कव्हरस्टोरी

महापरिनिर्वाण दिन आला किंवा निवडणुका आल्या की राजकारण्यांना आठवण होते ती तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित जनतेची. कारण या वर्गाकडे एकगठ्ठा मते असतात आणि त्या मतांवर निवडणुकांमधील जय-पराजय ठरू शकतात, असा अनुभव आहे. पण याच दलित जनतेच्या श्रद्धास्थानी सर्वोच्च असलेल्या गौतम बुद्धांचा अनमोल ठेवा जतन करण्याची वेळ आली की, त्यांचे हात आखडतात. त्यांना दलितांची मते हवी असतात, पण बुद्धठेव्याची जपणूक करायची नसते.. केंद्र आणि राज्य सरकारही बुद्धठेव्यापासून हात झटकते; मग सुरू होते या ठेव्याची अक्षम्य परवड. सध्या हीच परवड मागाठाणेच्या लेणींच्या नशिबी आली आहे, त्याविषयी…
‘इथूनच जवळ असलेल्या मग्गठाणे येथील अधेलीची जमीन कल्याण येथील व्यापारीश्रेष्ठी अपरेणुकाने कन्हगिरीच्या या बौद्धभिक्खू संघाला दान दिली असून त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा वापर या भिक्खूसंघाच्या निर्वाहासाठी करण्यात यावा.’
मुंबईतील बोरिवली येथील कान्हेरीच्या लेणी क्रमांक २१ मधील शिलालेखामध्ये इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात असलेली नोंद.
यातील मग्गठाणे म्हणजे आताचे मागाठाणे असावे, असे आपल्याला सहज लक्षात येते आणि मग सहज प्रश्न पडतो की, आता त्या जमिनीवर काय असावे? भिक्खूसंघाला दिलेल्या त्या अधेलीच्या जमिनीचे आताचे रूप नेमके काय असावे? या प्रश्नांचा मागोवा घेत आपण काही ज्येष्ठ पुरातत्त्वतज्ज्ञांपर्यंत पोहोचतो तेव्हा लक्षात येते की, मागाठाणे येथे बौद्ध लेणी आजही अस्तित्वात आहेत. मग आपण मागाठाणे परिसरात शोध घेतो. त्या वेळेस तिथे कैक वर्षे राहणाऱ्यांनाही ही लेणी माहीत नसल्याचे लक्षात येते. मग अखेरीस पुन्हा पुरातत्त्वतज्ज्ञांना गाठले असता लक्षात येते की, पूर्वीचे मागाठाणे आणि आताचे यात फरक आहे. सध्या पश्चिम द्रुतगती मार्गाच्या एका बाजूस मागाठाणे बस डेपो आहे, त्या परिसरालाच मागाठाणे म्हटले जाते. मात्र त्याच्या अलीकडे बोरिवली स्थानकाच्या दिशेने असलेला जो भाग आहे, तोही पूर्वी मागाठाणे म्हणूनच ओळखला जायचा. याच परिसरात सध्याच्या दत्तपाडा मार्गावर या लेणी काहीशा आतल्या बाजूस वसलेल्या आहेत. अधिक माहिती घेताना असे लक्षात येते की, कान्हेरीच्या शिलालेखांमध्ये असलेल्या त्या शेताच्या बाजूला नंतर पाचव्या- सहाव्या शतकामध्ये या लेणींची निर्मिती करण्यात आली.

बोरिवली स्थानकाच्या पूर्वेस बाहेर पडल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दिशेने जाणारा एक रस्ता दत्तपाडा फाटकावरून जातो. आता तिथे फाटक नाही तर पूर्व पश्चिमेला जोडणारा भुयारीमार्ग रेल्वेखाली करण्यात आला आहे. तरीही या मार्गाला दत्तपाडा फाटक मार्ग असेच आजही म्हटले जाते. या दत्तपाडा फाटक मार्गावरून मागाठाणेच्या दिशेला येताना टाटा स्टीलच्या आधी उजवीकडे असलेल्या बैठय़ा वस्तीमध्ये ही मागाठाण्याची अतिशय मह्त्त्वाची लेणी पाहायला मिळतात.
कान्हेरीप्रमाणेच हीदेखील पुरातत्त्वतज्ज्ञांना सुपरिचित अशी लेणी आहेत. पण सामान्य माणसाला मात्र त्याची फारशी माहिती नाही. एवढेच काय तर गेल्या काही वर्षांत पुरातत्त्वतज्ज्ञांनी या लेण्यांच्या जपणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्यानंतर या लेणींना विशेष महत्त्व असल्याचे या परिसरातील अनेकांना लक्षात आले. कान्हेरीच्या २१ क्रमांकाच्या लेण्यातील शिलालेखात उल्लेख आलेला हाच तो परिसर. अपरेणुका नावाच्या कल्याणच्या एका व्यापाऱ्याने कान्हेरीच्या बौद्ध भिक्खूसंघाच्या उदरनिर्वाहासाठी येथील (मागाठाणेमधील) शेतजमीन दानरूपाने दिली होती, असा उल्लेख त्यात आहे. आता मागाठाणे याच नावाचा विधानसभा मतदारसंघही सध्या अस्तित्वात आहे. मात्र लेणी असलेल्या परिसराला पूर्वी मागाठाणे असे म्हणत. मुळात या लेणींवरूनच त्या परिसराला हे नाव मिळाले आहे. मग्गस्थानकपासून अपभ्रंश होत त्याचे मग्गठाणे आणि नंतर मागाठाणे असे झाल्याचे मानले जाते. काहींच्या मते मग्ग म्हणजे मार्ग आणि त्यावर थांबण्याचे ठिकाण म्हणजे मागाठाणे होय. कारण कोणतेही असले तरी मागाठाणे हे प्राचीन ठिकाण आहे, याबाबत कुणाचेच दुमत नाही. शिवाय या ठिकाणाला महत्त्व प्राप्त झाले तेही या लेणींमुळेच यातही वाद नाही.

पण आता केवळ हे नावच शिल्लकच राहील अशी अवस्था आहे. कारण लेणींकडे राज्य आणि केंद्र सरकार दोघांचेही पूर्णपणे दुर्लक्षच झाले आहे. लेणींच्या अस्तित्वालाच थेट धोका पोहोचला असून राज्य आणि केंद्र सरकार या दोन्हींच्या पुरातत्त्व खात्यांनी याबाबतीत हात वर केले आहेत. एवढेच नव्हे तर हे प्रकरण उच्च न्यायालयात जनहित सुनावणीसाठी आले असता थेट राज्य पुरातत्त्व विभागाने पत्र सादर केले असून त्यात ‘सदर लेण्या पुरातत्त्वीयदृष्टय़ा महत्त्वाच्या नाहीत त्यामुळे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या योग्यतेच्या नाहीत,’ असा शेरा मारण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकार दोघांनीही या लेणींचे संरक्षण आणि संवर्धन शक्य नसेल अशीच भूमिका घेतल्याने यात उच्च न्यायालय त्यांच्या या कार्यकक्षेत काहीही करू शकत नाही, असे म्हणत जनहित याचिका निकाली काढली. मात्र ते करताना लेणी वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका करण्याचा याचिकाकर्त्यांचा हेतू उदात्त होता असे न्यायालयाने म्हटले आहे.
मागाठाणेची माहिती एम. जी. दीक्षित यांच्या पीएचडीच्या शोधप्रबंधामध्ये सापडते. हा शोधप्रबंध ५०च्या दशकातील आहे. त्यात म्हटले आहे, ‘मागाठाणे हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे गाव असून त्यांनी अनेकांनी पोर्तुगिजांच्या कालखंडामध्ये म्हणजेच १७ व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला दिसतो. या मागाठाणे लेणी पोईसर लेणी या नावानेही ओळखल्या जातात. पोईसर हे मागाठाणेच्या वेशीला लागून असलेले गाव आहे. आणि ते या लेणींपासून तुलनेने जवळ आहे. या लेणींचा उल्लेख बॉम्बे गॅझेटिअरमध्येही सापडतो. बॉम्बे गॅझेटिअरमधील उल्लेखानुसार आजूबाजूला दाट हिरवी झाडी असल्याने त्या बाहेरून दृष्टीस पडत नाहीत, असा आहे. जोगेश्वरीच्या लेणींचा विशेष म्हणजे तिथे लेणी वर आणि जमीन खूप खाली आहे, तसेच चित्र आपल्याला मागाठाणे लेणींमध्येही पाहायला मिळते.’

येथील विहाराच्या छताचा काही भाग पडल्याचे दीक्षितांची नोंद वाचताना लक्षात येते. ते पुढे म्हणतात.. ‘‘मात्र एकूण आजूबाजूचा अंदाज घेता असे लक्षात येते की, इथे मध्यभागी मोठय़ा ेसभागृहाप्रमाणे असलेला भाग होता. त्याची लांबी-रुंदी सुमारे पंचवीस बाय सहा फुटांची असावी. लेणींच्या पूर्वेकडील बाजूस व्हरांडा असून तिथे असलेल्या स्तंभांवर डबल क्रिसेंट पद्धतीचे अलंकरण आहे. अशा प्रकारचे अलंकरण कोकणातील कुडा आणि कान्हेरी या अगदी सुरुवातीच्या काळातील लेणींमध्ये पाहायला मिळते.
 डावीकडच्या बाजूस या लेणींचे मुख्य प्रवेशद्वार असून तिथे दोन मोठय़ा पाण्याच्या टाक्या होत्या. त्यावर दगडी झाकणेही होती. आतमध्ये असलेल्या चैत्यामध्ये सहा ते सात स्तंभांवर शंखाकृती रचना असून त्यावर फारसे अलंकरण नाही. सहाव्या शतकातील लेणींचा हा विशेष इथे पाहायला मिळतो. इथे एक सर्वात महत्त्वाचे चैत्यही आहे. किंबहुना ते या लेणींमधील सर्वात महत्त्वाचे लेणे आहे, असे म्हणता येईल. हे आकारानेही सर्वात मोठे असून लेणींच्या वायव्येस आहे, असा उल्लेख गॅझेटिअरमध्ये सापडतो.’  
दीक्षितांनी ही नोंद केली त्या वेळेस या चैत्यामध्ये बाहेरच्या बाजूने आतमध्ये मोठय़ा पाण्याची गळती सुरू होती. आजही ती गळती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. दीक्षित त्यांच्या नोंदीमध्ये म्हणतात, हे चैत्य म्हणजे एक मोठे चौकोनी आकाराचे सभागृह असून त्याच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी बेंचसारखे दगडीबांधकाम करण्यात आले आहे. समोरील भिंतीच्या एका बाजूला गौतम बुद्धाची मोठी शिल्पकृती पाहायला मिळते. पद्मासनात बसलेला बुद्ध इथे दिसतो. शिल्पकृतीचा मधला काही भाग कालौघात पडला आहे. तर या मोठय़ा बुद्ध शिल्पकृतीच्या दोन्ही बाजूस हातात मोठे कमळपुष्प घेतलेल्या अवलोकितेश्वराची शिल्पकृती होती. ती आता धुसर दिसते. तर या बुद्धमूर्तीच्या दुसऱ्या बाजूस धर्मचक्र मुद्रेमधील ध्यानी बुद्धाच्या विविध पाच छोटेखानी शिल्पकृती दिसतात.

इथे असलेली तोरणाची कलाकृती मात्र अप्रतिम असून त्यावर उत्तम कोरीव काम करण्यात आल्याचे दीक्षितांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘‘त्यावर हत्ती, मकर, उडणाऱ्या अप्सरा अतिशय उत्तम पद्धतीने कोरलेल्या आहेत. वेरुळमधील विश्वकर्मा लेणींशी समांतर जाणारी अशी ही कलाकृती आहे’’
येथील शिल्पकृतींवरून या लेणींची निर्मिती सहाव्या शतकात झाल्याचे दीक्षितांनी म्हटले आहे. केवळ तेवढेच नव्हे तर मागाठाणेच्या आजूबाजूच्या परिसरात जे पुरातत्त्वीय अवशेष सापडतात तेदेखील हा लेणींचा परिसर सहाव्या शतकाच्या सुमारासचा असावा, असाच संकेत देतात त्यामुळे सहाव्या शतकात या परिसरात बौद्ध धर्माचे प्राबल्य होते, हेच या मागाठाण्याच्या लेणी सिद्ध करतात, असे नोंदींअखेरीस दीक्षित म्हणतात.
विशेष महत्त्वाचे म्हणजे प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली त्यावेळेस दीक्षितांच्या अनेक नोंदी आजही बऱ्यापैकी जुळत असल्याचे लक्षात आले. म्हणजे आजही लेणी बाहेरून नजरेस पडत नाहीत. फरक इतकाच की, पूर्वी जिथे घनदाट हिरवी झाडी होती, तिथे आज झोपडय़ा मोठय़ा प्रमाणावर उभ्या राहिल्या आहेत. लेणींची अवस्था अतिशय विदारक आहे. काही लेणींचा एक भाग सिमेंटने बंदिस्त करून तिथे चक्क लोखंडी ग्रीलच्या खिडक्या लावण्यात आल्या आहेत. अगदी अलीकडेपर्यंत या लेणींमधील चैत्याच्या भागात एक कुटुंब वास्तव्य करत होते. या चैत्यामध्ये असलेल्या ज्या तोरणाचा उल्लेख दीक्षितांनी वेरुळच्या नक्षीकामाशी केला आहे, तो भाग आजही उत्तम अवस्थेमध्ये आहे. बुद्धशिल्पकृती अतिभग्नावस्थेत असली तरी तिथे ती शिल्पकृती होती, हे सांगणारे पुरावे स्पष्टपणे दिसतात. या लेणींच्या आतील भागाची २००९ साली टिपलेली छायाचित्रे सोबत प्रसिद्ध करत आहोत.

रहिवाशीही संरक्षण-संवर्धनास तयार आणि बिल्डरदेखील!
मागाठाणे लेणींच्या संरक्षण-संवर्धनास स्थानिक झोपडपट्टीवासीयांचा विरोध असल्याची आवई मध्यंतरी उठली होती. मात्र त्यांचा प्रश्न हा त्यांच्या पुनर्वसनाशी संबंधित असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीच्या लक्षात आले. येथे साधारणपणे १५० कुटुंबे राहतात, त्यांचे योग्य पुनर्वसन झाल्यास येथील रहिवाशांचा या लेणींच्या संरक्षण- संवर्धनास विरोध नाही, असे रहिवाशांमधील अनेकांनी स्पष्ट केले. किंबहुना त्यातील अनेकांनी असेही सांगितले की, झोपडपट्टी पुनर्विकासाला परवानगी मिळाल्यानंतर बिल्डर आणि रहिवासी या दोघांनीही एकत्र येऊन असा निर्णय घेतला की, लेणींचा परिसर मोकळा ठेवून त्या समोर उद्यान करण्यात यावे आणि पलीकडच्या बाजूस उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर इमारत उभारणी करण्यात यावी, असे झाल्यास रहिवाशांचेही कल्याण होईल आणि लेणींचेही!

लेणींचे एक मोठे संकुल इथे असावे. मात्र सध्या त्यातील अनेक बाबी आजूबाजूला नष्टप्राय होण्याच्या अवस्थेत आहेत. इथे लेणींच्या वरच्या बाजूस एक गायत्री मंदिर उभे राहिले असून त्याला धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिल्याचे तेथील संबंधितांनी सांगितले. मुळातच पुरातन वास्तूच्या डोक्यावर एखादे बांधकाम करण्यास धर्मादाय आयुक्त परवानगी देऊच कशी काय शकतात? त्यामुळे इथे नियमांची सर्रास पायमल्ली झालेली दिसते. कारण केंद्र सरकारनेच पुरातन वास्तूंच्या कायद्यामध्ये २००१ साली सुधारणा केली असून त्यात अशा प्रकारचे कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही, असे म्हटले आहे.
याच गायत्री मंदिराच्या विश्वस्त मंडळींशी संबंधित व्यक्तींच्या दोन समाधी इथे तयार झालेल्या दिसतात. २००९ साली टिपलेल्या छायाचित्रात या समाधी जमिनीलगत होत्या आता त्या मोठा चौथरा उभारून त्यावर साकारलेल्या दिसतात. ही जमीन खटाव यांच्या मालकीची होती ती त्यांनी मंदिराच्या नावे करून दिल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी समाधीसाठीचा चौथरा उभा करताना मागच्या बाजूस असलेले लेणींचे अवशेष सिमेंटमध्ये चिणण्याचेच काम केले आहे.

लेणींच्या समोरच्या बाजूला मोठय़ा आकाराची कुंडे होती. ती सर्व सध्या घाणीने भरलेली दिसतात. हा भाग स्वच्छ केला तर त्या कुंडातून निघणाऱ्या घाणीमध्येही अनेक पुरातत्त्वीय अवशेष नक्कीच सापडतील, असे पुरातत्त्व तज्ज्ञांना वाटते.
शिवाय या मोठय़ा लेणीसंकुलात एक मोठे कुंडही होते. त्याचे अवशेष सध्या उभ्या राहिलेल्या एकता शक्ती बिल्डरच्या इमारतीखाली गाडले गेल्याचा आरोप या संदर्भात आवाज उठविणाऱ्या अनिता राणे-कोठारे यांनी केला आहे. त्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी मुंबईतील प्राचीन स्थळांच्या माहितीसंदर्भात महत्त्वाचे कार्यही केले आहे. सध्या तरी हा परिसर झोपडपट्टीने वेढलेला असून हे सारे उठवले आणि येथील रहिवाशांचे योग्य पुनर्वसन केले तर या आजही शिल्लक राहिलेल्या या परिसराच्या अवशेषांमधून अनेक चांगल्या बाबी हाताला लागू शकतात, असे तज्ज्ञांना वाटते.
मध्यंतरीच्या कालखंडामध्ये प्राध्यापिका अनिता राणे-कोठारे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पुरातत्त्व खाते, स्थानिक पोलीस या सर्वाकडे जाऊन याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे एका बाजूला हे सारे प्रकरण कोर्टात सुरू असतानाच या परिसरात एकता शक्ती बिल्डर्सनी या लेणींना लागूनच एका गगनचुंबी इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली. खरे तर पुरातत्त्वीय स्थळांच्या एवढय़ा लगत बांधकाम करण्याची परवानगी नियमाने मिळत नाही. त्याही संदर्भात अनिता राणे-कोठारे यांनी आक्षेप नोंदविले होते. मात्र अखेरीस राज्य पुरातत्त्व खात्याने बिल्डरला परवानगी दिली. आता लेणींना खेटूनच ही नवीन इमारत उभी राहते आहे. अनिता राणे-कोठारे यांनी ‘लोकप्रभा’ला दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या पायाचे बांधकाम सुरू असताना तिथे पाण्याचे टाके सापडले होते. मात्र राज्य सरकारच्या पुरातत्त्व खात्याने परवानगी दिल्यानंतर त्यावरच आता इमारतीची एक बाजू उभी राहिली आहे. ज्या ठिकाणी आता ही इमारत उभी आहे, त्याच्या एका बाजूच्या खाली पूर्वी पाण्याचे टाके होते याला स्थानिक रहिवासीही दुजोरा देतात. मात्र आता तिथे इमारत उभी राहिली आहे, ही वस्तुस्थिती आहे.
हे सारे काम सुरू असतानाच अनिता राणे-कोठारे यांनी मनसे- सेना- रिपब्लिकन पक्ष या सर्वाचे दरवाजेही ठोठावले. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी त्या परिसराला भेटही दिली. मात्र त्या वेळेस या परिसरात मनसेचे प्राबल्य असल्याने त्यांनी बहुधा त्यात लक्ष घातले नसावे, असेही त्या म्हणाल्या. तर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर मनसेनेही त्यातून अंग काढून घेतले. खरे तर या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी राज ठाकरे यांनाही पत्र लिहिले होते, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असे अनिता राणे-कोठारे म्हणाल्या.

या लेणींच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली ती पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. सूरज पंडित यांनी. ‘लोकप्रभा’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘ही लेणी पाचव्या-सहाव्या शतकातील असून त्याची परंपरा आणि नक्षीकाम हे थेट अजंठा परंपरेशी नाते सांगणारे आहे.’’
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कान्हेरीच्या २१ क्रमांकाच्या लेणीची निर्मिती झाली. त्यात मागाठाणेचा उल्लेख आहे. कालांतराने त्याच परिसरात लेणी उभ्या राहिलेल्या दिसतात. सध्या मागाठाणेचा बसडेपोचा जो भाग आहे, त्याच्या मागे असलेल्या झोपडपट्टीत अवशेषांचा शोध घेत असताना आपल्याला २०००-२००१ साली दोन एकाश्म स्तूप सापडले होते. त्यावरून असा अंदाज बांधता येतो की, लेणीसाठी दिलेल्या जमिनीची हद्द तिथपर्यंत असावी. कारण पूर्वी अशा प्रकारच्या स्तूपांचा वापर सीमा निश्चितीसाठीदेखील केला जात असे. कान्हेरीच्या लेणींशी तर या लेणीचा घनिष्ठ संबंध आहेच. पण याचे नाते थेट अजंठा-वेरुळशी आहे. पश्चिम महाराष्ट्रात अजंठा-वेरुळशी नाते सांगणाऱ्या लेणी फारशा नाहीत. म्हणून अवस्था कशीही असली तरीही मागाठाणेच्या लेणींची जपणूक होणे याला सर्वाधिक ऐतिहासिक महत्त्व आहे! त्या आपल्या अनमोल अशा परंपरेचा महत्त्वाचा वारसा सांगतात.

सूरज पंडित म्हणाले, ‘‘खरे तर या लेणींचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अहवाल मध्यंतरी पुरातत्त्व खात्याच्या विनंतीवरून आपण त्यांना सादर केला होता. त्यात या लेणींचे महत्त्व आणि संवर्धन-संरक्षण का व्हावे ते स्पष्टपणे नमूद केले आहे. असे असतानाही उच्च न्यायालयात सरकारने सादर केलेल्या अहवालात पुरातत्त्वीयदृष्टय़ा या लेणी महत्त्वाच्या नाहीत, असे सरकारने म्हणणे हे खरोखरच धक्कादायक आहे!’’
राज्याचे माजी पुरातत्त्व संचालक आणि या विषयातील ज्येष्ठ जाणकार डॉ. अरिवद जामखेडकर म्हणाले, ‘‘जगप्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ वॉल्टर स्टिंक यांनी ७०च्या दशकामध्ये सादर केलेल्या ‘अंजठा ते वेरुळ’ या शोधप्रबंधामध्ये मागाठाणेचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यात या लेणींचे असलेले महत्त्व आणि अजंठासोबतचे नाते विशद केले आहे. असे असतानाही ‘ही लेणी पुरातत्त्वीयदृष्टय़ा महत्त्वाची नाहीत’ असे राज्य शासनाने म्हणणे हे धक्कादायक तर आहेच, पण अनाकलनीयही आहे!  किंबहुना अजंठाशी असलेल्या नात्यामुळे सरकारने या लेणींना संरक्षण देऊन त्यांचे संवर्धन करणे हे त्यांचे प्रथमकर्तव्यच आहे.’’
मात्र या साऱ्या घडामोडींकडे शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन या सर्वच पक्षांनी पाठ फिरवली असून भारतीय लेणी संवर्धन समितीसारखी एखादी संस्थाच किंवा प्रस्तुत प्रकरणात जनहित याचिका करणाऱ्या कार्यकर्त्यांसारखे काहीजण या कार्यासाठी प्राण पणाला लावतात. राजकीय पक्षांना तर लेणींच्या जपणुकीचे काहीच पडलेले नाही, अशी अवस्था आहे. कारण कोणत्याही राजकीय नेत्याने या लेणींसाठी आजतागायत कोणतेही ठोस व ठाम पाऊल उचललेले नाही. आता निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा एकदा एकगठ्ठा मतांसाठी अनेक राजकीय पक्षांचे लक्ष दलितांच्या मतांकडे लागले आहे. पण त्यांना गौतम बुद्धांचा अनमोल ठेवा मात्र जपण्याचे कष्ट घ्यायचे नाहीत!
छायाचित्र सौजन्य : १९५०-६०च्या दरम्यान प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ वॉल्टर स्टिंक यांनी टिपलेले मागाठाणे लेणींची सर्व कृष्णधवल छायाचित्रे अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन स्टडीजच्या सेंटर फॉर आर्ट अ‍ॅण्ड आर्किऑलॉजी फोटो आर्काइव्हमधून साभार.