आयुष्यात कधी तरी लेह-लडाखला जायचं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हेच लेह-लडाख आपली चारचाकी घेऊन, आपल्याला हवं तिथे थांबत, हवं तसं फिरायचं ठरवलं तर ती सफर स्वप्नवतच होऊन जाते.

खाडी पुलांवरून दिसणाऱ्या नद्या व समुद्र, हिरव्यागार फळबागा, जोरात चालू असलेले उद्योग धंदे/कारखाने, नंतर लांबवर पसरलेल्या दगडाच्या खाणी व संगमरवराची दुकाने, नंतर क्षितिजापर्यंत पसरलेले वाळवंट, वाळूच्या टेकडय़ा, त्यावर उगवलेली तुरळक बाभळी, निवडुंगाची झाडे, नंतर हळूहळू नजरेत भरली ती, काही ठिकाणी पिके डोलत उभी तर कुठे पेरणीची लगबग सुरू; नंतर नजर जाईल तिकडे हिरवळ, शेती, झाडे..
अशी ही दृश्यमालिका सरकत होती आमच्या स्कॉर्पिओच्या खिडकीमधून! आत बसलेले आम्ही प्रेक्षक, निघालो होतो भारत भूच्या मुकुटाचे दर्शन घेण्यासाठी!
होय, हीच आमची स्वप्नसफर! २०१२ मध्ये मुलगा मित्रांबरोबर बाइकवरून लडाख ट्रीप करून आला होता, त्याच प्रेरणेने आम्ही स्वत:ची गाडी, स्वत: चालवत, लडाख दर्शन करायला निघालो होतो.
श्रीनगरला पोहोचल्यावर लेहला जाताना जोझीला, नीमकला, फोटुला इ. अनेक ला (पास-खिंड) पार कराव्या लागतात. दूर झेलम नदीच्या खोऱ्यात दरीमध्ये अमरनाथ यात्रेचा बेस कम्प दिसत होता. सोनमर्गला झालेले ग्लेशिअर्सचे दर्शन, त्यावर खेळणे आता अप्रूप राहिले नव्हते. आता आव्हान होते ते दोन्हीकडे बर्फाचे कडे, रस्त्यावरील बर्फ डोझरने नुकताच बाजूला केलेल्या अशा. भुसभुशीत बर्फयुक्त चिखलातून गाडी सही सलामत बाहेर काढण्याचे! तरी प्रत्यक्ष जोझीला खिंडीत गाडी बाजूला घेऊन बर्फावर घसरगुंडी खेळायचा मोह आवरता आला नाही. चहूकडे पसरलेल्या बर्फावरून परावर्तित होणारी सूर्यकिरणे डोळे दिपवीत होते. खिंड पार होताच समोरच्या पाटीचं उत्स्फूर्तपणे सामूहिक वाचन झाले, वेलकम टू लडाख.
आणि खिडकीतून दिसणारा देखावा पूर्णपणे बदलून गेला. विरळ होत गेलेली डोंगरावरची झाडी गायब झाली आहे! डोंगरांची उंची इतकी वाढली की आकाशाला टेकतात की काय असा भास होत होता! आकाशही खाली आलं! डोंगरांचा बदलत जाणारा रंग हिरवा, लाल, जांभळा, काळा, राखाडी, पिवळा, खडकांचे वैविध्यपूर्ण आकार, काही वेळा लेणी किंवा किल्ल्यांच्या बांधीव बुरुजाची आठवण करून देणारे, काही ठिकाणी सैनिकच बंदूक रोखून उभे असल्याचा भास, काही ठिकाणी पट्टी लावून तासल्यासारखे, काही ठिकाणी खाणीतून काढल्यासारख्या मोठय़ा शिला, दगड, काही ठिकाणी खडी मशीन लावून काढल्यासारखा खडीचा डोंगर तर कुठे बारीक वाळूचा डोंगर! बर्फाचे तुकडे तर कुठेही विखुरलेले. लांब एखाद्या घळीत गोठलेला धबधबा! मध्येच मोठे विस्तीर्ण पठार त्यातून जाणारा सरळसोट रस्ता! दूरवर दिसणारा हिरवळीचा झुबका, वाळवंटातील ओअ‍ॅसीससारखा, जणू देवाने एखादा हिरवा पुष्पगुच्छ वरून टाकला आहे. सिंधू नदी, तिला मिळणाऱ्या उपनद्या, त्यांना मिळणारे असंख्य प्रवाह, डोंगरातून कुठूनही उगवणारे. लडाखमधील निसर्गाच्या या खेळासाठी अद्भुत हा एकच शब्दप्रयोग आपण वापरू शकतो.
अशा हिरवळीच्या गुच्छांमध्ये लडाखी गावे वसली आहेत. आणि बाकी ठिकाणी ठरावीक अंतरांवर लष्करांचे ट्रान्सिट कॅम्प, वेगवेगळ्या डिव्हिजन्स आणि त्याच्या आसपास काही दुकाने, होटेल्स, इ. वाटसरूंच्या प्राथमिक गरजा पुरवणारी.
पहिले मुख्य गाव लागते द्रास, नंतर १९९९ची युद्धभूमी. सभोवतालच्या उंच हिमशिखरांवर लपलेली, शत्रूने विश्वासघाताने बळकावलेली आपलीच ठाणी, तेथून टप्यात येणारा आपला एन-एच-१, श्रीनगर लेह मार्ग, आपल्या लष्कराने हिकमतीने लढवलेले डावपेच, पत्करलेले हौतात्म्य आणि जिंकलेले कारगिल युद्ध यांचे स्मारक म्हणजे कारगिल वॉर मेमोरिअल बघण्यासाठी स्कॉर्पिओ तासभर स्थिरावली. शंभर फूट उंच स्टीलच्या ध्वजस्तंभावर दिमाखात फडकणारा ३० फुटी भव्य राष्ट्रध्वज बघून अभिमानाने छाती फुगली.
कारगिल ते लेह रस्त्यावर नमिक ला, फोटू लाचा खिंडी पार कराव्या लागतात तसेच मूनलँड जिथे पिवळसर रंगाचे दगड व छोटय़ा छोटय़ा उंचवटय़ांनी बनलेले डोंगर आहेत (चंद्रभूमीशी याचे साधम्र्य आहे म्हणे) मॅग्नेटिक हिल-जेथील खडकांमध्ये मॅग्नेट्स असावेत, त्यांचा प्रभाव आपण वाहनांवर अनुभवू शकतो. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाविरुद्ध, ठरावीक वाहने मागे चढतात. या भागात आश्चर्य आम्ही स्कॉर्पियोच्या बाबत ३-४ वेळा अनुभवले (हँडब्रेक न लावता गाडी न्युट्रलमध्ये ठेवायची- उतारावर ती खाली न जाता मागे चढते) व खात्री करून घेतली.
दूरवरची हिमशिखरे आपल्या समपातळीवर दिसतात, क्षितिजापर्यंत पसरलेल्या १० ते १५ पर्वतरांगा आपण मोजू शकतो. आपण हळूहळू वर वर जातो, परत थोडे खाली येऊन लेह गावात १२,००० फुटांवर स्थिरावतो.
तेथे विरळ हवेत चालताना लागणारी धाप एवढे एकच लक्षण आपण १२ हजार फुटांवर असल्याची जाणीव करून देते. अन्यथा लेह जिल्ह्याचे ठिकाण व टूरिस्ट बस असल्याने बाकी गावांसारखंच गजबजलेलं, हॉटेल्स, गेस्ट हाऊस (राहाण्याची घरगुती सोय) ज्वेलरी कपडे, ट्रॅव्हल एजंट इ. दुकानांची रेलचेल असलेलं आहे. फरक एकच इथे ट्रेकर्स, बाइकर्सचे प्रमाण जास्त, त्यांची दुकानेही जास्त इथून बाइक (बुलेट) भाडय़ाने घेऊन लडाख भ्रमंती केली जाते.
एक दिवस विश्रांती घेऊन आम्ही स्कॉर्पिओसहित सज्ज झालो ते जगातील सर्वात उंच मोटरेबल रोड पार करण्यासाठी लेह-खारदुंगला- नुब्रा रोड. या बीआरओ प्रोजक्टचं नाव आहे हिमांक- १८३८० फुटांवरील खारदुंगला पास पार करणे हे प्रत्येक बाइकवेडय़ा मुलाचं स्वप्न असते. ते आमच्या डोळय़ांत होतं आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून आम्ही नुब्रा व्हॅलीत पोचलो, अजून एक निसर्गाचा चमत्कार बघण्यासाठी! वळणावळणाचा डोंगर, माथ्यावर जाऊन उतरणारा रस्ता (हा लडाख सफरीतील अविभाज्य घटक) पार करताना एका बाजूला असते विस्तीर्ण वाळूच्या पात्रात प्रवाहाने रांगोळय़ा रेखत जाणारी शायोक नदी, वाळवंटातील वाळूवाळूच्या टेकडय़ा, तिच्यामध्येच हिरवळ, रंगीबेरंगी बोडके डोंगर आणि माथ्यावर बर्फाचा मुकुट! सृष्टीतील सर्व वैविध्यं तिथं एकवटलेलं! पश्मिना बोकडाचे कळप, मेंढय़ा, याक, छोटय़ा गायी, दोन वशिंडे असलेले उंट, विविध पक्षी अशी प्राणिसृष्टी. डिस्कीट जिल्ह्य़ातील हुंडर गावी एक दिवस राहून आमची सवारी पुन्हा एकदा खारदुंगला चढाई करून लेहला परतली. दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध २३० कि.मी.चा विस्तार असलेलं आणि भारत, तिबेट, चीन तिन्ही देशांत पसरलेले पेंगागासो लेक बघण्यासाठी पुन्हा प्रोजेक्ट हिमांकवर आमची चढाई सुरू झाली. चांगला ला चांगबाबाच्या मंदिराचे दर्शन करून १६० कि.मी. कापायला ७ तास लागले. (जम्मू-काश्मीरचे सराईत ड्रायव्हर ५ तास जायला, पाच तास यायला, तेथे १ तास असा एका दिवसात कार्यक्रम संपवतात.) आम्ही तेथे तंबूत मुक्काम केला. संध्याकाळ, सकाळ लेकचे विविध वेळी, प्रकाशात सौंदर्य पुरेपूर अनुभवले. परत येताना १६व्या शतकातील शे पॅलेस व १४ व्या शतकापासून कार्यरत असलेली ठिकसे मॉनेस्ट्री बघितली.
लेह ते मनाली अंतर साधारण ४५० कि.मी. कारू ते तांडी अशा ३५० कि.मी.मध्ये पेट्रोल पंप नाही. हिशेब केला, टाकी फुल केली, जादा कॅन भरून घ्यायचा नाही असा निर्णय घेतला, निघालो. हा सर्व प्रदेश हिवाळय़ामध्ये मनुष्यविरहित असतो. रस्ते बंद होतात. जूनला बर्फ कमी झाल्यावर ऑगस्ट वा सप्टेंबर पुन्हा हिमवृष्टी होईपर्यंत वाहतूक सुरू असते. वाटेत फक्त ३ टप्पे; जिथे मिलिट्रीचे ट्रान्सिट कॅम्प आहेत व जेवणाची व तंबूत रहाण्याची सोय तेथील स्थानिक करतात, ज्यांची गावे डोंगरात आहेत. मुख्य रस्त्यावरून ती दिसतही नाहीत. हिवाळय़ात हे सर्व लोक भारतात इतरत्र रोजीसाठी जातात. पहिला टप्पा पांग. आम्ही दुपारी १२.३० वाजता पोहोचलो ते टांगलाला ही १७,८३८ फूट उंचीवरची खिंड पार करून व जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंचीवरील मोटरेबल रोडवरून, मूर प्लेन नावाचे १६,००० फूट उंचीवरील साधारण ४६ कि.मी. लांबीचे पठार ओलांडून! पांग सर्वात जास्त उंचीवरील ट्रान्सिट कॅम्प आहे (१५,४६० फूट). १.३० वाजता पांग सोडले. नोकीला ही १६,५४० फूटवरील खिंड ओलांडून तो पर्वत उतरण्यासाठी बीआरओने कमाल कौशल्याने रस्ता बनवला आहे. त्यात २१ लूप्स (पिनच्या आकाराची वळणे) आहेत, जी आपण वरून बघू शकतो. २१ लूप्स रोड आमचे सारथी डौलदारपणे वळणे घेत होते आणि आम्ही मोजत होतो. आमच्या मते २६च्या वर असावीत. ट्वींग ट्वींग नामक नदीवरील ब्रिज पार करून दुसऱ्या पर्वतात गाडी घुसते. दृश्य बदलू लागतं- लडाख पर्वतराजी संपून आपण पुन्हा हिमालयाच्या कुशीत शिरत असतो. नदीकाठच्या पर्वतांवर वेगळीच शिल्पे दिसू लागतात आणि सार्चू हा दुसरा टप्पा होतो. येथे आम्ही संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. येथे बऱ्यापैकी पठार होते. बरेच प्रोफेशनल कॅम्प्स, मोठे स्वतंत्र तंबू इ. छान सोय होती. ७.३० ला होणारा सूर्यास्त व ८ वाजेपर्यंतचा संधिप्रकाश याचा फायदा घेऊन आम्ही तिसरा टप्पा गाठायचा निर्णय घेतला. मुख्य आव्हान होते बारालाच्छाला पार करण्याचे. हा असा पास आहे की बारा डोंगर एकापाठोपाठ एक पार करावे लागतात- वरच्यावर! आमच्या सफरीतील हा कळसाध्यायच ठरला. संपूर्ण डोंगरावर बर्फाची जाड दुलई पसरलेली, ट्रकच्या उंचीएवढा बर्फाचा थर रस्त्याकडेने, एकेरी वाहतूक, पुढच्या वाहनाला रस्ता देण्यासाठी आपण दरीच्या टोकाला उभे राहावे किंवा त्याने तरी! बर्फ बाजूला केल्याने मधे मधे भुसभुशीत झालेला रस्ता, तर मधे मधे वाहणारे पाण्याचे जोरदार प्रवाह! घाटाच्या वळणांवर दूरवरून येणारे वाहन दिसले तर रस्त्याच्या रुंदीचा अंदाज घेऊन चढणाऱ्या वाहनाला रस्ता देण्यासाठी आपण सुरक्षित ठिकाणी थांबावे लागते. ताशी १० कि.मी. कापले तरी खूप, असे वेगाचे गणित असते. डोंगरावरचं तळं. ‘चंद्रताल’. निळशार पाणी. अर्ध गोठलेलं. अप्रतिम दृश्य! ७ वाजेपर्यंत डोंगर ओलांडले व ८ वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्याला पोहोचलो – ‘झिंझिंबार.’ हातापायाला झिणझिण्या आणणाऱ्या थंडीमध्ये, तंबूत खालीवर गाद्या गुंडाळून गाढ झोपलो, ग्लेशिअरच्या कुशीत!

सकाळी ७ ला पुढचा प्रवास सुरू झाला- पॅटसीओ मिल्रिटी कॅम्प, दारचा ओलांडल्यावर हिमाचल प्रदेश सुरू होतो. जिस्पा हे पहिलं मानवी वस्ती असलेलं गाव लागलं. पुढचा प्रवास त्यामानाने सोपा होता. केलांग, तांडी इ. मोठी गावे लागतात. चिनाब नदी सोबत येते. पुढचा रोमहर्षक प्रवास होता रोहतांग पास. संपूर्ण डोंगरउतारावर बर्फाची चादर पसरलेली, जी मधे मधे कापून रस्ता बनवलाय असं वाटतं! पण रस्ता छान आहे, त्यामुळे ड्रायव्हिंगची काळजी नव्हती. हे मनालीजवळील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने प्रचंड गर्दी, ट्रॅफिक जामला तोंड देत मनालीला पोहोचायला संध्याकाळ झाली!
स्कॉर्पिओ व सारथी यांची परीक्षा संपली. विशेष प्रावीण्य मिळवून सर्व जण उत्तीर्ण झाले. नंतर सिमला, चंदिगढ, दिल्ली-आग्रा (यमुना एक्स्प्रेस वे). आग्रा ते मुंबई एन.एच.३ पकडून पुन्हा हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशी सृष्टीची, भारतभूची बदलती रूपे न्याहळत स्कॉर्पिओ सह्य़ाद्रीच्या डोंगरांमध्ये दाखल झाली.