आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि नंतर कॉम्रेड गोविंदभाई पानसरे.. या दोघांवरही झालेल्या खुनी हल्ल्यांमुळे आणि त्यांच्या मृत्यूमुळे मनात निर्माण झालेली खदखद व्यक्त करणारे एका तरुणाचे कॉम्रेड पानसरेंना पत्र-

आदरणीय पानसरे सर,
आपली हत्या झाली त्याला जवळपास दोन महिने होत आलेत. बाजारीकरणाचा भाग झालेल्या आजच्या समाजात आपल्या हत्येच्या बातमीचे मूल्यदेखील दोन-चार दिवसांत हरवले आणि एव्हाना गोविंद पानसरे कोण, असा प्रश्न अनेकांना पडावा इतके आपण विस्मरणात गेला असाल अनेकांच्या. अर्थात नाही म्हणायला तुमच्या हत्येचा निषेध करणारे, विचारांची लढाई विचारांनी लढावी असे म्हणणाऱ्यांचे क्षीण आवाज अधूनमधून कानावर पडतात. पण सर आपल्या हत्येनंतर कुठलाही विरोध, निषेध, राग, चीड व्यक्त न करणारा, मात्र आतून प्रचंड अस्वस्थ असलेला एक तरुण वर्ग असावा.. मीही त्यातलाच आहे सर! पण आपल्या आणि दाभोलकरांच्या हत्येनंतर बोलायची भीतीच वाटते हल्ली, म्हणून मनातली घुसमट आपल्यालाच पत्र लिहून कळवत आहे. सर, आजही ती १६ फेब्रुवारीची सकाळ आठवते. रोजच्यासारखीच होती ती सकाळ. तशी नसावी तरी का? करिअर, पैसा, यश, टार्गेट या चौकटीत जगणारे लोक आम्ही. आमच्यासाठी प्रत्येक दिवसाचा सूर्य हा रोजच्यासारखाच ना! हो, पण हल्ली आमच्या हातात स्मार्टफोन आलेत, म्हणून आम्ही माहितीने अपडेट झालोय; पण विचारांनी बुरसटलेलेच आहोत आम्ही अजूनही हल्ली, असंच वाटतं आहे सर.
.. तर १६ च्या त्या सकाळी स्मार्टफोनवर टय़ून वाजली आणि काय अपडेट आलीय म्हणून बघावे तर बातमी होती.. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात प्राणघातक हल्ला!!! इतर अपडेट पाहतो तसे अनेकांनी ती बातमी पाहिली असावी माझ्यासह अनेकांनी. नाही म्हणायला व्हॉट्सअ‍ॅपच्या उथळ जगात विचारांचा प्रचार-प्रसार करणारे काही ग्रुप आहेत, त्यांच्यावर मग निषेधाचे मेसेज आदळू लागले.. विवेकावर हल्ला, पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा!! (?) मीदेखील इतरांसारखा कामात व्यस्त होतो; स्तब्ध होतो, पण आतून अस्वस्थ होतो.
का कुणास ठाऊक, मला तो दिवस आठवला, ज्या दिवशी आपले सहकारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर असाच हल्ला पुण्यात झाला होता. त्या दिवशीदेखील असाच आक्रोश, अशीच मोठमोठी विधाने वाचायला ऐकायला मिळत होती. डॉक्टरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याने ते सगळ्या महाराष्ट्राला तसे परिचित होतेच, पण आमच्या पिढीचे दुर्दैव की माझ्या एका सहकाऱ्याने मला हे विचारावे, हू इज मिस्टर पानसरे? खरेतर त्याचे काही चूक नसावेच! क्रिकेट, बॉलीवूड, पॉलिटिक्स या विषयांवर लिमलेट गोळ्या चघळाव्यात तसे तासन्तास चर्चा करणाऱ्या आमच्या पिढीला वेळ कुठे आहे पुरोगामी विचार म्हणजे काय, चळवळ म्हणजे काय हे समजून घ्यायला?
त्या सहकाऱ्याचा नाद सोडत मी घरी आलो आणि तावातावाने मी लिहिलेला तो लेख बघितला. डॉ. दाभोलकर यांच्या निधनानंतर असाच अस्वस्थ होऊन लिहिलेला लेख! काय होतं त्या लेखात? तसं काहीच नव्हतं सर, पण होती चीड, राग अन् संताप! डॉ. दाभोलकर यांनी असा काय गुन्हा केला होता? विज्ञानवादीच तर होते ना ते! विचारांच्या जोरावर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे (ऊठसूट मिरवले जाणारे) पुरोगामित्व अबाधित राहावे यासाठीच तर होता ना त्यांचा संघर्ष! पण म्हणून या संघर्षांत त्यांनी कधी जाळपोळ, मारझोड, हल्ला, बंद, कानाखाली आवाज यातलं काहीच केलं नाही; पण तरी शिक्षा काय तर मृत्यू! माझ्यासाठी तो हल्ला होता माझ्या स्वत:च्या विचार स्वातंत्र्यावर. हो, म्हणजे उद्या मी जर एखादा वेगळा विचार मांडला तर माझे काय, या प्रश्नाने मला हैराण केले होते.
दाभोलकर आम्हाला सोडून गेलेत. पण त्यांचा विचार घेऊन चळवळीतील कार्यकर्ता न्याय मागत राहिला, सलग दीड वर्ष, शांतपणे, संयमाने, विचारांच्या लढय़ाने.. पण जेव्हा त्यांनी तुमच्यावर हल्ला केला आणि आपण मृत्यूशी झुंज देत होतात तेव्हा पुन्हा त्या सगळ्या प्रश्नांनी मनात थैमान घातले होते. का? का पुन्हा पुन्हा असे होते आहे? विचारांची लढाई घटनेच्या चौकटीत राहून लढणाऱ्या माणसांवर हल्ले होत आहेत. म्हणे घटनेने आपल्याला विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण एखाद्याचा विचार स्वीकारणे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्यदेखील आहेच की. पण आपणास आणि डॉ. दाभोलकर यांना मारून ते सरळ विचारच करू नका, असे भयानक काही सांगू पाहत आहेत का? पानसरे सर, खरेतर एखाद्याची मुस्कटदाबी करणे, दहशत निर्माण करणे याला फार काही अक्कल लागत नसतेच. त्यामुळे म्हणूनच समाजवादी, परिवर्तनवादी, पुरोगामी विचारांचा मुकाबला करण्याचे सामथ्र्य नसणारी भित्री माणसेच हे करत आहेत हे जगजाहीर आहे. पण पानसरे सर, आपण आणि आपल्यासारखी असंख्य माणसे ज्या विचारांच्या लढय़ात स्वत:चे बलिदान देत आहेत, त्यांचे काही देणेघेणे आहे का आमच्या पिढीला, तो विचारांच्या लढाईचा वारसा पुढे नेण्यासाठी ही आमची पिढी तयार आहे का, असा प्रश्न मीच स्वत:शी करतो आहे.
परिवर्तनवादी विचारांच्या चळवळीत येणाऱ्या अनेकांना हे प्रश्न पडले असावेत खरेतर! म्हणजे डॉ. दाभोलकर यांची हत्या, नंतर आपली आणि इतके करून ते शांत नाहीत. पुन्हा कुणावर तरी हल्ला करणार नाहीत याची काय खात्री? आम्ही मात्र सभ्यपणे पुरोगामी चळवळीला काळिमा, विवेकावर पुन्हा हल्ला, मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो! असे म्हणत राहायचे चार दिवस.. माध्यमांची आरडाओरडदेखील थांबते. आम्हीदेखील शांत होतो. मग पुन्हा हल्ला; पुन्हा निषेध; पुन्हा हळहळ! मग वाटते की, का कराव्यात या लोकशाही मार्गाने लढू, न्याय मिळवू, ते व्यक्ती संपवतील विचार नाही अशा पोकळ गप्पा. नाही; मला याची जाणीव आहेच सर, की परिवर्तनवादाचा पुरस्कार करायचा तर कुणीतरी बलिदान द्यायलाच हवे; पण ते तरी का? कारण सर आपण आणि डॉक्टर दाभोलकर आता शरीराने आमच्यात नाहीत; पण विचारांनी आमच्यासोबत आहात. तरीदेखील आपण कोणाचे वडील होतात, भाऊ होतात, बाबा होतात, पती होतात. त्या आपल्या जिवाभावाच्या लोकांचे काय? आम्ही परिवर्तनवादी माणसे गमावलीत, पण त्यांनी त्यांचे जिवलग गमवलेत, तेही या समाजासाठी! मग समाज म्हणवून घेणाऱ्या आम्हा सभ्य लोकांनी काय दिले तुमच्या कुटुंबाला? फक्त सहानुभूती? पानसरे सर, डॉ. दाभोलकर आणि आपण गेल्यावरदेखील आपल्या कुटुंबीयांनी ज्या धैर्याने सामोरे येऊन ‘आम्ही बाबांच्या विचारांचा वारसा पुढे कायम ठेवू’ असे सांगितले, तेव्हा क्षणभर मनात वाटले की त्यांना जाऊन सांगावे, ‘नका रे बाबांनो, आता तुम्ही नका तुमचा जीव धोक्यात घालू! ज्या समाजासाठी तुमच्या बाबांनी बलिदान दिले, त्या समाजात राहणारे आम्ही कोत्या आणि संकुचित मनाची माणसे फक्त स्वत:चा विचार करणारी आहोत. आमची लायकी नाही बघा तुमच्या सोबत नेटाने आणि संयमाने लढण्याची.’ सर जेव्हा जेव्हा माझ्याच तरुण पिढीतल्या त्या मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांना पुण्याच्या त्या पुलावर दर महिन्याला शांततेच्या मार्गाने लढा देताना बघतो तेव्हा वाटते.
मुक्ता, हमीद चुकलोच आपण.. आपण ज्या विचारांच्या जोरावर न्यायासाठी लढतो आहोत, भांडतो आहोत, आवाज देतो आहोत तो आवाज त्या पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय- सामाजिक व्यवस्थेपर्यंत नाहीच पोहोचायचा! त्यांना फक्त जाळपोळ, खळ्ळ खटय़ाक, अमुक अन् तमुक स्टाइल आंदोलन, रास्ता रोको, दगडफेक याचीच भाषा कळते आणि कळत असावी. पण विचारांची लढाई लढणारे असे अविचारी कसे वागणार ना! जनतेच्या आणि समाजाच्या हितासाठी बलिदान देणाऱ्यांना न्याय मिळावा म्हणूनदेखील सामान्यांना वेठीस धरण्याची मानसिकता नाहीच आपली. पण मग वाटते की विचारांसाठी सुरू असलेल्या या लढाईला आपल्यातील समाजवादी, लोकशाही, सहिष्णू विचारधारेलाच आपला कमीपणा, नेभळटपणा तर नाही ना समजत ही व्यवस्था; की आपल्या अशा लढाईला बेदखल करीत ‘त्या’ विकृत मनोवृत्तीलाच खतपाणी घालण्याचे काम करतेय ही समाज आणि राजकीय व्यवस्था. खरंच पानसरे सर, तुमच्यावर हल्ला झाला त्या दिवसापासून तुम्ही अनंतात विलीन झालात तोपर्यंत आणि त्यानंतरही आजवर.. अशा अनेक विचारांनी काहूर केलाय मनात! कदाचित हादेखील आपल्याच विचारांचा खोलवर रुजलेला संस्कार असावा. म्हणून हे विचारांचं काहूर डोक्यात माजलेले असतानासुद्धा तुमच्या कार्यावर आणि विचारांवर ठाम विश्वास असणारा एकही माणूस अविचारी आणि अविवेकी वागला नसावा! सर आपल्यावरील हल्लय़ानंतर हळहळ आणि निषेध व्यक्त करणारे लघुसंदेश फार फटाफट फिरत होते, पण या गर्दीत व्हॉट्स्अपवरून फिरणाऱ्या या कवितेने माझ्या मनातील विचारांचे काहूर वाढले आहे..
ते आणि मी..
प्रथम ते गांधींसाठी आले.
त्यांचा खून केला. मी शांत राहिलो.
कारण मी काही गांधीवादी नव्हतो.
नंतर ते डॉक्टर दाभोलकर यांच्यासाठी आले. त्यांचा खून केला.
मी शांत राहिलो.
कारण मी काही अंनिसचा
कार्यकर्ता नव्हतो.
काल ते कॉम्रेड पानसरे
यांच्यासाठी आले.
त्यांचा खून केला.
तरीही मी शांत राहिलो आहे.
कारण मी काही कम्युनिस्ट नाही.
उद्या ते माझ्यासाठी येतील.
माझ्यावर हल्ला करतील.
मी मदतीसाठी सभोवार पाहीन.
सगळे शांत राहतील.
कारण..?
आता भीती वाटते ती याचीच की पुन्हा ही चीड, राग, संताप शांत व्हायचा. आणि ते मात्र धमक्याच देत राहायचे. पुन्हा तयार राहा हळहळ व्यक्त करायला आणि किंमत मोजायला.
तुषार देसले