01vbस्प्राउट्स ग्रील्ड सँडविच

साहित्य :
६ ब्रेड स्लाईस
१ वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, हरभरे, वाटाणे इत्यादी.)
१/२ चमचा चाट मसाला
१/४ चमचा काळे मीठ
१/२ चमचा लाल तिखट
lp27पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
कांद्याच्या चकत्या ३ ते ४
उकडून सोललेल्या बटाटय़ाच्या चकत्या ३ ते ४
कोथिंबीर मिरची पुदिना चटणी
बटर
चवीपुरते मीठ

कृती :
१) कडधान्ये व्यवस्थित वाफवून घ्यावीत. गरम असतानाच ठेचून घ्यावीत.
२) त्यात चाट मसाला, काळे मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालावे.
३) ब्रेडला बटर आणि चटणी लावावी. त्यावर कडधान्याचे मिश्रण लावावे. वरून बटाटा आणि कांद्याच्या चकत्या ठेवून त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस लावून सँडविच बनवावे.
४) टोस्टरमध्ये ठेवून दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईस्तोवर टोस्ट करावे. गरमागरम सँडविच टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणीबरोबर खावे.

lp26मूग-मटकी सलाड

साहित्य
१/२ वाटी वाफवलेली मटकी
१/२ वाटी वाफवलेले मूग
१/२ मध्यम कांदा, चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, बिया काढून चिरावा
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
१ चमचा लिंबूरस
१/२ चमचा चाट मसाला
चवीपुरते मीठ
२ चमचे चिरलेली कोथिंबीर
१ पाती कांद्याची काडी

सजावटीसाठी :
१ लहान गाजर

कृती :
१) मूग आणि मटकी कोरडी राहील अशीच वाफवावी. पूर्ण शिजलेली पण अख्खी राहिली पाहिजे. त्यासाठी भिजलेली मूग-मटकी पाण्यात एकदा उपसून कुकरच्या आतल्या डब्यात घालावी. मीठ घालावे. आणि अगदी थोडा पाण्याचा हबका मारावा. कुकरच्या ३ शिट्टय़ा कराव्यात.
२) वाफवलेली मूग-मटकी, चिरलेला कांदा, थोडा पाती कांदा, चिरलेला टोमॅटो, मिरची मिक्स करून एका बोलमध्ये ठेवावे.
३) एका वाटीत लिंबूरस, थोडे मीठ, चाट मसाला मिक्स करून ठेवावे. हे मिश्रण सलाड सव्‍‌र्ह करायच्या आधी त्यात मिक्स करावे. कोथिंबीर, बारीक केलेले गाजर आणि पाती कांदा याने सजवावे. यावर चवीसाठी थोडी फ्रेश मिरपूड घालावी.

lp28कडधान्याचे कटलेट

साहित्य :
२ वाटय़ा मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, हरभरे, वाटाणा इत्यादी.)
१ लहान बीट
१ मध्यम बटाटा
१ लहान कांदा बारीक चिरून
१ इंच आले
२-४ लसूण पाकळ्या
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा धणेपूड
१/४ चमचा चाट मसाला
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१/२ वाटी बारीक रवा,
तेल.

कृती :
१) कडधान्ये वाफवून घ्यावीत. बटाटा आणि बीट उकडून सोलून घ्यावे. बटाटा कुस्करून घ्यावा. बीट बारीक किसणीवर किसून घ्यावे.
२) वाफवलेली कडधान्ये गरम असतानाच चेचून घ्यावीत. त्यात किसलेले आले-लसूण, चिरलेला कांदा, कुस्करलेला बटाटा, धनेजीरेपूड, चाट मसाला, वाटलेल्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे.
३) मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून कटलेट बनवावे. बाहेरून रवा लावून तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस होईस्तोवर शालो फ्राय करावे.
४) तयार कटलेट चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर सव्‍‌र्ह करावे.
टीप :
१) कडधान्ये वाफवताना कमी पाण्यात वाफवावी. जास्त पाणी झाले तर मिश्रण घट्ट होणार नाही.
२) जर मिश्रण सैल झाले तर ब्रेड क्रम्ब्ज घालून घट्टपणा आणावा.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com