आजकाल हृदयविकाराला जोडूनच येणारा शब्द म्हणजे अॅन्जिओग्राफी. मुळात ती का करतात, नेमकी कशी करतात आणि ती केल्यामुळे काय उपयोग होतो हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.

कोरोनरी अॅन्जिओग्राफी ही हृदयविकाराच्या आजाराचे निदान करणारी सर्वोत्तम तपासणी आहे. पुढील सर्व उपाययोजना आणि उपाययोजनेला हृदयाचा प्रतिसाद या एका तपासणीने सहजपणे कळतो.
इतिहासाच्या पानांमध्ये डोकावता असे दिसते, या कोरोनरी अॅन्जिओग्राफीची सुरुवातपण फार खडतर प्रवासाने झाली आहे.
१९२९ साली ऐबर्सवाल्ड, जर्मनी येथे वेरनर फोर्समन या २५ वर्षांच्या सर्जरीच्या डॉक्टरने युरिनरी कॅथेटर स्वत:च्या हाताच्या नसेतून हृदयाच्या उजव्या कप्प्यापर्यंत ठेवून मग एक्सरे (क्ष-किरण) डिपार्टमेंटमध्ये जाऊन स्वत:च्या हृदयाचा छातीचा एक्सरे काढला. कार्डियाक कॅथेटरायझेशनचा तो जिवंत माणसावर केलला पहिला प्रयोग..!
१९३० साली अशाच कॅथेटरमधून हृदयाच्या कप्प्यांमध्ये रंगद्रव्ये टाकून त्या कप्प्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण १९३० ते १९४० काळ खूप समस्यांचा गेला. नंतर १९४० साली ए. कुर्नाड, एच. रेंजस आणि डी. रिचर्डस् या त्रयीने वेगवेगळे कॅथेटर्स निर्माण केलेत, जेणेकरून कोरोनरी अॅन्जिओग्राफी सहजतेने केली जाईल.
पुढे मॅसॉन सोन्स (१९५८) आणि एम. जडकिंगस् (१९६७) यांनी या कॅथेटरमध्ये लक्षणीय सुधारणा करून व्यवस्थित आकार असलेल्या, निश्चितपणे डाव्या आणि उजव्या हृदय-रक्तवाहिन्यांत जाईल अशा वेगवेगळ्या नळ्यांची उत्पत्ती केली.
(१९६७-१९६८) अॅम्प्लाटस् यांनी काही विशिष्ट रुग्णांमध्ये ज्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची जागा थोडीबहुत बदलेली असते.. (Abnormal Origin) अशा विचित्र रक्तवाहिन्यांचे चलचित्र काढण्यासाठी वेगळ्या कॅथेटर्सची उत्पत्ती केली. त्यांना ‘अॅम्प्लाटस् कॅथेटर’ म्हणतात. २-५ टक्के रुग्णांमध्ये या कॅथेटर्सचा वापर होतो. यांच्या या योगदानामुळे १९५६ साली फोर्समन, कुर्नाड आणि रिचर्डस् यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
नोबेल पारितोषिक स्वीकारताना कुर्नाड यांनी म्हटले की, कोरोनरी अॅन्जिओग्राफी ही एक चावीसारखी तपासणी आहे, ज्याने हृदयाची सर्व रहस्ये उघडता येतात.
‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी व कार्डियाक कॅथेटरायझेशन’ या अशा तपासण्या आहेत की, ज्यांनी हृदयविकारचे निदान होते.. पुढची उपाययोजना काय करायची याची माहिती मिळते आणि त्याच्याच मार्फत उपाययोजनेला हृदय कसे प्रतिसाद देत आहे याचेसुद्धा अवलोकन केले जाते.

Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

कोरोनरी अॅन्जिओग्राफी
हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी बऱ्याच तपासण्या उपलब्ध असून त्यात १०० टक्के निदान करणारी आणि पुढील उपचाराची दिशा ठरवणारी एकमेव तपासणी आहे..

कोरोनरी अॅन्जिओग्राफी..!!!
ही तपासणी अद्ययावत रुग्णालयात कॅथ लॅब (कॅथेटरायझेशन लॅबोरेटरी) या विशेष कक्षामध्ये केली जाते. ही लॅब आयसीसीयूसारखीच अत्यावश्यक आणि जीवनावश्यक अशा यंत्रांनी सुसज्ज असते. क्ष-किरण यंत्राचा वापर करून विशिष्ट मॉनिटर्स आणि कॅमेराद्वारे रुग्णाच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे चित्रीकरण केले जाते.
मांडीचा किंवा मनगटाचा भाग र्निजतुक करून रुग्णाला टेबलवर झोपवल्यानंतर र्निजतुक टॉवेल्स विशिष्ट भागांवर पांघरले जातात. मांडीची जागा (किंवा मनगटाची जागा) एका छोटय़ाशा सुईने बधिर करतात. मग पायाच्या आर्टरीमधून (फिमोरल आर्टरी) एक छोटीशी पण हातभर लांब (१.५ ते २ मि.मी. आकाराची व्यासाची) नळी (कॅथेटर-Catheter) हृदयाच्या रक्तवाहिन्याच्या तोंडाशी प्रस्थापित करतात. त्यातून मग रंगद्रव्य (Dye) टाकून हृदयाच्या रक्तवाहिन्या (Dye) डायने भरून टाकण्यात येतात. त्याचे चित्रीकरण करण्यात येते. प्रत्येक ठोक्यासोबत तो रंगद्रव्य (डाय) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून निघून रक्ताभिसरणात मिसळून जातो. असे ६-७ वेळा वेगवेगळ्या कोनांतून हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे रंगद्रव्य (डाय) टाकून चित्रीकरण केले जाते. उजव्या आणि डाव्या रक्तवाहिन्यांसाठी वेगवेगळे कॅथेटर वापरले जातात आणि वेगवेगळ्या कोनांतून हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे चित्रीकरण करण्यात येते.
ही एकदम सुरक्षित, सोपी अशी तपासणी असून पाच ते दहा मिनिटांत पूर्ण केली जाते. पूर्ण वेळ रुग्ण हा जागा असून फक्त लोकल अॅनेस्थेशियाच्या खाली केली जाते. तपासणीच्या वेळी रुग्णाशी डॉक्टर संवाद साधत असतो. मॉनिटरवर रुग्णाचे रक्तदाब, हृदयाचे ठोके.. ऑक्सिजनचे रक्तातील प्रमाण सतत दर्शविले जात असते.
तपासणी संपल्यानंतर मांडीतील (किंवा मनगटातील) नळी काढून टाकली जाते. आणि तेथे ५ ते १० मिनिटे दाब देऊन तेथील रक्तस्राव थांबवला जातो. तेथे र्निजतुक औषध लावून दाबपट्टी लावतात. मग तो पाय ५ तास न हलवता रुग्णाला आराम करायला लावतात. अध्र्या तासानंतर रुग्णास चहा, बिस्किट किंवा जेवण देण्यात येते. भरपूर पाणी पिण्यास सांगितले जाते जेणकरून जास्त पाण्यामुळे वापरलेला रंगद्रव्य (Dye) लघवीवाटे शरीराबाहेर लवकर पडण्यास मदत होते. ५-६ तासांनी पट्टी बदलली जाते आणि रुग्णाला चालवून बघितले जाते, मग रुग्णालयातून सुट्टी देण्यात येते.

कोणत्या रुग्णाची अॅन्जिओग्राफी करतात?
१) स्थिर स्वरूपाचा हृदयविकार : (Chronic Stable Angina) चालल्यानंतर छातीत दुखणे, औषधोपचार चालू असतानाही छातीत दुखणे.. दम लागणे, इको तपासणीमध्ये हृदयाची कार्यक्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी असणे, स्ट्रेस टेस्टमध्ये हृदयविकाराची शक्यता दर्शवणे यावरील परिस्थितीत अॅन्जिओग्राफी करणे आवश्यक आहे.
२) अस्थिर स्वरूपाचा हृदयविकार : (Unstable Angina and Heart Attack) छातीत खूप दुखणे. औषधोपचार पूर्ण मात्रेत करूनसुद्धा दुखत राहणे, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे, हृदयाचे ठोके अनियमित पडणे, रक्तदाब कमी होणे, हृदयाच्या स्नायूंना इजा झाली आहे असे दाखवणारे रक्तातील घटकांचे प्रमाण वाढले असता.. अॅन्जिओग्राफी अत्यावश्यक असते.
हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रत्येक रुग्णाची अॅन्जिओग्राफी करणे महत्त्वाचे आहे. उपचाराचा फायदा झाला की नाही.. रक्तवाहिन्यांमध्ये किती अडथळा आहे, त्यावर उपाय काय? अॅन्जिओप्लास्टी की बायपास सर्जरी करावी लागेल याची सर्व उत्तरे अॅन्जिओग्राफीच्या मार्फतच मिळणार. हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णाच्या नाडीची गती अनियमित असेल, रक्तदाब कमी असेल, पम्पिंग खूप कमी असेल, पडदा फाटला असेल किंवा झडपेमुळे गळती निर्माण झाल्यास लवकरात लवकर अॅन्जिओग्राफी करणे आवश्यक असते.
३) ज्या रुग्णामध्ये हृदयविकाराची शक्यता जास्त आहे (Very high risk patient) आणि तपासण्यांमध्ये पूर्णपणे निदान झाले नाही त्याची अॅन्जिओग्राफी केली जाते.

अॅन्जिओग्राफी : कोणता मार्ग स्वीकारावा?
अॅन्जिओग्राफी कोणत्या मार्गाने करावी, याबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होते. अन्जिओग्राफीचे दोन मार्ग आहे. जेव्हा कॅथेटर हे मांडीमधून फिमोरल धमनी (Femoral Artery) हृदयाकडे टाकतात त्याला फिमोरल मार्ग असे म्हणतात. मनगटाच्या (Radial Artery) ‘रेडिअल धमनी’ मधून कॅथेटर हृदयाकडे टाकतात. त्याला रेडिअल मार्ग असे म्हणतात.

फिमोरल मार्ग :
हा सर्वसामान्य मार्ग आहे. फिमोरल आर्टरीचा आकार हा ६ ते ८ मि.मी. एवढा असल्यामुळे कॅथेटर सहजपणे आत-बाहेर करू शकते. या मार्गाची वेगवेगळी कॅथेटर उपलब्ध आहेत. जगात ७५ ते ८० टक्के लोक याच मार्गाचा अवलंब करतात.
लठ्ठ लोकांमध्ये छोटे-मोठे रक्तस्राव होणे, आर्टरी लवकर न मिळणे यांसारख्या समस्या फिमोरल मार्गामध्ये आढळून येतात. अन्जिओग्राफीनंतर ५ ते ६ तास पाय न हलवता झोपून राहणे अत्यावश्यक असते.
रेडिअल मार्ग :
२० ते २५ टक्के हृदयरोगतज्ज्ञ या मार्गाचा वापर करतात. यामध्ये मोठा फायदा असा असतो की, रुग्ण अॅन्जिओग्राफी झाल्याबरोबर चालू शकतो आणि रक्तस्रावाचे प्रमाणसुद्धा कमी असते.
पण रेडिअल आर्टरीचा आकार ३ ते ४ मि.मी. एवढा असतो, म्हणून कॅथेटर आतबाहेर करताना आर्टरी आकुंचन पावते. (Radial spasm) त्यामुळे हातात वेदना होऊ शकतात.
कॅथेटर्सचे वेगवेगळे आकार आणि प्रकाराची उपलब्धता कमी आहे. छोटय़ा नसेतून कॅथेटर टाकणे आणि हाताच्या व मानेच्या रक्तवाहिन्यांच्या वेगवेगळ्या वळणांतून हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या तोंडाजवळ कॅथेटर योग्य तऱ्हेने बसवणे यासाठी थोडे वेगळे प्रशिक्षण आणि अनुभव लागतो. ५ ते ८ टक्के लोकांमध्ये रेडिअल मार्गाचा अवलंब यशस्वी होत नाही मग अशा वेळी पुन्हा फिमोरल मार्गातूनच अॅन्जिओग्राफी करावी लागते.
कोणता मार्ग वापरायचा.. याचा निर्णय तुमच्या हृदयरोगतज्ज्ञालाच घेऊ द्या.

अॅन्जिओग्राफी : किती सुरक्षित? किती गुंतागुंत?
आजकाल अॅन्जिओग्राफी ही अत्यंत सुरक्षित अशी तपासणी आहे. गुंतागुंत होण्याची शक्यता अगदीच कमी असते.
कधी कधी एक टक्के लोकांना रंगद्रव्याची अॅलर्जी होऊन शरीरावर पुरळ येऊ शकते. कॅथेटर ज्या मार्गातून टाकतात त्या मार्गातून कधी कधी रक्तस्राव होऊ शकतो, पण तो थोडा जास्त वेळ दाब दिला की थांबतो.
या सर्व गुंतागुंतीचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. म्हणून अॅन्जिओग्राफी ही अत्यंत निधरेक शास्त्रोक्त तपासणी आहे. तज्ज्ञ डॉक्टरकडून करून घेतल्यास ही अत्यंत सुरक्षित, सरळ-सोपी तपासणी आहे.
कार्डियाक कॅथेटरायझेशन : (Cardiac Catheterization) : विविध प्रकारचे कॅथेटर्स.. नळ्या वापरून हृदयातील कप्पे, झडपा, विविध भोके, झडपांतील गळती यांचे निदान करता येते. या तपासणीला ‘कार्डियाक कॅथेटरायझेशनन’ असे म्हणतात.
डाव्या कप्प्याची तपासणी : (Left Ventriculography) (LV Shoot)
या तपासणीमध्ये नळी (कॅथेटर) हे डाव्या जवनिकेत ठेवून थोडय़ा वेगाने आणि दाबाने २० ते २५ मि.लि. रंगद्रव्य टाकतात आणि त्याचे चित्रीकरण करतात. या तपासणीमध्ये जवनिकेचे आकारमान.. कार्यक्षमता.. पम्पिंग क्षमता.. जवनिकेला हृदयविकाराच्या झटक्याने झालेली इजा.. पडद्यामधील भोके किंवा द्विदल झडपेमधील गळती.. या सर्व बाबीची इत्थंभूत माहिती मिळते.
अॅन्जिओग्राफी आणि कार्डियाक कॅथेटरायझेशन ही हृदयविकाराचे निदान करणारी मुख्य तपासणी आहे आणि पुढील उपाययोजनांची ही पहिली पायरी आहे. पुढील संपूर्ण उपचार या तपासण्यांवर अवलंबून असतात.