avinashआज बऱ्याच व्यक्तींचे वजन हे थोडेसे वाढलेले आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये सोनोग्राफी केल्यास त्यामध्ये यकृतातील चरबी वाढल्याचे आढळून येते. सर्वसाधारण व्यक्ती असा रिपोर्ट पाहून घाबरून जातात. आज आपण यकृतातील चरबीविषयी जाणून घेऊ या. काही वर्षांपूर्वीपर्यंत आयुष्यात निवांतपणा होता. जो आताच्या धकाधकीत कुठे दिसेनासा झाला आहे आणि या जीवनशैलीतील बदलाचे परिणाम आपल्या जीवनावर कुठे न् कुठे जाणवतच राहणार!

यकृतातील चरबीचे आजार (Fatty Liver disease) या आजाराचे प्रमाण समाजात हल्ली फारच वाढले आहे. यकृतातील चरबीचे प्रमाण चार ग्रेडमध्ये केले जाते. ग्रेड वन म्हणजे मामुली किंवा अगदी कमी प्रमाणात असते. तर ग्रेड फोर म्हणजे जास्त प्रमाणात असणे. बहुतांशी व्यक्तीमध्ये ग्रेड वन चरबीचे प्रमाण असू शकते. सुरुवातीच्या आजारात (ग्रेड वन) याचा काहीच त्रास होत नाही. यकृतामध्ये चरबी नुसती वाढल्यास त्याचा त्रास नसतो. ज्या व्यक्ती दारू पीत नाही किंवा कमी प्रमाणात घेतात त्यांच्या यकृतात चरबीचे प्रमाण वाढले तर या आजाराचे निदान केले जाते. चरबीचे प्रमाण जास्त असल्यास यकृतास सूज (Non Alcoholic Steato Hepatitis) येते. पुढे यकृतामध्ये जखमा व घट्टपणा येतो. त्यामुळे पुढे सिरेसिस (Cirrhosis) होतो व कर्करोगदेखील होऊ शकतो. जगभर आजच्या काळात दारूमुळे होणाऱ्या सिरेसिसपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे. साधारणत: सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिरेसिस होतो व १०-११ टक्के रुग्णामध्ये ते मृत्यूचे कारण होते.
यकृतातील चरबीची कारणे
जेव्हा आपल्या आहारातील चरबीचे योग्य रीतीने विघटन होऊन त्याचा योग्य वापर झाला नाही तर यकृतामध्ये चरबीची साठवण होते. आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ आणि त्यामानाने कमी व्यायाम/ हालचाल यामुळे असे होते. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड/ इतर अंत:स्रावाची कमतरता, स्थूलपणावर केलेल्या शस्त्रक्रिया (Gastric bypass Surgery) आणि कोलेस्टेरॉल/ ट्रायग्लीसराइडचे रक्तातील प्रमाण वाढणे यामुळे यकृतातील चरबीचे प्रमाण वाढते.
यकृतातील चरबीची लक्षणे
यकृतातील चरबीमुळे थकवा येतो. पोटाच्या वरच्या भागात उजवीकडे दुखते आणि वजन घटते. याचबरोबर अ‍ॅसिडिटी, पित्ताशयातील खडे असे आजार होऊ शकतात. वाढलेल्या चरबीचे निदान हे सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय अशा तपासण्यांमध्ये होते. रक्तातल्या तपासण्यात अछळ, अरळ, GGT  या एन्झाइमचे प्रमाण तपासावे. यकृतातील चरबीमुळे रक्तातील एन्झाइम्स वाढल्या असतील तरच काळजी करावी. सूज जास्त काळ राहिली तर बायोप्सी (यकृताचा तुकडा काढून तपासणे) करावी.
यकृतातील चरबीवर उपचार
या आजारावर स्थूलपणा, मधुमेह व अन्य आजारावरील नियंत्रण हाच मुख्य उपचार असतो. जीवनशैलीतील बदल सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. रोजचा नियमित व्यायाम, साखर कमी खाणे, स्निग्ध पदार्थाचा कमी वापर याने हे नियंत्रणात येऊ शकते. रिफाइंड, ऑलिव्ह, ब्रान किंवा कोर्न तेल हे यासाठी चांगले असते. व्हिटॅमिन ई, कॉफी व विविध औषधे यामुळे चरबीचे प्रमाण कमी होऊ शकते.
यकृतातील चरबी टाळायची असेल तर निरोगी जीवनशैलीची सूत्रे पाळावीत.
* मुलांनी मदानी खेळ खेळलेच पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
* उघडय़ावरचे पदार्थ, फास्ट फूड खाणे बंद करावे, घरूनच मुलांना पोषक डबा कसा देता येईल हे पाहावे.
* रोजचा सकाळचा नाश्ता ही सर्वासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. नाश्ता टाळू नये.
* दिवसातून एक-दोन तरी फळे खावीत.
* रोजच्या आहारात भरपूर फायबर म्हणजे चोथा असलेले अन्न उदा. पालेभाज्या, कोंडा न काढलेली भाकर, ओट्स इ.चा आवर्जून समावेश करावा.
रोज एक तास व्यायाम करावा. त्यात शरीराच्या प्रत्येक सांध्याची हालचाल होईल असे पाहावे. शिवाय एक तास रोज योगासने करावीत. त्यात सर्वागाला स्ट्रेचिंग म्हणजे ताणण्याचा व्यायाम घडतो. या व्यायामामुळे शरीर फीट राहतं, स्थूलत्व येत नाही; शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते.
आहार समतोल असावा – आहारात फळभाज्या, पालेभाज्या, कच्चे सॅलॅड, कोिशबीरचा समावेश असावा.
जेवताना शांत, आनंदी मनाने जेवावे ( टीव्ही सीरियल्स पाहात जेवू नये) त्यामुळे पाचकरस योग्य प्रमाणात स्रवतात व योग्य पचन होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या व आहाराचे स्वरूपही बदलले. सोनोग्राफीमध्ये यकृतातील चरबीचा रिपोर्ट पाहून घाबरू नका, पण जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करा. शरीर पोषणासाठी योग्य आहार, निरोगी, शक्तिमय, स्फूíतशाली आरोग्यासाठी योग्य व्यायाम आणि बलशाली, भक्कम मनासाठी – मानसिक संतुलन ठेवणे आवश्यक आहे. मनाला थोडा निवांतपणा मिळण्यासाठी रोज ध्यानधारणा, शवासन इ. करावे. निरामय आरोग्यासाठी वरीलपकी काही गोष्टी जरी मनावर घेऊन केल्या तर बदलत्या जीवनशैलीमुळे असणारे आजारपण तुमच्यापासून नक्की दूर पळेल.
डॉ. अविनाश सुपे – response.lokprabha@expressindia.com

Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता