईल. तेव्हा ‘त्या’ घटनेचा पूर्वग्रह डोक्यात ठेवून आपण जर हे पुस्तक वाचणार नसाल तर आपल्यातील विश्वविजेत्या ‘ऑस्कर’ला भेटण्याची संधी आपण गमावून बसाल इतकं नक्की!