घरगुती उपकरणांविषयी बोलावयाचे झाले तर सर्वात आधी नाव घ्यावे लागेल ते टीव्हीचे. आपल्याला जगाशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडून ठेवणारं माध्यम म्हणजे टीव्हीच. आज इंटरनेट थ्रीजी, फोरजीच्या जमान्यातही भारतासारख्या देशात टीव्ही हेच सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचावयाचे प्रभावी माध्यम आहे. तर असं हे घरातील सर्वात महत्त्वाचं वापरलं जाणारं उपकरण जेव्हा आपल्याला खरेदी करावयाचं असतं तेव्हा आपण दिवाळी, नववर्ष, दसरा, पाडवा यांसारखा सर्वाधिक डिस्काऊंट असणारा दिवस पाहातो. एखाद्या जवळच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात जातो, ‘आम्हाला टीव्ही घ्यायचा आहे. चांगला टीव्ही दाखवा’, असं दुकानदाराला सांगतो, तो त्याच्याकडे असलेली चार मॉडेल्स दाखवतो. प्रत्येकाचे चार फीचर्स सांगतो. ज्यातलं आपल्याला थोडं कुतूहल वाटतं. आणि सरते शेवटी तो ‘ये टीव्ही लेकर जाओ.. मैने गये हप्ते मे ग्यारा पीस बेचे, सबसे अच्छा है.’, असं म्हणून त्याला जो विकायचा असतो तो टीव्ही आपल्या गळ्यात बांधून मोकळा होतो. दहा रुपयांची भाजी घेताना चोखंदळ पणा दाखविणारे आपण कित्येक हजारांची वस्तू खरेदी करताना चोखंदळपणा का दाखवीत नाही? हाच प्रश्न मी आमच्या शेजारच्या काकांना विचारला तेव्हा आपल्याला त्यातलं फारसं काही कळत नाही रे.. या त्यांच्या आणि अनेकांच्या मनातील प्रश्न कम तक्रारीवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न-

गरज, साइझ आणि बजेट
या तिन्ही बाबी एकत्र नमूद करण्याचे कारण म्हणजे तशा त्या एकमेकांना पूरक आहेत. आपल्या जुन्या टीव्हीचा पार जीव गेल्याशिवाय ‘अब रिपेअर नही होता’, असं दुरूस्त करणारा माणूस म्हणाल्याखेरीज किंवा रिपेअरिंग कॉस्ट ही नवीन टीव्हीपेक्षा जास्त गेल्याखेरीज, अचानक बजेट रोडावल्याखेरीज सहसा भारतीय घरात नवीन टीव्हीबाबत चर्चा होत नाहीत. ही झाली गरज आणि मग घेतोच आहोत तर जरा मोठा घेऊ असा विचार करतो. म्हणूनच आपण टीव्ही घेताना काय काय पहायचं असतं याची सविस्तर चर्चा करू.
सध्याच्या स्मार्ट जमान्यात टीव्हीसुद्धा स्मार्ट झाला आहे. त्यामुळे फक्त एखादी मालिका अगर बातम्या पाहाणे यापुरतं टीव्हीचा उपयोग राहिलेला नाही, सध्या वाय-फायवरून फेसबूक तसंच मेल आपण टीव्हीवर चेक करू शकतो, यूएसबी कनेक्शनमुळे टीव्हीवर कधीही गाणी ऐकता येऊ शकतात. थ्रीडी, एचडी यांसारख्या असंख्य सुविधा उपलब्ध असतात. त्यानुसार आपली गरज काय हे ठरवू शकतो. या साऱ्यांबद्दल अधिक विस्तृत चर्चा आपण करणारच आहोत. ज्यांना फास्ट अ‍ॅक्शन स्पोर्ट्स पाहाण्याचे खूप वेड आहे ते प्लाझ्मा टीव्हीचा विचार करू शकता. बऱ्याचदा गेमिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रीनचे रिझोल्यूशन जास्तीचे असल्यास उत्तम ठरते, साऱ्या बाबींचा विचार करून आपली गरज आपण ठरवू शकतो.
नवीन टीव्ही घ्यायचा ठरलं की महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणजे साइझ. ते ठरविण्यासाठी एक ढोबळ गणित आहे. आपल्या घरातील टीव्हीची जागा आणि टीव्ही पाहण्यासाठी बसणारा माणूस यांच्यातील अंतर ४ ते ६ फूट असेल तर १८ ते २६ इंची टीव्ही घेणे सोयीस्कर आणि पुरेसे ठरते हेच अंतर जर ६ फुटांपेक्षा जास्त ८ फुटांपर्यंत असेल तर २७-३६ इंच टीव्हीची निवड करण्यात काही गैर नाही, आणि हे अंतर त्याहीपेक्षा अधिक असेल तर ३६ इंचीपेक्षा जास्त साइझच्या स्क्रीनचा आपण विचार करणे सोयीचे ठरेल. बजेट ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. भारतीय बाजारात विविध कंपन्यांचे, प्रकारांचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्याबद्दल आपण या आणि पुढच्या भागात बोलणार आहोतच. परंतु एकदा आपला बजेट ठरला की पुढील बाबींची निवड करणे सोपे होऊन जाते.
प्रकार
सी.आर.टी- हा प्रकार म्हणजे आता जुने झालेले टीव्ही. कॅथोड रे टय़ूब वापरून किरणे तयार केली जातात आणि फॅस्फरस आयोनाइझ स्क्रिन वापरून त्यावर आपल्याला चित्र दिसते.
फायदे
या प्रकारच्या टीव्हीची किंमत सर्वात कमी आहे.
वर्षांनुवर्षे हीच टेक्नोलॉजी वापरली जात असल्यामुळे टीव्ही बिघडण्याची शक्यता कमी.
रिपेअरिंग चार्जेस इतरांच्या तुलनेत कमी.
तोटे
यामध्ये कॅथोडरे टय़ूब वापरली जाते ज्यामुळे या प्रकारचा टीव्ही जास्त जागा व्यापतो.
कमी, उपलब्ध रंगसंख्या कमी.
एलईडीच्या तुलनेने जास्त इलेक्ट्रिसिटी घेतो.

एलसीडी- लिक्विड क्रिस्टलाइन डिस्प्ले
यामध्ये लिक्विड क्रिस्टल या मटेरिअलचा वापर चित्र प्रदर्शित करण्यासाठी करतात म्हणून याला एलसीडी, असे संबोधले जाते.
फायदे
या प्रकारचे टीव्ही हे पातळ व कमी जागा व्यापणारे असतात.
सीआरटीपेक्षा जास्त चांगली डिस्प्ले क्वॉलिटी उपल्ब्ध असते
उत्तम रिझोल्यूशन उपलब्ध होऊ शकते. सीआरटीपेक्षा जास्त रंग स्क्रीनवर पाहता येऊ शकतात.
तोटे
या प्रकारचे डिस्प्ले जास्तीत जास्त वीज वापरतात
एलईडी आणि प्लाझ्मा टीव्हीच्या तुलनेत कमी रिझोल्यूशन रंग व पिक्चर क्वॉलिटी
व्डूइंग अँगल हा एलसीडी स्क्रीनचा सर्वात मोठा तोटा आहे म्हणेज जर आपण टीव्हीच्या अगदी समोर बसलो तर आपल्याला सगळे रंग आणि चांगली पिक्चर क्वॉलिटी दिसते; परंतु या सरळ रेषेपासून जरा डावीकडे अथवा उजवीकडे सरकून टीव्ही पाहिलात तर पिक्चर क्वॉलिटी कमी होते आणि रंगदेखील कमी दिसतात
प्लास्मा-
स्थायू द्रव आणि वायू याप्रमाणे प्लाझ्मा ही पदार्थाची एक अवस्था आहे. आयनाइज्ड गॅस हे चित्र प्रदर्शित करण्यासाठी वापरले जातात म्हणून यांना प्लाझ्मा टीव्ही म्हणून संबोधले जाते.
फायदे
एलसीडीप्रमाणे हे टीव्हीदेखील पातळ आणि कमी जागा व्यापणारे असतात.
एलसीडीच्या तुलनेने उत्तम पिक्चर आणि रेझोल्यूशन क्वालीटी उपलब्ध होते
फास्ट एक्शन स्पोर्ट पाहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून या प्रकारच्या टीव्हीचा विचार केला जातो
घरात सिनेमा बघण्याची हौस असणाऱ्यांनादेखील प्लाझ्मा टीव्ही आवडणारी गोष्ट आहे कारण यामध्ये दिसू शकणारे रंग हे जास्त नैसर्गिक वाटतात
तोटे
ह्य प्रकारचे टीव्ही सर्वाधिक वीज वापरतात त्यामुळे ते आपल्यासाठी महागडे ठरू शकतात. त्यामुळे फक्त नैसर्गिक रंगांसाठी जास्त विजेचे बील भरणे परवडणारे नाही, त्यामुळे शक्यतो हा पर्याय टाळलेला बरा
एल ई डी-
सध्या बाजारात टीव्हीमध्ये सर्वाधिक चर्चेचा प्रकार म्हणजे एल ई डी टीव्ही यामध्ये एल सी डी सारखीच टेक्नोलॉजी वापरली जाते फक्त एक फरक तो म्हणजे एल सी डी टीव्हीमध्ये स्क्रीन प्रकाशीत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दिव्यांऐवजी लहान लहान एल ई डीचा वापर केला जातो या मध्ये दोन प्रकार असतात
१. एज लीट एल ई डी- या प्रकारच्या स्क्रीनमध्ये स्क्रीनच्या बाजूला एल ईडी वापरले जातात म्हणून याला एज लीट असे म्हणतात यामुळे ह्य प्रकारचे टीव्ही हे अतिशय पातळ असतात. परंतु बऱ्याचदा या प्रकारच्या टीव्हीमध्ये अनियमित प्रकाश आणि रंगांच्या डिस्प्लेमध्ये थोडी समस्या उद्भवू शकते. सध्या अनेक कंपन्यांचे असे दावे आहेत की त्यांच्या टीव्हीमध्ये ही समस्या उद्भवत नाही.
२. बॅक लीट मॉडल- या प्रकारच्या स्क्रीनमध्ये फक्त स्Rीनच्या बाजूला एल ई डी न देता संपूर्ण स्क्रीनभर मागे एल ई डी असतात. त्यामुळे एज लीट इतके स्लीम टीव्ही उपलब्ध होत नसले तरी या प्रकारातील टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी उत्तम असते.
फायदे
एलईडी टीव्ही सर्वसामान्य बजेट असणाऱ्यांसाठी उपलब्ध बजेटमध्ये उत्तम टेक्नोलॉजी पुरविणारा टीव्ही आहे.
या प्रकारचे टीव्ही हे सर्वात कमी बीज वापरतात
या प्रकारच्या टीव्हीमध्ये व्ह्य़ूवींग अँगलचा प्रश्न फारसा उद्भवत नाही ( म्हणूनच रेल्वे स्थानकांवर एलईडी डिस्प्ले बसविण्यात येतात)
एलसीडी, प्लाझ्माच्या तुलनेने चांगले रिझोल्यूशन उपलब्ध होते.
तोटे
प्लाझ्माच्या तुलनेने रंग दाखविण्याची क्षमता जरा कमी आहे.
ओएलईडी-
ओएलईडी म्हणजे सध्या बाजारात असणारी नवीनतम टेक्नोलॉजी. यामध्ये एलईडी आणि प्लाझ्मा. दोहोंचे फिक्चर्स एकाच टीव्हीमध्ये आपणांस उपलब्ध होतात. काही ठरावीक आणि इंटरनॅशनल कंपन्या या प्रकारच्या टीव्हीचे उत्पादन करताना दिसतात ज्यामध्ये सॅम्संग आणि एलजी या कंपन्या आघाडीवर आहेत.
ही टेक्नोलॉजी उत्तम असली तरी यासाठी चांगली रक्कम आपल्याला मोजावी लागते.
एचडी- स्क्रीन रिझोल्यूशन ही महत्त्वाची बाब असते, सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास टीव्हीवर दिसणारे चित्र अतिशय सुस्पष्ट दिसते. कारण टीव्हीच्या स्क्रीनची चित्र दाखविण्याची क्षमता काही पटींनी वाढविलेली असते. ज्यामुळे चित्रातील बारीकसारीक गोष्टीही सुस्पष्टपणे आपणांस पाहता येतात. जेवढे जास्त स्क्रीन रेझोल्यूशन तितकी जास्त वीज वापरली जाते, त्यामुळे एचडी टीव्ही हे अधिक वीज वापरतात.
फोर के – सर्वात लेटेस्ट टेक्नोलॉजी असे याला संबोधता येऊ शकते. यामध्ये स्क्रीन रेझोल्यूशन हे एचडीपेक्षा चार पटींनी अधिक वाढविलेले आहे, ज्यामुळे एचडीपेक्षाही अधिक उत्तम आणि सुस्पष्ट चित्र आपण पाहू शकतो. अर्थात एचडीप्रमाणे यामध्येही अधिक वीज वापरली जाते. आणि किंमतही जास्तीची मोजावी लागते.
टीव्ही कधी घ्यावा?
या प्रश्नाचे उत्तर सोपे म्हणजे आपल्याला गरज असेल तेव्हा असे असले तरी गेल्या काही वर्षांत टीव्हीच्या किमतींकडे नजर टाकल्यास, असे लक्षात आले आहे की साधारण पावसाळ्याच्या सुमारास टीव्हीच्या किमती या कमी असतात. त्यामुळे घाई नसेल तर जून ते ऑगस्ट हा काळ टीव्ही खरेदीसाठी उत्तम ठरू शकतो.
सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व प्रकारातील उत्तम टीव्ही सेट त्यांचे विशेष फीचर्स आणि त्यांच्या सर्वसाधारण किमती यांबद्दल पुढील भागात आपण जाणून घेऊ.
प्रशांत जोशी