अफगाणिस्तानातील मेस आयनाक या ठिकाणी शंभर एकर परिसरात पाचशेहून अधिक बुद्ध मूर्ती आणि त्याही खाली जमिनीत ताम्रयुगातील आदिम अवशेष सापडले आहेत. मात्र त्यापूर्वीच अफगाण सरकारने तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सला हा परिसर खणकामासाठी चिनी कंपनीच्या ताब्यात दिला आहे. आता जगासमोरचा प्रश्न आहे, मानवाच्या आदिम पाऊलखुणांचे काय होणार?

मेस आयनाक या अफगाण भाषेतील शब्दाचा अर्थ तांबे सापडणारा लहानसा स्रोत असा होतो. काबूलपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर लोगार या रेताड वाळवंटसदृश भागात हे ठिकाण वसलेले आहे. मेस आयनाक जगभरात चर्चेत येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दहशतवादाच्या छायेतून पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफगाण सरकारने येथील तांब्याच्या या खनिज संपत्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागतिक निविदाही काढल्या. चीनच्या चायना मेटलर्जिकल कंपनीला त्याचे कंत्राट मिळाले. त्यांनी खणकामास सुरुवातही केली आणि प्रत्येक ठिकाणी थोडे खणल्यानंतर बुद्धमूर्ती हाती लागण्यास सुरुवात झाली. एक भाग या मूर्तीनी व्यापलेला असेल असे वाटले म्हणून काही दूर अंतरावर खणकामास सुरुवात केली तर तिथेही बुद्धमूर्ती. असे करत संपूर्ण १०० एकरांच्या परिसरात सुमारे ५००च्या आसपास बुद्धमूर्ती आजवर सापडल्या आहेत. दरम्यान, पुरातत्त्वतज्ज्ञांना असे लक्षात आले की, मेस आयनाक हे एके काळी पूर्णपणे बौद्ध शहर होते. आता हे पुरातन शहर कायम राखण्यासाठी आणि इथे खणकामास परवानगी देऊ नये यासाठीच्या एका मोठय़ा जागतिक मोहिमेला सुरुवात झाली आहे.
या प्रकरणात आता अफगाणिस्तान सरकार आणि चीन या दोघांचीही मोठी पंचाईत झाली आहे आणि हे खणकाम सध्या थांबलेल्या अवस्थेत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत इथे खणकाम होणारच असा निर्णय चिनी कंपनीने घेतला असून त्याबद्दल जगभरातील पुरातत्त्वतज्ज्ञांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कारण केवळ बुद्धमूर्तीपुरताच हा विषय मर्यादित नाही. इथे खूप मोठय़ा अशा बौद्ध वस्तीचे, मठाचे, तत्कालीन शहराचे अवशेष सापडलेले असले तरी त्याहीखाली करण्यात आलेल्या उत्खननामध्ये ताम्रयुगातील अवशेषही सापडले आहेत. त्यात तांबे वितळवून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणारी त्या वेळची भट्टीही सापडली आहे. साहजिकच त्यामुळेच मेस आयनाकचे अस्तित्व हे ताम्रयुगापर्यंत मागे जात असल्याचे संशोधकांना लक्षात आले आहे. अशा प्रकारे प्रचंड विस्तार असलेले जगातील हे दुसरे मोठय़ा आकारमानाचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधले गेले आहे.

lp17

हे लक्ष वेधले जाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अफगाणिस्तानला असलेला दहशतवादी कारवायांचा धोका अद्याप कायम आहे. अफगाणींचे जीवन आजही दहशतवादाच्या छायेखालीच सुरू आहे. या
पूर्वीच २००१ साली अफगाणिस्तानातील बामियान येथील जगातील सर्वात उंच बुद्ध शिल्पकृती इस्लामी दहशतवाद्यांनी तोफगोळ्यांनी उद्ध्वस्त केली होती. संपूर्ण जगभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली पण त्याने दहशतवाद्यांना फारसा फरक पडला नाही. अफगाणिस्तान हा एकेकाळी बौद्ध प्रदेश होता, याचे दाखले तर इतिहासात ठायी ठायी पाहायला मिळतात. मग ते ह्य़ुआन श्वांग या चिनी बौद्ध भिक्खूचे प्रवासवर्णन असो किंवा मग सापडणारे पुरातत्त्वीय पुरावे असोत. अफगाणिस्तानात आपल्या वर्चस्वाखाली असलेल्या सर्व प्रांतांमध्ये दहशतवाद्यांनी इस्लामी नसलेल्या सर्व गोष्टी नेस्तनाबूत करण्याची मोहीमच चालवली. त्याचा सर्वाधिक फटका बौद्ध संस्कृतीला बसला आहे. अफगाणिस्तानामध्ये सर्वाधिक बौद्ध शिल्पकृती दहशतवाद्यांनी हातोडय़ाने किंवा हाती येईल त्या अवजाराने फोडून टाकल्या. असाच धोका या मेस आयनाक प्रांतालाही आहे आणि गेल्या सुमारे दोन वर्षांत जगभरातील इस्लामी दहशतवाद्यांनी पुन्हा आक्रमक रूप धारण केल्याने हा धोका आता अधिकच वाढला आहे. त्यामुळेच इथे सापडलेल्या महत्त्वाच्या असलेल्या या बौद्ध अवशेषांनाही धोका निर्माण झाला आहे. अफगाण सरकारने इथे सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत, पण ते पुरेसे नाहीत, असे इथे काम करणाऱ्या पुरातत्त्वतज्ज्ञांना वाटते. पाकिस्तानातून पुढे जाण्यासाठी दहशतवादी ज्या मार्गाचा वापर करतात, त्याच मार्गावर मेस आयनाक येत असल्याने पुरातत्त्वतज्ज्ञ दररोज श्वास रोखून येथे काम करतात.
lp18येथील जनता मात्र ही बौद्ध परंपरा ही याच प्रांताची महत्त्वाची संस्कृती असल्याचे मानते. त्याचा त्यांना रास्त अभिमानही आहे. मात्र या जनतेच्या डोक्यावरही इस्लामी दहशतवाद्यांची टांगती तलवार कायम आहे. इथे काम करणारे काही अफगाणी पुरातत्त्वतज्ज्ञ आणि स्थानिक नागरिक जिवाची बाजी लावून ही संस्कृती वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करत आहेत. फारसे पैसे हाती नसतानाही पुरातत्त्वतज्ज्ञ बिनपगारी काम करत आहेत, स्थानिक नागरिकही इथे येऊन प्रचंड विषम अशा वातावरणात म्हणजेच कडाक्याची थंडी, बर्फ, तर कधी पराकोटीची उष्णता या वातावरणात जिवावर उदार होऊन काम करत आहेत. बामियानमध्ये घडले त्या इतिहासाची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून सर्व जण एकत्र आले आहेत. मात्र अफगाण सरकार चिनी कंपनीकडून लिलावाचे पैसे घेऊन बसले आहे. ही रक्कम थोडी- थोडकी नव्हे तर तब्बल तीन अब्ज डॉलर्स एवढी मोठी आहे. त्यामुळे पैसे वसूल करण्यासाठी इथे तांब्याची खाण करणारच, असा विडा चिनी कंपनीने उचलला असून त्यांच्या कामाला आता कोणत्याही क्षणी सुरुवात होणार आहे.
मेस आयनाकचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने उलटावी लागतील. इसवीसन पूर्व काळापासून जगाचा व्यापार सुरू होता तो प्राचीन अशा रेशीम मार्गाने. हा मार्ग चीनपासून सुरू होत थेट युरोपापर्यंत पोहोचला होता. त्यावेळचाच नव्हे तर अगदी १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हाच जगातील प्रमुख व्यापारी मार्ग होता. रेशीम मार्ग जसा रस्त्यावरून जायचा तसाच नंतरच्या कालखंडात जलरेशीम मार्ग तयार झाला. रेशीम मार्गावरील एका राजाने हा संपूर्ण मार्गच रोखून धरल्यानंतर त्यावर उतारा म्हणून तत्कालीन भारतीय व्यापाऱ्यांनी जलरेशीम मार्ग शोधला होता. मात्र नंतर रोखून धरलेला हा मार्ग मोकळा करण्यात आला. हा रेशीम मार्ग चीनपासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या अनेक देशांना जोडत पुढे जातो. ज्या इसवी सन पूर्व कालखंडाबद्दल आपण बोलत आहोत, त्या कालखंडात विद्यमान अफगाणिस्तान हा भारताचाच एक भाग होता. इसवी सनपूर्व सहाव्या शतकात उदयाला आलेल्या बौद्ध धर्माचा प्रसारही याच व्यापारी मार्गाने जगभरात झाल्याचे दाखले इतिहासात सापडतात तर आजवर अनेक उत्खननांमध्ये त्याचे पुरावेही सापडले असून त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. एक काळ असा होता की, बौद्ध हा जगभरातील एक प्रमुख धर्म होता. ज्या मंगोलवंशीय राजांनी अध्र्या जगावर राज्य केले त्यांच्यापैकी गोदान खान (चेंगिझ खानचा नातू) व त्याच्यानंतर राजसत्ता ग्रहण करणारा सेच्येन खुब्लाई खान यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांच्या साम्राज्याचा तो राजधर्म असल्याचे जाहीर केले होते. हा प्राचीन मार्ग तक्षशिलेहून बॅक्ट्रियामार्गे पुढे युरोपच्या दिशेने जातो. याच मार्गावर काबूलपासून काही अंतरावर हे मोठे बौद्ध शहर वसलेले आहे. या शहरातील रस्ते, बाजारपेठ, बौद्ध मठ, भिक्खूंचे विहार, सामान्य उपासकांची घरे आदी सारे या उत्खननामध्ये पुरातत्त्वतज्ज्ञांना सापडले आहे. तज्ज्ञांनी ज्या मातीच्या थरावर हे शहर सापडले, त्याही खाली जाऊन अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर मानवाच्या आदिम पाऊलखुणाच त्यांच्या हाती लागल्या. ताम्रयुगातील मानवाच्या पाऊलखुणा, त्याने वापरलेल्या वस्तू, तांबे वितळवण्याची व शुद्ध करण्याची भट्टी या सर्व गोष्टी सापडल्या असून त्यात तत्कालीन मातीच्या भांडय़ांचे अवशेषही समाविष्ट आहेत. इथे सापडलेल्या या सर्व पुरातत्त्वीय वस्तूंवर पर्शिया, चीन व भारतीय कला-संस्कृती पगडा संशोधकांना आढळला आहे. मेस आयनाकमध्ये सापडलेल्या एका स्तूपाच्या शेजारी सापडलेल्या मानवी सांगाडय़ाच्या कवटीवर तर जमिनीखाली मुबलक प्रमाणात असलेल्या तांब्याचे पुरावेच सापडले आहेत. तांबे खुल्या वातावरणात येते तेव्हा येथील ऑक्सिजनशी झालेल्या संयोगानंतर त्याचा रंग काहीसा हिरवट होतो. ती हिरवट झाक येथे सापडलेल्या मानवी सांगाडय़ाच्या कवटीवर आणि इतर अवशेषांवरही पाहायला मिळते.
बौद्ध परंपरेमध्ये थेरवादी (हीनयान) आणि महायान असे दोन महत्त्वाचे भेद पाहायला मिळतात. पहिल्या परंपरेमध्ये मूर्तिपूजा नसल्याने स्तूप किंवा बुद्धाची पावले, बोधिवृक्ष यांची पूजा प्रतीकात्मक रूपात केली जात होती. तर नंतर महायान परंपरेमध्ये मूर्तिपूजा पाहायला मिळते. मेस आयनाक येथे सापडलेल्या पुरावशेषांमध्ये नानाविध प्रकारचे नक्षीकाम केलेले, वेगवेगळी आकाररचना असलेले स्तूप पाहायला मिळतात. असे आकारांचे व नक्षीकामाचे वैविध्य तर भारतातील स्तूपांमध्येही संशोधकांना फारसे पाहायला मिळालेले नाही. म्हणूनच हे स्तूप जपले जाणे खूप महत्त्वाचे आहे. इथल्या शिल्पकृतींवर गांधार शैलीचा पूर्ण प्रभाव पाहायला मिळतो. किंबहुना गांधार शैलीच या परिसरात उगम पावली, असे इतिहास सांगतो. याही दृष्टीने इथल्या शिल्पकृतींची जपणूक होणे महत्त्वाचे आहे.
lp19महाराष्ट्रातील अजिंठा लेणींमध्ये सहाव्या शतकात खोदण्यात आलेल्या लेणींत आपल्याला चित्रे पाहायला मिळतात. या चित्रांना आणि पर्यायाने अजिंठा लेणींना त्यांच्या त्या अप्रतिम सौंदर्यामुळेच जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. मेस आयनाकमध्ये सापडलेली बुद्ध चित्रे हीदेखील त्याच कालखंडातील किंवा त्याही आधीची असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे. काही शिल्पकृती रंगविलेल्या अवस्थेतील आहेत. यातील काहींचे आयुर्मान हजार वर्षांचे असावे, असाही संशोधकांचा अंदाज आहे. म्हणूनच मानवी इतिहासातील सुमारे पाच हजार वर्षांचा इतिहास आजवर व्यवस्थित राखून ठेवलेला हा परिसर जागतिक वारसा यादीत नोंदवावा आणि येथील खणकाम पूर्णपणे थांबवावे, असे वाटणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी एकत्र येऊन मेस आयनाक वाचवा (#२ं५ीेी२ं८ल्लं‘), अशी हाक दिली आहे.
lp20१९७३-७४ च्या सुमारास रशिया आणि अफगाणिस्तानच्या काही पुरातत्त्वतज्ज्ञांनी या परिसरातील खनिज संपत्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या उत्खननामध्ये सर्वप्रथम याचे पुरातत्त्वीय महत्त्व लक्षात आले होते. त्यानंतर इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्वतज्ज्ञांचे या परिसराकडे लक्ष गेले. आजवर झालेल्या अभ्यासानंतर पाचवे ते सातवे शतक हा दोन शतकांचा कालखंड मेस आयनाकमधील सुवर्ण कालखंडच असावा, या निष्कर्षांप्रत संशोधक पोहोचले आहेत. आठव्या शतकामध्ये येथील बौद्ध धर्म आणि संबंधित संस्कृतीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली आणि १० व्या शतकाच्या अखेरीस हे ठिकाण सोडून माणसाने इतरत्र वस्ती केली.
lp21२००७ साली नोव्हेंबर महिन्यात हा परिसर भाडेतत्त्वावर खाणीसाठी देण्याचा निर्णय झाला. ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ाने त्याचा व्यवहारही झाला आहे. ३ अब्ज डॉलर्स ही चीनने त्याद्वारे केलेली गुंतवणूक ही आजवरची अफगाणिस्तानातील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक आहे. त्यामुळेच अफगाण सरकारवर यासाठी चीनचा दबावही आहे. आजवरच्या अभ्यासानुसार या बौद्ध शहराच्या खाली जमिनीमध्ये ५.५२ दशलक्ष मेट्रिक टन एवढे तांबे दडलेले आहे. तर त्याची किंमत १० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यताही आहे. गेली काही वर्षे येथील खणकाम थांबलेले होते. मात्र आता फार काळ वाट पाहता येणार नाही, असा इशाराच चीनने दिला आहे. त्यांनी पुरातत्त्वतज्ज्ञांना दिलेली मुदतही संपत आली आहे. त्यामुळे आता मानवाच्या या आदिम पाऊलखुणांचे काय होणार, हा यक्षप्रश्नच आहे. त्यासाठी पुरातत्त्वतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मंडळींनी एकत्र येऊन सेव्ह मेस आयनाक ही चळवळ सुरू केली आहे. याच्या प्रसारासाठी त्यांनी ट्विटर, फेसबुक आदी सोशल नेटवर्किंगचाही आधार घेतला आहे. ‘सेव्हिंग मेस आयनाक’ हा माहितीपट तयार करण्यात आला असून जगभरात तो दाखविला जात आहे. या चळवळीच्या माध्यमातूनच या कामासाठी आर्थिक मदतही गोळा केली जात आहे. काही देशांमधील नागरिकांनीही यात पुढाकार घेतला आहे. मात्र पुढाकार घेतलेल्यांमध्ये बुद्धाची भूमी असलेल्या भारताचा किंवा भारतीयांचा समावेश फारसा दिसत नाही!
विनायक परब