भारंभार सिनेमे न घेता एकच पण, तोडीस तोड सिनेमा करणाऱ्या कलाकारांपैकी आमिर खान एक. वर्षांतून येणाऱ्या त्याच्या एका सिनेमाबाबतची उत्सुकता, लोकप्रियता, विशिष्ट भूमिकेसाठी घेतली जाणारी मेहनत, टीका या गोष्टींविषयी त्याच्या ‘पीके’ या सिनेमाच्या निमित्ताने..
पाहा: ‘पीके’च्या संवादांसाठी आमिरने घेतलेली मेहनत
सिने इंडस्ट्रीतले लोक लकी मॅस्कॉट, शुभ-अशुभ, मुहूर्त अशा अनेक गोष्टींचा विचार सतत करतात. म्हणूनच तर सलमानच्या हातात निळ्या रंगाचं ब्रेसलेट दिसतं, शाहरुख दिवाळीत सिनेमा प्रदर्शित करतो, एकता कपूर सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सिद्धिविनायक मंदिराला भेट देते. यात इतर खान हिरोंप्रमाणे आमिर खानचंही नाव आहे. त्यामुळेच डिसेंबर डिसेंबर आणि आमिर खानचा सिनेमा हे आता एक समीकरणच झालंय. डिसेंबर त्याच्या गेल्या काही सुपरहिट सिनेमांसाठी त्याने डिसेंबरच निवडला होता. ‘तारे जमीन पर’, ‘गजनी’, ‘थ्री इडियट्स’, ‘धूम थ्री’ हे सिनेमे डिसेंबर महिन्यातच आले होते. एका वर्षांत तो एकापेक्षा अधिक सिनेमांची निर्मिती करेल पण, अभिनय मात्र एकातच करेल असा जणू त्याचा नियमच. डिसेंबर महिना त्याचा लकी मॅस्कॉट आहे असं म्हणूया. तर आमिरचा हा लकी मॅस्कॉट या वर्षी ‘पीके’ घेऊन येतोय.
पाहा: कोण ठरला ‘पीके’चा बॅटरी रिचार्ज?
‘पीके’चं पहिलं पोस्टर आलं आणि सगळीकडे चर्चेला उधाण आलं. न्यूड फोटोशूट करून आमिर तुफान चर्चेत राहिला. पण, हे फोटोशूट त्याने दोन वर्षांपूर्वीच केलं होतं. या फोटोमध्ये आमिरला त्याची उत्तम फिजिक दिसायला हवी होती म्हणून त्याने दोन वर्षांपूर्वीच सिनेमाचं शूट होण्याआधी केलं होतं, असं त्याने अनेक मुलाखतींमधून यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानंतर ‘धूम थ्री’साठी तो त्याच्या फिजिकवर पुन्हा काम करणार होता. ‘पीके’ सिनेमाची चर्चा या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांमध्ये होती. या सिनेमातला आमिरच्या लुकचा पहिला फोटो सिनेमाचं शूट होतानाच पसरला होता. आमिर घागरा आणि कोट अशा आगळ्या कपडय़ांमध्ये दिसून आला होता. त्यामुळे या सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी ताणली होती. या वर्षी जूनमध्ये ‘पीके’ सिनेमा प्रदर्शित होणार अशी चर्चा असतानाच त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ती डिसेंबरला येऊन पोहोचली. सिनेमाच्या प्रदर्शनासाठी डिसेंबर उजाडण्याची दोन कारणं. एक म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना एडिटिंगसाठी वेळ हवा होता. तर दुसरं असं की, ‘सत्यमेव जयते’ या आमिरच्या कार्यक्रमाचं तेव्हा काम सुरू होतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या वेळी त्याला सिनेमाचं प्रमोशन करता आलं नसतं.
‘पीके’कडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी
मोठय़ा पडद्यावरच्या कलाकारांना छोटा पडदा गेल्या काही वर्षांपासून खुणावतोय. याची सुरुवात केली ती अमिताभ बच्चन यांनी. कालांतराने शाहरुख, सलमान, अक्षयकुमार, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी, अर्शद वारसी असे अनेक कलाकार स्मॉलस्क्रीनकडे वळले. यात मि. परफेक्शनिस्टचा नंबर लागला नसता तरच नवल होतं. पण, अखेर आमिरही याकडे वळलाच. ‘सत्यमेव जयते’ हा सामाजिक विषय हाताळणारा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी त्याने सुरू केला. त्याची लोकप्रियता आणि सामाजिक विषयांची हाताळणी यामुळे हा कार्यक्रमही लोकप्रिय झाला. या कार्यक्रमाच्या वेळी अनेक बाबींवरून टीका झाली. कार्यक्रमातून मिळणारा पैसा विशिष्ट धर्माला पुरवला जातोय, सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचा टेंभा मिरवणारा आमिर मात्र कोटींमध्ये कमावतोय, अशा नानाविध टीका आमिरला सहन कराव्या लागल्या. पण, यामुळे कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झाली नाही. ‘सत्यमेव जयते’ हा एका एपिसोडसाठी सगळ्यात जास्त खर्च होणारा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमासाठी आमिर घेत असलेल्या मानधनाविषयीही चर्चा झाली होती. ‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वासाठी आमिरने एका एपिसोडसाठी तीन कोटी घेतले होते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वासाठी चार कोटी घेतले होते, असं बोललं जात होतं.
‘पीके’ चित्रपट ६ हजार चित्रपटगृहांत
‘रगं दे बसंती’मधला बिनधास्त डीजे असो किंवा ‘दिल चाहता है’मधला मस्तीखोर आकाश आमिरने प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात पोहोचवली. तर ‘तारे जमीन पर’मधला निकुंभसर आणि ‘थ्री इडियट्स’मधला रँचो आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. आमिरचे सिनेमे चर्चेत राहण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा लूक. त्याचा लूक बघून सिनेमा ओळखता येतो. ‘थ्री इडियट्स’चा जीन्स-टी-शर्ट आणि बॅग तिरकी लावणाऱ्या रँचोची स्टाइल नंतर कॉलेजांमध्ये पोहोचली होती. तर ‘रंग दे बसंती’चा झिपऱ्या डीजेही कट्टय़ांवर दिसू लागला होता. ‘तलाश’मधल्या इन्स्पेक्टरची मिशीही लोकप्रिय झाली तर ‘धूम थ्री’मधली गोल टोपीही आमिरचा ब्रॅण्ड झाली.
‘पीके’ का पाहाल याची पाच कारणे
सिनेमातल्या भूमिकेसाठी कलाकारांना अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आमिरही तसाच मेहनत घेणारा. मग ते ‘गजनी’मधले सिक्स पॅक अ‍ॅब असो किंवा ‘थ्री इडियट्स’मध्ये तरुण दिसण्यासाठी घ्यावी लागलेले कष्ट असोत. प्रत्येक गोष्ट परफेक्ट. तर या परफेक्शनिस्टने आगामी ‘पीके’साठीही अशीच एक आगळी मेहनत घेतली आहे. मुळात त्याच्या व्यक्तिरेखेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्याचे कान, डोळे काहीसे वेगळे दिसतायत. त्यात आणखी लक्ष वेधून घेतायत ते त्याचे ओठ. लालबुंद ओठ हे त्याच्या दिसण्यातलं ठळक वैशिष्टय़. पण, ते केवळ मेकअपने केलेलं नाही. तर यासाठी त्याने पानांचं सेवनही केलं आहे. खऱ्या आयुष्यात आमिरला पान खायची सवय नसली तरी या सिनेमासाठी मात्र त्याला पान खावंच लागलं. तोंड आणि ओठ लाल दिसण्यासाठी तो दिवसभरात एकूण दहा ते बारा पान खायचा. या सिनेमाच्या सेटवर एका पानवाल्याला बोलावूनच ठेवलं होतं. या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेविषयीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. आमिरच्या लूकवरून तो एका एलिअनची भूमिका साकारतोय अशीही चर्चा सुरू होती. मात्र अजून काहीच निश्चितपणे सांगण्यात आलं नाही.
‘पीके’च्या स्क्रिनिंगला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरची हजेरी
आमिरच्या सिनेमांमध्ये त्याच त्या नायिका असणं टाळलं जातं. ‘गजनी’, ‘रंग दे बसंती’, ‘थ्री इडियट्स’, ‘धूम थ्री’, ‘लगान’ आणि आता ‘पीके’ अशा काही सिनेमांमध्ये त्याने वेगवेगळ्या नायिकांसोबत काम केलंय. त्यामुळे त्याच्या सिनेमातली फ्रेश जोडी बघण्याची उत्सुकताही प्रेक्षकांमध्ये असते. त्याच्या खऱ्या आयुष्यातली त्याची नायिका अर्थाच त्याची बायको, किरण राव प्रोडक्शनच्या कामात हातभार लावत असते. ‘धोबी घाट’, ‘पिपली लाइव्ह’, ‘देल्ली बेल्ली’, ‘तलाश’ या सिनेमांसाठी निर्माती म्हणून तर ‘तारे जमीन पर’ आणि ‘जाने तू या जाने ना’ या सिनेमांसाठी साहाय्यक निर्माता म्हणून तिने काम केलंय. पूर्वी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं असल्यामुळे सिने इंडस्ट्रीच्या कामाविषयी जाण आहे. म्हणूनच निर्माती म्हणून ती आमिरच्या कामाचा भार काहीसा हलका करते.आमिर खान हे नाव जरी उच्चारलं तरी त्याच्या सिनेमांची झलक डोळ्यांसमोरून जाते. अर्थात त्याचे सगळेच सिनेमे गाजले असं म्हणणं चूक ठरेल. पण, दुर्लक्षित झाले असंही म्हणता येणार नाही. त्याच्या कामाची मात्र प्रत्येक वेळी वाहवाच झाली. आमिरचा सिनेमा आणि बॉक्स ऑफिसवर हिट हेही समीकरण ठरलेलं. हिट पे हिट देणाऱ्या कलाकारांपैकी आमिरही एक ब्रॅण्ड झालाय. गेल्या दोनेक वर्षांत तो मीडिया फ्रेण्डलीही होताना दिसतोय. याचं मुख्य कारण म्हणजे ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या आधी तो फारसा टीव्हीवर झळकायचा नाही. त्याची आणि प्रेक्षकांची भेट थेट थिएटर्समध्ये व्हायची. पण, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो प्रेक्षकांच्या अधिक जवळ येऊ लागला. असं सगळं असलं तरी एक नियम तो प्रामुख्याने पाळतो. त्याच्या सिनेमांचं प्रमोशन तो टीव्हीवर करणं टाळतो. सध्या अनेक छोटे-बडे कलाकार त्यांचा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीव्हीचा आधार घेतात. एकाच वेळी अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून ही कलाकार मंडळी दिसत असते. आमिर मात्र या गर्दीत दिसत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की, सिनेमाचं प्रमोशन गरजेपेक्षा जास्त केलं तर ते प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता कमी होते. प्रमोशनपेक्षा सिनेमाचं यश त्याच्या कथेत असतं. म्हणून त्याने ‘पीके’चं प्रमोशन काही ठरावीक ठिकाणीच केलं.
मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचं ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत चाललंय. वेगळ्या धाटणीचे, प्रेक्षकांच्या जवळ जाणारे, तरुणाईमध्ये चटकन जागा बनवणारे सिनेमे करण्याकडे आमिरचा कल असतो. म्हणूनच त्याच्या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता टिकून असते. त्याचे चाहते नसलेला पण, त्याचे सिनेमे आवडणाराही एक प्रेक्षकवर्ग आहे. असा प्रेक्षकवर्ग असणं ही आमिरची मिळकत. यंदा प्रेक्षकांसाठी त्याने ‘पीके’ हे ख्रिसमस गिफ्ट आणलंय. आता हे गिफ्ट प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस पडतं ते समजेल लवकरच. आमिर नावाच्या ब्रॅण्डचा डिसेंबर हा लकी मॅस्कॉट ‘पीके’ला काय मिळवून देतो याचाही उलगडा होईल.