अधिकाधिक सुखसोयी पुरवल्या की मुलांचं जीवन समृद्ध होईल, असा समज बाळगणारे ‘मॉम-डॅड’ आजकाल समाजात दृष्टीस पडतात. आपण ज्याला बालपणी वंचित झालो, ते ते मुलांना मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असतो. श्रीमंतांच्या मुलांना मिळणाऱ्या सुखसोयी आपल्याही मुलांना काही प्रमाणात तरी मिळाव्यात यासाठी मध्यमवर्गीय आई-बाबांचीही धडपड असते. आर्थिक समतोलता नसलेली मुलं शाळेमध्ये एकमेकांच्या सहवासात येतात. इथे बडय़ा बापाच्या बेटय़ांचा बडेजाव आणि मध्यमवर्गीय मुलांचा आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल असलेला उणा-भाव यामध्ये अदृश्य रूपांत मानसिक संघर्ष चालू असतो. जेमतेम परिस्थिती असलेल्या मुलांची अधाशी नजर, धनिक मुलांच्या माज-मुजोरीला अधिकच तेज बनवते. ही मुलं शाळेत आपल्या श्रीमंतीचा दिमाख दाखवतात. इतरांच्या भुकेल्या नजरा चाळवण्यात त्यांना एक प्रकारचा वेगळा आनंद मिळतो. धनाढय़ पालकांनाही आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त सुखसुविधा देऊन ऐषारामात लोळवण्यात धन्यता वाटते आणि तसंही या मुलांच्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या ‘स्टेट्स’चं प्रदर्शन करण्याचाच त्यांचा हेतू असतो. मुलांच्या हाती सोपवलेल्या पैशांचा त्यांनी दुरुपयोग केल्यास आपली आर्थिक संपन्नताच कदाचित मुलांना मानसिक विफलतेकडे नेऊ शकेल याचा पुसटसा अंदाजही पैशाची धुंदी चढलेल्या या धनिकांना येत नाही. इथेच मुलांच्या जडणघडणीच्या काळामध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ‘माजा’चं बीज रुजलं जाण्याची शक्यता असते. बडे उद्योगपती, मंत्री, राजकारणी यांचे कुलदीपक या माजामुळेच काय दिवे लावतात, बापाच्या मोठेपणावर कसली थेरं, भानगडी करून बसतात याची कित्येक उदाहरणं आपण पाहतो. पिताश्रींचे हात वपर्यंत पोचलेले असल्यामुळे युवराज अवैध कामं करण्यास मोकाट सुटलेला असतो. पिताश्रींमुळे कायद्याच्या कचाटय़ातून सुटका होऊन, शिक्षेपासूनही त्याचा बचाव होतो. आपल्या पुत्राचा ‘ऐसा व्हावा गुंडा’चा आलेला धक्कादायक प्रत्यय आपल्याच संस्कारांचं फलित आहे, या अनुभवाच्या पश्चात पालक पश्चात्तापांत होरपळून निघतात. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 

ही सारी पाश्र्वभूमी लिहिण्याचं कारण हेच की, या अशा वैभवधुंद, अविचारी मातांना छेद देणाऱ्या एका आगळय़ा विचारांच्या मातेशी माझा परिचय झाला. मला तिचं साश्चर्य-कौतुक वाटलं. तिचा आदर्श इतरही आजच्या आयांनी घेऊन उगवत्या पिढीला चंगळवादापासून दूर ठेवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करावा असं वाटलं.
गोव्यातून मुंबईला लेकीकडे मुक्कामाला आले होते. त्यांच्याच सोसायटीतले हे कुटुंब आहे. तिचे सासरे एम.पी. (Member of Parliament) नवरा एम.एल.ए. पदरी दोन मुलं. मोठा मुलगा आठ वर्षांचा. घरांत बडय़ा बडय़ा प्रस्थांची ऊठबस, आपापली कामं घेऊन येणाऱ्या जनताजनार्दनाची वर्दळ, वेळी-अवेळी टपकणारं मित्रमंडळ, खुशमस्कऱ्यांची बुरावळ, नोकर-चाकर, ड्रायव्हर्स अशा सर्व स्तरांतील माणसांची रेलचेल हे आलंच! आमदार वैभवाच्या शिखराच्या कितीही उंचावर असले तरी त्यांचे पाय मात्र नेहमीच जमिनीवर असतात, तसेच त्यांच्या पत्नीचेही!
थोडक्यात हे सुसंस्कृत कुटुंब धनाने, मानाने, प्रतिष्ठेने, इभ्रतीने मोठं असूनही ‘डाऊन टू अर्थ’ असण्याचा दुर्मीळपणा लाभलेलं हे विशेष. सासरा-नवऱ्याच्या सरकारी हुद्दय़ानुसार बदलत्या काळाच्या प्रवाहानुसार घरात एकदा का ‘हाय-फायनेस’चं वारं वाहू दिलं तर, मुलांना कुठच्या कुठे ते भिरकावत नेईल, ही दूरदृष्टी ठेवून तिने घरातलं वातावरण, वर्तन मध्यम दर्जाचं ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या श्रीमंतीला साधेपणाची झालर लावली होती. वाढत्या वयाबरोबर चिरंजीवाच्या अकलेचा कांदा नासू नये, डोक्यात श्रीमंतीची हवा जाऊ नये यासाठी तिने घरातील सर्वावर, नातेवाईकांवर वगैरे फक्त आणि फक्त त्यांच्या वाढदिवसाखेरीज इतर कोणत्याही दिवशी परगावाहून किंवा परदेशातूनसुद्धा येताना गिफ्टस् आणायची अक्षरश: बंदी घातली. एवढी खबरदारी आपल्या परीनं आईनं घेतली असली तरीही, चिरंजीवाच्या वाढत्या वयाबरोबर त्याच्या नजरेला झालेल्या मोठेपणाच्या जाणिवा कशा पुसता आल्या असत्या? आजोबा वडिलांचं ‘मोठं’ असण्याची जाणीव त्याला होत होती. कारण, सगळे जण त्यांच्याकडे कसं मानाने, अदबीने वागतात, सशस्त्र अंगरक्षक आजोबांच्या पाठून कसे फिरत असतात, नोटांची बंडलं कशी पडलेली असतात, मुजरे, सलाम, राम-राम हे सगळं घरातील चित्र पाहून त्याच्या वर्तनात झालेला फरक आईच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही. आपल्या आणि वर्गमित्राच्या घरच्या वातावरणातला फरक त्याला कळू लागला. त्यांच्याबरोबरचं त्यांचं वागणं बदलत असल्याचं तिच्या लक्षात आलं. एकदा तर त्यांच्याबरोबरचा त्याचा संवाद तिने ऐकला आणि त्याला ‘ग’ची बाधा होईल की काय या विचाराने ती बेचैन झाली. या श्रीमंती बडेजावाचा दृष्टिस्पर्शही न होणं हे तर अपरिहार्यच होतं आणि हे सारं नीट समजावण्याचं त्याचं वयही नव्हतं. तरीही त्याचं मानसिक पोषण याच वयापासून गर्वविरहित आणि नम्रतेच्या भावनांनी उत्तम विचार पेरून व्हायला हवं हे प्रकर्षांने तिला जाणवलं. त्याच्या डोळय़ांवर आलेली धुंदी त्याच्या डोक्यात चढू देऊ नये यासाठी आताच खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं तिने स्वत:ला बजावलं.
दुसऱ्या दिवशी चिरंजीव शाळेमधून आल्या आल्या त्याचं चहा-पाणी आवरून ती त्याला आपल्या रूममध्ये घेऊन गेली. त्याला समजेल अशा शब्दांत म्हणाली, ‘बाळा, काल तुझ्या मित्रांबरोबर झालेले संवाद मी ऐकत होते. तुझे खेळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांना दाखवताना तुला खूप ग्रेट असल्याचा फील येत होता. हो ना? खरं सांग, तुझा तो ऐवज पाहताना आपल्याकडे मात्र या वस्तू नाहीत याची एक प्रकारची खंत काहींच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होती. हे बघ, तू त्यांना जे काही दाखवतोयस, ते तुझ्या बाबांनी खूप मेहनतीच्या कमाईतून आणलेलं आहे. माणसाला त्याने घेतलेल्या कष्टानुसार त्याला मिळत असतं आणि तेच त्याचं असतं. सत्ता असली की आपोआप नाव मिळतं, लक्ष्मी येते. तिचा दुरुपयोग तुझ्या बाबांनी कधीच केला नाही. परंतु सत्ता कायम आज आहे तर उद्या नसेलही. तू बघतोस ना, ते जनतेची कामं करण्यात किती व्यस्त असतात ते. वेळेवर धड अन्न पोटात टाकायला त्यांना फुरसत नसते. दौऱ्यावरून थकून-भागून घरी येणं, निश्चिंत झोप न मिळणं हे आरोग्यासाठी किती घातक आहे? आपल्या कुटुंबाला थोडा वेळ द्यावा, असं त्यांना वाटत नसेल का? वाटतं. पण या व्यापात ते कौटुंबिक सुखही मिळवू शकत नाहीत रे! हे पाहा, हा सारा पैसा, मान, प्रतिष्ठा फुकटच नाही मिळालेलं. त्यांनी दिलेल्या योगदानाचा हा मोबदला आहे. त्यांच्यामुळे आपण हे सुख उपभोगतोय. म्हणून काही त्यांच्या नावावर आपण मोठं होता कामा नये राजा! आता तू लहान आहेस. तूही शिकून मोठा होशील, कमवशील तेव्हा ते फक्त तुझं स्वत:चं असेल. बाबांच्या मोठेपणावर आपण का म्हणून मोठेपणा मिरवायचा? होय की नाही? मी हे तुला सगळं का सांगतोय तर, अलीकडे तू तुझ्या मित्रांसमोर जो काही रुबाब दाखवू लागलायस ना, ते ठीक नाही बाळा. बाबांच्या मोठेपणावर तू मोठा झालेला मला नाही आवडणार. समजतंय ना तुला, मी काय म्हणतेय ते?’
चिरंजीव निरागस चेहऱ्याने डोळे विस्फारून आईचे बोल लक्षपूर्वक ऐकत होता. आजची मुलं वयाच्या मानाने खूपच स्मार्ट असतात. त्याला आईच्या सांगण्याचा नेमका अर्थबोध झाला होता. कारण, त्यानंतर मित्रांकडे बढाया मारणारा युवराज आईला पुन्हा कधीच दिसला नाही. आपण योग्य वेळी ‘माज’विरोधी टोचलेली उपदेशाची लस त्याला लागू पडल्याची खात्री त्या आईला पटली आणि ती निश्चिंत झाली.
मीरा प्रभुवेर्लेकर