सोसायटीत, नात्यात, ओळखीत वेगवेगळ्या समारंभांना गेल्यावर भेटवस्तू मिळातात. कधीतरी उपयोगी पडतील म्हणून कुठल्यातरी कप्प्यात ठेवून दिलेल्या या वस्तू खरंतर कधीच उपयोगी पडत नाहीत..

आज जवळजवळ एक महिन्याने दुपारच्या वेळी निवांतपणा मिळाला. कारण या जानेवारी महिन्यात सतत काही ना काही कार्यक्रम ठरलेलेच. कुणाचं लग्न, साखरपुडा, वाढदिवस, हळदीकुंकू समारंभ, पूजा, वास्तुशांती, बारसे, सहस्रचंद्रदर्शन, ऐंशी वर्षे पूर्ण झाली तो समारंभ, काकी वारली त्याचं तेरावं. दर एक दोन दिवसाआड कार्यक्रमांना जावंच लागायचं.
आज निवांतपणा मिळाला म्हणून डायनिंग टेबलवर सफरचंदाची फोड खात इकडे तिकडे खुर्चीत बसून बघत होती. तेवढय़ात टेबलाच्या कोपऱ्यात ठेवलेली सामान भरलेली पिशवी दिसली. आणि डोक्याची शीरच उठली. कारण त्यामध्ये ज्या ज्या समारंभांना हजेरी लावली तिथे मिळालेल्या परतफेडीच्या वस्तू होत्या. आता या वस्तू कुठे कोंबून ठेवू? पाच, सात वर्षांपासूनच्या वस्तू बेडरूमच्या वरच्या एका खणात ठेवल्या होत्या. आता तिथेही जागा नसावी. मी ती पिशवी आढून घेतली. त्यात हळदीकुंकवाला आलेली गोल टोपली, एक प्लास्टिकची बरणी, जेवण गरम राहाण्याचा डबा, दोन स्टीलचे चपटे डबे. लग्नात मिळालेलं एक स्टीलचं ताट, वास्तुशांतीला, पूजेला गोलाकार आकाराचे लहान-मोठे वाडगे, ऐंशी वर्षे झाली त्याला परत डिझाइनचा वाडगा, काकीच्या तेराव्याला तिच्या सुनेंनी बहिणींना पाच तांब्याच्या वस्तू दान केल्या. त्यात (ताम्हण, तांब्या, फुलपात्र, पळी, समई) घरामध्ये रोजच्या वापरातले दोन सेट आहेतच. घरामध्ये वापरायला सर्व प्रकारची भांडी आहेत. त्याचवेळी परत मला आठवण झाली. मी डायनिंग टेबलखाली असलेल्या ड्रॉवरमध्ये अगोदर आलेल्या भेटवस्तू कोंबून ठेवल्या होत्या. म्हणून ड्रॉवर उघडला. त्यात मुलींना वाढदिवसानिमित्त आलेले चहाचे दोन मोठे मग, एक फोटो फ्रेम, अँग्रीबर्डचे दोन बाहुले, स्टीकर्स निघाले. दोन-तीन नवरात्रीत ओटी भरलेले ब्लाऊज पीस, एक स्टीलचं फुलपात्र. मी तेव्हाच माझ्या मुलींना म्हणाले होते की या वस्तूंचा तुम्हाला काही एक उपयोग नाही. कशाला या अशा भेटवस्तू तुम्ही एकमेकींना देता? त्यापेक्षा खरंच उपयोगी पडेल अशी वस्तू सर्वाचे पैसे एकत्र करून घ्या. किंवा हेच पैसे कोणाला जरुरी असतील त्याला द्या. तेव्हा त्या तशा पद्धतीने वस्तू देण्याचा विचार करून अमलात आणू लागल्या. मी मात्र अनेकदा मुलींचे वाढदिवसाचे पैसे एखाद्या संस्थेत जे लोक ग्रुपने पैसे गोळा करून संस्थेला जरुरी वस्तू किंवा खाण्याच्या वस्तू संस्थेतील व्यवस्थापकाला विचारून दान देतात त्यांच्याकडे देते. आणि माझी मीच आठवू लागली. आपण देतो का या अशा आवश्यकता नसलेल्या भेटवस्तू कोणाला? मी विचार करून आठवू लागले. माझे लग्न झाले तेव्हा मी हळदीकूंकु केलं. पण पाच वर्षे. ते पण प्रत्येक वर्षी गूळ, साखर, नारळ, शेंगदाणे, मिक्स डाळ दिलं जे वापरून संपेल. पुढे गणपती, गौरीचा उत्सव. आमच्या घरी हे सण साजरे करू लागल्यावर गौरीच्या दिवशी ओवसायला येईल त्यांच्या सुपात ब्लाऊज पीस देण्याची पद्धत. पण मी स्पष्ट नकार दिला. कारण हे ब्लाऊज पीस हल्ली कोण शिवत नाहीत. वर प्रत्येक साडीवर ब्लाऊज असतात. मग हेच ब्लाऊज दुसऱ्या कुणाला तरी देतात. त्यापेक्षा इतकी फळं येतात. तीच सुपात त्यांच्या देऊ. प्रथम विरोध झाला, पण मग आता फळ देण्याचीच पद्धत चालू ठेवली.
अशा या नव्या कोऱ्या छोटय़ा, छोटय़ा आलेल्या भेटवस्तूंचं काय करायचं? घरामध्ये तर रोजच्या वापरायची प्रत्येक वस्तू असते. त्यात हल्ली प्रत्येक समारंभ हॉटेल किंवा हॉल असं बाहेरच करतात. घरी केले तरी वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीने करतात. बरे प्रत्येक वस्तू एक, एकच असते. मी कामवाल्या बाईला म्हटलं, तुला ही टोपली, बरणी प्लस्टिकची ने वापरायला. तर ती मला म्हणाली की तुम्हाला जिने दिली तिच्या बाजूच्याच घरी मी काम करते. तिने मला बोलावून दिली, वर जिच्याकडे काम करते ती पण म्हणाली, ही पण टोपली घेऊन जा. ‘आता मी तरी काय नेऊन करू, तुम्हीच द्या कोणाला तरी.’ वर या घरकाम करणाऱ्या बायकांना सतत, दर दिवाळीला मोठय़ा घरातील लोक त्यांचं जुनं सामान देऊन टाकतात. जुनं कसलं, चांगलंच असतं. साडय़ा, ब्लाऊजेस, चप्पल, जुन्या बरण्या, भांडय़ांचे सेट. फार काही वापरलेलं नसतं. त्यात त्यांची घरं लहान. कुठे ठेवणार या वस्तू. त्या त्यांच्या इतर नातेवाइकांनासुद्धा देतात. मी पैसा, त्यांच्या मुलांना खायचे पदार्थ देते. दप्तर, डबा, वॉटर बॅग अशा वस्तू देते; जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल.
आता या वस्तू गोळा केल्या आणि बेडरूमचा दरवाजा उघडला, तर दोघी मुली बसल्या होत्या. त्यांचे मोबाइल बाजूलाच शांत पडलेले दिसले. मला खूप बरं वाटलं. मोठीला शनिवारची ऑफिसला सुट्टी होती. ती पुस्तक वाचत बेडवर बसली होती. छोटी मुलगी तिचे नवीन कानातले बघत होती. मी छोटीला म्हटलं, ‘‘अगं जरा वर चढ, आणि या वस्तू ठेव. तो वरचा ड्रॉवर उघड, बघू तिथे जागा आहे काय?’’ ती पण न कंटाळता उठली आणि टेबलवर चढून ड्रॉवर उघडला. त्याबरोबर एक पिशवी तिच्या खांद्यावर पडता पडता धरून ठेवली. बघतो तर पूर्ण वरचा कप्पा पिशव्यांनी भरलेला. ठेवायला जरासुद्धा जागा नव्हती, मी तिला म्हणाली, ‘‘काढ त्या सर्व पिशव्या. बघू या तरी काय काय वस्तू आहेत त्या.’’ तिने सर्व पिशव्या माझ्या हातात दिल्या आणि आम्ही दोघी बसलो. एका एका पिशवीतल्या त्या नव्या कोऱ्या वस्तू काढू लागलो. माझ्या मुलीने वस्तू काढून मांडायला सुरुवात केली. खोक्यातील वस्तू न काढता उघडून ठेवलं आणि बघता बघता भांडय़ात विविध वस्तू मिळाल्या. त्याचं एक दुकानच तयार झालं. वस्तूमध्ये छोटय़ा जवळजवळ २० वेगवेगळय़ा आकाराच्या वाटय़ा, वाडगे, पेले होते. चहाचे कप सेट, दिवाळीत ड्राय फ्रूट टाकून दिलेले ट्रे, त्यातील वाटय़ा, स्टीलचे चपटे पाच सहा लहान मोठे डबे, काचेचे वाडगे, स्टीलचे उभे डबे, कॉपरची भांडी असं बरंच काही होतं.
‘‘मम्मी या वस्तू ठेवून काय करणार? दे कोणाला तरी.’’
‘‘मी कोणाला देऊ? नव्या असल्या तरी एक नाही तर दोन अशाच वस्तू आहेत. त्या खूप भारी पण नाहीत की कोणाला गिफ्ट देऊ. वर आपणच वापरत नाही मग दुसरे कोण वापरतील?’’
‘‘मग कुठल्या तरी संस्थेला दे दान, नाही तर तुझ्या मदतनीस आहेत त्यांना दे.’’
‘‘अगं एका संस्थेतील व्यवस्थापकबाईंना विचारलं होतं, तर त्या म्हणाल्या, आमच्याकडे अशी खूप भांडी आहेत. आम्ही घेताना सेटवाईज घेतो. तुम्हाला आम्हाला काही द्यायचं तर पैशाच्या किंवा खाण्याच्या रूपाने देऊ शकता. कामवाली बाई पण नको म्हणते’’ मला मागचा प्रसंग आठवला. गेल्याच वर्षी मला पूजेला गोल स्टीलचं ताट भेट आलं. त्यात हळदकुंकू, अबीर, अगरबत्ती लावायचा स्टॅण्ड, वाटी असं सर्व एकाच ताटात बसवलेल ंहोतं. मी माझ्याकडे काम करायची तिला म्हणाले, तुला घेऊन जा. उपयोगाला येईल. तर ती थोडा विचार करून माझ्याकडे बघत म्हणाली, ‘‘मला याचा काय बी उपयोग नाय, ताई तुम्हाला मला जर काय द्यायचंच असेल तर तुमच्या वापरातील मॅचिंग ब्लाऊज असलेली साडी द्या. म्हणजे माझ्याकडं तुमची धरून अठ्ठाईस साडय़ा होतील. तुमच्यासारख्या मॅडमांनी दिलेल्या तीन वर्षांपासूनच्या साडय़ा आहेत. त्यांनी नवीन साडय़ा आणल्या तर एक वेळेला चार, पाच ब्लाऊजसकट साडय़ा न्या सांगतात. अशा केल्यात जमा. आता महिन्याचे दोन सुट्टीचे दिवस सोडले तर रोज एक नेसायला होईल.’’ एवढं बोलून ती तोंड भरून हसली आणि पदर खोचत अर्धी गिरकी घेत बेसिनजवळ भांडी घासायला लागली. तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून मनातच रागवत म्हणाले, ‘‘मोठी ऑफिसला जाणारी मॅडमच बाई ही.’’ म्हणजे फुकट मिळालेल्या वस्तू दुसऱ्याच्या गळय़ात मारायला जातो तर असं फुकट ऐकून घ्यावं लागतं.
आता काय करायचं हा विचार करत असतानाच अचानक एक विचार डोक्यात घोळू लागला. समोरच बेडवर बसून मोठी मुलगी पुस्तक वाचत होती. ती मध्येच मान वर करून त्या वस्तूकडे बघत होती व आमचं बोलणं पण ऐकत असावी. तिला बघून माझ्या डोक्यात विचार आला आणि मी बोलून दाखवला.
‘‘अगं दीदीचं या दीड-दोन वर्षांत लग्न करायचं आहे, तर तिचं कन्यादान करताना भांडी लागणार तर यातलीच देऊ.’’ हे तिने ऐकल्याबरोबर म्हणाली, ‘‘मम्मी तुलाच जर या दान आलेल्या वस्तूंचा काही उपयोग नाही तर मी तरी करीन का? तुला जर द्यायचं तर मला प्रेशर कुकर, फूड प्रोसेसर, ओव्हन, टोस्टर, अ‍ॅटोमेटिक प्रेशर कुकर अशा वस्तू दे. म्हणजे या वस्तू बघून स्वयंपाक करणारी बाई टिकून राहील.’’ मी खाली मान घालून नको तो विचार बोलून दाखवल्याबद्दल स्वत:लाच दोष दिला. माझी छोटी मुलगी गालातल्या गालात हसायला लागली. माझा चेहरा बघून मग तीच म्हणाली, ‘‘अगं त्या आपल्या टिळक नगरवरून चेंबूर मार्केटकडे जाणाऱ्या ब्रीजखाली कितीतरी भिकारी, गरीब बायका असतात. त्यांना दे एक एक.’’ ती असं बोलल्याबरोबर मला मागे घडलेला प्रसंग आठवला. ‘‘मागे कपडे दान करताना काय प्रसंग घडला तो तुला माहीत आहे ना.’’ माझी मोठी मुलगी म्हणाली, ‘‘आई मला नाही माहीत. मला सांग ना.’’ माझ्या डोळय़ासमोर अख्खा प्रसंगच उभा राहिला.
आम्ही नवीनच राहायला आलो तेव्हा त्या ब्रीजखालूनच मार्केटकडे रस्त्याने जायचो. त्या ब्रीजखालीच बरेच फेरीवाले रोजच्या लागणाऱ्या भाज्या व इतर वस्तू विकायचे. मी त्यांच्याकडून पालेभाज्या, इतर भाज्या, कांदे, बटाटे, नारळ, लिंबू व इतर पण वस्तू विकत घ्यायची. त्यामुळे ते चेहऱ्यावरून ओळखायचे. जरा लवकर दुपारनंतर गेलं तर ही सर्वजणं कठडय़ावर रांगेत बसून चहा पीत बसलेली दिसायची. चहाची किटली घेऊन एक मुलगा यायचा. तो त्यांना रांगेत चहा छोटय़ा ग्लासातून द्यायचा. मी एकदा जाता जाता एकाला विचारलं, ‘‘माझ्याकडे माझ्या मिस्टरांचे वापरलेले चांगलेच कपडे आहेत. तुम्हाला आणून दिले तर घालाल का?’’ ते सर्व म्हणाले, घालू आम्ही, घेऊन या. मी पण दुसऱ्या दिवशी त्यांचे सर्व वापरलेले, पण चांगलेच कपडे गोळा केले. त्यात ३ पॅन्ट, २ शर्ट, २ टी शर्ट, २ बर्मुडा पॅन्ट, १ कुर्ता असे दहा नवेच कपडे एका पिशवीत भरले. मग एका मधल्या दिवसाच्या दुपारच्या वेळेत ती पिशवी घेतली आणि निघाले. येताना भाजी पण घेऊन येऊ, असा विचार करत ब्रीजखाली पोहचली. ते सहा, सात जण चहा पीत कठडय़ावर बसले होते. मी रांगेत प्रत्येकाच्या हातात पिशवीतून काढून कपडा देत गेली. मी पॅन्ट शर्ट देते आहे बघून आणखी तिघं जण आले. राहिलेले तीन प्रत्येकाला देऊन टाकले. प्रत्येक जण दिलेला कपडा वर खाली करून बघत होते. त्यातील एक बारीक अंगकाठीचा मुलगा माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘आण्टी मुझे ये पॅन्ट बहोत बडी होगी (एकाकडे बोट दाखवून) आप वो शर्ट उसको मुझे देने को बोलो, मेरे पास अच्छा शर्ट नही है.’’ मी तो ज्याच्याकडे बोट दाखवला त्याला म्हणाली, ‘‘अरे तू ये पॅन्ट ले उसे वो शर्ट दे दो!’’ ‘‘नही मेरे पॅन्ट पे ये मॅचिंग शर्ट है!’’ शर्टवाला म्हणाला. ‘‘देखो आन्टी बोल रही तो वो शर्ट मुझे दे दो!’’ आणि सरळ त्याने त्याच्या हातातील शर्टची बाही पकडून खेचायला लागला. ज्याच्याजवळ शर्ट होता तो शर्टचा बाकीचा भाग पकडून खेचायला लागला. मी काही बोलायच्या आधीच जोरदार खेचाखेची चालू झाली, आणि ज्याला पॅन्ट नको हवी होती त्याने इतक्या जोरात शर्टची बाही खेचली की पूर्ण शर्टचा हात त्याच्या हातात आला. ज्याच्याकडे राहिलेला शर्ट होता तो त्या शर्टसकट दणकन खाली आपटला. दुसऱ्याच क्षणाला उठून तो शर्टचा हात ज्याच्याकडे होता त्याच्या दिशेने येऊ लागला. हा प्रसंग मी डोळे मोठे करून तोंडाचा आ वासून बघतच राहिले. पण दुसऱ्याच क्षणी पुढील प्रसंगाची जाणीव होऊन मी भाजी न घेताच तेथून काढता पाय घेतला व थेट घर गाठलं. मी हा सर्व प्रकार आठवून सांगितला आणि म्हणाली, ‘‘या स्टीलच्या लहान, मोठय़ा वस्तू त्या बायकांना दिल्या तर त्या नाही का मला म्हणायच्या, तिला दिलेला डबा मला हवा, नाहीतर ते स्टीलचे ताट मला घ्यायला सांगा, हा वाडगा तिला घ्या. मग त्यांच्यात हाणामारी होऊन त्या एकमेकींची डोकी फोडायच्या. नको रे बाबा हे असले प्रकार.’’ आणि मी कानावर हात ठेवले. आम्ही तिघी मग खो, खो हसायला लागलो.
‘‘मम्मी आता ऐक शेवटचा उपाय सांगते. तू वाचलं आहेस ना, तो अमेरिकेमध्ये ‘गराज सेल’ लावतात तसा आपण सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये लावू- ‘गराज सेल.’
‘‘अगं यातील बऱ्याच वस्तू सोसायटीच्या बायकांनीच हळदीकुंकू, वास्तुशांती, लग्नकार्यात दिल्या आहेत. बोलतील यांना कसले हे डोहाळे लागलेत वर. कंपाउंडचं भाडं द्यावं लागेल ते वेगळे. मला बाहेर पडणं मुश्कील होईल.’’
मोठी म्हणाली, ‘‘आता या सर्व वस्तू भंगारवाल्याला दे.’’
‘‘त्याला पण मी विचारलं. तो म्हणाला, आम्ही पण मोडतोड करून त्या सामानाची विभागणी करतो. आता या नवीन वस्तू आम्ही ठेचून घेऊ का? हम नही लेता.’’
‘‘मग आता काढलंस तसं परत दोघी मिळून वर ठेवून द्या.’’
आणि मी मनाशीच विचार करू लागली. आपण किती वेगाने पुढे जात आहोत. जे काही बदल होत आहेत, त्याप्रमाणे आपण बदलत जातो. नवनवीन संकल्पना आपण उचलून धरतो. पण पूर्वीपासून करत आलो, देत आलो आहोत. एक करते म्हणून आपणही एखादी प्रथा चालू करतो. दान, पुण्य करू याच्या नावाखाली या अशा वस्तू देणे, आठवण राहावी म्हणून हळदकुंकू लावून लग्नात अशा वस्तू देणं योग्य आहे का? हजारो रुपये पाण्यात घालवतात. आता बऱ्याच जणी त्यात सुधारणा करत आहेत. सार्वजनिक हळदीकुंकवाला वापरण्याजोग्या वस्तू देतात. तरी पण काही समारंभांना अशा वस्तू अजूनही देण्याची प्रथा आहेच. आता या बिनकामाच्या वस्तू देणं बंद केलं पाहिजे. नाही का?