आपल्या शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्या हृदयावर होतो.

‘योग’ या शब्दाचा उगम ‘युज’ या धातूपासून झाला आहे. याचा अर्थ संयोग होणे असा होतो. भारतीय अध्यात्माच्या दृष्टीने ‘योग’ या शब्दाचा अर्थ ‘परमात्मा’ आणि ‘जीवात्मा’ यांचा एकत्र संयोग होणे, जीवात्माचे परमात्म्याशी मीलन होणे असा होतो.
योग ही जीवनशैली आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली मोठी देन आहे. भारतात उगम पावलेली योग विज्ञानाची सरिता आता विश्वाच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पसरली आहे. तत्त्वज्ञानाचा व्यापक आणि सखोल मूलाधार असलेले हे शास्त्र काहींनी आध्यात्मिक वळणांनी पुढे नेले तर अनेकांनी त्याचा व्याधीमुक्ती तंत्राच्या अंगांवर भर देऊन उपयोजित योगशास्त्र म्हणून विकसित केले. त्यामुळेच ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोगपासून हठयोग, ते पॉवर योगापर्यंत ज्यांना जसे भावले त्याप्रमाणे त्यांनी पुढे नेले.
भारतातील योग परंपरा पंधराशे वर्षे जुनी आहे, असे मानले जाते. महर्षी पतंजलींच्या महत्त्वपूर्ण योगसूत्राच्या आधीदेखील काही शतके योगविद्येचे विविध प्रकार आणि प्रवाह भारतवर्षांत होते. पतंजली योगशास्त्रात सूत्रे पूर्णपणे मानसशास्त्राच्या दृष्टीने ‘शांत प्रगल्भ चित्तवृत्ती’भोवती केंद्रित केली गेली आहेत. यात आसनांना दुय्यम स्थान आहे. तरंगहीन सरोवराप्रमाणे चित्त शांत झाल्यानंतर पुढच्या अवस्था गाठता येतात. अंतिम अवस्था समाधी म्हणजे चित्त आणि शरीराची तात्पुरती फारकत करणे.
विवेकानंदांनी ज्याला ‘राजयोग’ म्हटले तो ‘अष्टांगयोग’ आहे. या अष्टांगयोगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या आठ पायऱ्या सांगितल्या आहेत.
शारीरिक आरोग्यासोबतच मनाचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्य रक्षणासाठी आणि शारीरिक व्याधी टाळण्यासाठी योगशास्त्र आणि योग जीवनशैली खूप उपयुक्त ठरते.
शारीरिक योगशास्त्र म्हणजे कमीतकमी कष्टात स्नायुबळ फारसे न वापरात, हृदय किंवा श्वासगती न वाढवता करायचे संथगतिशील किंवा जास्त करून स्थितिशील पद्धती आहे.
शारीरिक व्यायामात सिम्पथेटिक (२८ेस्र्ं३ँी३्रू) ऑटोनॉमिक चेतासंस्था काम करते तर योगाभ्यासात पॅरासिम्पथेटिक (विरामजनक) चेतासंस्था जास्त कार्यरत असते, त्यामुळे शिथिलता आणि शांती हे योगाभ्यासाचे व्यवच्छेदक गुणधर्म आहेत.
योगाभ्यासात ईश्वरप्रणिधान असा शब्द असला तरी योगशास्त्र जवळजव्ळ ईश्वररहित पद्धती आहे. ती मूलत: मानसप्रक्रिया आहे. ती एक शास्त्रशुद्ध जीवनशैली आहे. याची आठ अंगे शास्त्रात सांगितली आहेत.
१) यम : यामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय (अस्तेय म्हणजे चोरी न करणे), अपरिग्रह (म्हणजे संग्रह न करणे, साठेबाजी न करणे) आणि ब्रह्मचर्य या बाह्य व्यावहारिक आचारसंहिता आहे.
२) नियम : यामध्ये योग्य असा शिस्तबद्ध आहार, विहार, विचार सांगितले आहेत. विशेषत: स्वत:च्या शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता, मनाचा संतोष- आनंद, अभ्यास-तप आणि ईश्वर शरणता या पाच बिंदूंचा समावेश आहे.
३) आसन : यात शारीरिक आसनांचा समावेश आहे.
४) प्राणायाम : ही श्वासोच्छ्वास नियंत्रणाद्वारे प्राणिक ऊर्जा नियंत्रित करण्याची पद्धती आहे. प्राणायाम, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रमरी या सर्व श्वसनांच्या व्यायामाचे शरीरावर, आरोग्यावर चांगले परिणाम होतात. तसेच मानसिक आरोग्यपण लाभते.
५) प्रत्याहार : यामध्ये इंद्रिय निग्रह म्हणजेच इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. बा वस्तूपासून लक्ष काढून, बा प्रलोभनापासून लक्ष आत ओढणे याचा समावेश आहे.
६) धारणा : म्हणजे चित्त एकाग्र करणे. मानवी मन चंचल असते. ते एका ठिकाणी किंवा एका विषयावर फार काळ टिकत नाही. ते एकाग्र करण्याची, आपले लक्ष एका ठिकाणी केंद्रित करण्याची साधना करणे म्हणजे ‘धारणा’ होय.
७) ध्यान : चित्त एकाग्र करण्याची आपली धारणा पुरेशी झाली की त्याची पुढची पायरी आहे..ध्यान!! एकाग्र चित्तानं चिंतन करणं, मनन करणं याचंच नाव ‘ध्यान’ होय. मन, चित्त एवढे एकाग्र करायचे की बाह्य जगाचा विसर पडायला पाहिजे. अष्टांग विसर पडायला पाहिजे. अष्टांग योगाचा पाया थोडा धार्मिकतेकडे झुकला असल्यामुळे, योग या शब्दाचा अर्थ..(भारतीय अध्यात्माच्या दृष्टीने) परमात्मा आणि (साधक) जीवात्मा याचा एकत्र संयोग होणं, जीवात्म्याचे परमात्म्याशी मीलन होणे असा होतो.
ध्यानामध्ये मन-चित्त एवढे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा की आपलं तन, मन, बुद्धी, अहंकार आणि जाणिवा एकवटून साधक परमात्म्याचे चिंतन करून तो परमात्म्याशी ‘एकरूप’ होऊ लागतो.
ध्यान साधना करू लागलं की त्या परमात्म्याची परमशक्तीशी जवळीक हळूहळू वाढू लागते. आपण सर्व अंतरंगी एकच आहोत. जोडलेले आहोत. वेगळे नाही, अशी भावना तयार व्हायला होते. मनातील एकटेपणा कमी होतो. आपल्यासोबत आपला परमात्मा, आपला देव आहे अशी दिलासादायक भावना मनात सदैव राहाते. त्यामुळे मन शांत निर्धास्त व तणावरहित असते. ही हृदयरोगाच्या बाबतीत मोलाची गोष्ट आहे.
८) समाधी : समाधी हे साधकाच्या साधनेचे अंतिम ध्येय असते. ध्यान करता करता ध्यानाच्या परमोच्च क्षणी साधकाला समाधी प्राप्त होऊ शकते. त्याचे शरीर आणि शारीरिक संवेदना विश्रांत स्थितीत असतात, पण मन आणि बुद्धी सजग आणि तरतरीत असतात. समाधी स्थितीत साधक पूर्णपणे भानावर असतो, पण त्याचं शरीर मात्र भानावर नसल्यासारखं वाटतं. स्वत:तील ‘अहंम’ ‘मी’पण संपलेले असते आणि मनामध्ये. आत्म्यामध्ये प्रगाढ शांतता, मन:शांती भरून येते. ही अवस्था अवर्णनीय असते.
योगमार्गाने जाणारे साधक हे परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. परमात्म्यात आपला आत्मा विलीन व्हावा.. परमात्म्याचे आणि जीवात्म्याचे मीलन व्हावे यासाठी त्याचा सगळा प्रयत्न असतो. सर्वसाधारण संसारी माणूस एखाद्या योग्यासारखा योगसाधना करू शकणार नाही, पण नियमितपणे केलेले हे प्रयत्न शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त होऊ शकतात. व्याधीमुक्ती-साठीही उपयोगी पडू शकतो.
सर्वच आजार सायको-सोमॅटिक म्हणजेच शारीरिक-मानसिक असतात. प्रत्येक आजारासोबत प्रचंड मानसिक आणि वैचारिक उलाढाल होत असते. ही उलाढाल व्यक्तीसापेक्ष असते. आणि ‘योग’ या मार्गाने ही प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते.
प्रत्याहार..धारणा..ध्यान आणि समाधी या अवस्थेसाठी प्रयत्न करणे म्हणजे ‘मेडिटेशन’ करणे.. असे मॉडर्न वैद्यकीय शास्त्रात सांगितले जाते. या अवस्थेत चांगल्या हॉर्मोन्सची उत्पत्ती होते आणि वाईट हॉर्मोन्सचे प्रमाण कमी होते.
ध्यानामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयाची गती, नाडीचे ठोके, पोटामध्ये अ‍ॅसिडची उत्पत्ती कमी होते. स्नायूंवरील तणाव, रक्तवाहिन्यांवरील तणाव कमी होतो.
हृदयविकाराचे प्रमाण कमी होते. मानसिक शांती, मानसिक आरोग्य वाढवण्यास मदत होते. जगण्यात एक प्रकारचा आनंद वाढतो. डिप्रेशन, ताणतणाव प्रचंड प्रमाण कमी होते. जगण्याचा दर्जा उंचावतो.
म्हणून ध्यानासाठी वेगळा वेळ काढणे आणि नित्यनियमाने ध्यान करणे. ध्यान अमुकच वेळेला करायला हवा.. असे काही बंधन नाही. मात्र ध्यानाला बसल्यावर २०-३० मिनिटांचा निवांतपणा असावा. सर्वसाधारणपणे पहाटे आणि संध्याकाळी ध्यान करणे चांगले.
ध्यानाला बसताना आपल्याला १५-२० मिनिटे एकाच स्थितीत बसायचे आहे हे लक्षात घेऊन तितका वेळ न हलता बसता येईल अशा प्रकारे बैठक घ्यावी. खुर्चीवर.. पलंगावर.. जमिनीवर कुठेही बसले तरी चालेल, मात्र पाठ ताठ राहण्यासाठी भिंतीला किंवा खुर्चीच्या पाठीला टेकून बसावं. ज्यांना पद्मासन घालून इतक्या वेळ बसणे शक्य असेल तर त्यांनी पद्मासनात बसण्यात काहीच हरकत नाही.
एकदा आरामशीर बैठक घेतली की दोन्ही हातांचे तळवे एकावर एक ठेवून उताणे मांडीवर टेकवावे. डोळे मिटून घ्यावे आणि मन एकाग्र करायला सुरुवात करावी. आपल्या श्वासोच्छ्वासावर किंवा एखाद्या ध्वनीवर उदाहरणार्थ ॐवर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करावे.
मन एकाग्र करताना श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा एखाद्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करणे. तो ध्वनी सहसा ‘ओम्’ हा होय. ओम् हा ध्वनी म्हणजे ओंकार, हा सर्व ब्रह्मांडाला अंतर्बा व्यापून राहिलेला एकाक्षरी महामंत्र आहे. पण त्याच्या ऐवजी दुसरा कुठलाही ध्वनी, शब्द वापरला तरी चालेल.
ध्यान, धारणा, समाधी यांसारख्या अंगांची व्यवस्थित माहिती तज्ज्ञांकडून घ्यावी आणि सुरुवातीला काही दिवस तज्ज्ञांकडून शिकून घ्यावे. त्यांच्या समोर करून दाखवावे. मगच स्वत:हून या गोष्टींचा अवलंब करावा.
डॉ. गजानन रत्नपारखी

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….