पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शास्ताखानावर शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेला हल्ला ही अतिशय अचाट गोष्ट! शत्रूचा गोंधळ उडवून देण्याच्या बाबतीत कौटिल्य जी सूत्रे सांगतो तीच इथे तंतोतंत दिसतात.

शाहिस्तेखान हा मोगलाईतील एक मातबर सरदार. तो पुण्याला प्रत्यक्ष राजांच्या लालमहालात तळ देऊन बसला होता. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन वर्षे. शाहिस्तेखान स्वराज्य जसं कुरतडत होता तसा हळूहळू राजांकडले लोक फोडत होता. आतापर्यंत खानाने चाकण, सासवड, इंदापूर काबीज करून सुप्यास वेढा घालून पुण्यावर हल्ला केला. त्याच वेळी कृष्णाजी काळभोर, बाबाजीराव होनप, नारोजीपंत पंडित इतकेच नव्हे तर अफजलखान भेटीच्या वेळी राजांबरोबर असणारा राजांचा अंगरक्षक संभाजी कावजी अशा महत्त्वाच्या व्यक्तींना फोडण्यात खान यशस्वी झाला होता. अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्तेखानाशी प्रकाशयुद्ध खेळणे अशक्यच होते.
संधि, विग्रह, यान, आसन, संश्रय, द्वैधिभाव राजनीतीतील या सहा उपायांना ‘षाड्गुण्य’ अशी संज्ञा आहे. या उपायांचा विविध प्रसंगी कसा उपयोग करावा याची चर्चा सातव्या अधिकरणातील पहिल्या अध्यायात येते. जेव्हा कोणत्याही परिस्थितीत ऱ्हास दिसत असेल तेव्हा ऱ्हासापासून स्थिरता आणि स्थिरतेकडून वृद्धी कशी प्राप्त करावी ते सांगताना कौटिल्य म्हणतो, ‘यदि वा मन्येत नास्मि शक्त: परकर्माण्युपहन्तुं, स्वकर्मोपघातं वा त्रातुम् इति बलवन्तमाश्रित: स्वकर्मानुष्ठानेन क्षयात्स्थानं स्थानाद्वृद्धिं चाकाङ्क्षेत’ (७.१.३६) जर मी शत्रूच्या कार्याचा विध्वंस करू शकत नाही किंवा माझ्या कार्याचे विनाशापासून रक्षण करू शकत नाही तर बलवान राजाच्या आश्रयास जाऊन आपली कार्ये पार पाडून ऱ्हासापासून स्थिरता व स्थिरतेपासून वृद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.
आदिलशाही व मोगलशाही अशा दोन शाह्यांशी एका वेळी टक्कर घेणे कठीण आहे याची रास्त जाणीव असलेल्या राजांनी पन्हाळा सिद्दी जौहरला देऊन रुस्तुमेजमानतर्फे आदिलशाहीशी संधी केला होता. म्हणजे तथाकथित बलवान राजाचा आश्रय घेऊन झाला होता. थोडक्यात ऱ्हासापासून स्थिरतेकडे राजांच्या राजकारणाची वाटचाल सुरू होती. आता वृद्धीचा विचार करणे गरजेचे होते. आणि ती वृद्धी शाहिस्तेखान पुण्यातून निघून गेल्याशिवाय केवळ अशक्य होती. पण सध्या तरी राजांनी षाड्गुण्यातील आसन म्हणजे स्वस्थ राहणे पसंत केले होते. अर्थात आसन म्हणजे होणारा ऱ्हास पाहात स्वस्थ राहणे असा होत नाही. तर या कालावधीत शत्रूला वेगवेगळ्या मार्गाने जेरीस कसे आणता येईल याचा विचार होणे आणि तशी कृती होणे गरजेचे.
अर्थशास्त्रातील ‘आबलियस’ हे अधिकरण हीनबल पण विजिगीषू असलेल्या राजाने स्वत:ला कसे मोठे करावे यासाठी आहे. हीनबल राजाने वेगवेगळ्या उपायांनी बलशाली राजाला जेरीस कसे आणावे त्याच्या अनेक क्लृप्त्या येथे दिल्या आहेत.
शत्रूपक्षात फूट पाडण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ झाला. शाहिस्तेखानालाच फोडण्याच्या कल्पनेवर राजे कसा विचार करत होते ते सभासदी बखरीच्या नोंदींवरून लक्षात येते, राजियाचेच मनात सला करावा तर कोणी रजपूत मातबर नाहीत, जे आपणहि रजपूत हिंदुधर्म रक्षून आपले संरक्षण करील. शाहिस्तेखान म्हणजे मुसलमान पातशाहाचा नातलग, आप्त, तेथे काही लांचलुचपत चाले ना, अगर आपणासहि रक्षी ना.. (बा. सी. बेंद्रे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, पृ. २६२)
प्रत्यम्क्ष शाहिस्तेखानाला फोडण्याची शक्यता दिसून न आल्यामुळे राजांनी त्याचा सरदार जसवंतसिंहाला फोडायचा प्रयत्न केला होता. जसवंतसिंह हा शहाजहानच्या पक्षाचा होता. औरंगजेबाने शहाजहानला कैदेत टाकले व त्या वेळी शाहिस्तेखानाने औरंगजेबाची बाजू घेतली म्हणून जसवंतसिंहाला त्या दोघांचाही राग होता. सिंहगडच्या वेढय़ात त्याचे मन रमत नव्हते. गिफर्डच्या पत्रानुसार, रुस्तुमे जमान मुघलांना भेटला होता. (हा रुस्तुमे जमान आदिलशाहाचा सरदार व शहाजी राजांचा मित्र होता ज्याच्या मार्फत राजांनी आदिलशाहीशी तह केला होता) पण त्यांच्यात काय बोलणे झाले ते कोणाला कळले नव्हते. या वेळी नेताजी मोंगलांच्या मुलखात लुटालूट करत होता. मोंगलांनी त्याचा पाठलाग इतक्या जोराने केला की त्याला रोज चाळीस ते पन्नास मैलांची दौड करावी लागली. मात्र हा प्रदेश अत्यंत बिकट असल्याने आपण स्वत: नेताजीचा पाठलाग करू असे सांगून नेताजीचा पाठलाग करण्यापासून रुस्तुमे जमानने मुघलांना रोखले होते. आणि या सगळ्याचा परिणाम एवढाच झाला होता की नेताजी पसार झाला होता.
‘वनगूढा वा प्रत्यन्तस्कन्धमुपनिष्कृष्याभिहन्यु: एकायने वीवधासारप्रसारान् वा’। (१२.४.२०) अरण्यात दडून बसलेल्या सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला पुढे यायला लावून त्याचा नाश करावा किंवा एकच मनुष्य जाऊ शकेल अशा मार्गावर शत्रूची रसद, कुमक व खाद्यन्वेषण करणाऱ्या तुकडय़ांचा नाश करावा. चिटणीस बखरीतल्या नोंदी पाहिल्या तर राजांची ‘आसनावस्था’ अगदी अशीच चालली होती. ‘मुघल सैन्याला मिळणारे गवत, लाकूडफाटा आणि रसद तोडून त्यांना एका जागी जखडून ठेवले. आम्ही युद्ध कशासाठी करावे, आम्ही त्याची रसद तोडून त्याला जेरीला आणू, त्याला एखाद्या अडचणीच्या जागी ओढून नष्ट करू, एखाद्या किल्ल्याला वेढा घालायला लावू आणि मारू, थोडक्यात कपट मार्गाचा वापर करू आणि त्याला घालवून लावू.’ (शिवाजी हिज लाइफ अँड टाइम, ग. भा. मेहेंदळे, पृ. २४९).
खान केवळ राजांच्या राज्यातच नव्हे तर प्रत्यक्ष राजांच्या लालमहालात तळ ठोकून बसला होता. राजावासमनुप्रविष्टा वा संकुलेषु राजानं हन्यु:। (१२.४.२२) शत्रू आपल्या निवासात शिरू शकतो या शक्यतेचा विचार कौटिल्यही करतो. अर्थातच अशा शत्रूला कोणत्याही प्रकारे ठार मारला पाहिजे असे स्पष्टपणे लिहितो. शत्रूला हुसकावून लावायचे वेगवेगळे उपाय कौटिल्यांनी अर्थशास्त्रात दिले आहेत. त्यानुसार गुप्त भिंतीत किंवा मूर्तीखालील तळघरात लपून शत्रू झोपला असता ठार मारणे, यंत्राने सुटा होणारा खोलीचा एखादा भाग सुटा करून त्याच्यावर पाडणे, लाक्षागृहात शत्रू झोपला असल्यास ते पेटवून देणे अशा काही उपायांबरोबर गुप्तहेरांचा वापर करून शत्रूला कसे ठार मारावे याचीही चर्चा बाराव्या ‘आबलियस’ या अधिकरणातील पाचव्या अध्यायात आहे. याच ठिकाणी पुढे कौटिल्य सांगतो, ‘प्रमदवनविहाराणामन्यतमे वा विहारस्थाने प्रमत्तं भूमिगृहसुरुङ्गगूढभित्तिप्रविष्टास्तीक्ष्णा हन्यु: गूढप्रणिहिता वा रसेन’। प्रमदवन, क्रीडागृह, यांसारख्या ठिकाणी शत्रू गैरसावध असता तळघर, भुयारी मार्ग, गुप्त भिंत यांतून प्रवेश करून तीक्ष्ण हेरांनी त्याला ठार मारावे किंवा तेथे नेमणूक केलेल्या गूढ पुरुषांनी त्याच्यावर विषप्रयोग करावा. याशिवाय, ‘प्रत्युत्पन्ने वा कारणे यद्यदुपपद्येत तत्तदमित्रेरन्त:पुर गते गूढसंचार: प्रयुञ्जीत। ततो गूढमेवापगच्छेत, स्वजनसंज्ञां च प्ररूपयेत’। (१२.५.५०) संधी आली असता जे जे उपयुक्त होण्यासारखे असेल त्या सर्वाचा आपल्या राजवाडय़ात राहणाऱ्या शत्रूवर, स्वत: गुप्त रीतीने संचार करून प्रयोग करावा. त्यानंतर गुप्तपणेच तेथून जावे आणि आपल्या पक्षातील लोकांना खुणा निश्चित करून द्याव्यात.
आता राजांनी आपल्या किल्ल्यात प्रवेश केलेल्या खानाला गुप्तहेरांमार्फत ठार न मारता स्वत:च मारायचा निर्णय घेतला.
सारी योजना आकार घेऊ लागली. काफी खानाच्या नोंदीनुसार, ‘एक दिवस मराठय़ांच्या सैन्यातील काही लोकांनी कोतवालाकडून दोनशे मराठय़ांना लग्नासाठी नगरात प्रवेश परवाना घेतला. आदल्या रात्री एक लहान मुलगा नवरदेवाच्या वेशात वाजतगाजत नगरात आला. साधारण त्याच वेळी काही मराठा सैनिकांनी हात बांधलेल्या इतर मराठीच कैद्यांना मारत झोडत सर्व चौक्यांवरू नेले. अशा प्रकारे सर्व मराठय़ांचा पुण्यात प्रवेश झाला’ (शिवाजी हिज लाइफ अँड टाइम, ग. भा. मेहेंदळे, पृ. २५५).
हा प्रवेश काही सहज नव्हता. सभासदीच्या नोंदींनुसार जागोजागी राजांना व त्यांच्या लोकांना चौकशीला तोंड द्यावे लागत होते. पण खानाच्या सैन्यात मराठे असल्यामुळे आम्ही सैन्यातील लोक आहोत व पहाऱ्यासाठी गेलो होतो असे सांगत राजांच्या दादाजी बापूजी व चिमणाजी बापूजी देशपांडे या वाटाडय़ांनी प्रवेश मिळवला होता. एक्याण्णव कलमी बखरीनुसार पुणेकर माळी फुलांचे हार खानास पोचवत असे. त्याचा मेहुणा राजांजवळ होता. त्याच्याकरवी राजांनी या माळ्याला पाचशे होनांना फोडले. या माळ्याने राजांना लालमहालातील सध्याच्या बदलांची माहिती दिली.
मुसलमानांचा हा रमजानचा महिना होता आणि बादशाहाच्या राज्यारोहणाचा सहावा वाढदिवस असा सगळा योग जुळून आला. या दिवशी ठरावीक वेळी नौबती व नगारे वाजवले जात. ६ एप्रिल १६६३ ची पहाट उगवली. कुणाला काही कळण्याच्या आत राजे व त्यांचे सैन्य लालमहालात शिरले. मुदपाकखाना व खानाचे शय्यागृह यातील भिंत तोडण्यात आली. खानाची खोली समजून राजे ज्या कक्षात शिरले तो कक्ष खानाच्या मुलाचा म्हणजे फत्तेखानचा होता. राजांनी त्याला ठार केले व शास्ताखानाच्या कक्षाकडे वळले. काळोखात राजांनी वार केला. खान कोसळला. खान मेला असे समजून सर्वजण आले त्याच वेगाने पसार झाले.
शहरात आधीच शिरलेल्या राजांच्याच लोकांनी गनीम, दगा असा आरडोओरडा करत पळापळ केली. आणि या गोंधळाचा फायदा घेऊन सर्वानी परतीची वाट धरली. पुणे ते सिंहगड या मार्गावर पाठलाग झालाच तर तीही योजना तयार होती.
कूटयुद्धात प्राण्यांचाही उपयोग करण्यास कौटिल्य सांगतो. ‘शुष्कचर्मवृत्तशर्कराकोशकैगरमहिषोष्ट्रयूथैर्वात्रस्नुभिरकृतहस्त्यश्वं भिन्नमभिन्न: प्रतिनिवृत्तं हन्यात्’ (१०.३.२२) गोल खडे असलेल्या, वाळलेल्या चामडय़ाच्या पिशव्या बांधलेले गाईंचे, म्हशींचे किंवा उंटांचे भेदरलेले कळप शत्रूसैन्यात सोडल्यामुळे त्यातील हत्ती-घोडे उधळतील व सैन्य विखुरले जाईल. याशिवाय, ‘चिरसंसृष्टा वा गोवाणिजका गवामजावीनां वा यूथान्यवस्कन्दकालेषु परेषां मोहस्थानेषु प्रमुञ्चेयु:..’(१२.४.१४) पुष्कळ काळपर्यंत छावणीत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गाईंचे किंवा शेळ्यामेंढय़ांचे कळप शत्रुसैनिकांचा गोंधळ उडेल अशा ठिकाणी सोडून द्यावेत.
जेधे, चिटणीस आणि सभासदी बखरींनुसार, लालमहालावर हल्ला करणारी टोळी जेव्हा बाहेर पडली तेव्हा आधीच ठरल्यानुसार खुणेची इशारत झाली. कात्रज घाटात दबा धरून बसलेल्या लोकांनी झाडांना व बैलांना बांधलेल्या मशाली पेटवून दिल्या. त्या हल्लेखारांच्या मशाली समजून मुघल सैन्य त्या दिशेने गेले व हल्लेखोर विरुद्ध दिशेने सुखरूप सिंहगडी पोचले.
मे १६६० मध्ये पुण्यात आलेल्या शाहिस्तेखानाची मोहीम अखेरीस ८ एप्रिल १६६३ रोजी संपली होती.
शिवाजीच्या ह्य अचाट मोहिमेचा शाहिस्तेखानाने इतका धसका घेतला की अवघ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ८ एप्रिललाच सारा कारभार जसवंतसिंहाकडे सोपवून तो पुण्याहून औरंगाबादला निघून गेला. पण शाहिस्तेखानाचे अपयश एवढे मोठे होते की पुढे लवकरच त्याची दख्खनची सुभेदारी काढून घेतली गेली. शाहिस्तेखानाबरोबर जयसिंगाचाही अपमान औरंगजेबाने केला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा