lp54त्र्यंबक रांगेतली मोरबारी घाट- भास्करगड- हर्षगड- त्र्यंबकगड- भंडारदुर्ग अशी भटकंती केलेली. चेहरे रापलेले, पायांना ब्लिस्टर्स आलेले, सॅक्स रिकाम्या झाल्यात, पण सोबत घेऊन निघालो होतो रोमांचक अनुभवांनी गच्च भरलेली पोतडी!

मध्यरात्रीच्या पुणे – नाशिक एशियाड प्रवासाने अंग आंबून गेलेलं.. पहाटे साडेतीनला कुडकुडत्या थंडीत गर्रम कांदापोहे अन् चहा हवाच की! प्लॅटफॉर्मवर डुलक्या घेत असतानाच, ‘जव्हार’ एस.टी.ने लपेटदार वळण घेत एन्ट्री मारली. अभी आणि मी दोघेच ट्रेकला निघालो असल्याने, सामानानं लादलेल्या अजस्र सॅक्स आणि बूड टेकवायला जागा कशीबशी मिळवावीच लागली. एस.टी.च्या खिडक्यांचा जुर्र्र आवाज आणि त्याहीपेक्षा मोठ्ठय़ा आवाजात चाललेला जनतेचा गुजराती-िहदी-मराठी मिश्रित गलका अस झाला, म्हणून खिडकीबाहेर डोकावलो..

Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…

.. चांदण्यात डोंगर-सुळक्यांच्या कडा आभाळाच्या पटावर उजळलेल्या. नकाशात डोकावलो, तर सह्यद्री घाटमाथ्याजवळ ‘उतवड’ डोंगरापासून सुरू होऊन पूर्वेला धावणाऱ्या ‘त्र्यंबक रांगे’तल्या भास्करगड, हर्षगड, त्र्यंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी, गडगडा, बहुला अशा विलक्षण डोंगर-दुर्गाची रेलचेल दिसली. प्राचीन बंदरे (नालासोपारा, डहाणू, वसई) आणि नाशिकची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या ‘गोंदा घाटा’वर लक्ष ठेवण्यासाठी हे दुर्ग उभारले होते. म्हणूनच, त्र्यंबक रांगेच्या आमच्या ट्रेकमध्ये कोकणाच्या बाजूने चढणारी जुनी घाटवाट आणि थोडकं दुर्गवैभव धुंडाळावं, असा बेत होता..

..वळणावर ड्रायव्हरनं ब्रेक मारला, अन् विचारांची तंद्री मोडली. अंगावर सणसणीत काटा आला-एस.टी.च्या बंद खिडक्यांमधून घुसू पाहणाऱ्या कडक थंडीमुळे आणि ‘जव्हार-त्र्यंबक’ गाडीरस्ता आता त्याच पुरातन ‘गोंदा घाटा’तून जात असल्यानेही!!!

मोरबारी – रटाळ रखरखीत घाटवाट..

कोकणातून त्र्यंबक रांगेचं दर्शन घेण्यासाठी ‘मोरबारी’ नावाच्या पाऊलवाटेने आम्ही चढणार होतो. गंतव्य ‘भास्करगड’ असला, तरी आधी नतमस्तक व्हायचं समोरच्या बलदंड ‘उतवड’ डोंगराच्या चरणी. नंतर पदरातून आडवं जात ‘भास्करगड’चा पायथा गाठायचा असा ‘मोरबारी’ घाटाचा ३ तासांचा पल्ला आहे. कोकणातून ७०० मी. उंच उठवलेले धूसर गूढ डोंगर, उजाडल्यावर ओकेबोके वाटू लागले. एकीकडे मोखाडय़ाजवळचा वाघ तलाव आणि दुसरीकडे खोच तलाव यांमुळेच काय ते आसमंतात थोडेफार चतन्य होते. उतवडच्या रखरखीत डोंगरापासून उतरलेल्या लांबचलांब रटाळ सोंडेवरून तब्बल दीड तास चाललो. जड सॅक्सची सवय नसल्याने खांदे बोलत होते आणि रात्रीची अपुरी झोपही जाणवत होती. ट्रेकची सुरुवातच अशी रटाळ झालेली. अखेरीस, मोरबारीच्या सलग तीन तासांच्या चढाईनंतर, समोर दिसू लागला ‘भास्करगड’.

पाण्यासाठी वणवण, पण अमृत गवसलं..

सोबत प्रत्येकी चार लिटर पाणी होतं, तरी तळपत्या उन्हात पाणी झपाटय़ाने संपू लागलेलं आणि गडावर पाणी नाही. उतवड डोंगर आणि भास्करगड यांच्यामधल्या बेचक्यात पाणी शोधण्यासाठी केलेली वणवण व्यर्थच गेली. अखेरीस पाण्यावाचूनच भास्करगडची उभी धार चढायला सुरुवात केली. गडाच्या कातळमाथ्यापासून ५० मीटर खाली पोहोचलो, अन् अचानक सामोरा आला एक च-म-त्का-र.. ‘र्हुे – पाण्याचं टाकं’!!! पाणी काढायला कॉटन-िस्लगची लांबी कमी पडली, तर त्याला बुटांची लेस जोडणं किंवा पाणी गाळायला रुमाल – असले ‘जुगाड’ ट्रेकर्सना कधी शिकवावे थोडीच लागतात. चला पाण्याचं कोडं तर सुटलं आणि पौष्टिक सँडविच पोटात गेले. ट्रेकची मफल आता कुठे जमायला लागलेली.

आता आमचं लक्ष्य होतं भास्करगडचा माथा. गडाला बिलगून दगडांच्या राशींवरून-झुडपांमधून घुसत गेलो. द्वाररचना अग्गदी बघण्यासारखी – कातळकडय़ात कोरून काढलेला ‘नागमोडी जिना’ – रुंद पायऱ्या, एका बाजूला उंच कठडा आणि नागमोडी वळणं घेत जाणारा मार्ग. काही पायऱ्या व्यवस्थित, तर काहींवर मोठ्ठाल्या दगडांचं अतिक्रमण. लपेटदार वळण घेऊन कातळकोरीव जिना द्वारापाशी घेऊन गेला. प्रवेशद्वार lp55निम्म्याहून जास्त मातीनं बुजल्याने, विनम्र होऊन झुकून गडात प्रवेश केला. कोरलेल्या जिन्याची ही सगळी रचना बघता, भास्करगडची बांधणी सातवाहन काळातील असावी.

..माथ्यावर उधाणलेल्या खटय़ाळ वाऱ्यानं पाचोळा अन् मातीसोबत ‘भोवरा’ बनून, घिरक्या मारत आमची फार भंबेरी उडवून दिली. पण, करकरीत उन्हात तापणाऱ्या ‘त्र्यंबक’ रांगेचं थरारक दृश्य पाहून आमचं भानंच हरपलं. पूर्वेला रौद्र-भीषण कडय़ांचा सह्यद्रीतला ‘सर्वागसुंदर’ हर्षगड काय देखणा दिसतो म्हणून सांगू. हर्षगडाच्या अल्याड फणी डोंगर, तर पल्याड होते कापडय़ा – ब्रह्मा डोंगर, मागचा त्र्यंबकगड (ब्रह्मगिरी) आणि धूसर होत गेलेली अंजनेरी रांग असे बहुत जुनेजाणते दुर्ग. दक्षिणेला अप्पर वैतरणा धरणाचं लकाकणारं पाणी आणि त्यासोबत लांबवर पसरलेल्या वाडय़ा-वस्त्या-वळणवेडे रस्ते.. गडावर पिण्याचं पाणी, सावलीला बरं झाड आणि राहण्यास जागा बिलकूल नाही. गडाला चोहोबाजूंनी ५० मीटर कडय़ाची बेलाग नसíगक तटबंदी असल्याने रचीव तटबंदी फारशी नाहीच. परंतु, देवगिरी, बहामनी, निजामशाही, मोगल, मराठे, परत मोगल, कोळी, पेशवे आणि इंग्रज अशी कित्येक स्थित्यंतरे गडाने अनुभवली आहेत.

भास्करगडाच्या अनवट रौद्र सौंदर्यामुळे त्याचा निरोप घेताना पाय अंमळ जडच झालेले.. उत्तरेला उतरत जाणाऱ्या सौम्य सोंडेवरून पाऊलवाट िखडीत उतरली. ट्रेक रूटनुसार इथून दोन तास चढाई करून – फणी डोंगर बाजूला ठेवत हर्षगडच्या पायथ्याशी गणेश आश्रमात मुक्कामाला पोहोचायचं होतं. पण दिवस अगदीच कललेला, रानात पाण्याची शाश्वती नाही, अतिरिक्त श्रम झालेले. म्हणून, िखडीत लागलेल्या निरगुडपाडा ते आंबोली रस्त्यावर उजवीकडे वळून निरगुडपाडा (टाकेहर्ष) गावात मुक्काम केला.

रात्री गप्पा मारायला आलेला एक मोबाइलधारी वीर भलताच बडबडय़ा निघाला. हा हिरो म्हणतो, ‘‘..इथल्या रानातून लाकडं तोडून शहरात ट्रकनी पाठवायची ह्य़े माजा धंदा. एखाद्या हॉटेलमध्ये भेटून ‘थली दिली’, की इथं रानात साला कोनी अडवत नाही आपल्याला. पन येक सांगतो, गेली १५ र्वष म्या इथं काम करतोय, पन या रानात आता काही ती मजा नाही राहिली. सरकारनी जरा साग-साल असली जबरी झाडं लावायला पाहिजेत की नाही. सांगा पघा तुम्हीच’’ आम्ही अ-वा-क!!!

सह्यद्रीतला सर्वागसुंदर दुर्ग – हर्षगड

सह्यद्रीमधल्या अनोख्या दुर्गामध्ये ‘हर्षगड’ ऊर्फ ‘हरिहर’चं स्थान फार मोलाचं. खूप कवतिक ऐकल्यामुळे आमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली, म्हणून भल्या पहाटे निघून पाऊण तासात हर्षगडाच्या पठारावर पोहोचलो. नाजूक रानफुलांच्या साथीमुळे आणि वाऱ्याच्या मंद झुळकांमुळे ट्रेकची लज्जत वाढत चाललेली.

.. १८१८ मध्ये मराठय़ांच्या साम्राज्याची ‘शक्तिपीठे’ असलेले दुर्ग निकामी करण्याचा ‘खुळा-नाद’ इंग्रजांना जडला होता. ‘हर्षगड’ निकामी करण्याचं ‘कृत्य’ कोण्या एका ब्रिटिश ‘कॅप्टन ब्रिग्ज’कडे होतं. पण, झाली वेगळीच गंमत. हर्षगड जिंकल्यावर गडाच्या अनवट सौंदर्यानं हा गडी खुळावून लिहितो, ‘वर्डस् कॅन गिव्ह नो आयडिया ऑफ इट्स ड्रेडफूल स्टीपनेस. इट इज परफेक्टली स्ट्रेट फॉर, आय सपोज टू हँड्रेड फीटस् अँण्ड कॅन ओन्ली बी कम्पेअर्ड टू अ लॅडर ओव्हर अ हाइट ऑफ धिस नेचर.’

हर्षगडचा चढाईमार्ग आजही आपल्याला ‘जसाचा तसा’ बघायला मिळतो, म्हणून गडाच्या ‘स्थापत्यशास्त्रज्ञा’सोबतंच, त्या कोण्या ‘ब्रिग्ज’च्या ‘गुणग्राहकते’लादेखील सलाम करून चढाई सुरू करायची..

७५ अंशांत उभ्या, किंबहुना आभाळास भिडलेल्या कडय़ांमध्ये कोरलेल्या पायऱ्या; आणि पायऱ्या जिथे संपतात त्या बेचक्यात मोठ्ठय़ा कलात्मकतेने रचलेलं गडाचं प्रवेशद्वार हा हर्षगडाचा पहिला टप्पा! तिनेक फूट रुंद अन् दीड-दोन फूट उंच अशा सणसणीत ९० पायऱ्या आणि आधाराच्या खोबणी असलेला दगडी जिना सावकाश चढत निघालो. ऊर धपापायला लागलं. छोटेखानी बुरूज असलेल्या द्वारामधून गडात प्रवेश केला, शेंदूरचíचत गणेशमूर्तीला वंदन केलं आणि हुश्श केलं.

हर्षगडच्या मार्गाचा थरार अजून बाकी होता. हर्षगडाचा दुसरा टप्पा म्हणजे ब्रिग्जने ‘रॉक कट गॅलरी’ असं वर्णन केलेला धम्माल मार्ग. पोकळ चौकोनी पाइप उभा कापल्यावर उजवीकडचा अर्धा भाग जसा उलटय़ा इंग्रजी ‘सी’ अक्षरासारखा दिसेल, अशा आकारात कातळकडय़ात कोरून काढलेला मार्ग वाकून चालत जात पार केला. तिसऱ्या टप्प्यात कातळात खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर १३० पायऱ्यांचा दगडी जिना खोबणीमध्ये हात रुतवत पार केला. पूर्वीच्या कडय़ावरच्या बारीक पायऱ्या आणि त्याच्यालगतच्या कडय़ात lp56कालांतराने कोरलेला कठडेवाला जिना अशी स्थित्यंतरे जाणवली. शेवटी, बोगदेवजा दरवाजा पार करून गडात प्रवेश केला. खरोखरंच अद्भुत दुर्गरचना!!!

आता दुर्गवास्तू धुंडाळत निघालो. पठारावर सदरेचं जोतं, टाकी, पुष्करणी, बलभीम आणि शंकराची िपड बघितली. एकाच अवघड मार्गावर अवलंबून न राहता आणखी एका दुर्गम कातळकोरीव नागमोडी जिन्याची खोदाई दिसली. पूर्व टोकापाशी ५-६ टाकी, घुमटाकार माथा असलेली दगडी कोठी वैशिष्टय़पूर्ण आहे. (इथे गरज पडल्यास मुक्काम करता येईल). हर्षगडने निजामशाही, मोगल, िहदवी स्वराज्य, परत मोगल, परत मराठे, इंग्रज – अशी कित्येक स्थित्यंतरे अनुभवली.

सनावळीच्या इतिहासापेक्षा हर्षगडवरच्या ‘गनिमी काव्या’ची दंतकथा धम्माल आहे. एकदा मोगलांची मोठ्ठी सेना गडावर चालून आलेली, आणि गडावर तर मोजकीच शिबंदी. मग एका जाणत्या आजीने सुचवली युक्ती.. ‘रणदुंदुभी निनादू द्या आणि खूप साऱ्या खरकटय़ा पत्रावळ्या कडय़ावरून खाली लोटत राहा..’ गडाच्या खालून बघणाऱ्या मोगलांना खरंच वाटलं की गडावर हजारो मावळ्यांची सेना सज्ज आहे, आपला काही टिकाव लागणार नाही आणि मोगलांनी काढता पाय घेतला..

अशा या खऱ्या अर्थाने ‘सर्वागसुंदर’ गडाचा निरोप घ्यायची वेळ झाली होती, पण अजूनही पावलं आणि ऊर थरथरत होता हर्षगडची अद्भुत दुर्गरचना अनुभवून!

पौराणिक वारशाचा त्र्यंबकगड (ब्रह्मगिरी)

ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झालेला. देखणा दुर्ग ‘त्र्यंबकगड’ बघण्यासाठी जागृत ज्योतिìलग त्र्यंबकेश्वरमधून पायऱ्यांची वाट चढू लागलो. सर्व बाजूंनी शे-सव्वाशे मीटर उभे कातळकडे कोसळलेले असल्याने गड मोठ्ठा विलक्षण दिसत होता. अखंड कातळात कोरलेल्या जिन्याची सातवाहनकालीन रचना अगदीभास्करगड आणि हर्षगडासारखी. माथ्यावर प्रशस्त पठारावरून गडदर्शन करताना गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर, गोदातीर्थ टाके, जटा मंदिर आणि हत्ती मेट असे अवशेष प्रसन्न करून गेले. सर्वोच्च असलेल्या पंचिलग शिखरावरून वैतरणा आणि गोदावरी नदी खोऱ्याचं अफाट दृश्य मिळालं.

साहसाचा थरार – भंडारदुर्ग

ट्रेकच्या अखेरच्या टप्प्यात बघायचा होता, त्र्यंबकगडचा अल्प परिचित जोडकिल्ला – ‘भंडारदुर्ग’. आम्हाला कल्पनाच नव्हती की एक अनपेक्षित थरार आमची वाट पाहत होता!

भोळ्या भाविकांनी एकावर एक रचलेले नवसाचे दगड बाजूला ठेवून जटामंदिराच्या मागून उत्तरेकडे निघालो. उजवीकडे त्र्यंबकची धार, तर डावीकडे खोलवर तळेगावच्या खचूर्ली तलावाचं पाणी चमकत होतं. गवताळ उतरंडीवरून, टोचणाऱ्या काटेरी झुडपांमधून, घसाऱ्यावरून सटकणारी बारीकशी वळणवाट अगदीच काही सोपी नव्हती. सोनेरी गवतामागून ‘भंडारदुर्गाचा बुधला’ डोकावला अन् तो सह्यद्रीचा चमत्कार पाहून अंगावर सणसणीत शहारा आला. भंडारदुर्ग दिसत होता एखाद्या पालथ्या जलकुंभासारखा. चोहोबाजूंनी शे-सव्वाशे मीटर उंचीचे अवाढव्य कातळकडे आणि जलकुंभावर सुबक पाकळ्या कोरल्या असाव्यात, अशा शेजारी-शेजारी असलेल्या विलक्षण देखण्या उभ्या घळी. वैशिष्टय़ म्हणजे त्र्यंबकच्या मूळ पठारावरच भंडारदुर्ग असला तरी इंग्रजी ‘यू’ आकाराची १०० फूट लांब, १०० फूट खोल आणि १० फूट रुंद अशी निमुळती कातळपट्टी त्र्यंबकच्या माथ्यापासून भंडारदुर्गाला स्वतंत्र करते. ही चिंचोळी कातळपट्टी म्हणजे ‘डाइक’ अश्मरचनेचा सुरेख आविष्कार.

पहिल्या टप्प्यात त्र्यंबकच्या माथ्यावरून भंडारदुर्गाच्या डाइकवर उतरायचं होतं. कातळाच्या पोटातून खोदलेल्या साठेक पायऱ्या उतरत तळाशी पोहोचलो. बाहेर पडण्यासाठी जेमतेम फूटभर उंचीच्या िदडीतून डोंबार कसरत करत सरपटत बाहेर पडलो. दुसऱ्या टप्प्यात चिंचोळ्या डाइकवरून झुडपं आणि खडकाळ उंचवटय़ांवरून चालताना खोलवर दऱ्या आणि वारा धमकावत होता, पण आम्ही हे थ्रिल एन्जॉय करत होतो. तिसऱ्या टप्प्यात भंडारदुर्गाच्या पायथ्याच्या बुटक्या िदडीमधून सरपटत शिरून, पायऱ्या चढून माथ्यावर पोहोचणार होतो अन् इथेच एक अनपेक्षित गोष्ट घडली.

आमचा िदडीतला प्रवेश रोखण्यासाठी इथे सज्ज होती दात विचकावत धमकवणारी १२-१५ माकडांची फौज. त्र्यंबकला माकडं अतिशय आक्रमक आहेत. भीतीने अंगावर सणसणीत शहारा आला. मग माकडांना फुटाण्यांचं आमिष दाखवून अभीनं मला ‘कव्हर’ दिलं आणि मी शिरलो िदडीतून आत गडाकडे. पण आता अभी अडकला. माकडांनी त्याची ट्राउझर पकडली. मी कसाबसा म्हणतोय, ‘अरे, अभी ये ना..’. तो म्हणतोय, ‘अरे काळ्या, इथे ये’. तणावपूर्ण वाटाघाटीनंतर शेवटची फुटाण्यांची पुडी हस्तगत करून माकडांनी अभीला सोडलं. गडावर पोहोचून स्वच्छ गार पाण्याची टाकी, घरांची जोती आणि आसमंत बघितला. निघावं म्हणलं तर माकडांची पलटण आता भंडारदुर्गवर आमची वाट पाहत उभी! मग मी जे काही केलं ते आता वाचून हास्यास्पद वाटेल.. दोन हातांत दोन वाळक्या काटक्या लांब धरून सावकाश चालू लागलो. कुठल्याशा अंत:प्रेरणेने गंभीर मोठय़ा आवाजात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ म्हणायला सुरुवात केली. एकसमान आवाजामुळे किंवा आमच्यापासून त्यांच्या पिलांना धोका नाही असं वाटल्याने असेल कदाचित, पण आश्चर्य म्हणजे माकडांच्या हळूहळू जवळ आलो, बाजूने गेलो तरी माकडं ढिम्म! आम्ही झपझप पायऱ्या, सरपटी िदडीची वाट, डाइक पार करून पलीकडे गेलो. मागं वळून पाहिलं तर भंडारदुर्गाच्या तटावरून माकडं वाकुल्या दाखवत होती..

अखेरीस परतीचा प्रवास सुरू झाला. त्र्यंबक रांगेतली मोरबारी घाट- भास्करगड- हर्षगड- त्र्यंबकगड- भंडारदुर्ग अशी भटकंती केलेली. चेहरे रापलेले, पायांना ब्लिस्टर्स आलेले, सॅक्स रिकाम्या झाल्यात, पण सोबत घेऊन निघालो होतो रोमांचक अनुभवांनी गच्च भरलेली पोतडी!

कधी भारावून गेलो ‘अ-द्भु-त’ दुर्गरचनेने.
कधी सुखावलो एखाद्या नाजूक ऑíकडच्या नजाकतीने.
तर कधी धपापलो रखरखीत उभ्या घाटवाटेच्या चढाईने.
कधी आसमंतात घुमणाऱ्या वाऱ्यासोबत दरवळत होता गंध- इतिहासाच्या रोचक कथांचा..
तर कधी कुठे समजून घेतला वारसा- गमतीशीर दंतकथांचा..
कधी उलगडला अभेद्य भासणाऱ्या किल्ल्याचा दडवलेला वैशिष्टय़पूर्ण कातळकोरीव जिना.
तर कधी अस तहानलो डोंगरमाथ्यावर आणि वाटला हेवा खाली खोऱ्यात चमचमणाऱ्या जलाशयाच्या पाण्याचा..
कधी तथाकथित प्रगतीच्या वावटळीच्या अस्वस्थ करणाऱ्या कथा ऐकून हळहळ वाटली..
कधी थबकलो काहीशे वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा बाळगणाऱ्या एखाद्या लेणेमंदिरापाशी.
रसरशीत अनुभवांच्या या गाठोडय़ाला म्हणावं तरी काय.
‘लयभारी दुर्गवारी’ – अजून काय!!!