झाडं लावा असा संदेश आपण अनेक ठिकाणी वाचत असतो. आपल्या दृष्टीने झाडं लावायची असतात ती हिरवाईसाठी, सावलीसाठी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी.. पण त्याहीपलीकडे जाऊन आपण झाडांचे औषधी गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत.

भावना अरविंद प्रधान, मुंबई</p>

पावसाळा हा वृक्षारोपणासाठी योग्य काळ समजला जातो. पण वृक्ष लावताना योग्य झाडाची निवड केली पाहिजे. वड, पिंपळासारख्या वृक्षामध्ये प्रदूषण कमी करण्याची व हवा स्वच्छ करण्याची भरपूर ताकद आहे. पण शहरात पुरेशी जागा नसते. शहरात दुतर्फा लावण्यासाठी सप्तपर्णी, तामण, कडुलिंब, कांचन, आसूपालव, बकुळ, अशोक हे वृक्ष लावावे. यावर चिमण्या घरटे बांधतात. उन्हाळ्यात थंडावा वाटतो.
मंदिराचा परिसर व स्मशानाजवळ वृक्षारोपण करावे. बेल, गुलमोहर, रेन ट्री, जास्वंद, प्राजक्त ही झाडे लावावीत. घराच्या अंगणात सीता अशोक, कडुनिंब, कारंज, बदाम, समुद्रफळ, पाम, सातवीन, तामण, नागकेशर, अर्जुन ही वनौषधी झाडे लावा. मोकळ्या जागांवर गुंज, मधुवासी, मेहंदी, हिरडा, बेहडा, आवळा, शंकासुर, अडुळसा ही झाडे लावा.
वृक्षांचे औषधी उपयोग अनेक आहेत. ‘खर’ वृक्षाची साल उपयोगी असते. दात साफ ठेवण्यासाठी, मुखरोग, खोकला, त्वचा विकारात उपयोगी आहे. ‘खदिरादिवटी’ हे औषध होते. ‘रिठा’ वृक्षाचे फळ उपयुक्त आहे. ‘केश्य योग’ हे औषध करतात. हे वेदनाशामक असून सूज कमी करते. अर्धशिशी, दमा, खोकला यात वापरतात. त्वचारोगात वापरतात.
‘भोकर’ वृक्षाची साल व फळे उपयोगी असतात. त्याचा ‘फलमोरंबा’ हे औषध करतात. ते पित्तशामक असून अतिसारात उपयोगी पडते. ‘सीताफळ’ फार गोड असते. त्यांच्या बियांपासून ‘बीजचूर्ण’ हे औषध तयार करतात. बीजचूर्ण केसातील उवा घालवते. ‘शिसम’ वृक्षाचे काळा शिसम व पांढरा शिसम असे दोन प्रकार आहेत, पानांपासून ‘पत्ररस’ हे औषध करतात.
‘सुरंगी’ वृक्षाची फुले सुवासिक असून औषधी आहे. त्यापासून ‘रक्तस्तंभक योग’ हे औषध तयार करतात. ही औषधे अतिसार, मूळव्याधीत उपयोगी पडते, ‘पाटला’ किंवा ‘पाढळ’ वृक्षाची फुले व साल उपयोगी असते. त्याच्यापासून ‘दशमूलासव’ हे औषध करतात. याचा उपयोग जखम बरी करण्यासाठी करतात. ते वातपित्तशामक आहे. ‘पूतीकरंज’ किंवा ‘चिरबिल्व’ वृक्षाची साल उपयोगी असते. ‘सालचूर्ण’ हे औषध करतात. ते सूज कमी करणारे, त्वचारोग बरे करते. ‘मोह’ वृक्षाची साल, फुले, फळे उपयुक्त असतात. यापासून दारू बनवतात. खोकला, संधीवात, मूळव्याध यात वापरतात. ‘स्वरस’ हे औषध होते.
‘रायआवळा’पासून मोरंबा तयार करतात. तो पित्तशामक असून त्यामुळे पोट साफ राहते. ‘गुग्गुळ’ वृक्षाच्या खोडातील चीक औषधी असतो. त्यापासून ‘त्रिफळा गुग्गुळ’ हे औषध तयार करतात. ते हाडाचे विकार व अस्थिक्षयात उपयुक्त असते. सुजेवर व वजन कमी करण्यासाठी उपयोगी असते. ‘शिवण’ वृक्षाची पाने, फळे, साले उपयुक्त असतात. घशाचा शोष, अंगाची आग दूर करणारे उत्तम पित्तशामक, रक्तस्राव थांबवण्यास वापरतात. ‘दशमूलक्वाथ’ हे औषध करतात. चिंच वृक्षापासून ‘चिंचापानक’ औषध करतात. चिंच भूक वाढविण्यास उपयोगी असते. शोष (तोंड कोरडे पडते) कमी होते. पित्त वाढवते म्हणून अ‍ॅसिडिटीत घेऊ नये. ‘हिरडा’ वृक्षातील फळापासून ‘त्रिफळाचूर्ण’ करतात. पोट साफ होते. कफ कमी होतो. वातशामक. उत्तम दन्तमंजन होते.
‘शमी’ वृक्षाची फळे व पाने यापासून ‘शमीचूर्ण’ तयार करतात. हे रक्तदोषहर, त्वचारोगनाशक, शक्तिवर्धक असते. ‘वायवर्णा’ वृक्षाची साल थायरॉइडमध्ये उपयोगी, गॅसवर उपयोगी, ‘वायवर्णासव’ हे औषध तयार होते. ‘कुटज’ (कुडा) वृक्ष. याच्या सालापासून ‘कुटजारिष्ट’ हे औषध तयार करतात. अतिसारावर उत्तम औषध. अतिरक्तस्राव, जुना ताप, दातदुखीवर उपयोगी असते. ‘आपटा’ वृक्षाच्या पानापासून ‘पत्रचूर्ण’ हे औषध करतात. ते वेदनाशामक, वातपित्तशामक व सूज कमी करण्यास उपयोगी असते. ‘डिकेमाली’ वृक्षाच्या फांद्याच्या जोडातून निघणारा गोंद उपयोगी असतो. तो पोट साफ करतो. पोटात गॅस धरत नाही. अपचन दूर करते. लहान मुलांमध्ये पाचक म्हणून उपयोगी असते. त्यापासून ‘बाळगुटी’ तयार करतात.