बडे स्टार कलावंत आणि छोटा सिनेमा असे हल्ली थोडय़ाफार प्रमाणात घडताना दिसू लागले आहे. छोटा सिनेमा म्हणताना अधिकतम ‘स्टार व्हॅल्यू’ नसलेले कलावंत, प्रेक्षकांनी पूर्वी कधीही न पाहिलेले चेहरे, जीव लहान असलेले कथानक, त्याच पद्धतीची मांडणी आणि ‘लोकल’ अगदी आपल्या मातीतील कथानक सांगत ‘ग्लोबल’ भाष्य करण्याचा प्रयत्न असे असते. ‘एनएच१०’, ‘हवाईजादा’ ‘हंटर’ असे काही सिनेमे येऊन गेले. बडे स्टार कलावंत असलेल्या ‘षमिताभ’ सिनेमाची कथाही काहीशी अशाच प्रकारची होती. तरीसुद्धा अमिताभ बच्चन, धनुष यांसारख्या बडय़ा स्टार कलावंतांनी हा सिनेमा केला.

आता याच पद्धतीचा छोटीशी गमतीदार गोष्ट विनोद आणि नाटय़ यांच्या वेष्टनात रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करणारा ‘पिकू’ हा सिनेमा मे महिन्यात प्रदर्शित होत आहे.
बडी स्टार कलावंत मंडळी असल्यामुळे हा सिनेमा छोटय़ा बजेटचा नाही. परंतु, ट्रेलर पाहून त्याचे कथानक ‘लार्जर दॅन लाइफ’ नाही हे सहजपणे प्रेक्षकांना समजू शकते. कलावंत मात्र ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा असलेले; परंतु गोष्ट मात्र साधी सोपी, लहान जीव असलेली असा मामला ‘पिकू’ या सिनेमात असावा असे दिसतेय.
बडय़ा कलावंतांची प्रतिमा, त्यांच्या बिगबजेट सिनेमांचे होणारे तितकेच मोठय़ा प्रमाणातील मार्केटिंग यामुळे बडय़ा कलावंतांची ‘स्टार व्हॅल्यू’ सतत वाढती राहते. याचा फायदा सिनेमाला नेहमीच होत आला आहे. किंबहुना बडय़ा स्टार कलावंतांचे चित्रपट विकण्यास सोपे असेही गणित सिनेमा क्षेत्रातील वितरक, गुंतवणूकदार आणि अर्थसाहाय्य करणारे घटक मानत आले आहेत. त्यामुळे बडय़ा स्टार कलावंतांमुळे बिगबजेट गटात सिनेमांची वर्गवारी केली जाते. कारण सिनेमाचा विषय, आशय, मांडणी, मोठमोठाले सेट्स, परदेशी चित्रीकरण स्थळे हे सारेच मग अधिक खर्चीक, महागडे घ्यावे लागते, असेही नेहमी दिसून येते. मग एकेका गाण्यावर पाच-सात कोटींचा खर्चही केला जातो. मात्र एवढे करूनही एक आठवडय़ाहून अधिक काळ सिनेमा तग धरू शकत नाही.
म्हणूनच अधिकाधिक ‘लोकल’ गोष्ट मांडत ‘ग्लोबल’ होण्याचा काळ सुरू झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. गोष्ट हीच ‘हिरो’ असते असा ‘सुज्ञ’ विचार सिनेमावाले आणि सिनेमांतील कलावंतही करू लागलेले दिसतात.
‘पिकू’ या शूजित सरकार यांच्या तिसऱ्या चित्रपटात अभिनयाचे बादशहा ‘मेगास्टार’ अमिताभ बच्चन, सातत्याने सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच उत्तम कथानक असलेले चित्रपट करणारा अभिनेता इरफान खान अशी कलावंत मंडळी प्रथमच एकत्र आली आहे.
‘पिकू’ हे नायिकेचे नाव आहे आणि ही भूमिका दीपिका पदुकोनने साकारली आहे हे एव्हाना प्रेक्षकांना ठाऊक झाले आहे. एका जाडजूड वृद्धाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत, तर या दोघांमध्ये ‘सॅण्डविच’ झालेला टॅक्सी ड्रायव्हर म्हणजे इरफान खान.
हा टॅक्सी ड्रायव्हर पिकू आणि तिचे वडील यांना घेऊन कोलकाताला जातो एवढीच एका ओळीची गोष्ट सध्या तरी ट्रेलरवरून समजतेय. सिनेमाची ‘टॅगलाइन’ ‘मोशन से ही इमोशन’ अशी आहे. या टॅगलाइनची गंमत सध्या ट्रेलर्समधून पाहायला मिळते. त्यामुळे सिनेमा विनोदी तर नक्कीच असेल; परंतु माणसांचे स्वभाव, लकबी, त्यांचे वावरणे, त्यांच्या ‘चिवित्र’ गोष्टी असे मनुष्यविशेषांचे अनेक नमुने या सिनेमातून पाहायला मिळतील असे दिसते. म्हणूनच ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे हे नक्की. ८ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कोलकाता शहर हेसुद्धा एखाद्या व्यक्तिरेखेसारखे वापरण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केल्याची शक्यता आहे.
या सिनेमाचे वैशिष्टय़ म्हणजे बंगाली संस्कृती, कोलकातामधील बंगाली लोकांचे चित्रण असले तरी सिनेमा हिंदी आहे. जिशू सेनगुप्ता या बंगाली सिनेमातील आघाडीच्या कलावंताचीही भूमिका या सिनेमात आहे. पश्चिम बंगालमधील संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सिनेमा असून त्यामुळेच अनुपम रॉय हे बंगाली गीतलेखक-संगीतकार यांनी ‘पिकू’ सिनेमाला संगीत दिले आहे. ‘बंगाली कनेक्शन’ हे या सिनेमाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.