आपली मायबोली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, की त्यात २५ हजाराहून अधिक शब्द आहेत. परिणामी त्यांचे अनेक शब्दसमूह होऊ शकतात, व्याकरणाच्या दृष्टीने जसे, नाम, सर्वनाम, विशेषनाम, विशेषण, क्रियापद वा अन्य कारणांनी रूढ आहेत. याच अनुषंगाने थोडय़ा अधिक निरीक्षणानंतर लक्षात आलेले त्यातील काही विशेष व क्वचितच नोंद झालेले काही खालील शब्दसमूह आढळले, ते मराठी भाषेचा एक वेगळा आनंद देऊ शकतात- ते विशेष लक्षवेधी शब्दगट खालीलप्रमाणे-
१) उलटसुलट सुलटउलट केले तरी तोच शब्द-
सरस, कणीक, कनक, कडक, वाहवा, सकस, सर्कस, नयन, नमन, वानवा, नेमाने, जलज, डालडा, रबर,
२) एकाक्षरी- एकाच अक्षराचे अनेक अक्षरी शब्द –
तंतोतंत, व्यत्यय, द्वंद्व, बाब, बाबा, बांबू, बेंबी, बोंब, काका, काकू, मामा, मामी, नाना, पाप, पापी, शशी, बोंबाबोंब, वाव, चोच, पोप, गार्गी
३) अदलाबदल- मुळाक्षरांची अदलाबदल करून निराळ्या अर्थाचा शब्द –
कसरत-सरकत, नासिक-किसान, रातोरात-तरातरा, टपोरा-परीट, बगळा-गबाळा,
चटकन-टचकन, विडा-डावा, रडका-करडा, सत्र-त्रास, वर्ग-गर्व, टक्कर-टक्कर,
बिलकूल-किलबिल, खरखर वा खरोखर-रुखरुख, वेगळा-गाळीव, बेताल-तबेला,
वकील-लकवा, बोकड-बोडके-डबके, पकडा-कपडा, टपाल-लंपट, खाक-काख, रवा-वार, कपोल-पालक, गल्लोगल्ली-लगोलग, पाकीट-कपाट, निळा-नाळ, विहार-विरह, माळ-माळा-मळा
बटाटा-टाटोबा, किटकिट-टिकटिक, वासलात-सवलत, टोक-टाके-काटे-टीका-काट-कट
४) केवळ जोडाक्षरे – सर्व अक्षरे जोडाक्षरे असलेले शब्द
स्वस्त, स्वत्व प्राप्त, स्तुत्य, निम्न, न्याय्य, द्रव्य, द्वंद्व, तृप्त, व्रात्य, क्षुद्र, व्यस्त क्षम्य, स्वार्थ, स्वर्ग
५) लिंगबदल – एकाच शब्दाचे लिंग बदलून निराळा अर्थ
तो पूर (पाण्याचा लोंढा),
ते पूर (शहर);
तो हार (फुलांचा हार),
ती हार (पराजय);
तो बेल (बेलाचे पान),
ती बेल (घंटा);
तो कात (विडय़ाच्या पानातील),
ती कात (सापाची कात);
ते नाव (नाव),
ती नाव (होडी);
तो पाठ (धडा),
ती पाठ (शरीराचा भाग);
तो लय (क्षती, ऱ्हास);
ती लय (ताल);
तो नार (गाजरामधील देठ),
ती नार (स्त्री);
तो माळ (पठार),
ती माळ (मोत्यांची माळ);
तो हार (पुष्पमाला),
ती हार (पराजय);
तो वाणी (धान्यविक्रेता),
ती वाणी (बोली, भाषा);
ती पीक (कोकीळ),
ते पीक (शेतात उगवणारे);
तो माळी (बागवान),
ती माळी (झाडाची फांदी);
तो मुकुल (कळी),
ते मुकुल (कमळ);
तो रवी (सूर्य),
ती रवी (घुसळण्याचे साधन);
तो सूट (जोडी),
ती सूट (सवलत);
तो राऊळ (राजा),
ते राऊळ (देऊळ)
अशा प्रकारे नवीन शब्द अशा प्रकारांत किंवा असे वेगळे शब्दसमूह शोधून मराठी भाषा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हाच या खटाटोपामागील उद्देश!