विलक्षण तयारीच्या आणि गोड गळ्याच्या जुन्या जमान्यातील गायिका कुंदा बोकील यांचे अलीकडेच निधन झाले. गेली अनेक वर्षे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या या विलक्षण गुणी गायिकेला श्रद्धांजली-

निळा सावळा नाथ
अशी ही निळी सावळी रात..
अभिमानाने मीरा वदते,
हरिचरणांशी माझे नाते..
वैकुंठीचा राणा तूची नारायणा..
शाळा सुटली पाटी फुटली..
ही गाणी आकाशवाणीवर नेहमी ऐकायला मिळतात आणि कुंदा बोकील या गायिकेचं नाव नव्याने समोर येतं. काही मोजकी गाणी गाणारी पण ती सर्व अजरामर करणारी ही गायिका गेले काही दशकं रसिक श्रोत्यांपासून, गायन क्षेत्रापासून आणि त्याबरोबर असणाऱ्या झगमगाटापासून अतिशय लांब, एक साधं-सरळ आयुष्य व्यतीत करत होती. ज्या काळात रेडिओशिवाय करमणुकीचं कोणतंच साधन नव्हतं, त्या काळात त्यांच्या गाण्यांनी आपलं बालपण समृद्ध केलं. त्याच काळातल्या नावाजलेल्या गायिका कुंदाताई भागवत (बोकील) ३० मे २०१५ रोजी अनंतात विलीन झाल्या. रसिकांपुढे त्यांचा सांगीतिक जीवनपट उलगडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न, हीच त्यांच्यासाठी माझी श्रद्धांजली.
कुंदाताईंच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात वयाच्या सहाव्या वर्षी झाली. जन्म बडोद्याचा, पण वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे प्राथमिक शिक्षण अहमदाबादला झालं. जात्याच गोड गळ्याची देणगी लाभलेल्या कुंदाताईंना शाळेतल्या एका कार्यक्रमात गायची संधी मिळाली. व्यासपीठावर चढून मोठय़ा धिटाईने त्यांनी गाणं गायलं. एक-दोन र्वष मुंबईत राहून वडिलांची पुन्हा बदली झाली ती इंदोरला. त्यांचं गाण्याचं शिक्षण खऱ्या अर्थाने इंदोरला सुरू झालं. १२-१३ वर्षांच्या कुंदाताईंना तिथल्याच संगीत विद्यालयाचे मुख्याध्यापक पंतवैद्य, शास्त्रीय संगीत शिकवत. कुंदाताईंचा गोड आवाज, त्यांची संगीतातली रुची आणि आकलन क्षमता पाहून ५०-५५ वर्षांच्या वयाचे हे संगीत शिक्षक ऊन-पावसाची तमा न बाळगता पाच-सहा मैल अंतर गावापासून लांब राहणाऱ्या बोकीलांच्या घरी जात. कुंदाताईंच्या गोड गळ्याला शास्त्रीय संगीताचं वळण पंतवैद्य यांनीच लावलं. त्यांच्यासारखा गुरू आपल्याला लाभला याचा सार्थ अभिमान कुंदाताईंना होता. शास्त्रीय संगीताबरोबरच कुंदाताईंनी गझल गायनाचे धडे महावीर प्रसाद यांच्याकडून घेतले.
गाण्यात करिअर करण्याबाबत कुंदाताई विशेष आग्रही नव्हत्या, परंतु गोड गळ्यातून उमटलेले सूर आकाशवाणीपर्यंत पोचले आणि आकाशवाणीच्या इंदोर केंद्राने त्यांचा पहिला गाण्याचा कार्यक्रम प्रक्षेपित केला. ते साल होतं १९५५ आणि कुंदाताईंचं वय होतं अवघं सोळा वर्षांचं. या मधुर आवाजाने इंदोरकरांना मंत्रमुग्ध केलं. १९५६ मध्ये दिल्लीला झालेल्या आकाशवाणीच्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत इंदोर आकाशवाणी केंद्रातर्फे त्या गायल्या व त्यांना राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिलं पारितोषिक मिळालं. त्यांच्या या यशाची दखल अनेक वृत्तपत्रांनी घेतली. ‘‘संपूर्ण कार्यक्रमात कुंदा बोकील यांनी पेश केलेलं सुगम गीत सर्वोत्तम होतं. त्यांचा आवाज अतिशय मधुर व गाणं मोहक आणि भावपूर्ण आहे,’’ अशा शब्दांत त्यांच्या गायनाचे कौतुक झालं. अर्थातच त्या आकाशवाणीच्या ए ग्रेड आर्टिस्ट झाल्या.
त्याच दरम्यान शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईला आल्या. रुपारेल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, पण मुंबई आकाशवाणीवर गाण्याचे नियमित कार्यक्रम चालू होते. त्यात प्रामुख्याने मुंबई केंद्रावर संगीत विभागात कार्यरत असलेल्या यशवंत देव, श्रीनिवास खळे या दिग्गज संगीतकारांच्या अनेक रचना ‘भावसरगम’ या कार्यक्रमात कुंदाताईंनी गायल्या. या कार्यक्रमात ‘श्रावणात घन निळा बरसला..’ हे मंगेश पाडगावकरांचं गीत कुंदाताई गायल्या आहेत हे चोखंदळ रसिकांच्या नक्कीच लक्षात असेल. नंतर एचएमव्हीने त्या गाण्याची ध्वनिमुद्रिका लता मंगेशकरांच्या आवाजात केली. मुंबईव्यतिरिक्त दिल्ली, जम्मू, श्रीनगर, लखनौ, जयपूर आणि नागपूर इथे झालेल्या नभोवाणी संगीत संमेलनात त्यांचे सुगम संगीत नावाजले गेले. या सर्व केंद्रांवर त्यांच्या गाण्याचे ध्वनिमुद्रणही झाले. हिंदी आणि मराठीव्यतिरिक्त गुजराथी, पंजाबी व कोकणी भाषेत त्यांची गाणी आहेत.
एचएमव्हीमध्ये जेव्हा कुंदाताईंनी पहिल्यांदा आपला आवाज ऐकवला तेव्हा, ‘‘अगदीच लहान मुलीसारखा आवाज आहे’’, असा अभिप्राय मिळाला होता. म्हणून खळे यांनी संगीतबद्ध केलेली ‘शाळा सुटली पाटी फुटली आणि गम्माडी गम्मत’ ही लहान मुलांसाठीची गाणी कुंदाताईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली गेली. ही त्यांची पहिली रेकॉर्ड. ही गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर अनिल मोहिले यांनी कुंदाताईंकडून दोन गाणी गाऊन घेतली, ज्याची एचएमव्हीने रेकॉर्ड काढली. त्यात ‘अभिमानाने मीरा वदते.. आणि प्रीतीचा पारिजात फुलला..’ या दोन्ही गाण्यांनी अमाप लोकप्रियता मिळवली.
एका चित्रपटाचं यशवंत देव संगीत दिग्दर्शन करत होते. त्या चित्रपटाची गाणी कुंदाताई गायल्या, परंतु तो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
१९६८च्या ‘मनोहर’ मासिकात गंगाधर महांबरे यांनी कुंदाताईंवर लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात, ‘‘चित्रपटासाठी पाश्र्वगायन करण्याचे समाधान कुंदा बोकील यांना ‘जिव्हाळा’च्या वेळी मिळाले. श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांना स्वरश्री लता मंगेशकर यांच्याबरोबर ‘या चिमण्यांनो, परत फिरा..’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली. हा बोकीलांच्या आयुष्यातला सुवर्ण योगच होता.’’ श्रीनिवास खळे यांच्या चरित्रात मात्र असा उल्लेख कुठेही आढळत नाही, परंतु त्या पुस्तकात खळ्यांनी कुंदाताईंचं खूप कौतुक केलं आहे. ‘‘आकाशवाणीच्या कारकीर्दीत अनेक, नवनवीन कलावंत खळे यांच्या स्वररचना गाऊन गेले. मात्र खळे यांच्या मनावर व जाणकार रसिक व आघाडीच्या कलावंत मंडळींच्या मनावर ठसा उमटवणारी गायिका म्हणून उल्लेख करावा लागेल तो कुंदा बोकील या गायिकेचा. हे नाव घेतलं की आठवण होते ती कविवर्य गंगाधर महांबरे यांच्या ‘निळा सावळा नाथ’ या गाण्याची. या गाण्याचं व त्याचबरोबर त्या स्वररचनेचं सोनं या गायिकेने केलं आहे.’’
याचबरोबर खळ्यांची आणखीन एक आठवण त्यात सांगितली आहे..
मुंबईला ‘रंगभवन’ सभागृहात एके दिवशी श्रीनिवास खळे, वसंत देसाई, सुधीर फडके, दत्ता डावजेकर व राम कदम अशा पाच संगीत दिग्दर्शकांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांचं पहिलं गाणं ‘सांग मला रे सांग मला’ हे दहा कडव्यांचं गाणं होतं. हे युगल गीत खळे यांनी कृष्णा कल्ले आणि कुंदा बोकील यांना गायला दिलं होतं.. दोघींनी गाणं सुंदरच सादर केलं. दुसरी स्वररचना ‘देवा दया तुझी’ हे गीत कुंदा बोकील हिनं विलक्षण तयारीने सादर केलं. आशाताई व लतादीदींनी समोर बसून त्यांची गाणी ऐकली. लताबाईंनी आत जाऊन कुंदाताईंचं कौतुक केलं होतं.
‘लय’ या गोष्टीवर मनापासून प्रेम असलेले खळे म्हणतात, ‘‘कुंदा बोकील या गुणी कलावतीला गाण्याची समज विलक्षण चांगली होती. संगीतात सूर शिकवून तयार करता येतो, पण ‘लय’ मात्र उपजतच असावी लागते. कुंदा बोकीलच्या आवाजात त्यांच्या स्वररचना अधिक चांगल्या प्रत्ययाला येण्याचे हेच प्रमुख कारण असावे. ‘निळा सावळा नाथ’ हे गीत सर्व रसिकांना आवडण्याचे हेच कारण. केरव्यातील किंवा भजनी ठेक्यातील हे गीत ‘कोमल गंधार’, ‘कोमल निषादा’च्या सान्निध्यात बांधले आहे. स्वररचनेतील लयीचा अंदाज व त्याला गायनातून कुंदा बोकील यांनी दिलेला न्याय हे त्या गीताचे वैशिष्टय़ आहे.’’
गंगाधर दांडेकर यांनी ‘गीत शाकुंतल’ हे ‘संगीत पुनर्मीलन’ या नावाने रचले होते. ‘रिझव्र्ह स्टार्स ड्रॅमॅटिक क्लब’ या नाटय़संस्थेने ते साहित्य रंगमंदिरात सादर केले होते. या संगीत नाटकात एकूण चोवीस पदांना प्रभाकर पंडितांनी संगीतबद्ध केलं होतं. तर स्नेहल भाटकर, शरद जांभेकर व कुंदाताईंनी ती आपल्या सुरेल सुमधुर आवाजात गायली होती. कुंदाताईंचा रंगभूमीवरचा हा पहिलाच अनुभव पण गीतांतील भावनांशी समरसून त्या अत्यंत कुशलतेने गायल्या आणि रसिकांची पावती मिळवली.
१९७०च्या आसपास दिलेल्या एका मुलाखतीत कुंदाताईंनी भावगीताबद्दलचे त्यांचे विचार मांडले आहेत. त्यांच्या मते भावगीत गायन ही एक स्वतंत्र आणि नाजूक तशीच अवघड कला आहे. त्यासाठी आवाजाला शास्त्रीय संगीताचा पाया हवाच. आवाज जितका लवचीक, तितकाच स्पष्ट हवा. चोरटय़ा आवाजात गाणे म्हणजे भावगीत अशी काहींची चुकीची समजूत असते. भावगीतातील स्वरांचा लवचीकपणा, शब्दातील भावना, हळुवारपणा, स्पष्ट शब्द या प्रमुख गोष्टी दाखवण्यासाठी आवाजावर ताबा असावा लागतो. या सर्व गोष्टी कुंदाताईंनी लीलया आत्मसात केल्या होत्या.
‘‘कुंदा बोकील कुठल्याही गायिकेची अंधपणे नक्कल न करता गातात. त्यांचा कल जास्त हळुवार, आर्त स्वरांची आणि शब्दांची गाणी गाण्याकडे आहे. स्वत:ची स्वतंत्र कल्पक बुद्धी वापरण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी आहे.’’ ‘निळा सावळा नाथ अशी ही निळी सावळी रात..’ या कुंदाताईंनी गायलेल्या गाण्याचे कवी, गंगाधर महांबरे यांनी कुंदाताईंबद्दल काढलेले उद्गार किती सार्थ आहेत याचा प्रत्यय त्यांचं प्रत्येक गाणं ऐकताना येतो.
कुंदा बोकील आपल्याला माहीत आहेत त्या गायिका म्हणूनच. पण त्यांच्या गळ्यात जे माधुर्य होतं, आवाजात जी जादू होती तितकीच सुंदर कला त्यांच्या बोटात होती. बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये एक वर्ष त्यांनी चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलं होतं. अनेक निसर्ग चित्रे आणि पोटर्र्ेट्स् त्यांच्या कुंचल्यातून सजीव झाली आहेत.
कुंदाताईंनी आकाशवाणीसाठी गायलेल्या गाण्यांची यादी बरीच मोठी आहे. पण बराचसा खजिना हा अजूनही आकाशवाणीच्या कडी-कुलपात असल्यामुळे ही मोजकी लोकप्रिय गाणी अनेकदा रेडिओवर लागतात.. जेव्हा उद्घोषिका गायिकेचं नाव सांगत असे ‘कुंदा बोकील’. गाणं ऐकता ऐकता मनात प्रत्येक वेळी एकच विचार येत असे, ५० वर्षांपूर्वी एखादी गायिका अशी मोजकी गाणी गाते.. गोड गळ्याची देणगी आणि शास्त्रीय संगीताची पक्की बैठक जिच्या गाण्यातून जाणवते, अशा लोकप्रिय गीतांची गायिका इतकी मोजकी गाणी गाऊन कुठे लुप्त झाली? शोधाशोध करूनसुद्धा हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकीच गाणी ऐकायला मिळतात, पण त्या प्रत्येक गाण्याची लोकप्रियता आज ५० वर्षांनंतर जरासुद्धा कमी होत नाही. मग असं काय झालं असेल की या गायिकेने संगीत क्षेत्रातून ‘एक्झिट’ घेतली?
गेले काही वर्षे या एका प्रश्नाने मला पछाडलं होतं. मी जुन्या भावगीतांची एक दर्दी रसिक, चिकाटीने त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या या मोजक्या गाण्यांच्या व्यतिरिक्त ना कोणती माहिती होती ना कुठे एखादा फोटो पाहिला होता, पण माझ्या प्रयत्नांना यश आलं. दोन महिन्यांपूर्वी मला त्यांचा ठावठिकाणा मिळाला. खूप आनंदाने मी त्यांच्याशी संपर्क साधला. अनेक वर्षांची माझी इच्छा पूर्ण होणार या आनंदात मी होते. फोन करून भेटण्याची इच्छा मी त्यांच्याजवळ व्यक्त केली, पण त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मी स्वत:वर संयम ठेवला. काही दिवसांनी त्या बऱ्या झाल्या की त्यांना भेटून त्यांची मुलाखत घ्यायची, मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची, हे पक्कं ठरवलं. पण नियतीने पुन्हा हुलकावणी दिली. आणि माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तर न देता कुंदाताईंनी या जगातूनच एक्झिट घेतली.
सत्तरच्या दशकात गायल्या गेलेल्या ज्या गाण्यात आपण आजही रममाण होतो आहोत, त्या गायिकेचा संगीतप्रवास उलगडावा या उद्देशाने त्यांच्यावर एक लेख लिहावासा वाटला. त्यासाठी त्यांच्या यजमानांनी, विष्णू भागवत आणि कुंदाताईंचे ज्येष्ठ बंधू शरद बोकील यांनी फार मोलाची मदत केली.
कुंदाताई, तुमचं असं जाणं मनाला चटका लावून गेलंय. तुम्हाला सांगायचं होतं की तुमची गाणी आम्ही आजही खूप आवडीनं ऐकतो. तुम्ही खूप गायला हवं होतं.. का गायला नाहीत हे जाणून घ्यायचं होतं. खूप ऐकायचं होतं. सांगायचं होतं.. सगळंच राहिलं..
तुमच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वसुधा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा