यंदाची इंडियन सायन्स काँग्रेस वेगळय़ाच अर्थानं गाजली. काही निवडक वक्त्यांनी आजच्या प्रगत तंत्रज्ञानापैकी बहुतेक शोध आपल्या वेद-पुराण ग्रंथात आधीच नमूद केलेले आहेत असा जावई शोध लावलाय. म्हणजे विमान, रॉकेट यांचं संपूर्ण तंत्रज्ञान, एवढंच नव्हे तर रडार तंत्रज्ञानदेखील भारतात आधीच उपलब्ध होतं, असा यांचा दावा आहे. गणितातील बहुतेक शोधांचं मूळदेखील भारतीय ग्रंथांत असल्याचा दावा आहे. पण पाश्चात्त्य लोक आपल्याला त्याचं श्रेय देत नाहीत, अशी यांची तक्रार आहे.

एक वेळ आपल्या वेद-पुराणात हे सगळं उपलब्ध आहे असं आपण गृहीत धरू, पण वैज्ञानिकांनी एक मान्य करायला हवं. तुमचं ज्ञान, विज्ञान हे फक्त कागदावरच असून उपयोगाचं नसतं. ते प्रत्यक्ष प्रयोगात, प्रॉडक्टमध्ये, त्यातही उपयोगी प्रॉडक्टमध्ये रूपांतरित करावं लागतं. संजयनं धृतराष्ट्राला महाभारतातील युद्धाच्या कथा ऐकवल्या, त्याही दूरदृष्टीनं म्हणजे टेलीविजननं असाही दावा कुणीतरी करतं.. प्रश्न हा आहे की, हे सगळं तंत्रज्ञान जर आपल्याकडे उपलब्ध होतं, आहे, तर ते वापरून विमान, टेलिविजन, रडार भारतातच तयार करायला कुणी कुणाला रोखलं? म्हणजे आपल्याकडे तेवढी कर्तृत्ववान मंडळी आधी होती, पण स्वातंत्र्योत्तर काळात किंवा गेल्या शतकांत नव्हती असं म्हणायचं का? एअरफोर्समधले जे अधिकारी विमानाचं तंत्रज्ञान आपल्याकडे वर्षांनुवर्षे उपलब्ध आहे, असा दावा करताहेत त्यांनी आपल्या सव्‍‌र्हिसच्या काळात तेच तंत्रज्ञान वापरून विमान तयार करण्याचा अन् त्यातच बसून उड्डाणे करण्याचा आग्रह का धरला नाही? आपण आजही बोइंग विमाने, एअरफोर्सला लागणारी बहुसंख्य विमाने बाहेरून आयात करून पैसा का वाया घालवतो?
आज स्पेस टेक्नॉलॉजी किंवा संरक्षण क्षेत्रातील रॉकेट, रडार, मिसाइल्सची प्रगती. यात आपण खूप प्रगती केलीय हे खरंय. पण त्यातले बहुतेक कॉम्पोनंट्स, इन्स्ट्रुमेंट्स, आय.सी. चिप्स या आयात केलेल्याच असतात. हे तंत्रज्ञान विकसित करताना जे मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स लागतात ते तर बहुतेक सर्वच आयात केलेले असतात. आजही आपल्या डी.आर.डी.ओ., सी.एस.आय.आर. या प्रयोगशाळांतून किंवा आयआयटीजसारख्या संस्थांतून निर्यात केलेली इक्विपमेंट्स किती अन् भारतीय उत्पादने किती याचे ऑडिट केले तर सत्य बाहेर येईल.
रडार तंत्रज्ञानात आम्ही मंडळी स्कॉलनिक त्या ग्रंथाला (Handbook) बायबल/ गीता/ महाभारत समजतो. जे रडार भारतात आधीच विकसित झालं असा दावा केला जातो ते कोणतं रडार होतं? पल्स्ड रडार, कोनिकल स्कॅनिंग रडार, सर्च रडार, ट्रॅकिंग रडार की आताआताचं मल्टिमोड फेज्ड अरे रडार? आम्हाला तरी हीच नावं ज्ञात आहेत अन् रडार क्षेत्रात तीच प्रचलित आहेत. संस्कृतमध्ये असलेली ही मूल्यवान ज्ञानसंपदा आय.टी.च्या विद्यार्थ्यांना तरी भाषांतरित करून आतापर्यंत का शिकविली गेली नाही? किंवा आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमध्ये जे पुरातन संस्कृतिप्रेमी आहेत त्यांनी त्या त्या क्षेत्रात ते ज्ञान वापरून अस्सल भारतीय विमान तंत्रज्ञान, रडार तंत्रज्ञान का विकसित केले नाही? रडार हे रडार इक्वेशनवरच आधारित असते. तिथे सेकंदाचाही इकडे तिकडे फरक चालत नाही इतके ते अचूक असावे लागते. एरवी आजही नासा वगैरेची अनेक मिशन्स अयशस्वी झालेले आपण पाहतो.
हे सगळे लिहिण्यात आपल्या वेद-पुराणाला, संस्कृतीला कमी लेखण्याचा मुळीसुद्धा उद्देश नाही. किंबहुना आपलेच हे ज्ञानभंडार उचित वापरण्यात, पुढे नेण्यात आपणच कमी पडलो हे सांगणे हाच एकमेव उद्देश आहे. कारण कोणतेही तत्त्व कितीही उच्च प्रतीचे असले तरी ते प्रत्यक्षात उपयोगात आणावे लागते. ते आर्थिकदृष्टय़ादेखील किफायतीशीर असावे लगाते. हाताळायला सुलभ, समजायला सोपे असावे लागते. समाजोपयोगी असावे लागते. ज्ञान फक्त पुस्तकातच राहिले तर ते निरुपयोगी ठरते. त्याला वाळवी लागते.
मेडिकलच्या क्षेत्रातली डायग्नोसिसची, शस्त्रक्रियेची जी इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यातही जास्तीतजास्त इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. आता रोबोट्स, नॅनो टेक्नॉलॉजी हेही नव्याने उपयोगात येते आहे. मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील बहुतेक इक्विपमेंट्स आयात केलेली असतात. काही अपवाद असतील भारतीय उत्पादनाचे, नाही असे नाही, पण तुलनेने कमी.
या चर्चेत असाही दावा केला गेला की, पाश्चात्त्य लोक, शास्त्रज्ञ आपल्या शोधांना भाव देत नाहीत. कमी लेखतात. दुर्लक्षित करतात. तेही तितके खरे नाही. लढा द्यावा लागतो. संघर्ष करावा लागतो, पण आपला दाम सच्चा असेल तर पाश्चात्त्यांनादेखील आपले दावे मान्य करावेच लागतात. याचे एकच प्रसिद्ध उदाहरण देतो. वायरलेस कम्युनिकेशनच्या शोधाचे श्रेय बरीच वर्षे माकरेनीला दिले जायचे. पण ते खरे नव्हते. हा शोध डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा. तोही शंभर (जास्तच) वर्षांपूर्वीचा.. तोही परदेशात नव्हे, तर कलकत्याच्या एका छोटय़ा प्रयोगशाळेत लावलेला. लहानसहान नव्हे तर चाळीस जीगॅहर्झ (४०GHz) फ्रिक्वेन्सी जनरेट करणे, ट्रान्समिट करणे, डिटेक्ट करणे हे त्या वेळी अशक्य समजले जाणारे कृत्य डॉ. जे. सी. बोस यांनी प्रयोगाने सिद्ध करू दाखविले होते. तेही रॉयल सोसायटी ऑफ लंडनसमोर! पण ते अज्ञातातच राहिले. प्रसिद्धी मिळाली माकरेनीला. काही वर्षांपूर्वी आमच्या खरगपूर आय.आय.टी.च्या एका चळवळय़ा संशोधक तरुणाने (डॉ. पी. के. बंदोपाध्याय) या प्रकरणाला तडीस न्यायचे ठरविले. तीन वर्षे संशोधन करून जगाला सिद्ध करून दाखविले की, वायरलेस कम्युनिकेशनचे जनक डॉ. जे. सी. बोस आहेत. माकरेनी नव्हे. विशेष म्हणजे अमेरिकेतील सर्वोच्च आय ट्रिपल ई (कएएए) संस्थेने ते मान्यही केले जाहीरपणे. तेव्हा लढा दिला तर आपले दावेही मान्य होतात जगाच्या पटलावर. परदेशातील मंडळी आपल्याला वाटतं तितकी संकुचित, कोत्या मनोवृत्तीची नसतात. म्हणूनच आपले तरुण वैज्ञानिक, तंत्रज्ञ बाहेर जाऊन जे संशोधन करतात त्याचे आवश्यक ते पूर्ण श्रेय (पेटंटचे अधिकार वगैरे) त्यांना मिळते. उलट आपल्याकडे ‘लडे सिपाई, नाम सरदार का’ अशी श्रेय लाटण्याची वृत्ती आढळून येते. जातीचे राजकारण, पक्षीय राजकारण हे शिक्षण, ज्ञान, विज्ञान, विद्यापीठ, प्रयोगशाळा, विज्ञान संस्था अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्याकडे जास्त प्रमाणात दिसून येते. (परदेशात ते नसतेच असा दावा नाही, पण अल्प प्रमाणात. आपल्या तुलनेत.)
आपली संस्कृती, आपला इतिहास, आपला वारसा निश्चितच गर्भश्रीमंत आहे. पण आपणच त्याचा उपयोग करीत नाही. आपल्यालाच आपल्या महत्तेचा अभिमान नाही. वर उल्लेखिलेली डॉ. जे.सी. बोससंबंधीची कथा तरी किती जणांना माहीत आहे? मी प्रत्येक भाषणात हा प्रश्न विचारतोच. मला दिसून येते ते वैचारिक दारिद्रय़!..
आपल्या साहित्याची, ज्ञान-विज्ञानाची, तंत्रज्ञानाची श्रेष्ठता ही जगन्मान्यतेनेच ठरते. उपयोगिततेनेच ठरते. टागोर, रामन, बोस, नारळीकर यांचे कार्य जगन्मान्य झालेच की नाही? अस्सल खणखणीत नाणे कुठेही चालते. त्याची किंमतदेखील इतर ठरविणार. आपण नाही ठरवायची. तेव्हा फालतू वादविवाद करण्यात वेळ दवडण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीकडे वळणे केव्हाही श्रेयस्कर. ते काम आपली बुद्धिवान, प्रज्ञावान तरुण पिढी निश्चितच करू शकते. त्यांनी भलत्या नादी न लागता कामाला लागलेले बरे. त्यातच त्यांचे अन् आपल्या देशाचे भले आहे.
डॉ. विजय पांढरीपांडे