आपल्याकडे नुकतीच झील समूहाची ‘झी जिंदगी’ ही नवी वाहिनी सुरू झाली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, इराण, थायलंडमधल्या उत्तमोत्तम मालिका या वाहिनीवर दाखविल्या जाणार आहेत. त्यानिमित्ताने पाकिस्तानी निर्मात्या सुलताना सिद्दीकी यांच्याशी बातचीत

२३ जून रोजी ‘झील’ समूहाच्या ‘जिंदगी’ या नव्या वाहिनीची सुरुवात झाली. या वाहिनीचे वैशिष्टय़ म्हणजे पाकिस्तानसह बांगलादेश, इराण, थायलंड अशा विविध देशांतील उत्तम मालिकांचा समावेश यात करण्यात येणार आहे. याची सुरुवात पाकिस्तानातील गाजलेल्या मालिकांपासून करण्याचे वाहिनीने निश्चित केले होते, त्यामुळे सुरुवातीपासूनच वाहिनीबाबत लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. वाहिनीवरील पहिल्या मालिका संपण्याच्या मार्गावर आहेत आणि या मलिकांच्या छोटय़ा पण आशयघन स्वरूपामुळे प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अगदी सेलेब्रिटीजनीसुद्धा टीव्हीच्या या बदलत्या स्वरूपाचे कौतुक केले आहे. त्याच अनुषंगाने या वाहिनीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असलेला पाकिस्तानी चेहरा सुलताना सिद्दिकी’ यांच्याशी ‘लोकप्रभा’ने संवाद साधला. पाकिस्तानी मालिका भारतात प्रसारित करण्याच्या संकल्पनेमागची त्यांची मतेही ‘लोकप्रभा’ने जाणून घेतली आहेत.
सुलताना सिद्दिकी या पाकिस्तानी टीव्ही क्षेत्रातील नामवंत दिग्दíशका आणि निर्मात्या आहेत. पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात टीव्ही नेटवर्क सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचे ‘हम नेटवर्क’ हे पाकिस्तानातील आघाडीचे टीव्ही नेटवर्क आहे आणि ‘जिंदगी’मध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक मालिका याच नेटवर्कच्या आहेत. ‘सुलताना आपा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुलताना सिद्दिकींचा भर हा मुख्यत्वे स्त्रियांच्या कल्याणासाठी असाच राहिला असल्याचे त्यांच्या मालिकांमधून जाणवते. ‘िजदगी’ वर दाखवली जाणारी ‘िजदगी गुलझार है’ ही मालिका स्वत: सुलताना आपा यांनी दिग्दर्शित केली आहे.
‘जिंदगी’च्या प्रवासाच्या सुरुवातीबद्दल सुलताना आपा सांगतात, या वाहिनीच्या जन्माची कथा सुरू झाली ती झील समूहाच्या क्रिएटिव्ह हेड शैलजा केजरीवाल यांच्यामुळे. भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रात बदल आणण्यासाठी झपाटलेल्या शैलजा यांनी पाकिस्तानी मालिका पाहिल्या आणि माझ्याशी संपर्क साधला. त्यांना काही ठरावीक पाकिस्तानी मालिका भारतात प्रसारित करायच्या होत्या. मी तर थक्कच झाले, पण त्यांनी तोपर्यंत पाकिस्तानी मालिकांवर खूप संशोधन केले होते. त्यामुळे त्या आपल्या निर्णयावर किती ठाम आहेत हे मला लक्षात आले आणि आम्ही पुढच्या कामाला लागलो.
सिद्दीकी सांगतात, ‘‘बहोत अरसेसे मै चाहती थी कि हमारे शोज इंडिया में देखे जाये. पण तसे झाले नाही. एकदा मीही हा प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. भारतीय प्रेक्षक आम्हा पाकिस्तानींना स्वीकारतील की नाही, ही भीती कुठेतरी मनात दडून बसली होती. पण आता स्वत:हून कोणीतरी हात पुढे करतंय म्हटल्यावर मी माघार घ्यायची नाही, असे ठरवले’’
भारतात पाकिस्तानी मालिका प्रसारित करायच्या म्हणजे येथील लोकांच्या पसंतीची माहिती असणे महत्त्वाचे असतेच. पण सुलताना यांच्यासाठी नव्हे तर कित्येक पाकिस्तानी प्रेक्षकांना भारतीय टीव्ही क्षेत्राची आणि पर्यायाने लोकांच्या पसंतीची पूर्ण माहिती आहे. त्या सांगतात, ‘‘तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आमच्याकडे भारतातील अनेक मालिका आवडीने पाहिल्या जातात. त्यांना एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. तुमच्याकडील कित्येक दैनंदिन मालिकाच नाही तर रिअ‍ॅलिटी शोजपण पाकिस्तानमध्ये आवडीने पाहिले जातात. आणि तेही लपून किंवा बेकायदेशीररीत्या नाही, तर कायदेशीररीत्या. येथील काही नेटवर्क्‍सनी भारतात गाजलेल्या काही मालिकांचे प्रसारणाचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे अगदी ‘साँस भी कभी बहु थी’पासून ते ‘बालिका वधू’पर्यंत कित्येक भारतीय मालिका पाकिस्तानी प्रेक्षक आवडीने पाहतात.’ पण असे असताना भारताने मात्र आमच्यापर्यंत येण्यास इतका उशीर का लावला?’’ हा प्रश्नही आपल्याला सतावत असल्याचे त्या नमूद करतात.
पाकिस्तानी मालिकांची खासियत मांडताना त्या सांगतात, ‘‘आमच्याकडे मालिका लघुकथा किंवा कादंबऱ्यांवर आधारित असतात. त्यांना प्रत्यक्ष जीवनातील घडामोडींचा स्पर्श असतो. टीव्हीच्या माध्यमातून कुटुंबांना जोडायचा प्रयत्न आम्ही करतो. मालिकांमध्ये दिसणारी पात्रे जास्तीत जास्त वास्तववादी ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तसेच या मालिका ठरावीक भागांसाठी बनवलेल्या असतात. २०-२२ भागांपुढे मालिका नेण्याचे आम्ही टाळतो. त्यामुळे किती आणि काय सादर करायचे आहे याचा पक्का मसुदा लेखक आणि दिग्दर्शक यांच्या डोक्यात पक्का असतो.’’ हे सांगताना त्या काही अंशी भारतीय मालिकांवर टीकाही करायला मागे-पुढे पाहात नाहीत. त्या सांगतात ‘भारतीय मालिका खूप ताणल्या जातात. कित्येकदा त्यांतील चार्म संपलेला असतो. तसेच घटना, पात्रे अतिरंजित असतात.’ अर्थात भारतीय टीव्हीसृष्टी काहीअंशी बॉलीवूडशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करताना दिसते, त्यामुळे असे होत असावे असे त्यांचे मत आहे.
‘‘पाकिस्तानी टीव्हीसृष्टी तेथील सिनेमापेक्षा जास्त पुढे गेली असल्यामुळे तेथे स्पर्धेचा प्रश्न येत नाही. पुढेमागे जर तेथील सिनेमा मालिकांच्या पुढे गेला तर आमचे पाऊलही त्या मार्गावर पडू शकते’ असेही त्या प्रामाणिकपणे मान्य करतात. ‘‘पाकिस्तानमधील चित्रपटसृष्टीला अवकळा आली आहे. त्या मानाने येथील टीव्हीसृष्टी खूप पुढे आहे. अर्थात भारताच्या तुलनेने टीव्हीच्या बाबतीतही आम्ही नवखे आहोत, त्यामुळे आमच्याकडे सांगण्यासाठी खूप कथा आहेत. पण एकदा का या कथा संपल्या की कदाचित आम्हीपण भारताप्रमाणे लांब, रंजक मालिका बनवायला सुरुवात करू.’’
पाकिस्तानी मालिका भारतात आणण्याबद्दलचा त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. मनोरंजन हे या दोन देशांमधील लोकांना एकत्र जोडण्याचे महत्त्वाचे साधन होऊ शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. ‘‘दोन्ही राष्ट्रांमध्ये जी काही भांडणे आहेत, ती राजकीय मुद्दय़ांवर आहेत. त्यात तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांचा संबंध नाही. त्यामुळे इतक्या वर्षांमध्ये या दोन्ही राष्ट्रांमधील लोकांना एकत्र आणण्याचे काम जिथे दोन्ही बाजूच्या राजकीय नेत्यांना जमले नाही ते जर टीव्हीमुळे होत असेल तर त्याहून उत्तम काहीच नाही.’’ फाळणीच्या जखमा कधीच्याच भरल्या गेल्या आहेत. आता पाकिस्तानी नागरिकांना भारतीयांशी तुटलेली नाळ पुन्हा एकदा जोडायची इच्छा असल्याचे त्या सांगतात. कारण भारताप्रमाणेच येथील लोकांच्या वंशाच्या, इतिहासाच्या पाऊलखुणा भारतात राहिलेल्या आहेत. त्या स्मृतींमध्ये पुन्हा एकदा जगायची इच्छा पाकिस्तानमधल्या आजच्या पिढीला आहे आणि हीच नाळ या दोन्ही देशांतील लोकांना एकमेकांशी जोडत असल्याची भावना त्या व्यक्त करतात. ‘‘आम्हाला टीव्हीच्या माध्यमातून काहीतरी खूप भव्य-दिव्य करायचे आहे असे अजिबात नाही. पण पुढे जाऊन जेव्हा कधी या दोन राष्ट्रांमधील संबंध सुधारले जातील, तेव्हा या कामात ‘जिंदगी’चा मोलाचा वाटा असेल अशी आशा नक्कीच करतो आहोत.’’ हे सांगताना भविष्यात भारतीय आणि पाकिस्तानी टीव्हीसृष्टी हातात हात घालून एकत्र मालिकांची निर्मिती करताना दिसेल, अशी आशा त्या व्यक्त करतात आणि प्रेक्षकांनी ‘िजदगी’ला दिलेला प्रतिसाद पाहता हे चित्र लवकरच साकार होईल, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.