उन्हाळ्यामध्ये लांब केसांची हेअरस्टाइल करणे, हे त्रासदायक काम असते. प्रवास करताना केस सुटे ठेवता येत नाहीत, घामामुळे केस चिकट होतात. अशा वेळी झटपट, सोप्या पण छान दिसतील अशा कोणत्या हेअरस्टाइल्स आहेत?
– मृण्मयी शिरसाट, २७.

उन्हाळ्यात केसांची समस्या असतेच. मुख्यत: रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाताना ट्रेन, बसमध्ये घामाघूम होऊन गेल्यावर केसांमध्ये घाम जमा होणे, त्यातून वास येणे, ऑइलीनेस जाणवणे हे नेहमीच असते. त्यात लांब केस असणं आणि त्यांना सांभाळणं हे दुसरं महादिव्य असतं. त्यामुळे ही समस्या सगळ्यांचीच असते. शक्यतो मुली उन्हाळ्यात लांब केसांची वेणी बांधायला पसंती देतात. पण वेणी बांधताना केसांना तेल लावून घट्ट वेणी बांधण्यापेक्षा मेस्सी वेणी बांधून बघ. त्यासाठी केस धुऊन अर्धे सुकल्यावर त्यांना थोडं चुरगळून वळण दे आणि त्यांची वेणी बांध. हाय पोनी पण बांधता येतो. त्यासाठी पोनी नेहमीपेक्षा थोडा वरच्या बाजूला बांधायचा. पण खालच्या बाजूने त्याला पिना लावायला विसरू नकोस. त्याने पोनी जागेवर टिकून राहतो आणि त्याचा उठाव कायम राहतो. नाहीतर कित्येकदा आपण बांधलेला पोनी थोडय़ा वेळाने खाली दाबला जातो. साइड पोनी बांधायलापण हरकत नाही. ती स्टाइलपण मस्त दिसते. मेस्सी बनसुद्धा करता येतो.
पण हे सगळं करताना पुरेशा पिना जवळ असणं महत्त्वाचं. केसात घामामुळे वास येण्याबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या केसांचे डिओज बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर नक्कीच करू शकतेस. फक्त त्यांना केसांच्या मुळाकडे फवारणे टाळ. केस सुट्टे ठेवायचे असतील तर ड्राय कंडिशनर जवळ ठेवून दे. म्हणजे ऑफिसला पोहोचल्यावर त्याच्याने केसांचे मूळ वळण परत मिळवता येते. बाहेरून आल्यावर हेअरड्रायर किंवा पंख्यासमोर उभे राहून केसातला शक्य तितका घाम सुकवायला मदत होते.

सध्या मुलांमध्ये गुलाबी रंगांच्या कपडय़ांचा ट्रेंड आहे. हा रंग मुलींसाठी आहे असंच आतापर्यंत समजलं जायचं. थोडा भडक असल्याने तो रंग पटकन उठून दिसतो. या रंगाला ड्रेसिंगचा भाग नक्की कसा करता येऊ शकतो?
– सुयश जाधव, २५.

गुलाबी रंग मुलींसाठी आणि निळा रंग मुलांसाठी हे समीकरण लहानपणापासून आपल्या मनात पक्कं केलेलं असतं. त्यामुळे मुलं शक्यतो गुलाबी रंगाच्या आसपास फिरायला पण घाबरतात. पण सध्या हाच रंग मेन्सच्या ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे आता तरी मुलांना या रंगापासून पळता येणं शक्य नाही. सर्वप्रथम गुलाबी रंगाच्या फिकट छटेने सुरुवात कर. या छटेचे टी-शर्ट्स किंवा शर्ट्स तू नक्कीच वापरू शकतोस. प्रिंटेड टी-शर्ट्स असतील तर उत्तमच. तरीही भीती वाटत असेल तर त्यावर एखादा डार्क शेडचा शर्ट किंवा जॅकेट घाल, जेणेकरून मूळ गुलाबी रंग काहीसा लपला जाईल. चेक्समध्ये गुलाबी रंग वापरणे हा सगळ्यात सोप्पा पण मस्त पर्याय आहे. त्यामुळे चेक्स शर्ट्स ट्राय कर. गडद गुलाबी रंगाची ट्राऊझर वापरायला हरकत नाही. अर्थात त्यासोबत शर्ट किंवा टी-शर्ट मात्र गडद किंवा अर्धी शेडच वापरायला हवं. त्यामुळे रंग एकमेकांमध्ये क्लॅश होत नाहीत आणि सटल लुक मिळतो. गुलाबी स्कार्फ डार्क टी-शर्टवर मस्त दिसतो. कुर्त्यांमध्येसुद्धा गडद गुलाबी शेड छान दिसते. छोटे कुर्ते जीन्सवर घालता येतात.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत