क्रिकेटवेडय़ांच्या देशात बॅडमिंटन क्षेत्रात एकापेक्षा एक सरस कामगिरी करणाऱ्या सायनाभोवती तेजोवलय तयार झालं असलं तरी तिचे पाय अजूनदेखील जमिनीवर आहेत. म्हणूनच अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ऑलिम्पिकचं स्वप्न तिला पुरं करायचं आहे.

आपल्या देशात एखाद्या खेळाडूने जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतरच त्या खेळात करिअर करण्यासाठी नवोदित खेळाडू व त्यांच्या पालकांना प्रोत्साहन मिळते. सायना नेहवाल हिने बॅडमिंटन क्षेत्रात तेजोवलय निर्माण केल्यानंतर तिला आदर्शस्थानी ठेवत शेकडो मुला-मुलींमध्ये आपणही सायनासारखे यश मिळवावे अशी प्रेरणा निर्माण झाली. सायनाने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेत इतिहास घडविला. हे स्थान अल्पकाळ ठरले असले तरीही तिने आजपर्यंत केलेल्या कामगिरीची तुलना होणे अशक्य आहे.
सायनाने या क्षेत्रात केलेल्या कामगिरीपूर्वी बॅडमिंटनमध्ये प्रकाश पदुकोण, विमलकुमार, पुल्लेला गोपीचंद आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भरघोस यश मिळविले. पदुकोण व गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धाजिंकण्याची किमया केली. मात्र या क्षेत्रातही करिअर करता येते हे सायनाने दाखवून दिले आहे. केवळ बॅडमिंटन नव्हे तर अन्य खेळांमध्येही भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशातील खेळाडूंनाही तिच्या कामगिरीने मोहीत केले आहे. आपल्या मुला-मुलींनी सायनासारखे जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचवावे हा आत्मविश्वासही पालकांमध्ये निर्माण झाला आहे. जागतिक क्रमवारीत अग्रमानांकन मिळविणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
सायना नेहवाल हिला ऑलिम्पिक स्पर्धेत नशिबामुळेच कांस्यपदक मिळाले अशी टीका तिच्यावर झाली. तिची कारकीर्द संपली आहे अशाही टीकेस तिला सामोरे जावे लागले. मात्र सायना हिने गेली तीन वर्षे अफाट कष्ट घेत अनेक अव्वल दर्जाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत व आपल्याकडे ऑलिम्पिक पदक मिळविण्याची अजूनही क्षमता आहे हे दाखवून दिले आहे. या कालावधीत तिने आपले प्रशिक्षक बदलले. हैदराबाद येथे गोपीचंद यांच्याऐवजी बंगळुरू येथे विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. अनेकांसाठी तिचा हा निर्णय अनपेक्षित होता. मात्र काही वेळा भविष्याचा विचार करता असे निर्णय घेणे अनिवार्य असतात. घरापासून थोडेसे दूर राहताना खेळाडूंना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. तथापि काटय़ावाचून गुलाब नसतो तद्वत ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवायचे असेल तर असे कष्ट आवश्यक असतात. बॉक्िंसगमधील भारताची सुपरमॉम मेरी कोम हिला डोळ्यांसमोर ठेवतच सायना सराव करीत असते. मेरी कोम हिने ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी दोन जुळ्या मुलांपासून दोन दोन वर्षे हजारो मैल लांब राहून सराव केला. आपणही तसाच सराव केला पाहिजे असेच सायनास वाटत असते व त्याप्रमाणे ती आचरणात आणते.
बीिजग ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या उंबरठय़ावरून परतल्यानंतर सायनाची काय मानसिक अवस्था झाली असेल याची सर्वसामान्यांना कल्पना येणे शक्य नाही. मात्र या पराभवामुळे ती डगमगली नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये सायनाने अनेक स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले आहे. ऑल इंग्लंड स्पर्धेच्या विजेतेपदापर्यंत ती पोहोचली होती. मात्र अंतिम फेरीत पहिला गेम जिंकल्यानंतर तिला स्पेनच्या कॅरोलीन मरीन हिच्याविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या खेळाडूंचे प्राबल्य आहे. सायनाच्या भाषेत सांगायचे झाल्यास जागतिक स्तरावर तिला एकाच वेळी चीनच्या किमान सात- आठ खेळाडूंचे मोठे आव्हान असते. चीनच्या खेळाडूंपुढे एकाच सायनाचे आव्हान असते. चीनचे खेळाडू जर एकाग्रतेने केलेला सराव व एकनिष्ठता याच्या जोरावर जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करू शकतात तर आपल्यालाही मेहनतीच्या जोरावर सर्वोच्च यश मिळविणे शक्य आहे हे सायनाने ओळखले. सायनाही एकाग्रतेने सराव करण्याबाबत ख्यातनाम आहे. सराव सत्रास दांडी मारणे हे तिच्या शब्दकोशातच नाही. सराव करतानाही आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमात शॉर्टकट न करता ती सतत सरावावर लक्ष केंद्रित करीत असते. कठीण वर्कआऊट असले तरी त्याबाबत तक्रार न करता त्याचा पाठपुरावा करण्यावरच तिने भर दिला आहे.
आपली बॅडमिंटन कारकीर्द घडविण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी केलेला त्याग डोळ्यांसमोर ठेवीत त्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे याची जाणीव तिला आहे. त्यामुळेच कधीही तिने मेजवान्या किंवा चैनीच्या सवयींना जवळ केले नाही. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ती मेजवान्यांमध्ये येत नाही म्हणून तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला सतत टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र बोलणाऱ्याचे तोंड दुखेल या रीतीने या टीकेकडे तिने दुर्लक्षच केले व आपली कारकीर्द समृद्ध केली.
कोणताही अव्वल दर्जाचा खेळाडू अल्पसंतुष्ट नसतो. एक स्पर्धा जिंकल्यानंतर आता पुढची कोणती स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे याचा तो विचार करीत असतो. सायनादेखील त्यांच्याप्रमाणेच अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे विजेतेपद कसे मिळविता येईल याचाच विचार करीत असते. त्याकरिता आपल्याला कितीही कठोर मेहनत घ्यावी लागली तरी चालेल पण आपण हे यश मिळविणारच हाच ध्यास तिच्यासमोर असतो. आपल्या देशात अनेक खेळाडू आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये पदक मिळविल्यानंतर जणूकाही आपण जगज्जेतेपद मिळविले असाच आव आणतात. सायना ही अशा खेळांडूमधील खेळाडू नाही. सतत पुढच्या स्पर्धाचाच ध्यास तिला असतो.
भारतात क्रिकेटखेरीज अन्य खेळांमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये सायनाचा क्रमांक अग्रस्थानी आहे. मात्र असे असूनही तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. अनेक खेळाडू विजेतेपद मिळविल्यानंतर बीभत्सपणे आनंद व्यक्त करतात. तिच्यापेक्षा कमी यश मिळविणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंनी आपल्या सर्वोच्च यशानंतर संबंधित संघटना किंवा शासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. सायना हिने राष्ट्रकुल विजेतेपद किंवा ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविल्यानंतर संघटना किंवा अन्य कोणावरही भरघोस पारितोषिके किंवा सवलतींबाबत संघटकांवर दडपण आणलेले नाही. मध्यंतरी पद्म सन्मानाबाबत तिच्यावरून टीका झाली होती. मात्र त्यामध्ये तिचा कोणताही दोष नव्हता. आपला अर्ज शासनाकडे पाठविण्यास बॅडमिंटन संघटकांकडून विलंब झाला आहे व हे सन्मानासाठीही खूप राजकारण चालत आहे हे तिला दाखवायचे होते. आपल्या देशातील अनेक खेळाडू मॉडेलिंग, सेलिब्रिटी शोज याकरिता जास्त वेळ देतात. सायनाने मॉडेलिंग किंवा सेलिब्रिटी शोजकरिता सरावाच्या वेळाबाबत कधीही तडजोड केलेली नाही. अनेक महिला खेळाडू कामगिरीपेक्षाही बॉयफ्रेंड किंवा फॅशन्स याबाबत जास्त चर्चेत असतात. सायना हिने याबाबत नेहमीच स्वत:ला दूर ठेवले आहे. आपला पोशाख, सवयी आदीबाबत आपल्यावर टीका होणार नाही याची काळजी ती सतत घेत असते. प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचना तत्परतेने आत्मसात करण्याबाबत ती ख्यातनाम आहे. कोणतेही प्रशिक्षक किंवा ज्येष्ठ खेळाडू हे आपल्या पितासमान आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले तरच आपल्याला अव्वल दर्जाचे यश मिळणार हे तिने ओळखले आहे. खेळातील आपल्या चुकांचा स्वीकार करीत त्या लगेचच दुरुस्त कशा होतील यावरच तिचा सरावात भर असतो. आत्मपरीक्षणासारखा उत्तम गुरू नाही असे नेहमी म्हटले जाते. सायना ही याच तत्त्वांचा पाठपुरावा करीत असते.
सायनाच्या अव्वल दर्जाइतकी महिला खेळाडू सध्या तरी भारतात नाही. साहजिकच अनेक वेळा तिला आपल्यापेक्षा कनिष्ठ खेळाडूंबरोबर किंवा पुरुष खेळाडूंबरोबर सराव करावा लागला आहे. मात्र त्यामध्ये तिला कमीपणा वाटत नाही. समोरचा खेळाडू तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतो व त्याच्याकडून आपल्याला बरेच काही शिकावयास मिळत असते हे तत्त्व डोळ्यांसमोर ठेवीतच ती सराव करते. प्रत्येक खेळाडूबद्दल आदराभाव व्यक्त करणे हे तिच्या नसानसांत भिनलेले आहे.
संयम, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावरच तिने आजपर्यंत सर्वोत्तम यश मिळविले आहे. शेवटच्या गुणापर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूला झुंज देण्याबाबत ती ख्यातनाम आहे. दडपणाखाली आपली कामगिरी खराब होणार नाही याबाबतही ती दक्ष असते. परिपूर्ण खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिच्या खेळात विविध फटक्यांची विविधता दिसून येत असते. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मागे शटल टाकण्याचा प्रयत्न ती करीत असते. स्मॅशिंग, प्लेसिंग, कॉर्नरजवळ शटल टाकणे, समांतर फटके मारणे आदी शैलीबाबत ती अव्वल दर्जाची खेळाडू मानली जाते. संयम व शांत वृत्ती ठेवली तर यश आपोआप मिळते हे ओळखूनच ती वागते. सायनाच्या आई-वडिलांनी तिची कारकीर्द होण्यासाठी अफाट कष्ट केले आहेत. अनेक गोष्टींचा त्याग त्यांनी केला आहे. असे पालक मिळणे हेदेखील भाग्य लागते. सुदैवाने तिच्या पालकांनी अनेक गोष्टींची जडजोड करीत तळहातावरील फोडाप्रमाणे तिला वाढविले आहे.
सायनास अनेक वेळा ती केव्हा निवृत्त होणार व कधी संसार थाटणार असेही प्रश्न विचारीत भंडावून सोडले जाते. मात्र याबाबत तिने कधीही वादग्रस्त विधाने केलेली नाहीत. आपण अजूनही ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी उत्सुक आहोत व ते पुन्हा मिळविल्याखेरीज अन्य कोणताही विषय आपल्या डोळ्यांसमोर नाही असेच ती सतत सांगत असते. आपला देश आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव तिला आहे. ती कोटय़वधी भारतीयांच्या हृदयातील ‘फुल’राणी आहे.

UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
Nifty hit a high of 22297 points eco news
निफ्टीची २२,२९७ अंशांची उच्चांकी दौड
loksatta analysis global recession created challenges for the it sector
विश्लेषण: आयटीतील घसघशीत पगाराला मंदीची कात्री?
provision for bio based products in interim budget
जैवउत्पादने हा संधींचा पेटारा