vachak-lekhakदूरदर्शन भारतात सुरू झाले तेव्हा एकच चॅनेल होते. त्यावर मराठी, हिंदी व इंग्रजी बातम्या त्यांच्या वेळेप्रमाणे असत आणि इतर वेळी दाखविल्या जाणाऱ्या हिंदी, मराठी मालिका आटोपशीर असत. म्हणजे कमीत कमी १६ भागांच्या किंवा फार तर २६ भागांच्या. जाहिरातींची गर्दी नसल्याने त्या सलग पाहता यायच्या.

आत्ता दूरदर्शनवर अनेक चॅनेल आले आहेत. त्यांचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक चॅनेलवर जाहिरातींचा माहोल उभा राहू लागला. आणि जाहिराती सतत मिळत राहाव्यात म्हणून सर्वच भाषांतील मालिका कशाही प्रकारे वाढविल्या जाऊ लागल्यामुळे सुरुवातीला काही भागापर्यंत उत्तम वाटणाऱ्या मालिका अवास्तवपणे वाढविल्यामुळे कंटाळवाण्या वाटू लागतात. शिवाय कथानक खंडित होते ते वेगळेच.

मात्र आज झी-मराठी चॅनेलवर दाखविल्या जात असलेल्या तीन मालिका नेहमीच्या पद्धतीने वाढविल्या जात असल्या (आणि नेहमी त्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्याची जाणीवही होत असली) तरी त्या मालिका तशाच चालू राहाव्यात असे वाटत राहाते. यातील पहिली मालिका गुणानुक्रमाने पाहिल्यास ‘होणार सून मी त्या घरची’ पहिल्या क्रमांकाची असावी असे मला वाटते, कारण यातील नायक-नायिका श्रीरंग-जान्हवी प्रेम करायला योग्य वयाचे तरुण आणि लोभस आहेत. जान्हवीचे हास्यच प्रसन्न वाटते. बस स्टॉपवर प्रेम करण्याची कल्पनाही नावीन्यपूर्ण आहे. तसेच आजी आणि इतर पाच जान्हवीच्या सासवा यांचा एकत्र कुटुंबातील एकोपा. कुटुंबात नंतर आलेले श्रीरंगचे काका आणि बाबा यांचाही कुटुंबाशी झालेला समन्वय. मालिका वाढवण्यासाठी सासवांच्यात होणारे पोरकट वादही करमणूक करणारे असल्यामुळे कंटाळवाणे वाटत नाहीत. मात्र अनिल आपटे व जान्हवीची लोभी व आक्रस्ताळी आई यांचे प्रवेश हे खास मालिका वाढविण्यासाठीच योजलेले असावेत असे वाटते. तरी श्रीरंग-जान्हवी, जान्हवीच्या सहा सासवा, जान्हवीचे आई-वडील यातून दिग्दर्शकाने व लेखकाने वेगवेगळय़ा स्वभावाची व्यक्तिमत्त्वे उभी केली आहेत.

जान्हवीचा अपघात होऊन ती हॉस्पिटलात असताना ती वाचणार की नाही या विचाराने प्रत्येकाचे होणारे लांब दु:खी चेहरे पडद्यावर बराच काळ दाखविणे हा मालिका वाढविण्याचा पद्धतशीर प्रकार असला (कारण जान्हवी नायिका असल्यामुळे ती वाचणार हे प्रेक्षकांना कळत असते) तरी ते कथानकाच्या दृष्टीने वास्तव आहे. पण जान्हवीचे आजारानंतरचे विस्मरण मात्र पुढच्या कथानकाची उत्सुकता वाढविणारे आहे, म्हणूनच ही मालिका अशीच चालू राहावी असे वाटते.

दुसरी हवीहवीशी वाटणारी ‘झी मराठी’वरील मालिका ‘जुळून येतील रेशीमगाठी.’ या मालिकेत ती वाढवीत नेणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. सर्वात पहिली म्हणजे सुरुवातीपासून अधून-मधून दाखविले जाणारे मेघनाच्या वडिलांचे पराकोटीचे बाबाजीचे वेड. तसेच लग्नाच्या पहिल्या रात्रीच आपल्या लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची मेघनाने आदित्यजवळ कबुली देणे, ती त्याने स्वीकारून तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा शोध लावण्यास मदत करणे, शिवाय तिच्या मर्जीप्रमाणे आपल्या लग्नबंधनातून तिला मुक्त करण्याची तयारी दाखविणे व ते साध्य होईपर्यंत रात्री एकशय्या न करणे. प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवण्यासाठी प्रियकराचा हा शोध पुरेसा लांबवीत नेऊन शेवटी मेघनाचेच मतपरिवर्तन होणे. सर्व प्रसंग मालिका वाढविण्यासाठीच असले व एकूण कथानक रेंगाळत चालले असले, तरी सतत दाखविला जाणारा देसाईंच्या एकत्र कुटुंबातील एकमेकांबद्दल जिव्हाळा, समंजसपणा, मनमिळाऊपणा, अर्चनाचा खटय़ाळपणा आणि नवरा-बायकोतील अधून-मधून होणारे प्रेमळ वाद, नाना व माईंची सर्वाना समजून सांभाळून घेण्याची वृत्ती (जिच्यामुळे मेघनाचे नकळत मन परिवर्तन होते) यामुळे ही मालिका हवीहवीशी वाटते.

तिसरी मालिका अलीकडेच संपलेली एका लग्नाची तिसरी गोष्ट. यात ओम आणि ईशा यांच्या लग्नाचा घोळ सतत या ना त्या कारणाने वाढवीत नेणे, ईशाच्या आई व काकूचे ओमच्या घरी त्याच्या घरची कुटुंबवत्सलता पाहण्यासाठी येणे, ईशाच्या काकूची नाराजी, ओमच्या संशोधक बापाचे आगमन. त्यांच्याविषयी ओमच्या मनातील बराच काळ असणारी अढी. नंतर ती हळूहळू कमी होणे. ओमच्या आई-वडिलांनी एकत्र यावे व नंतर आपण लग्न करावे असा ईशाचा आग्रह. मध्येच ओमच्या गावाकडच्या काकाचे आगमन. या सर्व गोष्टींमुळे मालिकेची लांबी वाढत असली, तरी कामत आजोबा, आजी, मधू तसेच गुरूजी व त्यांची सतत धास्तावलेली पत्नी धना, शोभना मावशी, दत्ताराम काका अशा चार झाडावरच्या चार पक्ष्यांनी स्वत:च्या कौटुंबिक समस्यांमुळे एकत्र येऊन ओमशी जिव्हाळय़ाने वागणे व ओमच्या एकत्र कुटुंबाचा आभास निर्माण करणे आणि वेळोवेळी बाहेरच्या मंडळींसमोर ओमचेच खरे कुटुंब असल्याचे नाटक करणे यामुळे मालिका मनोरंजक वाटते.

या तिन्ही मालिकांचा विशेष म्हणजे इतर बऱ्याच मालिकांत दिसणारी आपसातील भांडणे, सूड घेणे, त्यासाठी कारस्थाने करणे अशा गोष्टी तिन्ही मालिकांत नसल्यामुळे त्या निर्मळ वाटतात.

आता बहुतेक सर्वच ठिकाणी ‘हम दो- हमारे दो’ अशी आटोपशीर विभक्त कुटुंब संस्था दिसत आहे. यामुळे या मालिकांत दाखवली जाणारी एकत्र कुटुंब पद्धती जुन्या ज्येष्ठ मंडळींना आठवणींना उजाळा देणारी म्हणून आणि नव्या पिढीला नावीन्यपूर्ण वाटणारी म्हणून या तीन मालिका हव्याहव्याशा वाटतात.