मुंबईतल्या उत्तर दक्षिण मतदारसंघातून हिरवी मिरची हे निवडणूक चिन्ह घेऊन राखी सावंत निवडणुकीला उभी आहे. आयटम गर्ल म्हणून, अत्रंगी रिअ‍ॅलिटी शोजची अत्रंगी सहभागी म्हणून सगळ्यांना माहीत असलेल्या राखीला निवडणुकीच्या रिंगणात बघून भलेभले अचंबित होत आहेत. पण हिरवी मिरची हे निवडणूक चिन्ह, त्याला साजेसा हिरवा पेहराव घालून राखी बेधडक बिनधास्तपणे प्रचारात रंगली आहे.

निवडणूक आयोगाने राखी सावंतला हिरवी मिरची हे निवडणूक चिन्ह दिलं तेव्हाच उत्तर दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक झणझणीत असणार हे स्पष्ट झालं. अर्थात राखी सावंतला हिरवी मिरची हे निवडणूक चिन्ह मिळण्यात कोणताही योगायोग नाही. ‘चुरा लिया है तुमने’ या सिनेमात राखीने १३ वर्षांपूर्वी ‘मोहब्बत है मिरची’ हे आयटम साँग केलं होतं. त्यामुळे आता तिच्या कानात, हातात मिरचीच्या डिझाईनचे दागिने असणंही स्वाभाविक आहे.
२८ मार्च रोजी राष्ट्रीय आम पार्टी (राप)ची स्थापना करत आपण उत्तर दक्षिण मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं राखी सावंतनं जाहीर केलं. ती मूळची याच मतदारसंघातली रहिवासी. तिच्या या घोषणेचं लोकांना आश्चर्य वाटलं पण त्यानंतर तेवढय़ाच उत्साहाने तिच्याभोवती निवडणुकीसाठी एक टीमही गोळा झाली आहे.
‘माझ्यामध्ये पहिल्यापासूनच एक आग आहे. ती कायमच आहे. मी जन्मले तेव्हापासूनच माझ्यात ही आग आहे. त्यामुळेच तर मी फिल्म इंडस्ट्रीत आले. आणि म्हणूनच आता मला राजकारणात जाऊन लोकांचं दु:ख कमी करण्यासाठी काम करायचं आहे.’ राखी सांगते.
आपल्या अत्रंगी भूमिका आणि आयटम साँग्जमुळे लोकांमध्ये खळबळ उडवणारी राखी पोलीस इन्स्पेक्टर आनंद शंकर सावंत यांची मुलगी. ते आता निवृत्त झाले आहेत. राखीच्या आईने जया सावंत यांनी फारच थोडा काळ सिनेमात कामं केली आहेत. राखीनेही छोटय़ा मोठय़ा पडद्यावर आपले तथाकथित जलवे दाखवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्यावहिल्या सीझनमध्ये ती होती. त्याशिवाय ‘राखी का स्वयंवर’, ‘राखी का इन्साफ’ या तिच्या मालिकांमधून तिने धमाल उडवून दिली होती. आताही उत्तर दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे गुरुदास कामत, युतीचे गजानन किर्तिकर, मनसेचे महेश मांजरेकर आणि ‘आप’चे मयंक गांधी यांच्या विरोधात उभं राहून राखीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राखी ‘राप’ची उपाध्यक्ष झाली, तेव्हा त्या आठवडय़ातच ‘आप’च्या मयंक गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून राखीने आपले संघर्षांचे इरादे जाहीर केले. कोणताही गांभीर्याने विचार करू शकणारा माणूस राखीला मत देणार नाही, या मयंक गांधींच्या वक्तव्यावर भडकून तिने ही तक्रार दाखल केली होती. ‘आप’च्या उमेदवाराच्या या वक्तव्याचा तिला इतका राग आला की, तिने लगोलग वाराणसी आणि ठाणे या दोन मतदारसंघांतून आपच्या विरोधात आपले उमेदवार उभे करून टाकले. पक्ष स्थापन झाल्यापासूनच्या ७२ तासांतल्या या घडामोडी होत्या.
निवडणूक आयोगाने हिरवी मिरची हे चिन्ह दिल्यानंतर त्याचं महत्त्व लक्षात घ्यायला राखीने अजिबात वेळ दवडला नाही. त्यानंतर कानात हिरव्या मिरचीच्या डिझाइनचे डूल, हातात हिरव्या मिरचीच्या डिझाइनचं ब्रेसलेट आणि हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्समधले ड्रेस अशी राखी प्रसारमाध्यमांमधून सतत दिसायला लागली. ‘हिरव्या रंगाच्या विविध शेड्समधले ड्रेस प्रचारादरम्यान वापरणं ही माझीच आयडिया. त्यातून आम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांना ग्रीन सिग्नल देऊ इच्छितो. म्हणजे आमच्याकडे याल तर तुमचं काम होईल.’ राखी सांगते.
नेलपेंटपासून ते चपलांपर्यंत नखशिखान्त हिरव्या रंगाने नटलेली राखी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेलपेंट आणि कानातले डूल, हातातलं ब्रेसलेट गडद हिरव्या रंगाचं असतं. तर कपडय़ांमध्ये कुर्ता, जॅकेट, सलवार हिरवा, पोपटी या रंगांच्या शेडमध्ये असतात. तिचे केस घट्ट बांधलेले असतात आणि डोक्यावर राष्ट्रीय आम पार्टी असं लिहिलेली टोपी असते. जाड, काळ्या फ्रेमचा चष्मा आणि स्नीकर्स असतात. हे सगळं परफेक्ट मॅचिंग करून, डोक्यापासून पायापर्यंत एखाद्या नेत्याच्या पेहरावातली राखी लोकांसमोर अशा रूपात येते की, आयटम गर्ल म्हणून फेमस असलेली हीच का ती राखी सावंत, असा प्रश्न पडावा.
गम्मत म्हणजे ‘आप’ने ज्यांना नाकारलं अशा सगळ्या असंतुष्टांना ‘राप’चा मोठा आधार वाटायला लागला आहे. एकीकडे राखीचा मयंक गांधींबरोबरचा संघर्ष आहेच, दुसरीकडे ‘आप’च्या टोपीच्या डिझाइनवर आधारलेली पण हिरव्या रंगाची टोपी ‘राप’ने डिझाइन केली आहे. अरविंद केजरीवालांवर शरसंधान करायची एकही संधी राखी सध्या सोडत नाहीय. आपल्या पत्रकार परिषदेत राखीने जाहीर केलं की, ‘राप’ वाराणसीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आरपी सिंग हा व्यवसायाने इंजिनीयर असलेला आपला उमेदवार उभा करत आहे. गम्मत म्हणजे वाराणसीमधूनच भाजपचे नरेंद्र मोदी हेसुद्धा उभे आहेत. पण त्यांचा एका शब्दानेही राखीने उल्लेख केला नाही. म्हणजे जणू काही तिच्या पक्षासाठी ते फारसे दखल घ्यावी असे महत्त्वाचे उमेदवार नाहीतच. जणू तिचं लक्ष्य एकच आहे, अरविंद केजरीवाल.
ओशिवरामधल्या ओम हिरा पन्ना मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर राखीचं ऑफिस आहे. तिथेच पक्ष कार्यकर्त्यांची सतत ऊठबस सुरू असते. या मॉलपासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर इनफिनिटी आणि मेगा हे दोन मॉल आहेत. त्यामुळे या मॉलमध्ये तुलनेत खरेदीसाठीची गर्दी कमी असते. इथे गोल्ड जिम आणि भोजपुरी सिनेमाचे निर्माते कृष्णलाल हंस यांचं ऑफिस आहे. ते ‘राप’चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचे अनेक उद्योग आहेत. त्यातला एक म्हणजे गल्फमधल्या बांधकाम उद्योगाला मजूर पुरवणं. तरीही हंस यांच्याबद्दल कुणालाच फारसं काही माहीत नाही. ‘राप’चे प्रवक्ते ऋषी राज हेसुद्धा हंस यांच्याबद्दल फारसं काहीच बोलायला तयार नव्हते. ‘त्यांचे बरेच उद्योगधंदे आहेत.’ एवढंच ते पुन्हा पुन्हा सांगत होते.
या मॉलवर ‘राप’चे मोठमोठे बॅनर लागले आहेत. हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसलेल्या राखीचेही मोठमोठे बॅनर आहेत. डान्स हॉल कम पक्षाची कॉन्फरन्स रूम ते महत्त्वाच्या लोकांना भेटण्यासाठीची व्यवस्था म्हणून असलेलं छोटंसं ऑफिस अशी सतत ये जा करणाऱ्या राखीभोवती सतत चार बॉडीगार्ड असतात. राखी येते-जाते तेव्हा प्रत्येक वेळी हे चार जण धावपळ करत त्या अरुंद कॉरीडॉरमधली माणसं बाजूला हटवतात आणि राखीला जागा करून देतात.

‘लोक मला का गांभीर्याने घेणार नाहीत, मी बॉलीवूडमधून आले आहे म्हणून? मग काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी तरी असं काय फार गंभीर काम केलं आहे?’ राखी धुसफुसत विचारते.

‘सुरुवातीला पक्षाचं नाव काय असेल हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न होता. भारतीय आम पार्टी असं नाव माझ्या डोळ्यासमोर होतं. त्याचा शॉर्टफॉर्म झाला असता, बाप. मला हेच नाव अगदी मनापासून हवं होतं.. ‘आप’चा बाप! पण ते नाव आधीच कुणीतरी घेतलेलं आहे असं आम्हाला कळलं.’ राखी सांगते. फोनवर बोलतानाही ‘राप’ आणि ‘आप’चा गोंधळ करू नका, आदमी मत लिखना, राष्ट्रीय आम पार्टी लिखना असं पत्रकारांना सतत सांगत राहते.
०००
राखीने हिरव्या रंगाचा ड्रेस घालून दोन तासांची एक मोठी रॅली काढली तेव्हा सगळी जोगेश्वरी तिला बघायला गोळा झाली. काही लोक आ वासून बघत राहिले. काही जण दात काढून हसत राहिले. काही जणांनी भुवया उंचावल्या. रस्त्यावरून जाणारे, गच्चीवर किंवा गॅलरीत उभे असलेले, रेल्वे स्टेशनवर असलेले लोक राखीला हात करत होते आणि एकमेकांमध्ये उत्सुकतेने राखीबद्दलच बोलत होते. रॅली निघून गेली, लोक आपापल्या कामाला लागले, तरी राखीबद्दलच्या गप्पा संपत नव्हत्या. ‘राखी सावंत निवडणुकीला उभी राहिली म्हणजे हद्द झाली. आता आणखी काय बाकी आहे..’ जोगेश्वरी बेहराम बाग भागातल्या एका हाऊसिंग कॉम्लेक्सचा वॉचमन म्हणाला.
आधी एका जीपमधून आणि नंतर एका ट्रकवर बसून रॅली काढणाऱ्या राखीने आपल्या पद्धतीने मतदारांना सांगायचा प्रयत्न केला की, ती इतर उमेदवारांसारखी मतदारसंघाबाहेरून आलेली नाही, तर मतदारसंघातलीच, त्यांच्यातलीच एक आहे. आपण लोकांसाठी काम करण्यासाठी आपल्या बॉलीवूडमधल्या करियरचा त्याग करणार आहोत, असं तिचं म्हणणं आहे, आणि तिच्या मतदारसंघातल्या लोकांनी तिच्या या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हवा असं तिला वाटतं. पण लोकांनी तिची उमेदवारी गांभीर्याने घ्यावी असं तिला वाटत असेल, तर तिला तसंच काही तरी गंभीर काम करून दाखवावं लागेल. ‘शेवटी ती टपोरीच आहे. एखादी टपोरी व्यक्ती लोकांचं नेतृत्व कसं करू शकेल,’ वरळीमधल्या दीपक बारचे सदाशिव शेट्टी विचारतात.
मयंक गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांनाही राखी उडवून लावते. ‘लोक मला का गांभीर्याने घेणार नाहीत, मी बॉलीवूडमधून आले आहे म्हणून? मग काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी तरी असं काय फार गंभीर काम केलं आहे?’ ती धुसफुसत विचारते.
अर्थात लोकांमध्ये चर्चा होणं, वादविवाद, टीका या गोष्टी राखीला नवीन नाहीत. तिचे आयटम साँग, त्यातलं अंगप्रदर्शन यांची चर्चा होत असतानाच राखी रिअ‍ॅलिटी शोमध्ये पूर्ण नव्या भूमिकेत शिरली. तिथेही ती वादग्रस्त ठरली, ही गोष्ट वेगळी. तिचं ते ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन राहणं, स्वयंवरासारख्या रिअ‍ॅलिटी शोमधून लग्न करणं, ‘राखी का इन्साफ’सारखा रिअ‍ॅलिटी शो याबद्दल डझनावारी एन्टरटेनमेंट वेबसाइट्सवरून प्रेक्षकांनी चर्चा केली. तिच्या बोलभांड पद्धतीने बोलण्याच्या पद्धतीवर टीका झाली. ‘राखी का इन्साफ’ या सीरियलमधून झालेल्या चर्चेमुळे लक्ष्मण प्रसाद या व्यक्तीने नंतर आत्महत्या केली, त्याचंही राखीवरचं सावट अजून दूर झालेलं नाही.
पण तिचा भाऊ राकेश सावंत हा आज आठ वर्षांनंतर तिच्या बरोबर येऊन उभा राहिला आहे. आपल्या बहिणीच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होतो आहे, असं त्याला वाटतंय. तिच्या आधीच्या कारकिर्दीबद्दल तो नाराज होता. त्याला ते सगळं आवडत नव्हतं. म्हणून तो तिच्यापासून लांब होता. पण आता राजकारणात शिरण्यासाठी राखीने त्याला हाक घातली तेव्हा त्याला राहवलं नाही. आता तो तिच्या कॅम्पेन, रोड शोज या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो आहे. ‘टीव्हीवर तुम्हाला प्रत्येकावर टीका करून, स्वत: इतरांच्या एक पाऊल पुढे जावं लागतं. टीव्हीची गरज म्हणून राखीने तेव्हा ते केलं. पण आता ती बदलली आहे. खूप शांत झाली आहे. तिच्यामध्ये हा बदल होण्यासाठी मधली आठ वर्षे जावी लागली. पण एक मात्र खरं, तिच्यामध्ये संघर्ष करायची ताकद आहे. फायटिंग स्पिरिट आहे.’ राखीचा भाऊ सांगतो.
राखीच्या या सगळ्या ग्लॅमरविषयी, स्टारझमविषयी लोकांना काय वाटतं, ते मतदानानंतर कळेलच, पण राखी मात्र तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षांविषयी ठाम आहे. ‘मी घाबरणाऱ्यांमधली नाही. आवाज उठवणाऱ्यांमधली आहे. मला दिल्लीत जाऊन संसद हलवून टाकायची आहे.’ ती ठणकावून सांगते
(‘एक्स्प्रेस आय’मधून)