lp45वेध सूक्ष्माचा..

बऱ्याच वेळा आपण एखादा शब्दप्रयोग अगदी सहजपणे करतो. पण त्यामागील शास्त्र माहीत नसते. आजचं युग नॅनो टेक्नॉलॉजी आहे असं म्हणतानाच नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे हे माहीत नसते. अत्यंत सूक्ष्म पातळीवर अणू-रेणूंची स्वत:च्या गरजेनुसार मांडणी करून एखादा नवीन पदार्थ तयार करता येऊ शकतो, या जाणिवेतून जन्माला येणारे नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पसारा हा अतिप्रचंड असा आहे. म्हणूनच वैदिक वाङ्मयात असलेल्या तात्त्विक चर्चेच्या पलीकडे जाणारं हे विज्ञान नेमकं समजून घेणं गरजेचं आहे. कारण एखाद्या महाप्रचंड जाणून घेण्याकरिता सूक्ष्माला जाणणे गरजेचे आहे. त्यामुळेच विश्वाच्या पसाऱ्यात या नॅनोचं महत्त्व मराठीतून उलगडून सांगण्याची गरज या पुस्तकाने पूर्ण केली आहे असे म्हणावे लागेल. नॅनोचा सर्वव्यापी विस्तार लेखकाने अतिशय सहज सोप्या भाषेत मांडला आहे. विविध संदर्भ आणि वैज्ञानिक संज्ञाच्या विश्लेषणातून अतिसूक्ष्माचा वेध घेणं काहीसं सोपं झालं आहे.
’ अतिसूक्ष्म महाप्रचंड, नॅनो टेक्नॉलॉजी, लेखक- शैलेश माळोदे,
परममित्र पब्लिकेशन्स,
पृष्ठसंख्या २१६, मूल्य रु. २२५/-.

lp46अवमूल्यन वैद्यकीय व्यवसायाचे
गेल्या काही वर्षांत वेगाने प्रगती झालेल्या व्यवसायात आरोग्य व्यवसायाचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे आणि अर्थातच त्याहूनही अधिक वेगाने अपपवृत्तींनी ताबा घेतलेले क्षेत्रदेखील हेच आहे. प्रचंड प्रभावी असे लॉबिंग आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्यांनी या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात शिरकाव केला आहे. किंबहुना त्याच वेगाने अनेक उद्योग समूहांनीदेखील आपल्या उद्योगाचा विस्तार करताना अगदी हमखास यश मिळवून देणारं आणि व्यवसायास मरण नसणारं क्षेत्र म्हणूनदेखील याकडे पाहिले जाते. अर्थातच गळेकापू स्पर्धेतून निर्माण होणारे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अमेरिकेत अशाच एका स्पर्धेतून स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अस्तित्वावरच घाला घातला जाण्याची कहानी या पुस्तकातून मांडली आहे. आरोग्य विम्याच्या जोरावर फोफावलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची ही कथा पडद्यामागच्या अनेक हालचालींवर प्रकाश टाकणारी आहे.
’ क्रिटिकल, लेखक – रॉबिन कुक, अनुवाद – प्रमोद जोगळेकर,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठसंख्या ३५४, मूल्य रु. ३६०/-.

lp47बाबसाहेबांची ज्ञानोपासना
सारं आयुष्य ज्यांनी परिवर्तनाच्या वाटेवर अखंड संघर्ष करत दलितोद्धाराचं ऐतिहासिक कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वाटचालीचा पाया हा ज्ञानार्जनामुळेच घडला होता. किंबहुना म्हणूनच त्यांनी ‘शिका आणि संघटित व्हा’ हा मंत्र समाजाला दिला. समाजास शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखून त्यांनी इतर चळवळींबरोबरच शिक्षण प्रसारास मोठे महत्त्व दिले आहे. कारण नवयुगाची निर्मिती ज्ञानार्जनातूनच होणार होती. डॉ. आंबेडकर हे आयुष्यभर ज्ञानार्जन करतच होते, पण १९२३ पर्यंतचा म्हणजेच वयाच्या ३२ व्या वर्षांपर्यंतच्या कालावधीत त्यांनी अर्थशास्त्र, वकिली अशा विषयांमध्ये उच्च शिक्षण भारत, अमेरिका आणि लंडन येथे पूर्ण केलं. लेखकाने डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील या काळाचे कादंबरीमय लेखन करून ज्ञानसूर्याची जडणघडण वेगळ्या अंगाने मांडली आहे. संयमता आणि औचित्याचे भान राखून प्रसंगचित्रणातील अतिरेक टाळणारा हा कादंबरीमय प्रवास अनुभवण्यासारखा आहे.
’ असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
लेखक प्राचार्य व. न. इंगळे, साकेत प्रकाशन,
पृष्ठसंख्या २००, मूल्य रु. २००/-.

lp48प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी
एखाद्या क्षेत्रातील व्यावसायिक उत्कर्ष हा त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून प्रभावी व्यक्ती उत्कर्ष असतोच असे नाही. त्यामुळेच व्यावसायिक उत्कर्ष साधतानाच जर प्रभावी व्यक्तिमत्त्व घडलं तर त्याचा फायदा संबधित व्यवसायाला तर होतोच पण समाजालादेखील होत असतो. मात्र त्यासाठी जाणीवपूर्वक आपलं व्यक्तिमत्त्व घडविण्याची गरज असते. सोबतीच्या चार माणसांना आपलंसं करत त्यांना सांभाळत मार्गक्रमणा करणे हे अर्थातच सोपे नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. स्वत:ला ओळखावे लागते. स्वत:चे कठोर परीक्षण करावे लागते आणि मग प्रयत्नपूर्वक स्वत:मध्ये योग्य ते बदल घडवावे लागतात. या पुस्तकातून अशाच विविध घटकांचा मनोवैज्ञानिक आढावा घेत केलेले विश्लेषण म्हणूनच नक्कीच सर्वाना मार्गदर्शक ठरू शकणार आहे. लेखक हे स्वत: मानसशास्त्राचे गाढे अभ्यासक असल्यामुळे केवळ यशाची गुरुकिल्ली या सदरात मोडणारे हे लेखन नसून त्याला अभ्यासाचा आधार आहे.
’ व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी कसे बनवाल?
डॉ. अरुण कुळकर्णी, डायमंड पब्लिकेशन्स,
पृष्ठसंख्या ११२, मूल्य रु. १२५/-.