01youthरांगोळी हा खरं तर अल्पजीवी असा कलाप्रकार. तो दीर्घकाळ टिकणारा नसल्यानेच रांगोळीकारांना अनेकदा कलाकार म्हणूनही मान्यता मिळत नाही. असं असलं तरीही आजही अनेक रांगोळी कलावंत असे आहेत, जे जीव ओतून रांगोळी साकारतात. अशाच काही उत्तम रंगावली कलावंतांची ‘लोकप्रभा युथफूल’च्या टीमने साकारलेली ही अनोखी रांगोळी!

वीरेश वाणी
वीरेश मूळचे श्रीवर्धन गावचे. ते म्हणतात.. ‘‘आमच्या शाळेत दरवर्षी रांगोळीच्या स्पर्धा व्हायच्या. प्रत्येक स्पर्धेत मी भाग घ्यायचो. तेव्हा मी फक्त निसर्गचित्राच्या, ठिपक्यांच्या आणि कार्टूनच्या रांगोळ्या काढायचो. सगळ्यांच्या प्रशंसेतून आपण जरा चांगल्या रांगोळ्या काढतो हे कळलं. मग मुंबईमधल्या रांगोळी स्पर्धामध्ये भाग घेऊ लागलो. प्रत्येक स्पर्धेमधून मिळालेल्या बक्षिसाने मला माझी आवड जपण्यासाठी प्रेरित केलं. त्यातही राजकीय नेते नवाब मलिक यांची पाठीवरची थाप मी कधीही विसरू शकणार नाही.’’ व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीमध्ये तज्ज्ञ असलेले वीरेश वाणी गुरूंबद्दल विचारल्यावर म्हणाले, ‘‘मी मुळात गावात राहात असल्यामुळे आम्हाला lp02रांगोळी वगैरे शिकावयला कोणीच नव्हतं. शाळेत होणाऱ्या स्पर्धामध्ये जे कोणी व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी काढत होते त्यांच्याकडे बघून बघून मी हा प्रकार शिकलो. मग स्वत:ला हळूहळू विकसित करत गेलो.’’ त्यांच्या रांगोळीच्या वाखाणण्याजोग्या प्रगतीमध्ये त्यांच्या त्यांच्या वडिलांकडून आलेला चित्रकलेचा वारसाही मोठा आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. ‘‘चांगली रांगोळी येण्यासाठी चित्रकलेचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे आणि ते ज्ञान मला माझ्या वडिलांकडून मिळालं.’’ असंही त्यांचं मत आहे. यांनाही स्पर्धेपेक्षा प्रदर्शनात जास्त रस आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कुठलीही कला आपल्यात रुजायला हवी, मगच आपण तिची प्रामाणिकपणे सेवा करू शकतो. याच सगळ्याची कास धरत वीरेश वाणी आपली कला विविध प्रदर्शनांत भाग घेऊन गेली २०-२२ वर्षे मनापासून जपत आहेत.

गणेश सालियन
गणेश सालियन हे नायगाव-वसईमधल्या जितेंद्र गावचे रहिवासी. ते सांगतात, जितेंद्र हे गाव कलाकारांनी समृद्ध असं गाव. त्या गावात राहून आपणही काही तरी शिकावं म्हणून चित्रकला शिकायची असं ठरवलं. गावात होणारी रांगोळी प्रदर्शने बघून चित्रकलेच्या जोडीने रांगोळीही शिकावी अशी इच्छा निर्माण झाली. रांगोळी स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ७ वीमध्ये असल्यापासून रांगोळी काढायला सुरुवात केली. आज १०-१२ वर्षे झाली. छंदाची आवड आणि आवडीचं प्रोफेशन कधी झालं कळलंच नाही. रांगोळी येण्यासाठी चित्रकला महत्त्वाची आहे का, या प्रश्नावर ते म्हणतात, ‘‘रंगसंगतीचं ज्ञान महत्त्वाचं आहे. खरं तर चित्रकला lp03आणि रांगोळी ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत. रांगोळीसाठी निरीक्षण फार महत्त्वाचं आहे. आमच्या गावात बरेच लोक असे आहेत की ज्यांना चित्रकला अवगत नसूनही ते उत्तम रांगोळी काढतात. संयमही तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्याबरोबर बोटांची पकड आणि थोडं कसब. या सगळ्यावर रांगोळीची भिस्त आहे.’’ सालियन यांना रांगोळीचे सगळे प्रकार काढायला आवडतात; परंतु व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीमध्ये त्यांना विशेष रुची आहे. त्यांच्या या कलेचा सगळ्यांनी गौरव केला. कधी कुणी शब्दांनी तर कधी कुणी स्मृतिचिन्हांनी. या आठवणी सांगताना त्यांनी त्यांची एक अविस्मरणीय आठवण सांगितली, ‘‘सचिन खेडेकर यांनी माझ्या नावावरून माझी रांगोळी लक्षात ठेवली होती आणि ते ऐन प्रदर्शनात शुभेच्छा देण्यासाठी मला शोधात होते. त्यावेळी मी केतकी माटेगावकरची रांगोळी काढली होती. त्या रांगोळीचा त्यांनी फोटो काढला आणि केतकीला पाठवला आणि केतकीने रांगोळी मला आवडली असं सांगायला आवर्जून फोन केला. हे दोन क्षण मी कधीही विसरणार नाही.’’

भारत प्रधान
भारत प्रधान त्यांच्या रांगोळीच्या आवडीबद्दल म्हणतात, ‘‘गणेश आणि मी एकत्रच चित्रकलेच्या आणि रांगोळीच्या आवडीनिशी वाढलो. स्वत:च स्वत:ला शिकवत एकमेकांनाही घडवत गेलो. सगळ्या स्पर्धाना एकत्रच गेलो आणि एकत्रच जिंकून आलो. आज सगळेच आम्हाला ‘गणेश-भारत’ या नावाने ओळखतात. आमची प्रत्येकाची आडनावंसुद्धा माहीत नाहीत. आमच्या गप्पांचा विषयही रांगोळीच असतो.’’ त्यांच्याही बक्षीस मिळालेल्या बऱ्याच आठवणींपैकी त्यांनी एक सांगितली ती म्हणजे दरवर्षी त्यांच्या गावात प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते पार पडणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची. ते म्हणतात.. ‘‘गणेश आणि मी तेव्हा ९ वीमध्ये असू. परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळे कुठल्याही, कशाही कपडय़ांत फिरायचो. असंच फिरताना मला शरद पोंक्षे दिसले आणि तो दिवस १ जानेवारी आहे हे लक्षात आलं.. एकदा माझ्या कपडय़ांकडे पाहिलं आणि घरी lp04गेलो आईला सांगितलं. गणेश आणि मला दोघांनाही बक्षिसं होती. त्यामुळे मी गणेशलाही तयारीसाठी घेऊन आलो. गणेशला सांगून कपडय़ांची केलेली जमवाजमव, आपण बक्षीस घेताना छान दिसावं म्हणून केलेली धडपड हे कधीच विसरू शकणार नाही.’’ भारत प्रधान यांनाही रांगोळीचे सगळे प्रकार येतात आणि आवडतात; पण त्यांचीही ख्याती आहे ती व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीसाठी. त्यातही त्यांना चेहऱ्यामध्ये बारकाव्यानिशी काम करायला जास्त आवडतं. रांगोळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं हे विचारल्यावर रांगोळीची गुणवत्ता आपली कला सिद्ध करते असं प्रांजळ मत त्यांनी मांडलं. आज या कलेमध्ये एवढा प्रवास करूनही कला सर्वदूर पसरावी अशी भारत यांची इच्छा आहे. त्यामुळे गणेश आणि भारत दोघेही मिळून नायगावमध्येच रांगोळीचे वर्ग घेतात. आणि बऱ्याच रांगोळीच्या स्पर्धाना परीक्षक म्हणूनही जातात आणि कलेचा प्रसार करतात. ‘‘अजूनही आम्हाला खूप काही शिकायचं आहे. हळूहळू शिकू; पण जे काही शिकू ते परफेक्ट शिकू’’ असा त्यांचा निर्धार आहे.

प्रवीण भोईर
ठाणे जिल्ह्यतील जूचंद्र गाव म्हणजे कलाकारांचं ठाणंच. इथं जवळपास प्रत्येक जण कलाकार आहे. त्यांपैकीच एक म्हणजे प्रवीण भोईर. व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी हा त्यांचा हातखंडा विषय. घरची lp05परिस्थिती हलाखीची असतानादेखील त्यांनी आपल्यातील रांगोळीची कला जिवंत ठेवली. लहानपणापासून मोठमोठय़ा कलाकारांच्या रांगोळ्या पाहात पाहात ते शिकले. ‘‘तुझी रांगोळी काही फार चांगली नाहीये. तू या क्षेत्रात नको येऊस’’ असं अगदी सुरुवातीला त्यांना एका प्रस्थापित रांगोळी कलाकाराने सांगितलं, तेव्हा त्या कलाकाराला ‘मी तुमच्यापेक्षाही उत्तम रांगोळी काढून दाखवीन’ असं त्यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिलं आणि आज तोच कलाकार स्वत:च्या मुलांना रांगोळी शिकविण्यासाठी प्रवीण भोईरांना विनंती करतो तेव्हा कलेसाठी त्यांनी दाखविलेल्या निष्ठेचा प्रत्यय आपणांस येतो. देशभरात अगदी राजस्थानपासून ते पार केरळपर्यंत रांगोळीच्या विविध प्रदर्शनांत त्यांनी आपल्या कलेची चमक दाखविली आहे. वयाच्या २५-२६व्या वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करत आहेत. गुणवंत मांजरेकरांबरोबर काम करून त्यांनी आपली अनेकविध रांगोळी प्रदर्शनं भरविली आहेत. त्यांचं कसब आहे ते व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी काढण्यात. पण नुसतंच कलाकुसरीची रांगोळी काढून ते थांबत नाहीत तर आपल्या रांगोळीतून सामाजिक विषयांना ते हात घालतात. भ्रष्टाचार, युद्ध अशा अनेक विषयांवर त्यांनी व्यंगचित्रात्मक रांगोळी काढलेली आहे. कार्टून्स व्यंगचित्रांमध्ये lp06काढलेली रांगोळी लोकांचं अधिक लक्ष वेधून घेते. त्यामुळे मला पोहोचवायचा असलेला सामाजिक संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येतो असं ते सांगतात.
हल्ली रांगोळी ही फक्त दिवाळीपुरती मर्यादित नसून वर्षभर तिला मागणी असते. या क्षेत्रात येणाऱ्यांकडे सतत ८ ते ९ तास बसण्याची तयारी हवी असं ते सांगतात. एकदा त्यांनी शिर्डीच्या पालखीत चालता चालता साईबाबांची रांगोळी केवळ अडीच तासात पूर्ण केली, असं करणारी त्यांच्या गावातली ती एकमेव व्यक्ती आहे. रांगोळ्यांबरोबरच ते गणपती आणि दुर्गादेवीच्या मूर्तीच्या रंगकामाचं कामदेखील करतात. घरची परिस्थिती हलाखीची असताना घरातल्या लोकांच्या ‘तू दुसऱ्यांच्या ओटीवर जाऊन रांगोळ्या काढतोस’ अशा टोमण्यांना न जुमानता त्यांनी आपल्यातली कला जिवंत ठेवली ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.

संजय पाटील
नायगावला राहणारे जुचंद्र गावचेच संजय पाटील हेसुद्धा एक उत्तम रांगोळी कलाकार. लहानपणी त्यांनी कधी रांगोळी काढण्याचे फारसे मनावर घेतले नव्हते. पण शाळेत विविध स्पर्धा सुरू झाल्या आणि शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना किमान एका स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले. भाग नाही घेतला तर रु. २५ दंड lp07होईल या भीतीने संजयजींनी कॅरम स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले पण त्यांनी भाग घ्यायच्या आधीच त्या स्पर्धेसाठीची नावनोंदणी पूर्ण झाली. त्यामुळे नाइलाजाने त्यांना रांगोळी स्पर्धेत भाग घ्यावा लागला. त्यांचा भाचा आधीपासून रांगोळी काढायचा. त्याच्या मदतीने त्यांनी रांगोळीचा सराव केला आणि त्या स्पर्धेचे बक्षीस पटकावले. यानंतर त्यांना हळूहळू रांगोळीची आवड निर्माण झाली, त्यात त्यांनी विविध बक्षिसेही मिळवली. असेच एका स्पर्धेसाठी ते दादरला गेले असता काही कारणास्तव त्यांना त्या स्पर्धेत भाग घेता नाही आला, म्हणून ते तिथे जवळच सुरू असलेले रांगोळीचे एक प्रदर्शन पाहायला गेले. तिथे असलेल्या एका रांगोळीने त्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. ही रांगोळी इतर रांगोळ्यांपेक्षा काहीशी वेगळी होती. एक सुंदर आभास त्या रांगोळीतून निर्माण होत होता. त्यांना तो प्रकार खूप आवडला. पारंपरिक रांगोळी काढण्याबरोबरच आपण वेगळं काहीतरी करावं असं त्यांना सतत वाटत असे. त्यातूनच त्यांनी थ्रीडी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि आता थ्रीडी रांगोळीसाठी त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. रांगोळी काढायला ते इतरांपेक्षा जास्त वेळ घेतात. पण जोपर्यंत मनाजोगी सुंदर रांगोळी होत नाही तोपर्यंत त्यांना समाधान वाटत नाही. कधी कधी तर ४-५ तास केवळ रंग बनविण्यातच निघून जातात. पण रांगोळी परिपूर्ण असण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. ते सांगतात की त्यांच्या गावात प्रत्येक मुलगा चांदीचा चमचा तर नाही मात्र कलेचा वारसा घेऊन नक्कीच जन्माला येतो. प्रत्येकाकडे कोणती ना कोणती कला ही आहेच, त्यामुळेच जरासा वाव मिळाला की ही कला बहरास येते. या कलेला ते lp09आत्मीयतेने जोपासतात म्हणूनच नोकरीच्या व्यस्त दिनक्रमातसुद्धा ते रांगोळीला विसरत नाहीत.

जयकुमार भोईर
नायगाववासी असलेल्या कलाकारांनी समृद्ध असलेल्या जितेंद्र गावात राहून रांगोळीची प्रदर्शनं बघून रांगोळीची आवड भोईर यांनाही लागली. त्या आवडीतून त्यांनी स्वत:ला अनुभवातून घडवलं. अनुभवांसोबत त्यांनीही व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीचा अभ्यास केला. ते म्हणतात, ‘‘मला लहानपणापासूनच थोडी चित्रकला येत होती, त्यातूनच पुढे मला रांगोळीची आवड लागली. थोडी चित्रकला, थोडी आवड, थोडे अनुभव आणि थोडा अभ्यास यामुळे रांगोळी हेच माझं प्रोफेशन झालं. हळूहळू स्पर्धामध्ये उतरलो त्यातून मिळालेल्या बक्षिसांनी माझी आवड वृद्धिंगत केली.’’ त्यांना आता स्पर्धामध्ये उतरून बक्षिसं मिळवण्यापेक्षा दौरे करून प्रदर्शनात रांगोळी काढणं जास्त आवडतं. जयवंत, गणेश आणि भारत हे तिघंही गुणवंत मांजरेकर यांच्या गटातील कलाकार. व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी काढताना सगळी बॉर्डर काढून घेऊन मग फिलिंग आणि फिनिशिंग असं त्यांनी त्यांचं स्वतंत्र तंत्र विकसित केलं आहे. त्यांच्या या तंत्रांनी आणि आवडीने अनेकांची वाहवा मिळवली. आपण एकातच मास्टर असावं या मताचे ते असल्यामुळे त्यांनी व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीमध्ये स्वत:ला मास्टर केलं. ‘‘माझी रांगोळी मला आवडण्याबरोबर ती लोकांना आवडली पाहिजे आणि ते माझी रांगोळी बघून खूश झाले पाहिजेत याकडे माझा कटाक्ष आहे.’’ असंही ते म्हणतात. प्रदर्शनामध्ये आपली रांगोळी वेगळी दिसावी याकरिता तुम्ही काय करता किंवा याकरिता तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘प्रदर्शनामध्ये रांगोळी काढताना जिथे प्रदर्शन आहे त्यांच्याकडून एक विषय दिला जातो. आपल्याला दिलेल्या विषयामध्ये आपण स्वत: काहीतरी रचावं लागतं. ती रांगोळीची रचनाच आपलं वेगळेपण ठरवते. प्रत्येकाची रांगोळी काढण्याची एक वेगळी लकब असते, वेगळं तंत्र असतं.’’ जयकुमार यांना आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणं आणि त्याची प्रामाणिकपणे सेवा कारणं आणि त्यात परफेक्शन आणणं महत्त्वाचं वाटतं.

विनायक वाघ
संस्कारभारती रांगोळी म्हटलं की एका विशिष्ट रांगोळीचे चित्र डोळ्यांसमोर येते. जवळपास २५ वर्षांपूर्वी संस्कारभारती या कलांना उत्तेजन देणाऱ्या संस्थेतील वासुदेव कामतांसारख्या मातब्बर कलाकारांनी एकत्र येऊन एक विशिष्ट प्रकारची रांगोळी जी सोपी असेल, सहज असेल अशी निर्मिण्याचे योजले आणि त्यातून संस्कारभारती रांगोळीचा जन्म झाला. आज ही रांगोळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिला पुढच्या पिढय़ांपर्यंत नेण्यासाठी अनेक रांगोळी कलाकार कार्यरत आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे डोंबिवलीचे विनायक वाघ. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून ते रांगोळी काढत आहेत. १२वीत असल्यापासून त्यांनी रांगोळीवर काम करायला सुरुवात केली आणि आता संस्कारभारती काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी आणि त्यांच्या ३-४ मित्रांनी डोंबिवलीत सर्वप्रथम संस्कारभारतीची रांगोळी काढण्यास सुरुवात केली. आज ते या रांगोळीची अनेक शिबिरं घेतात. ते सांगतात जेव्हा मी रांगोळी शिकायला शिबिरात जायचे ठरविले तेव्हा मुलांनी रांगोळी काढणं फारसं चांगलं समजलं जायचं नाही. पण मी आणि माझ्या मित्रांनी अगदी ठामपणे रांगोळी शिकायचे ठरविले त्या वेळी त्या शिबिरात ७० महिला आणि दोन-चारच मुलं होतो. आता मात्र हे चित्र बरंच बदललंय. आज मुलंही तितक्याच उत्साहात रांगोळ्या शिकायला तयार असतात. संस्कारभारतीची रांगोळी ही वैशिष्टय़पूर्ण रांगोळी असते. या रांगोळीत सुरुवातीला रंग पसरला जातो आणि त्यानंतर पांढऱ्या रांगोळीने त्यावर रांगोळी काढली जाते तसेच काढताना पाचही बोटांचा वापर केला जातो. टीमवर्कचं उत्तम प्रतीकच ही रांगोळी मानली जाते. पूर्वी दोन बोटांनी काढली जाणारी रांगोळी संस्कारभारतीमुळे पाच बोटांनी काढली जाते. वेगवेगळ्या विचारधारांना एकत्र आणून कलाकार ती साकार करायची हेच या रांगोळीतून सूचित होते. त्यातील फार तुरळक वापरल्या जाणाऱ्या सर्परेषा या प्रकाराचे विनायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून २० प्रकार विकसित केले आहेत तसंच पारंपरिक चिन्ह शंख-चक्राचा वापर करून त्यांनी अनेकविध डिझाइन्स बनविल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रातून मणिपूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी तेथील लोकांना संस्कारभारती रांगोळीची ओळख करून दिली. रांगोळी शिकणाऱ्या नवीन मुलांना ते आवर्जून सांगतात की, रांगोळीसाठी निरीक्षणशक्तीची खूप आवश्यकता असते. विविध रंगसंगती, डिझाइन्स, कल्पकता या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे सराव आणि सातत्य. अखिल भारतीय रांगोळी मंडळाचे अध्यक्ष भय्याजी देशपांडे हे आजसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी किमान २० मिनिटे बिंदू पाडण्याचा सराव करतात. व्यवसायाने सुलेखनकार आणि ग्राफिक डिझायनर असल्याने त्यांना त्यांच्या रांगोळीत या गोष्टींची मदत होते. संगणकाच्या साहाय्याने विविध रंगसंगती, ग्रेडेशन असे प्रकार करता येत असल्याने रांगोळीत नावीन्यता आणता येते.

lp08

विवेक प्रभू केळुस्कर
जोगेश्वरीला गेली ३० वर्षे रंगावली परिवारातर्फे रांगोळ्यांचे प्रदर्शन भरविले जाते. या परिवाराचे सर्वात जुने सभासद असलेले विवेक प्रभू केळुस्कर हे स्वत:सुद्धा एक निष्णात रांगोळी कलाकार आहेत. त्यांनी लहानपणापासूनच रांगोळी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाविद्यालयीन-आंतरमहाविद्यालयीन असे टप्पे पार करत आज ते आणि त्यांचे सहकारी रंगावली परिवारातर्फे रांगोळ्यांचे प्रदर्शन भरवितात. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ ते सांगतात की आम्ही हे प्रदर्शन फक्त रांगोळ्यांसाठी भरवत नाही तर एक उत्तम माणूस घडविण्यासाठी भरवितो. प्रदर्शनासाठी घेतल्या जाणाऱ्या शाळेची साफसफाई स्वच्छता टीममधले सर्व lp10रांगोळी कलाकार मिळून करतात. दरवर्षी या प्रदर्शनाची एक संकल्पना असते तीसुद्धा चर्चेतून ठरविली जाते. या वेळी या प्रदर्शनाची थिम भावभावना अशी आहे. यानंतर प्रत्यक्ष रांगोळीचं काम सुरू करतानाही कलाकार एकमेकांची मदत घेतात. रंगसंगतीचे संदर्भ यांमधील माहितीची देवाणघेवाण होते. यातील प्रत्येक कलाकार हा फक्त आपली रांगोळी सर्वोत्कृष्ट होण्यासाठी नाही तर संपूर्ण प्रदर्शन उत्तम व्हावे यासाठी झटत असतो. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना वयाचे बंधन नसते. अगदी शाळकरी मुलांपासून ते आजी- आजोबांपर्यंत कोणीही या प्रदर्शनात सहभागी होऊ शकते. असे हे प्रदर्शन कलाकारांसाठी एक उत्तम कार्यशाळा ठरते. स्वत: विवेक प्रभू केळुस्कर उत्तम रांगोळी काढतात. व्यक्तिचित्रणात्मक हा त्यांचा खास आवडीचा विषय. त्यांच्या मते रांगोळी ही जमिनीला सुशोभित करण्यासाठी तर असावीच पण त्यातूनही एक सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक विषयांना हात घालणारी हवी. अशा विषयांकडे लोकांचे लक्ष वेधून घेणारी हवी. रांगोळ्यांमध्ये त्यांनी विविध प्रयोगसुद्धा केले आहेत. माध्यम रांगोळी या प्रकारात त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे रांगोळी साकारली आहे. दगड, चिरे, विटा इतकंच नाही तर सिमेंट, वाळू ते अगदी मसाले, धान्य, मिठाची रांगोळी त्यांनी साकारली आहे. झाडांच्या पानांचा, त्यांच्या आकारांचाही त्यांनी रांगोळीत उपयोग केला आहे. त्याचबरोबर थर्माकोलच्या गोळ्यांपासून बसच्या तिकिटांचाही कलात्मक वापर रांगोळ्यांतून त्यांनी केला आहे. बरेचदा रांगोळीला चित्रकलेपेक्षा दुय्यम समजले जाते. मात्र विवेक प्रभू केळुस्करांच्या मते रांगोळीत आपल्या कलेचा कस लागतो. एक तर रांगोळी ही अल्पजीवी असते. मात्र त्यासाठी लागणारे शारीरिक कष्ट मात्र बरेच जास्त असतात. सलग ५-६ तास बसून पंखा सुरू केला तर ती खराब होईल म्हणून तसेच घामाने निथळत ती कलाकृती पूर्ण करायची असते. पण तरीही या दरम्यान लोकांच्या मिळणाऱ्या कौतुकाने ही कलाकृती आठवणींच्या रूपाने प्रत्येकाच्या मनात ठसलेली असते. या क्षेत्रामध्ये करिअर करणे आणि यास कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन बनविणे तसं काहीसं कठीण आहे असं ते म्हणतात पण यात मातब्बर असलेला कलाकार एक चांगला चित्रकारही बनू शकतो आणि दिवाळीत तर हमखास कामं मिळतातच. स्वत: चित्रकार आणि कार्टूनिस्ट असलेल्या विवेक प्रभू केळुस्करांची स्वत:च्या चित्रांचीसुद्धा अनेक प्रदर्शनं भरलेली आहेत, असे असले तरी त्यांचं शिक्षण मात्र वाणिज्य क्षेत्रात झालेले आहे. जे जे स्कूलमध्ये कमी गुणांअभावी प्रवेश नाकारल्याने नाइलाजाने त्यांना वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा लागला पण आता मात्र ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगलेच रमले आहेत. कलेला बहरायला कोणत्याच शिक्क्याची गरज नसते हेच यावरून सिद्ध होते.