lp08‘तुम्हाला काय हवंय.. शिस्त की पश्चात्ताप’ ही कव्हर स्टोरी वाचली. पूर्वी हृद्रोग हा फक्त श्रीमंतांना वयाच्या उतारावर होणारा रोग असे मानले जात असे. पण आता तो सर्व आर्थिक स्तरातील लोकांना कुठल्याही वयात होताना दिसतो आहे, कारण एकूण राहणी, खानपान आणि जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन हा सर्वाचाच बदलला आहे. जीवनाकडे बघण्याची बदललेली दृष्टी आणि मनुष्यजन्म एकदाच मिळतो म्हणून सर्व काही उपभोगण्याची वृत्ती या वाढत्या अनारोग्याची मुख्य कारणे आहेत. 

‘गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक’ या कव्हर स्टोरीमधील पालक हा काही प्रमाणात बालमानसशास्त्र जाणणारा आणि मानणारा असा आहे, पण त्याचे बालपण पारंपरिक संगोपनाचे असल्याने नवीन विचार मानले तरी ते पूर्णपणे अंगीकारणे त्याला जड जाते आणि त्यातून गोंधळलेली मन:स्थिती तयार होते. हल्ली मुलांबरोबर मैत्रीचे संबंध असावेत हे सर्व पालकांना माहीत असते, तसे ते वागतातसुद्धा; पण मुले वयात येताना त्यांच्याशी जो संवाद साधायची गरज आहे तो साधला जात नाही, एक वेळ आई-मुलीत संवाद साधायचा प्रयत्न तरी होताना दिसतो, पण मुलगा आणि वडील यांच्यात अशा विषयांवर क्वचितच संवाद साधला जात असेल. मुलाला घरात दारू प्यायला सोबत करणारे बाबा तारुण्यातील मानसिक कुतरओढीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. मुलगी वयात आली की आई जरा सजग होते, पण मुलगा वयात आल्यावर आई-बाबांपैकी कुणीही सजग होत नाही, कारण मुलाने काहीही केले तरी चालते असा सामाजिक भ्रम आहे. त्यातच नवीन तंत्रज्ञान आणि उपलब्ध होणारे ज्ञान पालकांना झेपत नाही ते मुले कशी काय पचवू शकणार?
– माया हेमंत भाटकर, चारकोप, मुंबई.

lp09विचारमंथनासाठीचा समुद्र
सोनाली नवांगुळ यांच्या ‘ऑस्कर-रीवाच्या शोकांतिकेच्या निमित्तानं..’ या प्रातिनिधिक लेखानं मनाला चटका लावला. स्त्रियांना जसा दुसऱ्याच्या देहबोली अन् वागणुकीबद्दल ‘सिक्स्थ’ सेन्स असतो, तशी अपंग व्यक्तींच्या चांगल्या अवयवामध्ये काही प्रमाणात जास्त क्षमता असते हे अगदी खरं आहे. अंध व्यक्तींना श्रवणशक्तीचा भक्कम आधार असतो. ‘आँखे’या बँक रॉबरीच्या सिनेमात अंध व्यक्तींच्या या शक्तीचा नकारात्मक उपयोग केलेला दाखवलाय. तर ‘स्पर्श’ या चित्रपटातून स्वावलंबी, सकारात्मक विचारांनी जीवन समृद्ध करणारा नसिरुद्दीन शाह बघायला मिळाला. एकंदरीतच अपंग व्यक्ती आसपासच्या व्यक्तींच्या हेतू आणि वावराविषयी नैसर्गिकरीत्या सावध आणि साशंकही असू शकतात. कारण त्यांच्या विकलांगतेचा गैरफायदा घेणारे बरेच असू शकतात.

लेखिका किंवा ऑस्करसारख्या समाजात मानाचं स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांना हवी तशी परिस्थिती निर्माण करून देणारी मंडळी असतात. लेखिकेसारख्या विकलांग व्यक्ती स्वत:च्या दैनंदिन व्यवहारांबद्दल जागरूक आणि काटेकोर असतात हे अगदी योग्यच आहे. पण त्याचा त्या बाऊही करत नाहीत हे विशेष. अशा व्यक्तींच्या बाबतीत इच्छामृत्यू हा टोकाचा आणि वादाचा मुद्दा आहे. ‘इच्छापत्रा’च्या लेखात आपल्या वैद्यकीय उपचारांना थांबवून मृत्यू देण्याबद्दलचे ‘इच्छापत्र’ रीतसर नोंदणी करून ठेवता येण्याचा मार्ग सांगितला होता त्याची आठवण झाली.

लेखिकेनं स्वत:च्या दैनंदिन व्यवहारांसाठी केलेली गृहरचना आणि त्याच्या अनुषंगानं विकलांग व्यक्तींच्या मानसिकता आणि भौतिक जीवनाविषयी केलेली चर्चा समर्पक वाटली. अशा माणसांना जाणवणारी असुरक्षितता आणि धडधाकट माणसांना वाटणारी असुरक्षितता यांच्यात काही फरक असू शकतो का हे लेखाचं शेवटचं वाक्य सर्वसामान्य मेंदूला झिणझिण्या आणणारं आहे. कारण आपण धडधाकट असूनही त्याबद्दल देवाचे आभार मानायचे सोडून जीवनातल्या छोटय़ाछोटय़ा उणिवांबद्दल तक्रारींचा केवळ पाढाच वाचत असतो, हे कटु सत्य आहे.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे.

lp10एक जाहिरात अंगाशी येणारी

नेत्रा
हृषीकेश, मला तुमचा थेटपणा आवडला. मला ही जाहिरात माहीत नाही, कारण मी परदेशात असते; पण तुमचे सगळे मुद्दे पटले. आपल्या आजूबाजूचे लोक आपली उलटतपासणी करणारच, गाढव आणि बाप-मुलाच्या गोष्टीसारखे. त्यामुळे तुम्ही लक्ष पुढे जाण्यावर द्या. आम्हाला तुमचा उत्तम अभिनय पाहायचाय फक्त.

डॉ. उज्ज्वला
लेख वेगळा, मुद्देसूद आणि ओघवता आहे. फार आवडला. समारोप उत्तम; पण आधीच्या जाहिरातीत उपहास कशासाठ होता? आघाडीचंच तर सरकार होतं ना?

नीता
फार फार सुंदर लेख.

राजाभाऊ
हृषीकेश, तुमचा अनुभव आणि त्याविषयीचे विचार तुम्ही निर्भीडपणे मांडलेत याबद्दल तुमचं अभिनंदन. मी ही जाहिरात अनेकदा पहिली आहे. खरं सांगायचं तर, या जाहिरातीचा उलट परिणाम झाला आहे. रस्त्यांची स्तुती, सरकारी दवाखाना ‘ब्येस’ असणं हे लोकांनी पाहिल्यावर त्यांच्या मनात तुलना होऊन असं मुळीच नाहीये हे अधिक परिणामकारक रीतीने लक्षात यायचं व ही किती खोटी जाहिरात आहे असं वाटायचं. ही नकारात्मक जाहिरात आहे. तुम्ही नाही, तर राष्ट्रवादीच फसली आहे.

विनोद मुंतोडे
तुम्ही म्हणता की, जाहिरात आधी आघाडी सरकारची, तर त्यात सरकारविरोधी मत का? लेखात मतभिन्नता आढळते.

हरीश कुलकर्णी
हृषीकेश तू आता अ‍ॅक्टर कमी आणि पत्रकार जास्त वाटत आहेस!! हा अनुभव आम्हालाही हवाच होता.

लय भारी!
लय भारी म्हणजे अत्यंत चांगले. वाचनाचे महत्त्व ‘लोकप्रभा’मधून कळते म्हणून आम्ही चांगले वाचण्याचा नेहमी प्रयत्न करतो. वाचन हा एक छंद झालेला आहे. वाचनाने वाचक बहुश्रुत होतोच, शिवाय मनाला फार मोठी प्रसन्नता व प्रगल्भता लाभते. मन प्रसन्न होते. वाचनाची आवड आणखीनच वाढत जाते. भूतकाळाशी वर्तमानाची सांगड घालण्याचे सामथ्र्य जसे ग्रंथामध्ये असते, अगदी तशाच प्रकारचे सामथ्र्य ‘लोकप्रभा’च्या साप्ताहिक अंकामध्ये आहे. म्हटले तर अतिशयोक्ती नाही.

वाचनाने व्यासंग वाढतो. त्याचबरोबर वाचक आपली ज्ञानक्षमता अद्ययावत ठेवू शकतो. त्यातून प्रगतीचा मार्ग सुकर होतो. वाचनाने मनोरंजन तर होतेच होते, शिवाय मनाला फार मोठी प्रसन्नता व प्रगल्भता लाभते. केवळ १२ रुपये खर्चून हा आनंद ठेवा मिळवता येतो.
राम शेळके, नांदेड.

बाह्य़रुपालाच महत्त्व
आपल्या समाजामध्ये सुंदर दिसण्यासाठी गोरा रंगच हवा असा समज पसरलेला दिसतो (सुंदर मी होणार, मेक टु ऑर्डर – उज्ज्वला दळवी, दिवाळी अंक २०१४). अशी चुकीची मानसिकता तयार झाल्यामुळेच बाजारात फेअरनेस क्रीम (पुरुषांसाठीसुद्धा!) मोठय़ा प्रमाणावर विकले जाताना दिसतात. दुसरे उदाहरण म्हणजे लग्न ठरवताना आधी बाह्य़ रंगरूप कसे आहे हे बघितल्यावरच पुढील पावले उचलण्यात येतात. त्यामुळे मुला-मुलींचे स्वभाव एकमेकांना पूरक आहेत का तसेच आवड-निवड जुळतात का, इत्यादी आवश्यक गोष्टींना बऱ्याचदा कमी महत्त्व देण्यात येते हे सत्य आहे.
केतन र. मेहेर, विरार (पूर्व) ई-मेलवरून.

वेगवेगळे पैलू समजले
शशिकला लेले यांचा ‘थँँक्सगिव्हिंग’वरचा लेख वाचनीय व अर्थपूर्ण होता. मागच्या वर्षी अमेरिकेत शिक्षणाची संधी चालून आली व तेव्हापासून इथल्या परंपरा व सणवार जपण्याची ओढ मनात आहे. थँँक्सगिव्हिंगबद्दलच्या चर्चा नोव्हेंबर सुरू होताच कानावर पडू लागतात. त्याचा खरा महत्त्व व त्याचा उगम कसा झाला हे या लेखाद्वारे उत्तमरीत्या कळून चुकलं. लोकांना थँँक्स देणे असं जरी याचा सरळ अर्थ असला तरी त्यामागची मूळ कथा कोणती, हेदेखील कळले. बारकाईने सगळे मुद्दे मांडून लेख अजून रंगतदार झाला आहे. अमेरिकन लोकांच्या रीती-परंपराही या लेखाद्वारे चोखपणे मांडण्यात आल्या आहेत.
– सुदीप बापट, ई-मेलवरून.