गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन्सची निवड ही त्यातील मूलभूत तांत्रिक सुविधा किती यापेक्षा सेल्फी किती चांगला काढता येतो, फोनची जाडी किती कमी आहे, बॉडी कशी आहे, दिसतो कसा, रंग कोणता या घटकांवरच अधिक होताना आढळते. हेच सूत्र नुकत्याच बाजारात आलेल्या सॅमसंगच्या चार नव्या मॉडलेबाबत दिसून येते. सॅमसंगची ही नवी मॉडेल्स म्हणजे त्यांच्या नव्या-जुन्या मॉडेल्सचे मिश्रण आहे. गॅलक्सी ए ५, ए ३ आणि इ ५ – इ ७ अशा सीरिजमध्ये सॅमसंगने लाँच केलेल्या या मॉडेल्सचा भर हा प्रामुख्याने उच्च किमतीच्या मोबाइलमधील काही वैशिष्टय़े कमी किमतीतील वर्गासाठी उपलब्ध करून देणे हा आहे.

नव्याने बाजारात दाखल होणाऱ्या इतर स्मार्टफोन्सना स्पर्धा करण्यासाठी शोधलेला पर्याय असंच म्हणावं लागेल. किमतीची स्पर्धा नसली तरी स्लिक मॉडेलचा मुद्दा मात्र कंपनीने उचललेला दिसतो. ६.७ ते ७.३ मिलिमीटर अशी स्लिक बॉडी असणारे ही मॉडेल्स १९ हजार ते २५ हजार या रेंजमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. हे करताना काही प्रमाणात उच्च तंत्रज्ञान, नवी वैशिष्टय़े आणि नवा पर्याय तोदेखील तंत्राच्या तुलनेनं कमी किमतीत, असे याचे स्वरूप म्हणावे लागेल.
सध्या जमाना सेल्फीचा आहे हे तर यामधून अगदीच ठळकपणे दिसून येते. १२० अंश इतका वाइड सेल्फी. पाम सेल्फी, अ‍ॅनिमेटेड जीआयएफ, ब्यूटी फेस फीचर्स अशा सुविधा ही महत्त्वाची वैशिष्टय़ं म्हणावी लागतील. अर्थात हे करताना काही नव्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत त्या म्हणजे वाढीव रॅम. दीड ते दोन जीबी अशी भरभक्कम रॅम ही फोनची कार्यप्रणाली सुरळीत चालण्यास मदतकारी ठरणारी आहे. ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे उच्च किमतीच्या रेंजमध्ये असणारी अ‍ॅडाप्टिव्ह डिस्प्ले सुविधा. गॅलक्सी मालिकेतील या सुविधा आता या कमी किमतीच्या गटात देण्याचा फंडा वापरला आहे. तरुणाईला आकर्षित करतानाच तुलनेने भरभक्कम पगार मिळविणाऱ्या नव्या घटकाला आकर्षित करण्यासाठीच हे सारे प्रयोग केल्याचे दिसून येते. रंगसंगतीचा मुद्दादेखील जाणीवपूर्वक निवडला आहे. थोडक्यात काय, तर मोबाइल काय काम करतो यापेक्षा दिसतो कसा, त्यावर तुम्ही कसे दिसता हेच मांडणारी ही बाजारशरण मॉडेल्स म्हणावी लागतील.
सुहास जोशी