ऐ मेरे वतन के लोगों.. कुछ याद उन्हें भी कर लो, हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आहे. त्याला संगीत दिलं आहे सी. रामचंद्र यांनी. अनेक गायक, संगीतकार यांच्यासोबत लता मंगेशकर २७-१-१९६३ रोजी हे गीत सादर करण्यासाठी नवी दिल्लीला गेल्या होत्या. तो कार्यक्रम दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर (सध्याचं मेजर ध्यानचंद स्टेडियम) आयोजित केला होता. त्या वेळी लतादीदींनी शहिदांच्या स्मृती व अजोड त्याग सर्व प्रेक्षकांच्या डोळय़ांसमोर उभा केला होता. या गाण्यातील भाव मनाला भिडल्याने पं. जवाहरलाल नेहरूंच्या डोळय़ांत पाणी आलं होतं. ते खूप अस्वस्थ झालं होते. त्या वेळी पंडितजींनी लतादीदींना त्यांच्या निवासस्थानी चहापानाला बोलावलं होतं, त्या वेळी त्यांचे नातू राजीव व संजय यांची ओळख करून दिली होती. इ.स. १९६२ सालचे भारतावर झालेलं चीनचं आक्रमण, आपल्या सेनेला घ्यावी लागणारी माघार, अनेकांना आलेलं वीरमरण, यामुळे सर्व भारतीय सैरभैर, दु:खीकष्टी झाले होते. अशा या साऱ्या वेदना कवी प्रदीप यांनी या गीताद्वारे प्रकट केल्या आहेत. चीनच्या आक्रमणाने कवी प्रदीप यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. मनात सतत तेच विचार घोळत होते. ते त्या वेळी काही कामानिमित्त मुंबईला माहीमला गेले होते. एका फुटपाथवर उभे होते. शब्द ओठावर येत होते. जवळच एक सिगारेटचं रिकामं पाकीट पडलेलं होतं. ते त्यांनी उचललं, फाडलं व तेथील बूथवाल्याकडून एक पेन मागून घेतलं व त्या पाकिटावर त्यांचे ते सर्व शब्द उतरले गेले. त्यांची ती सारी अस्वस्थता त्या कागदावर उतरली होती. 

‘ऐ मेरे वतन के लोगों,
तुम खूब लगा लो नारा
यह शुभ दिन है हम सब का,
लहरालो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गवायें
कुछ याद उन्हें भी कर लो,
जो लौट के घर ना आये’
असे हे गीत १९६२ च्या युद्धाचं सर्व चित्र डोळय़ांपुढे उभे करतं, आपलं कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्यांना वाहिलेली ती भावपूर्ण श्रद्धांजली होती. या पूर्वीही कवी प्रदीप यांनी ‘आओ बच्चोंे तुम्हें दिखाए झाँकी हिदुस्थान की..’ दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल.. कोई लाख करें चतुराई, कर्म का लेख ना मिटे भाई.. अशी गीतं लिहिली होती, पण ज्या वेळी हा कार्यक्रम पार पडला, त्या वेळी ते मात्र स्वत: हजर नव्हते. कारण त्यांना त्याचं आमंत्रण मिळालेलं नव्हतं. पुढे पं.नेहरू २१ मार्च १९६३ रोजी मुंबईला आले होते. त्या वेळी कवी प्रदीप यांना खास भेटायला बोलावलं होतं. ती भेट बांद्रय़ाला एका कार्यक्रमात झाली होती. त्या वेळी पंडितजींनी हे गीत त्यांना सांगितले होते. ते त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गायलं होतं. त्या वेळी पंडितजी भारावले होते. त्या वेळी पंडितजींनी हे गीत त्यांच्या हस्ताक्षरात लिहून द्यायला सांगितलं होतं. १९७५च्या युद्धानंतर ही त्यांनी काही गीतं लिहिली होती व ती सर्व आशा भोसले यांनी गायली होती, पण त्या गाण्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही आणीबाणीच्या काळानंतर जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीनेही ते प्रभावित झाले होते. त्यांनी जय प्रकाशजींच्या गौरवाप्रीत्यर्थ एक गीत लिहिलं होतं. पण दुर्दैवाने जनता सरकार गडगडलं. ते पाहून त्यांनी ते गीत फाडून टाकलं.
६ फेब्रुवारी २०१५ रोजी कवी प्रदीप यांची जन्मशताब्दी झाली. तर ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गीताला २७ जानेवारी २०१५ रोजी ५२ वर्षे पूर्ण झाली. संरक्षणव्यवस्था भक्कम असली पाहिजे, याचं सजग भान या गीताने जागृत केलं. भारतीयांच्या मनांना प्रज्वलित करण्याचं काम लतादीदींच्या स्वरांनी केलं. ही मने अशीच प्रज्वलित राहतील हे मात्र नक्की.
प्रा. जी. एन. हंचे, सांगली</strong>