lp24क्रिकेट हाच धर्म असलेल्या आपल्या देशात त्याव्यतिरिक्त इतर खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कारकीर्द उभी करणं ही सोपी गोष्ट नाही. मुलींसाठी तर ही वाट आणखीनच बिकट. म्हणूनच सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा यांची वाटचाल कौतुकास्पद आहे.

दोघींचंही आयुध एकच- रॅकेट. हैदराबादमधून सुरू झालेला दोघींचा प्रवास आता जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी शिखरावर येऊन स्थिरावला आहे. सायना नेहवालच्या प्रवासात चढउतार आहेत, पण ते प्रामुख्याने खेळापुरते. सानिया मिर्झाची कारकीर्द म्हणजे नैपुण्यवान बंडखोरीतेचं पर्व आहे. खेळात स्वत:ला सिद्ध करताना सामाजिक स्तरावर तिने दिलेला लढा स्तिमित करणारा आहे. खेळ म्हणजे क्रिकेट असं समीकरण रूढ असताना सानियाने टेनिस तर सायनाने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. खेळसंस्कृतीचं नामोनिशाण नसताना या दोघांनी आपापल्या खेळात तिशीच्या आतच जागतिक स्तरावरील सर्वोच्च खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. गेल्या वर्षी कंगना राणावत अभिनित क्वीन चित्रपट प्रदर्शित झाला. सर्वसामान्य घरातली, सुरक्षित वातावरणात लहानाची मोठी झालेल्या मुलीचं आयुष्य एका प्रसंगाने बदलतं आणि ती सक्षम होते, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ लागते, भावनिकदृष्टय़ा परिपक्व होते आणि खऱ्या अर्थाने क्वीन होते. सानिया आणि सायना दोघींचंही कुटुंब सर्वसामान्य असं. मात्र मुलींना त्यांना आवडतंय ते करू देण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं, सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि या दोघींनी आपापल्या क्षेत्रात शिखरस्थान गाठलं. या दोघीं आता समाजासाठी क्वीन्स आहेत. युवा खेळाडूंना त्यांच्या कारकीर्दीची उदाहरणं दिली जातात.
खेळांची भूमी असलेल्या हरियाणात सायनाचा जन्म झाला. मात्र कामानिमित्ताने नेहवाल कुटुंबीय हैदराबादला स्थायिक झाले. वडील शास्त्रज्ञ आणि आई गृहिणी. नवव्या वर्षी सायनाने बॅडमिंटनची रॅकेट हातात घेतली. शहर पातळीवर होणाऱ्या स्पर्धा, तालुका-जिल्हा, राज्य असं टप्पे हळूहळू पार करत सायना राष्ट्रीय स्तरावर पोहचली. बॅडमिंटन हा शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी पाहणारा खेळ. सर्वागीण वावर या खेळासाठी आवश्यक असतोच मात्र त्याच वेळी दमसासही तगडा असायला लागतो. सलग नऊ वेळा राष्ट्रीय जेतेपद पटकावणाऱ्या अपर्णा पोपटला सायनाने नमवले आणि ती पहिल्यांदा चर्चेत आली. ते वर्ष होतं २००६.
देशभरातल्या असंख्य चांगल्या खेळाडूंना टक्कर देत सायनाने हे यश मिळवलं होतं. इथून पुढचा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचण्याचा टप्पा खडतर होता. सायनाआधी आणि तिच्यानंतरही बॅडमिंटनमध्ये अनेक गुणी खेळाडूंनी देशभरात नाव कमावलं मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेत ते टिकाव धरू शकले नाहीत. बॅडमिंटन विश्वात चार श्रेणीच्या स्पर्धा असतात. सुपर सीरिज प्रीमियम, सुपर सीरिज, ग्रां. प्रि. गोल्ड किंवा ग्रां. प्रि. इंटरनॅशनल चॅलेंज आणि फ्युचर सीरिज असे हे टप्पे असतात. देशांतर्गत स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू फ्युचर आणि इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धामध्ये चमकतात मात्र त्यापुढे त्यांचा प्रवास मर्यादित राहतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली चीन, मलेशिया, इंडोनेशिया खेळाडूंची मक्तेदारी, त्यांच्या खेळाचा अव्वल दर्जा यामुळे भारतीय खेळाडूंसाठी ग्रां. प्रि किंवा सुपर सीरिज स्पर्धा दिवास्वप्न ठरते. सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील छोटय़ा स्पर्धाचे अडथळे पार केले आणि सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धापर्यंत पोहचली, नुसती सहभागी झाली नाही तर या स्पर्धाची तब्बल १५ जेतेपदं तिच्या नावावर आहेत. यामागे तिच्या कष्टांचा वाटा सिंहाचा आहे मात्र या कष्टांना दिशा देणारा माणूसही तितकाच महत्त्वाचा, तो म्हणजे पुलैला गोपीचंद. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता असलेल्या गोपीचंद यांनी हैदराबादमध्ये अकादमी स्थापण्याचा निर्णय घेतला. लहान वयातच गोपीचंद यांनी सायनातले नैपुण्य हेरले. यानंतर या गुरुशिष्याच्या जोडीने भारताचा झेंडा बॅडमिंटन क्षेत्रात सातत्याने उंचावत ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी अफाट तंदुरुस्ती, फटक्यांमधले वैविध्य, तांत्रिक गोष्टींची सखोल जाण, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास या मुद्दय़ांवर गोपीचंद यांनी सायनाला तयार केले. सायनाकडे उपजत प्रतिभा होतीच मात्र त्यावर शिस्तीचे, अभ्यासाचे, अथक सरावाचे संस्कार गोपीचंद यांनी केले. सायना आणि तिच्या कुटुबीयांनी गोपीचंद यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला. सायनाचा दिनक्रम, प्रवास, सराव आणि स्पर्धाचे वेळापत्रक, आहार हे सगळं गोपीचंद नियंत्रित करतात.
१५ ते २५ हा वयाचा टप्पा कळीचा असतो. मन स्वतंत्र होऊ पाहत असतं. कोणाचं ऐकण्यापेक्षा न ऐकण्याची बेफिकिरी खुणावत असते. मात्र याच काळात सायनाने गोपीचंद यांच्या प्रत्येक सूचनेचं तंतोतंत पालन केलं. मित्रमैत्रिणी, मजा-मस्ती, फिरणं अशा असंख्य चंगळवादी गोष्टींचा तिने त्याग केला. गोपीचंद अकादमी तिचं घरच झालं. तिचं अख्खं आयुष्य बॅडमिंटनमय झालं. अनेक गुणी खेळाडू प्रतिभा असूनही भरकटतात कारण दिशा देण्यासाठी त्यांना योग्य गुरू मिळत नाही. मात्र सायनाला गोपीचंदच्या रूपात गुरू सापडला. गोपीचंदचा प्रत्येक शब्द सायनाने प्रमाण मानला. सायना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावली त्यावेळी चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी होती. चीनमध्ये अकादमींचं प्रचंड जाळं आहे, त्यातून अव्वल दर्जाच्या खेळाडूंची फौज सातत्याने तयार होत असते. चीनच्या या फौजांना भारताकडून एकच उत्तर होतं सायना. अशा व्यस्त समीकरणामुळे सायनाचा मुकाबला एकटय़ादुकटय़ा चीनच्या खेळाडूशी नव्हता तर नैपुण्यवान चीनच्या फौजेशी होता. चीनमध्ये रोबोला साजेसं वाटावं अशा धाटणीत खेळाडू घडवले जातात. जिंकणं एवढंच त्यांना माहिती असतं. व्यावसायिक दृष्टिकोन त्यांच्या अंगात मुरलेला असतो. अशा खेळाडूंना टक्कर द्यायची असेल तर लोकशाही तत्त्वांपेक्षा हुकूमत स्वरूपाचं प्रशिक्षण देणं गरचेचं आहे हे गोपीचंद यांनी ओळखलं. म्हणूनच सायनाच्या आयुष्याशी निगडित बारीकसारीक गोष्टीचं नियंत्रणही गोपीचंद करतात. वरकरणी हे अति वाटत असलं तरी चीनच्या खेळाडूंना चीतपट करण्यासाठी सायनाला सबकुछ बॅडमिंटनमय करणं गरजेचं होतं. चीनच्या आणि पर्यायाने प्रतिस्पर्धी खेळाडूंचा तपशीलवार अभ्यास, स्वत:च्या खेळात सातत्याने सुधारणा, तंदुरुस्ती राखण्यासाठी व्यायाम, वजन वाढणार नाही असा आहार, योग आणि ध्यानधारणा, मर्यादित वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य ही अशी चौकट गोपीचंद यांनी सायनासाठी आखून दिली. या चौकटीमुळेच सायनाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीचं मूळ आहे. भरगच्च आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, देशांतर्गत स्पर्धा, सराव असं सायनाचं वर्ष असतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनाची घोडदौड सुरू असताना देशांतर्गत पातळीवर तिला समांतर कामगिरी कुणाचीच नव्हती. त्यामुळे एकला चलो रे हा तिचा मार्ग होता. असंख्य स्पर्धाची जेतेपदे नावावर करणाऱ्या सायनाच्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण म्हणजे लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक. ऑलिम्पिकवारी करायला मिळणं हेच खडतर असतं. अनेकजण त्यातच धन्यता मानतात. मात्र जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंशी मुकाबला करत प्रभुत्व गाजवणं विलक्षण अनुभव असतो. सायनाने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आणि तिचं आयुष्यच बदललं. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात पदक पटकावणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली होती. पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान, पुरस्कार यांच्याबरोबरीने जाहिराती, सदिच्छादूत अशा गोष्टींनी तिच्या आयुष्यात गर्दी केली. आदर्शवत वाटावी अशी कारकीर्द, वादविरहित प्रवास आणि निसर्गत: मिळालेलं सौंदर्य यामुळे सायना आयकॉन झाली. त्याग, मेहनत, सच्चेपणा, विजिगिषू वृत्ती यांचं प्रतीक झाली. भारतीय बॅडमिंटनची ती ओळख झाली आणि तेही वयाची पंचविशी पार करण्याआधी. या काळात सायना जागतिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये होती. लंडन ऑलिम्पिकआधीही सायनाला अनेक वेळा दुखापतींनी सतवलं होतं मात्र जिद्दीच्या बळावर ती त्यातून सावरली. मात्र ऑलिम्पिकनंतर सायनाच्या कारकीर्दीतलं एक वाईट पर्व सुरू झालं. खराब फॉर्म आणि दुखापती यांनी सायनाला वेढलं. तब्बल दीड वर्ष सायनाला एकाही सुपर सीरिज अर्थात बॅडमिंटन विश्वातल्या अव्वल दर्जाच्या स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलं नाही. ऑलिम्पिकचं यश तिच्या डोक्यात गेलंय अशा वावडय़ा उठू लागल्या. मात्र तिने संयम गमावला नाही, आक्रस्ताळं वर्तन केलं नाही. ती झगडत राहिली. गुडघे, मनगट, पायाचा घोटा अशा अनेक व्याधींना तिला सतवलं. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सायनाने या दुखापतींशी लढा दिला. २०१४ मध्ये सायनाने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज जेतेपद पटकावलं आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेलं नाही. मध्ये सायनाने गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांचं मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामागे कटूता नव्हती. गोपीचंद यांचं कारकीर्दीतलं योगदान अमूल्य आहे मात्र आता एकप्रकारचं साचलेपण आलं आहे. मला पुढे जायचं आहे असं प्रांजळपणे सांगत सायनाने नव्या प्रवासाला सुरुवात केली. नव्या ऊर्जेने खेळणाऱ्या सायनाने यंदा प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्याच वेळी ती क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणार हे स्पष्ट झालं. नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली तरी सायना क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणार होती. मात्र स्पेनची कॅरोलिन मारिन उपांत्य लढतीत पराभूत झाल्याने उपांत्य फेरी गाठण्याआधीच सायनाच्या क्रमवारीतील अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब झाले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली. अव्वल स्थान पटकावणं स्वप्नवत आहे, प्रचंड आनंद झाला आहे मात्र त्याच वेळी जबाबदारी वाढली आहे. अव्वल स्थान टिकवणं त्याहून कठीण असल्याचं सांगत सायनाने आपले पाय जमिनीवर असल्याचं सिद्ध केले. पद्म पुरस्कारांसाठी आवश्यक निकष पूर्ण केलेले असतानाही या पुरस्कारासाठी निवड न झाल्याने सायनाने ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. हा अपवाद सोडला तर सायनाने निग्रहाने वादांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. कामाप्रती निष्ठा असेल, त्यासाठी अथक मेहनत करण्याची आणि मोहमयी गोष्टींचा त्याग करण्याची तयारी असेल तर उत्तुंग भरारी घेता येते हा विश्वास सायनाने दिला आहे. देशभरातल्या युवा बॅडमिंटनपटूंसाठी सायना प्रेरणास्थान झाली आहे.
सानिया मिर्झाला खेळापेक्षा वादविवादांनीच घेरल्याचं चित्र प्रामुख्याने समोर येतं. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वाद ओढवून घेणारी खेळाडू असा बट्टाही तिच्या नावाला लागला. मात्र दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील यशाने सानियाने रॅकेटच्या माध्यमातून टीकाकारांना खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. टेनिस विश्वात युरोपीय खेळाडूंचे वर्चस्व असते. टेनिसला लागणारी प्रचंड ताकद, अफाट फिटनेस आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे व्यस्त वेळापत्रक ही व्यावसायिकता अंगी भिनवणे हेच मोठं कौशल्य आहे. देशांतर्गत स्पर्धामध्ये क्षमता सिद्ध केल्यानंतर सानियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवले. महिलांच्या स्पर्धा डब्यूटीए अर्थात वुमन्स टेनिस असोसिएशनतर्फे होतात. सानियाने सुरुवात एकेरीपासूनच केली होती. अव्वल दहामध्ये असणाऱ्या खेळाडूंना नमवत सानियाने आपली छाप सोडली. एकेरीच्या क्रमवारीत २७व्या स्थानापर्यंत सानियाने आगेकूच केली. मात्र दुखापतींनी घेरल्याने सानियाला एकेरीला अलविदा करत फक्त दुहेरी खेळण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. सानियाला हायपरलॅक्सिटी नावाचा सांध्याचा आजार आहे. यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. दुखापतींची शक्यता वाढते. शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन फक्त दुहेरी खेळण्याचा निर्णय सानियाच्या कारकीर्दीला संजीवनी देणारा ठरला. सानियाने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून तिच्यानंतर एकही भारतीय खेळाडू अव्वल दोनशे खेळाडूंमध्येही नाही. त्यामुळे सानियाचंही एकला चलो रे हाच पॅटर्न होता. एकेरीच्या तुलनेत दुहेरीला नेहमीच कमी लेखले जाते. मात्र दुसऱ्या खेळाडूची साथ मिळत असली तरी वावर, फटक्यांतले वैविध्य आणि वेगवान लवचिकता हे दुहेरीचे वैशिष्टय़ आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे प्रशिक्षक सहयोगींचा ताफा असतो. मात्र सानियासाठी तिचे वडील प्रशिक्षक आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या स्पर्धा आणि वेगवेगळे सहकारी ही दुहेरी कसरत सानियाने गेली २० र्वष सांभाळली आहे. ग्रॅडस्लॅम स्पर्धा टेनिस विश्वाचा मानसबिंदू. ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी पात्र होणंच कठीण असतं. मात्र सानियाने ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकत भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली आहे. मात्र या सगळ्यापेक्षाही सामाजिक स्तरावर वादविवादांमध्ये अडकवण्यात येत असताना सानियाने जपलेला टेनिसचा ध्यास अचंबित करणारा आहे. सानियाने खेळायला सुरुवात केल्यानंतर तिच्या स्कर्टच्या लांबीवर इस्लाममधील काही गटांनी आक्षेप घेतला. सानियाने प्रत्युत्तर दिले नाही आणि स्कर्टमध्ये कोणताही बदल केला नाही. थोडय़ा दिवसांनी या गटानेच माघार घेतली. ऑस्ट्रेलियात झालेल्या हॉपमन स्पर्धेदरम्यान सानिया तिरंगा असलेल्या टेबलवर पाय पसरून बसली असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. सानियाविरोधात तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. सानियाला समन्स बजावण्यात आला. मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेत खटला निकालात काढला. आंध्र प्रदेश राज्यातील विधीनगरम जिल्ह्यातील लक्ष्मी नावाच्या महिलेला देण्यात आलेल्या रेशनकार्डावर सानियाचे छायाचित्र होते. दारिद्रय़रेषेखालील लक्ष्मीच्या नावावरील रेशनकार्डावर लखपती सानियाचा फोटो कसा यावर वाद झाला. मात्र यात रेशन कार्ड वितरित करणाऱ्या अधिकाऱ्याची चूक आहे हे लक्षात येताच प्रकरणाचा निपटारा झाला. हे शमतंय तोच मोहम्मद अशरफ नामक मजनूने सानियावर आपलं प्रेम आहे आणि तिच्याशी विवाह करून द्या असा धोशा लावला. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या या प्रेमवीराचं म्हणणं मान्य करणं शक्य नव्हतं. मात्र त्याने सानियाच्या वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. लग्न हा कोणासाठीही वैयक्तिक मुद्दा. मात्र सेलिब्रेटी सानियाचं लग्न सोहराब मिर्झाशी ठरलं आणि मीडियाला चघळायला विषय मिळाला. दुर्दैवाने हे लग्न मोडलं आणि मीडियाने जागतिक समस्यांप्रमाणे या घटनेचा बाऊ करत चर्वितचर्वण केलं. काही वर्षांनंतर सानियाने पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि कहरच झाला. भारतात सानियाला लायक तरुण नाहीत का इथपासून चॅनेलीय चर्चा आणि परिसंवाद झडू लागले. सोशल मीडियावरही सानिया-शोएब व्हायरल झाले. दोन्ही कुटुंबीयांनी विवाह खाजगी होणार असल्याचे सांगितले तरी मीडियाने गुप्तहेराप्रमाणे लग्नाआधी, लग्नात आणि लग्नानंतर या जोडप्यावर पाळत ठेवल्याप्रमाणे वृत्तांकन केले. स्पोर्ट्स सेलिब्रेटी होणं किती नुकसानदायी आहे याची जाणीव सानियाला झाली. यानंतर लंडन ऑलिम्पिकपूर्वी महानाटय़ घडलं. लिएण्डर पेस आणि महेश भूपती यांच्या अहंकारनाटय़ात अखिल भारतीय टेनिस संघटनेने सानियाला उभं केलं. सानियाने याविरोधात संघटनेवर जोरदार हल्लाबोल केला. यामुळे संघटनेने शरणागती पत्करली. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धाच्या वेळी आणखी एक वाद उफाळला. क्रमवारीच्या गुणांसाठी अन्य स्पर्धा खेळणं किंवा देशाला पदक मिळवून देण्यासाठी आशियाई स्पर्धेत खेळणं असा निर्णय सानियाला घ्यायचा होता. सानियाने अन्य स्पर्धामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर तिने हा निर्णय संघटनेने घ्यावा असं मत व्यक्त केलं. संघटनेने आशियाई क्रीडा स्पर्धाना प्राधान्य द्यावं म्हणताच सानिया या स्पर्धेत सहभागी झाली आणि तिने भारताला तीन पदकं मिळवून दिली. आंध्र प्रदेशमधून नवनिर्मित तेलंगण राज्याची सदिच्छा दूत म्हणून सानियाची नियुक्ती करण्यात आली. मात्र राज्यातील भाजप नेते के. लक्ष्मण यांनी सानियाला पाकिस्तानची सून संबोधत या नियुक्तीवर आक्षेप घेतला. भारतासाठी खेळणारी सानिया या वक्तव्यामुळे चांगलीच दुखावली आणि तिने मुलाखती, सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडलं. अखेर लक्ष्मण यांना वक्तव्य मागे घ्यावं लागलं. टेनिसविश्वाची क्वीन असणारी सानिया बॉलीवूड मैफली, फोटोसेशन्स, रॅम्पवॉक, जाहिराती या दुनियेतही सहजतेने वावरते. फॅशनविश्वातल्या असंख्य मासिकांच्या मुखपृष्ठावर सानिया असते. खेळाडू आहे म्हणून कायम छापील, पॉलिटिकली करेक्ट बोलावं, वागावं, खेळापलीकडच्या कशाचाच विचार करू नये, स्पष्ट भूमिका घेऊ नये या सगळ्याला सानियाने छेद दिला आहे. खेळात सर्वोच्च शिखर गाठतानाच खेळापलीकडच्या आयुष्यात स्वतंत्र व्यक्ती म्हणून वावरता येतं. तसं राहता येत नसेल तर बंडखोरी करावी, मात्र ते करताना मुख्य कामाप्रती असलेली सचोटी जिवंत ठेवूनच हा धडा सानियाने दिला आहे. हैदराबादच्या या सावित्रीच्या लेकींनी रॅकेटविश्वात घेतलेली अव्वल भरारी क्रिकेटेत्तर खेळांच्या प्रचार आणि प्रसाराला चालना देणारी आहे.
पराग फाटक