टीव्ही कार्यक्रमांचा टीआरपी मोजण्यासंदर्भात ‘टॅम’ हा शब्द इतके दिवस सगळ्यांच्या कानावर पडत होता. आता त्याची जागा ‘बार्क’ने घेतली आहे. टीआरपी मोजण्याच्या ‘बार्क’यंत्रणेमुळे भारतीय टीव्हीक्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जायची शक्यता आहे.

आपल्या हातात रिमोट घेऊन टीव्हीसमोर बसलेला प्रेक्षक मनोरंजनाचं सगळं जग आपल्या मुठीत सामावलेलं आहे, या मुद्दय़ावर सॉलिड खूश असतो. टीव्ही मालिका, सिनेमे, स्पोर्ट्स, आर्थिक, धार्मिक, ज्ञान-माहितीपर कार्यक्रम असं ज्याला जे हवं ते त्याच्या एका बोटाच्या इशाऱ्यावर त्याच्यासमोर येतं. त्याच्या या घरबसल्या स्व:तचं मनोरंजन करून घेण्याच्या इच्छेच्या पलीकडे कुणा-कुणाची आणि किती मोठी दुनिया उभी आहे याची त्याला सुतराम माहिती नसते. मनोरंजन, माहिती मिळवणं, ज्ञान मिळवणं या आणि अशा वेगवेगळ्या हेतूंनी टीव्हीसमोर बसणाऱ्या प्रेक्षकांच्या हातात रीमोट असला तरी त्या प्रेक्षकांचा रीमोट मात्र भलत्याच कुणाच्या तरी हातात असतो. एखादा टीव्ही कार्यक्रम, त्याची प्रेक्षकसंख्या आणि त्याला मिळणाऱ्या जाहिराती या संदर्भात टीआरपी हा शब्द आणि तो मोजणारी टॅम हे शब्द सतत सगळ्यांच्या कानावर पडत होता आणि त्याची जागा बार्क या शब्दाने घेतली आहे. हा नेमका बदल काय आहे, ते समजून घेण्याआधी टेलिव्हिजन विश्वाचा थोडक्यात आढावा घेऊ.
भारतामध्ये सुरुवातीच्या दूरदर्शनच्या काळात छोटे स्वरूप असलेल्या या टीव्ही क्षेत्राचा गेल्या तीस वर्षांत सॅटेलाइट टेलिव्हिजनच्या विस्तारामुळे अतिशय झपाटय़ाने विकास झालेला आपल्याला पाहायला मिळाला. टेलिव्हिजन हा आता जणू प्रत्येक घरचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रेक्षकवर्गाला आवडतील अशा वेगवेगळ्या मालिका तयार करण्याची एक स्पर्धा विकसित झाली आणि व्यवसाय म्हणून हे क्षेत्र खऱ्या अर्थाने बहरले. आज या क्षेत्राचा आवाका ३०० चॅनेल्सच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. आपण एक व्यवसाय म्हणून टेलिव्हिजन या माध्यमाकडे बघतो तेव्हा त्या व्यवसायाशी निगडित असलेले घटक समजून घेणे एक सामान्य प्रेक्षक म्हणून गरजेचे ठरते.
प्रत्येक घरामध्ये दररोज चालू असणाऱ्या टीव्ही मालिका आणि त्यातील सासू-सुनेमधील घडणारे नाटय़ पहिले की, सामान्य लोकांना नेहमी प्रश्न पडत असतो की, अशा एकसुरी मालिका वारंवार का दाखविल्या जातात? टीव्ही चॅनेल्सचे या आरोपावर एकच उत्तर असते की, प्रेक्षकांना जे बघायला आवडते तेच आम्ही आमच्या मालिकांद्वारे दाखवत असतो. मग प्रेक्षकांना काय आवडते हे या लोकांना कसे काय कळते, हा प्रश्न सामान्य प्रेक्षकांना पडला तर त्यात आश्चर्य नाही, कारण ‘जो बिकता है वोही स्क्रीन पर दिखता है’ हे त्यामागचे ढोबळ सूत्र असते. त्या मालिका आणि कार्यक्रमाची लोकप्रियता हेच त्याचे यश, हे सूत्र मानून चॅनेल्सद्वारे कार्यक्रमाची निर्मिती केली जाते. आपले कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना ते आवडावे यासाठी प्रत्येक टीव्ही चॅनेल प्रयत्नशील असते. त्यासाठी त्यांनी खूप मोठय़ा प्रमाणात आर्थिक आणि इतर यंत्रणांची गुंतवणूक केलेली असते. अनुभवी आणि कुशल निर्मिती संस्थांकडून या मालिका, कार्यक्रम बनवून घेतले जातात आणि चॅनेल्सवर दाखवले जातात. या दैनंदिन मालिका आणि कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकवर्ग बघत असतो आणि म्हणून अनेक जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सीज आपल्या उत्पादनाच्या जाहिराती या मालिकांदरम्यान दाखवण्यास उत्सुक असतात. कमर्शियल ब्रेकच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या या जाहिरातींचा दरही त्या त्या मालिकेच्या लोकप्रियतेवर अवलंबून असतो. चॅनेलला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी जाहिरातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाटय़ाचे प्रमाण खूप मोठे असते आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपल्या मालिकांची लोकप्रियता खूप जास्त महत्त्वाची असते. आता या मालिकांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी जाहिरात एजन्सीज आणि जाहिरातदारांना टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) रेटिंग्जवर अवलंबून राहावे लागते, ज्यातून त्यांना कळते की, कुठल्या चॅनेलवरील कुठली मालिका किती लोकप्रिय आहे. भारतामध्ये टीव्ही मालिका आणि इतर कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्यासाठी जे यंत्र वापरले जाते त्याला पीपल मीटर असे म्हणतात. हे यंत्र वेगवेगळ्या ठिकाणांतील काही निवडक घरांमधील टीव्हीशी जोडले गेलेले असते. या काही हजार घरांमधील घरांना सॅम्पल्स असे संबोधले जाते. ज्या घरांना पीपल मीटर लावले गेले आहेत असे प्रेक्षक ज्या मालिका किंवा कार्यक्रम बघतात त्याच मालिका किंवा कार्यक्रम त्या पटीने एक मोठा प्रेक्षकवर्ग बघत असतो असे गृहीत धरले जाते. शितावरून भाताची परीक्षा केल्यासारखाच हा काहीसा प्रकार असतो. भारतामध्ये आत्तापर्यंत टॅम (टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट) ही एकमेव एजन्सी टीव्ही प्रेक्षकांचे मोजमाप करणारी एजन्सी होती. भारतातील जवळपास १५५ शहरांतील अंदाजे ९६०० घरांमध्ये बसवलेल्या पीपल मीटरच्या साहाय्याने प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे मोजमाप करून त्यांची लोकप्रियता ठरवण्याचे काम ही एजन्सी करते.
भारतामध्ये जवळपास १५३ दशलक्ष घरांमध्ये टीव्ही कनेक्शन्स आहेत, त्यातील जवळपास १३० दशलक्ष घरांमध्ये केबल सॅटेलाइट आणि डिजिटल टीव्ही कनेक्शन्स आहेत आणि उरलेल्या घरांमध्ये फ्री टू एअर आणि दूरदर्शनचे कार्यक्रम बघितले जातात. ही आकडेवारी थोडय़ाफार प्रमाणात कमीजास्त होऊ शकते, पण मुख्य प्रश्न हा आहे की, एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येने टीव्ही मालिका बघण्याचे मोजमाप हे टॅमने केवळ ९६०० निवडक घरांमधून केलेल्या पाहणीच्या आधारे कसे काय ठरू शकते?
याच प्रश्नावरून मध्यंतरी टेलिव्हिजन विश्वामध्ये मोठे वादळ निर्माण झाले. टॅमद्वारे पुरवल्या जाणाऱ्या टेलिव्हिजन रेटिंग्सच्या आकडय़ावर खुलेआम प्रश्न विचारले जाऊ लागले. एनडीटीव्हीसारख्या मोठय़ा चॅनेलने टॅमच्या माहिती संकलनाच्या सत्यतेवरच प्रश्न उभे केले. जून २०१२ मध्ये संपलेल्या तिमाहीत त्यांना सहन करावा लागलेला तोटा हा मागील वर्षांपेक्षा १७.९८ कोटींपेक्षा अधिक होता. प्रेक्षकसंख्या आणि त्यांचा कल मोजण्याची टॅमची मर्यादीत संख्या ही आकडेवारीत फेरफार कण्यास कशी साहाय्यभूत ठरते हे एनडीटीव्हीने सोदाहरण पटवून दिले. आपल्या १९४ पानी आरोपपत्रात एनडीटीव्हीने गेल्या तीन वर्षांतील नुकसानीबद्दल तब्बल ५८० दशलक्ष डॉलरची नुकसानभरपाईची मागणी केली. टॅमचे कर्मचारी ठराविक कालावधीसाठी पीपल मीटरमध्ये बदल करुन विशिष्ठ चॅनलसाठी अपेक्षित बदल कसा करुन देऊ शकतात हे या केसद्वारे एनडीटीव्हीने स्पष्ट केले.
या सर्वाची परिणती एनडीटीव्हीने टॅम आणि टॅमची पेरेंट कंपनी नेल्सन आणि कंटार यांच्याविरुद्ध न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आणि मोठय़ा नुकसानभरपाईची मागणी करण्यात झाली. या पाश्र्वभूमीवर या वर्षी जानेवारीमध्ये माहिती आणि नभोवाणी खात्याने ट्राय (टेलिव्हिजन रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) च्या शिफारशीवरून टीव्ही रेटिंग्स मोजमाप यंत्रणेविषयी नव्याने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. यामागे मूलभूत आणि वास्तववादी पद्धतीने टीव्ही रेटिंग्स काढली जावीत हा सरकारचा मुख्य उद्देश होता. सरकारच्या या मार्गदर्शक तत्त्वानुसार टीव्ही रेटिंग्स पुरवणाऱ्या एजन्सीकडे कमीतकमी वीस हजार घरांचा माहितीसाठा (sample size) असणे गरजेचे आहे. असे नसल्यास ही रेटिंग्स एजन्सी भारतामध्ये टीव्ही रेटिंग्स पुरवण्यास पात्र नाही, असे गृहीत धरण्यात येईल.
याच सुमारास टीव्ही ब्रॉडकास्टर्स, जाहिरात एजन्सीज आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकत्र येऊन बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये ६० टक्के वाटा हा बीएफ म्हणजेच इंडिया ब्रॉडकास्टिंग फेडरेशनचा, तर प्रत्येकी २० टक्के वाटा इंडियन सोसायटी ऑफ अ‍ॅडव्हर्टायझर्स (ISA) आणि असोसिएशन ऑफ अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज ऑफ इंडिया (AAAI) चा असणार आहे. फ्रान्सच्या मीडियामेट्रिक या कंपनीसोबत बार्कने करार केला असून ही कंपनी भारतामध्ये रेटिंग्स प्रणाली विकसित करणे आणि त्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे काम करणार आहे. आता टॅमच्या जागी बार्क ही एजन्सी लवकरच भारतामध्ये टीव्ही रेटिंग्स पुरवण्याचे काम करणार आहे. टॅमच्या तुलनेत बार्क सुरुवातीला वीस हजार घरांमधील बघितल्या जाणाऱ्या दैनंदिन मालिका आणि इतर कार्यक्रमांचे मोजमाप करणार आहे आणि माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील तीन वर्षांत हे प्रमाण पन्नास हजार घरांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे.
‘बार्क’ रेटिंग्सची वैशिष्टय़े :
१. पारदर्शकता : ‘बार्क’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या प्रणालीमधील पारदर्शकता. या प्रणालीमध्ये टॅमच्या तुलनेत मोजमाप केलेल्या घरांची संख्या वीस हजापर्यंत, म्हणजे जवळपास दुपटीने वाढवण्यात आल्यामुळे रेटिंग्समधील अचूकता वाढण्यास मदत होईल. संकलन होत असलेल्या घरांचा डेटा हा पूर्णपणे सुरक्षित (Tamper Proof) असणार आहे. शिवाय कुठल्याही ब्रॉडकास्टिंग किंवा जाहिरात कंपनीला बार्कमध्ये कुठल्याही परिस्थितीत दहा टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स खरेदी करता येणार नाही.
२. उच्च तंत्रज्ञानाचा वापर : या बार्क प्रणालीमध्ये अतिशय उच्च आणि जागतिक पातळीचे डब्ल्यूएम (Water Marking) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. सिग्नलच्या ऑडिओ चॅनेलमध्ये एक कोड घातला जातो, जो डिस्ट्रिब्यूशन व्यवस्थेतून ट्रान्समिट केला जातो. हा कोड त्या क्षणी त्या त्या घरात कुठला कार्यक्रम पाहिला जातोय याचे मोजमाप करतो. हा कोड कुठल्याही परिस्थितीत गाळून टाकता येत नाही किंवा त्यावर पुनर्लिखाण होऊ शकत नाही. त्यामुळे डेटा संदर्भातील अचूकता आणि विश्वासार्हता वाढू शकते.
३. ग्रामीण लोकसंख्येचा मोठा सहभाग : डेटा संकलन करताना बार्क या व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागाचाही मोठय़ा प्रमाणात सहभाग करून घेतला गेला आहे. सुरुवातीला भारतातील एकूण डेटा संकलनापैकी जवळपास तीस टक्के घरे ही ग्रामीण भागातील असणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने टीव्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
४. सर्वसमावेशक रिपोर्टिग : हल्ली एचडी डिजिटल तंत्रामुळे आपल्या सेटटॉप बॉक्सद्वारे आपल्या आवडीचे कार्यक्रम रेकॉर्ड करून आपल्याला हवे तेव्हा पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या नवीन प्रणालीनुसार अशा पद्धतीने नंतर पाहिल्या गेलेल्या मालिका किंवा कार्यक्रमाचाही प्रेक्षकवर्ग अचूकरीत्या मोजता येऊ शकणार आहे. तसेच एखादा कार्यक्रम किंवा मालिका जर दोन वेगवेगळ्या चॅनेल्सवर एकाच वेळेस प्रक्षेपित होत असतील तर बार्कच्या नवीन तंत्रानुसार या दोन्ही चॅनेल्सचे वेगवेगळे मोजमाप करणे शक्य होणार आहे. याचा फायदा जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सीजना होणार आहे.
५. सॅम्पल्सची नवीन व्याख्या : टॅमपेक्षा बार्कचे वेगळेपण म्हणजे डेटा सॅम्पलची नव्याने तयार केलेली व्याख्या आणि वर्गीकरण. आधीच्या वर्गीकरणाप्रमाणे घरातील कमावणारी मुख्य व्यक्ती (Chief Wage Earner)च्या शिक्षण आणि व्यवसाय या बाबींचा मुख्य विचार करण्यात आलेला होता, पण आता नव्याने करण्यात आलेल्या व्याख्येनुसार घरातील कमावत्या मुख्य व्यक्तीच्या शिक्षण आणि तिच्या घरात असलेल्या अकरा घरगुती वस्तूंचा (ज्याची यादी बार्कने तयार केली आहे) समावेश आहे. या व्याख्येनुसार एखाद्या घराची आवड कुठल्या प्रकारचे कार्यक्रम पाहण्याची आहे हे समजण्यास मदत होणार आहे. ग्राहकांच्या या नवीन पद्धतीच्या वर्गीकरणामुळे आता खरा ग्राहक कोण आणि कोण जास्त पैसे खर्च करू शकतो हे आणखी चांगल्या पद्धतीने कळू शकणार आहे.
६. आधुनिक पीपल मीटर्सचा वापर : या प्रणालीमध्ये वापर करण्यात आलेले मीटर्स हे अत्याधुनिक असल्यामुळे सॅम्पलिंग डेटा थेट मुख्य प्रणालीला अपलोड केला जाऊ शकणार आहे.
७ : सर्व प्लॅटफॉर्मवरील उपलब्धता : बार्क वापरात असलेल्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल, अ‍ॅनालॉग आणि टेरेस्ट्रीयल अशा सर्व प्रकारच्या टीव्ही सिग्नल्सद्वारे प्रेक्षकांच्या मालिका पाहण्याच्या सवयीचे अचूक मोजमाप करता येऊ शकणार आहे.
अशा अचूक आणि अधिक वास्तववादी रेटिंग्स यंत्रणेंमुळे आणि मोजमाप करत असलेल्या प्रेक्षकांच्या व्यापक संख्येमुळे (Sample Size) येत्या काही काळात भारतीय टीव्ही क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आणि स्वाभाविक आहे यात शंकाच नाही. या बदलामुळे टीव्हीवरील मालिका आणि कार्यक्रमनिर्मितीचे स्वरूप खूप मोठय़ा प्रमाणात बदलेल.
गेल्या काही काळात ग्रामीण भागातील ग्राहकवर्ग वाढण्याची टक्केवारी ही तुलनात्मकरीत्या शहरी भागाच्या टक्केवारीपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या सवयी जाणून घेण्याच्या दृष्टीने या नवीन टीव्ही रेटिंग्स प्रणालीमध्ये ग्रामीण भागावर जोर दिल्याचे दिसून येते. टॅम रेटिंग्सच्या तुलनेत बार्क पद्धतीत ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व भारतभर ३० टक्के तर महाराष्ट्रात जवळपास ४३ टक्के असणार आहे. याचा अर्थ हा होतो की, या पुढील काळात टीव्ही चॅनेल्सना आपले कार्यक्रम तयार करत असताना या ग्रामीण भागातील प्रेक्षकांचा विचार करावा लागणार आहे आणि त्यांना आवडतील अशाच मालिका आणि एकदम वेगळे विषय प्रेक्षकांसमोर मांडावे लागणार आहेत. त्यामुळे प्रादेशिक टीव्ही चॅनेल्सना यापुढच्या काळात आपला व्यवसाय वाढवण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या वाढत्या प्रभावामुळे चॅनेल्सला आपल्या नेहमीच्या प्राइम टाइमच्या वेळांचाही नव्याने विचार करावा लागणार आहे. काही चॅनेल्सनी आत्तापासूनच त्याची जोरदार तयारी चालवली आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांच्या झोपण्याचा वेळा या शहरी प्रेक्षकांच्या झोपेच्या वेळेपेक्षा बऱ्यापैकी लवकर असतात, त्यामुळे अनेक चॅनेल्सचा प्राइम टाइम सध्याच्या वेळेपेक्षा लवकर सुरू होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा फायदा इंग्रजी आणि हिंदी चॅनेल्सनाही मिळू शकणार आहेत. कारण प्रत्येक जण आपल्या टीव्ही प्रेक्षकांपर्यंत आता जास्त अचूकरीत्या पोहोचू शकणार आहे.
पण यासर्वामागे मुद्दा केवळ कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे हा नाहीच. तर यामागे आहे ते थेट अर्थकारण. कोणता प्रेक्षक कोणते कार्यक्रम कसे पाहतो यावरच जाहिरातींचा प्रतिसाद अवलंबून असतो. कोणत्या जाहिराती केव्हा दाखवायच्या, कितीवेळा दाखवायच्या हे सारं काही प्रेक्षकसंख्या आणि त्यांचा कल यावरच ठरते. टॅमच्या आकडेवारीबद्दल शंका असल्यामुळेच जे काही स्टेकहोल्डर एकत्र आले आहेत त्यामध्ये जाहिरातदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. प्रेक्षकसंख्येच्या रिमोटवर गेली कित्येक वर्षे टॅमची मक्तेदारी होती. त्याला आता शह मिळत असला तरी उद्या टॅमदेखील सरकारी नियमावली वापरुन अशा प्रकारे प्रेक्षकसंख्या मोजण्याची प्रणाली राबवू शकते. किंबहुना आता प्रेक्षकसंख्या आपल्याच हाती राखण्याची एक नवीनच लढाई आता सुरु झाली आहे.

lp09‘बार्क’चा सगळ्यांनाच फायदा
‘आम्ही वापरत असलेले तंत्रज्ञान हे आजच्या काळात, जागतिक दर्जाचे आहेच शिवाय हे तंत्रज्ञान भारताच्या भविष्यासाठीही अत्यावश्यक आहे. आम्ही तयार केलेली व्यवस्था अत्यंत पारदर्शक, विश्वासू आणि सर्वसमावेशक आहे. आमच्याकडून कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे. आम्ही वापरत असलेल्या सॅम्पलचा विचार करता भारतीय प्रेक्षकांच्या बदलत्या सवयींचा आता अचूक वेध घेता येणार आहे ज्याचा फायदा जाहिरातदार, जाहिरात एजन्सीज, टीव्ही चॅनेल्स आणि संबंधित सर्वानाच होणार आहे.’
पाथरे दासगुप्ता, सीईओ, बार्क

lp10भविष्यवेधी यंत्रणा
बार्कची नवी प्रणाली आताच्या काळाशी सुसंगत आणि भविष्यवेधी आहे. बार्कच्या या नव्या यंत्रणेने सादर केलेले प्राथमिक निष्कर्ष आशादायी आहेत. अर्थात प्राथमिक पातळीवर सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये वाहिन्यांच्या रँकिंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही. मात्र जसजसा अधिक डेटाबेस हाती येईल तसे निष्कर्ष काढता येऊ शकतील. अर्थात आयआरएसने (इंडियन रीडरशिप सव्‍‌र्हे) त्यांची कार्यपद्धती बदलल्यावर त्यांचे नवीन निष्कर्ष जाहीर झाल्यावर जशी घमासान चर्चा झाली तसेच बार्कच्या निष्कर्षांवरदेखील चर्चा-वादविवाद होतीलच; पण ते एकदा रुळले की मात्र जाहिरातींच्या माध्यम धोरणांवर नक्की परिणाम होईल.
बार्कच्या नव्या प्रणालीत ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात आल्यामुळे जाहिरातींमध्ये होणारे बदल हे पूर्णत: त्या उत्पादनाच्या बाजारपेठेवरच अवलंबून आहेत. बॅ्रण्डची गरज ग्रामीण भागात विस्तार करण्याची असेल तर त्यांना तसे लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यानुसार माध्यम बदलेल.
बार्कच्या या नव्या प्रणालीमुळे जाहिरात क्षेत्रात महत्त्वाचे बदल होतील. बार्कमार्फत एकाच वेळी टीव्ही, डेस्कटॉप/ लॅपटॉप/ टॅबलेट आणि मोबाइल अशा सर्व माध्यमांमधील प्रेक्षकांचा डेटा मिळणार आहे. अर्थात सुरुवातीला घरात टीव्हीवर काय पाहिले जाते याची माहिती मिळणार आहे. वैयक्तिक स्वरूपात (डेस्कटॉप/ लॅपटॉप/ टॅबलेट आणि मोबाइल) काय पाहिले जाते याची माहिती सध्या तरी मिळणार नाही. मात्र बदलत्या काळात वैयक्तिक स्वरूपातील डेटा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
अनेक ब्रॅण्ड्स हे जाहिरातींवर प्रचंड पैसा खर्च करत असतात. त्यामुळेच जाहिरातींवर खर्च केलेला पैसा हा योग्य प्रकारे आणि योग्य त्या माध्यमांवर योग्य पद्धतीने खर्च होईल हे पाहणे आवश्यक असते. गेल्या पाच वर्षांतील बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकसंख्या वाढली आहे आणि वापरकर्त्यांच्या सवयींमध्येदेखील बराच बदल झाला आहे. शहरी आणि ग्रामीण हा भेद आता संपत चालला आहे. म्हणूनच शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणच्या वापरकर्त्यांच्या सवयींचा वेध घेणाऱ्या यंत्रणेची गरज होती. तीच आता बार्कच्या या नव्या प्रणालीमुळे पूर्ण झाली आहे, असे म्हणावे लागेल.
नंदिनी डायस, सी.ई.ओ. लोडस्टार यूएम

lp11प्राइम टाइम बदलणार नाही
बार्कने सुरू केलेली टीआरपीची नवी पद्धत एप्रिलच्या महिन्याअखेरीस लागू होणार आहे. सुरुवातीचे चारेक महिने ही पद्धत प्रयोगशीलतेच्या पातळीवर असेल. त्यामुळे तूर्तास याबाबतचे चित्र पूर्णत: स्पष्ट झाले नाही. यंत्रणा नवी असल्यामुळे काही अडचणी येतीलही, पण काही महिन्यांनी टीआरपीची नवी पद्धत स्थिर होईल. टीआरपीच्या नव्या गणितांमुळे प्राइम टाइमवर काहीही परिणाम होणार नाही, कारण ग्रामीण, शहरी असा फरक करणे महत्त्वाचे नाही. कार्यक्रमांमधला आशय महत्त्वाचा आहे. ग्रामीण प्रेक्षकांना लक्ष्य करण्यापेक्षा आम्ही संपूर्ण प्रेक्षकवर्गामध्येच बदल करणे महत्त्वाचे मानतो. आमच्या चॅनलचा पूर्वीचा प्रेक्षक मध्यमवयीन होता, पण आता त्यात तरुण प्रेक्षकांची भर कशी पडेल, याकडे लक्ष आहे. त्यामुळे बदल ग्रामीण किंवा शहरी असा न करता तरुण प्रेक्षकांनाही कसे लक्ष्य करायचे हा असेल.
अनुज पोद्दार, प्रोजेक्ट हेड, ईव्हीपी वायकॉम १८, कलर्स मराठी

lp12ग्रामीण भागाला महत्त्व प्राप्त
टीआरपीच्या नव्या यंत्रणेबाबत विचार करता पहिला अहवाल आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, पण एवढे मात्र सांगता येईल की, काही महत्त्वाचे बदल होणार असल्याने नवीन यंत्रणेचे स्वागतच आहे. या यंत्रणेमुळे ग्रामीण भागाला महत्त्व दिले जाणार आहे, ही सकारात्मक बाब आहे. मुंबई आणि दिल्लीसह ईशान्येकडील आणि इतर काही ग्रामीण भागांचाही आता विचार केला जाणार आहे. नव्या यंत्रणेमुळे आजवर दुर्लक्षित राहिलेले भागही विचारात घेतले जाणार आहेत, ही यातली चांगली बाजू आहे.
राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा

lp13स्वागत आहे
टीआरपीच्या नव्या यंत्रणेच्या धोरणांमुळे टीआरपी रेटिंग्जमध्ये अधिक चांगली पारदर्शकता येईल. यातील ग्रामीण भागातील रेटिंग्जानुसार काही कार्यक्रमांमध्ये बदल अपेक्षित आहेत. आमच्या कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक ग्रामीण भाग सहभागी करून घेता येईल, असा प्रयत्न असतोच. ग्रामीण भागाशी निगडित कार्यक्रम आम्ही यापूर्वीही करत आलो आहोत, आताही करतोय आणि भविष्यातही करू. झी चोवीस तासचा प्राइम टाइम संध्याकाळी सहा वाजता सुरू होतो. त्यामुळे प्राइम टाइमशी संबंधित बदल करण्याची फारशी आवश्यकता वाटत नाही.
lp15डॉ. उदय निरगुडकर, मुख्य संपादक, झी चोवीस तास

टीव्हीचा चेहरा बदलणार..?
न्यूज चॅनल्समध्ये ग्रामीण भागातील घटना अपरिहार्यपणे दाखवल्या जातातच. कारण, तिथले गुन्हे, गारपीट, कार्यक्रम, समस्या अशा अनेक बाबींवरील बातम्यांचे प्रक्षेपण होतंच असतं. त्यामुळे नव्या यंत्रणेनुसार ग्रामीण भागालाही महत्त्व दिलं जाणार असलं तरी न्यूज चॅनलमध्ये याविषयी काही बदल होणार नसल्याचं काही जाणकारांचं मत आहे. उलटपक्षी प्रोग्रामिंग चॅनलमध्ये मात्र ग्रामीण आशयाबाबतचे बदल घडू शकतात. ग्रामीण भागाकडून येणारं रेटिंग हा नव्या यंत्रणेचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण, या मुद्दय़ाला न्यूज चॅनल आधीपासूनच महत्त्व देत आल्यामुळे तिथल्या कार्यपद्धतीवर परिणाम होणार नसल्याचंही न्यूज चॅनल्समधल्या काहींचं म्हणणं आहे. इंग्लिश विशेषत: बिझनेस चॅनल्सच्या बाबतीत सॅम्पल साइज लहान असतो. दिल्लीसारख्या शहरात पाच ते सात सॅम्पलवरून त्या चॅनल्सचं मार्केट ठरतं. त्यामुळे याबाबत बिझनेस चॅनल वर्तुळात एकूणच नाराजीचा सूर होता. आता ही सॅम्पल साइज वाढल्यामुळे त्यांना दिलासा मिळेल आणि टीआरपीचं चित्र अधिक स्पष्ट होईल, असं न्यूज चॅनल इंडस्ट्रीतल्या काही जाणकारांनी मत नोंदवलं. सॅम्पल साइज जास्तीत जास्त ५० हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वर्ष-दोन वर्षांत नव्या यंत्रणेला सॅम्पल साइज ५० हजारांपर्यंत न्यायचा आहे. नवीन यंत्रणेमुळे प्राइम टाइममध्ये बदल होईल का, याबाबतही चर्चा आहे. पण, न्यूज चॅनलचे प्राइम टाइमचे पहिले बुलेटिन हे सर्वसाधारणपणे संध्याकाळी सहा किंवा साडेसहा या वेळेत सुरू होते. त्यामुळे त्यांचा प्राइम टाइम योग्य वेळेत सुरू होताना दिसतोय. ज्या न्यूज चॅनल्सवर प्राइम टाइम या वेळेत सुरू होत नाहीये त्यांना मात्र या वेळेत बदल करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स (जीईसी) म्हणजे प्रोग्रामिंग चॅनल्समध्ये मात्र प्राइम टाइमची वेळ बदलली जाऊ शकते. वास्तविक सध्या अनेक चॅनल्स त्यांचा प्राइम टाइम साडेसहा वाजता सुरू होतोय. त्यातही प्राइम टाइम तासभर आधी सुरू होण्याचा बदल केला जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त होतोय.

lp14प्रादेशिक चॅनल्सचा फायदा
बार्कची टीआरपीची नवी प्रक्रिया चॅनलकडून स्वीकारली आहे. आम्ही या नवीन प्रक्रियेविषयी उत्सुक आहोत. बार्कची ही पद्धत जगभरात वापरली जाते. त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता असावी. तसेच ग्रामीण भागातूनही नव्या प्रक्रियेमार्फत रेटिंग्ज मिळणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे, पण याचा चॅनलमधील कार्यक्रमांच्या आशयावर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही. मुळात ग्रामीण प्रेक्षक आणि शहरी प्रेक्षक असा फरक आम्ही करत नाही. त्यामुळे आशयात बदल होणार नाही. वेळेच्या बाबतीत कदाचित बदल करावे लागतील असा अंदाज आहे. गावात रात्री टीव्ही बघितला जात नाही, अशी समजूत आहे, पण आता काळ बदलतोय, त्यामुळे वेळेच्या बदलाबाबत विचार करावा लागेल, असाही दुसरा मुद्दा उपस्थित होतो. बार्कने सुरू केलेली टीआरपीची नवीन प्रक्रिया स्थिर होण्यासाठी आणखी काही महिने जातील, पण हाच वेळ चॅनलसाठी फायदेशीर ठरेल, कारण याचदरम्यान आम्हालाही वेगवेगळे प्रयोग करून बघता येतील. या नव्या पद्धतीमुळे प्रादेशिक चॅनल्सचा जास्त फायदा होईल, हे मात्र नक्की. त्यामुळे येत्या काळात प्रादेशिक चॅनल्सना सुगीचे दिवस येतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
जयेश पाटील, प्रोग्रामिंग हेड, स्टार प्रवाह
मंदार करंजाळकर, सुहास जोशी, चैताली जोशी