ईस्टरच्या सुट्टीवरून परतल्यावर माझे विंचवाचे बिऱ्हाड मी पॅरिसच्या उत्तर इलाख्यात हलवले. हा मजूर विभाग असल्यामुळे काहीसा बकाल होता. तिथे मुक्काम हलवण्याचे कारण- माझ्या आधीच्या खोलीपेक्षा दीडपट मोठी खोली आणि वापरायला छोटे, स्वतंत्र स्वयंपाकघर ही प्रलोभने होती. शिवाय भाडं अगदीच कमी होतं. घरमालकीण मादाम पेराँ ही हसरी, बोलकी होती. मेट्रो स्टालिनग्राड या स्थानकापासून दीड फर्लागावर तिचा फ्लॅट होता. ‘खोली तर छान आहे. परिसर दर्जेदार नसला तर काय बिघडलं? दिवसातून एकदाच फार तर मेट्रो ते घर हा रस्ता पार करण्याची पाळी येणार..’ असा विचार करून मी मादाम पेराँला दोन महिन्यांचे भाडे दिले. नाटकं पाहून उशिरा परतण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा ‘काय बिघडलं’ याचा चांगलाच प्रत्यय आला. पावलोपावली अ‍ॅल्जिरियन किंवा आफ्रिकन-फ्रेंच रोमियो हटकू लागले. मग मी आवर्जून घरापर्यंत सोबत आणू लागले. किंवा रात्रीचा मुक्काम माझ्या पॅरिसच्या दुसऱ्या घरी (नरवण्यांच्या) करू लागले. पेराँबाईंकडे बाकी सगळं राजरोस होतं. फक्त माझी रोज अंघोळ करण्याची सवय बाईंना अतिरेकी वाटे. पॅरिसमध्ये बरेचसे लोक जुम्मे के जुम्मे नाही, तरी आठवडय़ातून दोन-तीन वेळाच काय ते स्नान करतात.
मादाम पेराँकडे वास्तव्य असताना माझे बरेच काही लिहून झाले. जास्त बाहेर पडायला नको म्हणून की काय, मी दिवसाचा बराच वेळ आपल्या खोलीमध्ये टेबलाची कास धरून बसत असे. पानेच्या पाने लिहून काढी. ‘रोमचा विमानतळ’ हा माझा लेख मी पपाला प्रथमच भेटायला निघाले तेव्हाच्या मन:स्थितीबद्दल लिहिलेले स्वगत होते. हा लेख ‘सत्यकथे’मध्ये छापून आला आणि बराच गाजला. मुख्य म्हणजे माझ्या या लेखामुळे ‘मौजे’च्या श्री. पु. भागवतांसारखे रसिक, विद्वान आणि दर्दी साहित्यपंडित मला ज्येष्ठ स्नेही म्हणून लाभले. श्री. पुं.नी मला लिहायला सतत उद्युक्त केले. प्रचंड प्रोत्साहन दिले. पण पुढे मी सिनेमाकडे वळल्यानंतर मी पटकथा लिहू लागले आणि माझे इतर लिखाण दुर्दैवाने अजिबात थांबले. ‘सिनेसृष्टीत गेल्यापासून तुम्ही निरक्षर झाला आहात,’ असं ते हसून- पण वैषम्याने म्हणत. ‘सय’चे हे लेख लिहिताना, आठवणी गुंफताना मला वारंवार श्री. पुं.ची आठवण होते. याच पॅरिसच्या मुक्कामात मी फ्रेंच ‘रिव्ह्यू’ या नाटय़प्रकाराने प्रेरित होऊन बरेचसे स्वतंत्र प्रवेश लिहिले. परत मायदेशी गेल्यावर त्यांचे ‘नांदा सौख्यभरे’ आणि मग पुढे ‘सख्खे शेजारी’ या नाटकांमध्ये रूपांतर झाले.
फ्रेंच सरकारच्या शिक्षण विभागाने आमचा अभ्यास, संशोधन आणि पर्यटन यांची जबाबदारी पेलली होती. कँटीनमध्ये अगदी माफक खर्चात छान जेवणही मिळत असे. तरीपण महिन्याची पहिली तारीख ही रखडतच उगवत असे. पॅरिस हे महाग शहर होते. त्यातून आता घरचे वेध लागले होते. विनी, गौतम, आई, अरुण या सगळ्यांसाठी छानशा भेटवस्तू घ्यायच्या होत्या. ते कसे जमावे? आणि मग अचानक कमाईची एक नामी संधी चालून आली. मार्टिन नावाच्या एका छोटय़ा मुलीला इंग्रजी शिकवायचे काम होते. मी तिच्या आई-वडिलांना भेटायला गेले. माझे फ्रेंच तितकेसे पक्के नसल्याचे त्यांना प्रांजळपणे सांगितले. ते म्हणाले, ‘इंग्रजी पक्के आहे ना? फ्रेंच तिला येते.’ तरीही एक शिकवणी ‘वानगीदाखल’ (मोफत) करावी असा मी आग्रह धरला. शिकवणी झाल्यावर ते कुटुंब खूश झाले. माझ्या ‘वानगी शिकवणी’ची पण ‘बिदागी’ त्यांनी जबरदस्तीने दिली. आठवडय़ातून पाच दिवस दोन-दोन तास आमची शिकवणी चाले. कविता, गाणी, गोष्टी यांच्या रंजक खेळीमेळीत आमचा वेळ मजेत जात असे. अधूनमधून मार्टिन माझ्या फ्रेंचच्या चुका सुधारी. पुण्याच्या ‘चिल्ड्रन्स थिएटर’ आणि ‘बालोद्यान’चा इथे मला खूप उपयोग झाला. माझी छोटी शिष्या मोठय़ा झोकात हातवारे करून ‘हंपटी डंपटी, लिट्ल मिस् मफेट्, जॅक हॉर्नर आणि कंपनी’ला अगदी लीलया सादर करीत असे.
पॅरिसमध्ये १३ मे १९६७ पासून आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शन सुरू होणार होते. भारताच्या स्टॉलची प्रतिनिधी होणार का, म्हणून मला विचारणा करण्यात आली. रोज सहा तास.. २० दिवसांसाठी ही कामगिरी करायची होती. मेहनताना चांगला होता. Director of Tourism, India– श्री. रावत यांनी माझी ही नेमणूक केली.
भारतावरील वेगवेगळी माहितीपर पुस्तके, ग्रंथ, पत्रके, फोटो, नकाशे यांनी माझा स्टॉल अगदी ओसंडून वाहत होता. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांचे शंकासमाधान करणे आणि भारताची महती सांगणे, ही मुख्यत: माझी कामगिरी होती. सामान्यजनांच्या कुतूहलाचे विषय होते- योग, ‘पवित्र’ गाय, खजुराहो, काश्मीर वाद, ताजमहाल, गोल्डन टेम्पल, कामशास्त्र, इंदिरा गांधी, महात्मा गांधी, इ.! गंमत म्हणजे लोकांच्या कुतूहलाचे निरसन करता करता माझ्या स्वत:च्या ज्ञानात खूप भर पडली.
‘भारत पर्यटन प्रतिनिधी’ची माझी भूमिका मी ठीकठाक निभावली असणार, कारण लगेचच मला ऑर्ली विमानतळाच्या प्रमुख रेस्त्राँमध्ये काम करण्याचे आमंत्रण आले. या रेस्त्राँमध्ये ‘भारत सप्ताह’ साजरा होणार होता. तेव्हा ‘स्वागत समिती’मध्ये दाखल होण्यासाठी हे बोलावणे होते. छानशी साडी नेसून दारात हात जोडून सुहास्य वदनाने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आणि नंतर वाटलं तर टेबला-टेबलापाशी जाऊन ‘सावकाश होऊ दे’ किंवा तत्सम काहीतरी औपचारिक बोलायचं. पर्यटन माहिती सांगण्यापेक्षा हे काम फारच सोपं होतं. मोबदलापण भक्कम होता.
कित्येक प्रवासी (बहुधा अमेरिकन) मला त्यांच्या टेबलावर बसून त्यांना सोबत करण्याचा आग्रह करीत. ‘निदान आमच्याबरोबर डेझर्ट तरी घ्या.’ मग क्वचित कधी ‘कशाला, कशाला’ म्हणत मी पंगतीत सामावत असे. अशावेळी आपल्या भारतीय पाककलेविषयी, वेगवेगळ्या पदार्थाच्या कृतींविषयी गप्पागोष्टी होत. भारतीय स्वयंपाक्यांचा महिमा सांगणारी माझी एक गोष्ट हटकून ‘हिट्’ होत असे. ती अशी : फार पूर्वी एक राजा मेजवान्या देण्याबद्दल मशहूर होता. त्याच्या पदरी फार कुशल खानसामे होते. पंगत बसली की गरम गरम पुऱ्या ताटात पडत. फुगलेली पुरी बोटाने फोडली की जिवंत चिमणी पंख फडफडवीत आतून बाहेर पडे. जेवणघरात भुर्रकन् उडणाऱ्या छोटय़ा पाखरांची मजेदार धांदल उडे. जेवणारे हे दृश्य पाहून थक्क होत.
ऑर्लीच्या रेस्त्राँमध्ये स्वयंपाक बनवणाऱ्या शेफस्पासून ते वेटर आणि ‘मेत्र डी’ (Maitre dl hotel) म्हणजे हॉटेलचा प्रमुख यजमान या सर्वाशी माझी छान ओळख झाली. फ्रेंच चीज आणि वाइन या त्यांच्या लाडक्या विषयांबद्दल प्रत्येकजण मला माहिती पुरवत होता. मी हळूहळू दर्दी होत चालले होते. ऑर्लीच्या आनंदसोहळ्यात मी मश्गूल असताना आणखी एक आमंत्रण येऊन थडकले. वेडावून टाकणारे.
ळीं इं१ िऋ कल्ल्िरं ने दक्षिण फ्रान्सला वैभवसंपन्न रिव्हिएरामध्ये एक मोठी ‘चहाप्रचार’ मोहीम आयोजित केली होती. ‘नीस’ आणि ‘कान’ या प्रवासी आकर्षणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या दोन नखरेल शहरांमध्ये ही कॅम्पेन होणार होती. माझे पॅरिसला येण्याचे ठरले तेव्हापासून ‘रिव्हिएराला नक्की भेट दे..’ असा अनाहूत सल्ला अनेकांनी दिला होता. सल्ला द्यायला जातं काय? शिष्यवृत्तीवर काटकसरीने गुजराण करणाऱ्या विद्यार्थ्यांला इतक्या लांबचा प्रवास आणि सुखविलासाच्या त्या नगरींमध्ये अर्धा दिवससुद्धा गुजारा करणं, हे अशक्यप्राय होतं. आणि नेमकं तेच आता शक्य झालं होतं. नीस आणि कानला योजलेल्या चहाच्या सोहळ्याचं सारथ्य करायला मला पाचारण करण्यात आलं होतं. साखरेचं खाणार, त्याला देव देणार! मी अर्थातच रुकार दिला.
आणि मग वज्राघात झाला. आईचं पत्र आलं. अल्पशा पोटाच्या दुखण्याने अच्युतमामाचे निधन झाले होते. माझ्या पायाखालची जमीन हादरली. माझ्या लहानपणापासून अच्युतमामा आमच्या कुटुंबामधला अविभाज्य घटक होता. तो स्वत: समर्थ सिनेदिग्दर्शक आणि उत्तम पटकथालेखक होता. मी सिनेमाकडे वळले, त्याचे श्रेय केवळ त्यालाच जाते. माझ्या लग्नाकडे आईने पाठ फिरवली तेव्हा आप्पांच्या जोडीला अच्युतमामा उभा राहिला होता. अगदी आता आताच तर तो मला निरोप द्यायला मुंबई विमानतळावर आला होता. पण मी परत जाईन तेव्हाचे काय? माझं स्वागत करायला तो नसणार. ही कल्पनाच असह्य होती.
पुन्हा एकदा मी मुक्काम हलवला होता. आता बकाल उत्तर पॅरिसला रामराम ठोकून मी पॅरिसच्या पॉश वस्तीत शिरले होते. ‘पारी दझियेम’ (दुसरा क्रमांक), ‘बुलव्हार्ड दे कॅप्यूचीन’ हा माझा नवा पत्ता. द्वारा- एलिझाबेथ आणि मादाम (तिची आई) गँ्रस्तँ. पॅरिसच्या विभाग नंबरावरून तुमची पत ठरवली जाते. एलिझाबेथने मला फार मोठा आधार दिला, नाहीतर त्या बातमीने मी खरोखर ढासळून गेले असते. रिव्हिएरासाठी दोघी मायलेकींनी माझं पॅकिंग केलं. हरप्रकारे मला मदत केली. रोजच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी उभारी दिली. जड अंत:करणाने मी दक्षिण फ्रान्सला कूच केलं.
प्रथम मी नीसला गेले. हॉटेल नीग्रेस्को. एखादा राजवाडाच जणू. या हॉटेलला फ्रान्सच्या इतिहासाचे आणि समृद्धीचे जिवंत प्रतीक मानतात, ते उगीच नाही. या वास्तूचे दर्शन दिपवणारे आहे. आतून आणि बाहेरून एडवर्डियन काळातील शिल्पवैभवाचा प्रत्यय येत राहतो. हे हॉटेल खाजगी मालकीचे असून १९१२ साली बांधले गेले आहे. १९७४ मध्ये एक राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याला मान्यता मिळाली. त्या हॉटेलसमोर मी प्रथम उभी राहिले तेव्हा कितीतरी फ्रेंच आणि हॉलीवूडच्या सिनेमांतून त्याचे आधीच दर्शन झाले असल्याचे जाणवले. उदा. कॅरी ग्रांट, ऑड्री हेपबर्नचा ‘शराड’! जगातले एक महत्त्वाचे हॉटेल म्हणून नीग्रेस्कोला मान आहे. आपल्याकडचा कुणी महाराजा (नाव विसरले!) वर्षांनुवर्षे एक महिनाभर या हॉटेलचा अख्खा मजला आरक्षित करीत असे. साकरेव्हस्की, चर्चिल, चित्रकार मातीस, पिकासो, डाली, सिनेसृष्टीतले िक्लट ईस्टवूड, लुई आर्मस्ट्राँग, डी नीरो, ब्रिजिट बाडरे, ग्रेस केली- ही तर नित्याची  गिऱ्हाईके.
चहाच्या या मोहिमेत मला एक साथीदार मिळाली होती. बिजू बरुआ. ती मूळ आसामची. तिचे वडील खासदार होते. बिजू अप्रतिम देखणी होती. थोडी आसामी झाक असलेली मधुबाला जणू. छान मनमोकळी, गप्पिष्ट होती. टिंगलखोरसुद्धा.  (पुढे तिनं सुप्रसिद्ध सरोदवादक अमजद अली खान यांच्याशी लग्न केलं.) तिला आणि मला मिळून एक मोठी खोली मिळाली. एखाद्या सैन्याची तुकडी मावेल एवढी मोठी. खोलीमध्ये प्रचंड मोठा फुलांचा गुच्छ आणि फळांची टोपली धाडून नीग्रेस्कोने आमचे छान स्वागत केले.
हॉटेलच्या दर्शनी व्हरांडय़ामध्ये आम्हाला एक लांब टेबल आणि काचेचे सुंदर कपाट दिले होते. तिथे आम्ही आमचा चहाचा संसार मांडला. बोलूनचालून टी बोर्डाची निर्मिती! त्यांनी हरप्रकारे दर्जेदार सामान पुरवून आमचा तो ‘चहा चव्हाटा’ अगदी चकचकीत केला. कोपऱ्यात सुबक सामोव्हार, उंची काचसामान आणि दर्जेदार चहाचे डबे असा सरंजाम होता. जाणारा-येणारा कुतूहलाने आमच्या स्टॉलपाशी थांबून चौकशी करी. त्याला आम्ही दरवळणारा सुगंधी चहा सुबक प्यालामधून नजर करीत असू. जास्तकरून लिंबू आणि साखर मिसळून. कारण चहासाठी युरोपमध्ये दूध फारसे वापरत नाहीत.
आमच्या स्टॉलवर बऱ्यापैकी गर्दी उसळे. चहा पिण्याच्या निमित्ताने खरं तर गप्पा मारायला मंडळी येत. आमच्या एक लक्षात आलं की, ‘हार्ड ड्रिंक’ करणाऱ्या युरोपियनांना चहाची फारशी ‘चाह’ नाही. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे. मग बिजू आणि मी तावातावाने चहाची तरफदारी करीत असू.
एकदा एक जर्मन पर्यटक म्हणाला, ‘काही म्हणा- चहानं ‘किक् ’ बसत नाही!’
‘कारण चहाची मवाळ आवृत्तीच आम्ही तुम्हाला देतो. चहाची कॉकटेल प्याल तर आपला सूर बदलाल..’ मी म्हटलं.
‘चहाची कॉकटेल? ती कशी?’
मग आम्ही हॉटेलच्या बारमधून उत्तम जमेकन रम मागवली. कोऱ्या चहाच्या ग्लासात ती रम, संत्र्याचा रस, साखरेचा पाक आणि बर्फाचा भरपूर भुगा घालून छानपैकी कॉकटेल बनवली. जर्मन पाहुणा सर्द झाला. ‘फँटॅस्टिक!’ तो म्हणाला, ‘याला तुम्ही काय म्हणता?’
‘अं.. हिमालयन हरीकेन..’ मी पट्कन उत्तर दिलं. त्या बिचाऱ्याने आपल्या छोटय़ा डायरीत हे नाव टिपून घेतलं.
आमची कल्पनाशक्ती मग दौडू लागली. मजेदार नावं बहाल करून आम्ही एक नवाच उपक्रम सुरू केला. पूना पंच, आमूर द आसाम, सिंफनी, टीलिशस, इ. इ. जिन्, व्हरमूथ, स्कॉच, व्होद्का अशी वेगवेगळी ‘सशक्त’ पेये आलटून-पालटून वापरून त्यांच्यात कधी अननस, तर कधी द्राक्षाचा रस मिसळून आम्ही कॉकटेल्स बनवू लागलो. हॉटेलच्या बारमधून आम्हाला रेसिपीज्ची विचारणा होऊ लागली.
एका आठवडय़ानंतर आमचा मुक्काम कानला हलला. तिथे एका छान हॉटेलमध्ये आमची सोय करण्यात आली. मात्र, नीग्रेस्कोच्या मानाने भपका कमी होता. आम्ही नित्याप्रमाणे आपली चहाची आरास मांडली. मात्र, या खेपेला आपल्या कॉकटेल्सच्या चहाटळपणाला काहीसा आळा घातला. वृत्तपत्रं आणि वाहिन्यांनी आमच्या चहाची (खरं तर आमची!) खूप दखल घेतली. आमचा लज्जतदार बर्फीला चहा लोकप्रिय झाला. आता वाटतं, की नाटक-सिनेमाच्या फंदात पडले नसते तर मी बऱ्यापैकी विक्रेती झाले असते.
नीस आणि कानचे बीच अप्रतिम होते. पावडर शिंपडल्याप्रमाणे पसरलेली सोनेरी वाळू आणि निळाशार समुद्र यांची रंगसंगती सुरेख जुळून आली होती. नंतर कळले की, ही वाळू स्थानिक नाही. प्रवासी मोसम सुरू होण्याआधी ट्रक भरभरून बाहेरून वाळू आणली जाते. ती रीतसर पसरली जाते. एरवी रिव्हिएराचा हा किनारा गोल गुळगुळीत दगडगोटय़ांनी भरला आहे. प्रवाशांच्या ऐषारामाखातर असा हा बीचचा कायापालट केला जातो. लाखो फ्रँक खर्चून. हौसेला मोल नाही!
बीचवर छोटय़ा कॅफेज् होत्या. तिथले वेटरही पोहायच्या चड्डीमध्ये स्वच्छंद फिरत. त्यांच्या खांद्यावरचा नॅपकिन पाहून ओळखायचे, की हा वेटर! कानच्या बीचवर एका तरुण फ्रेंच इसमाशी आमची ओळख झाली. गप्पा मारता मारता एकदा त्याने प्रांजळपणे सांगितले, की तो ‘जिगोलो’चा पेशा करीत होता. मला हा शब्दसुद्धा नवा होता. जिगोलो म्हणजे पुरुषवेश्या. जां पियेरला आपल्या व्यवसायाबद्दल जरासुद्धा संकोच नव्हता. उलट, आपण काही समाजकार्य करीत असल्याचा त्याचा एकूण आव होता. विलक्षण! या प्रसंगावर आधारून मी एक लघुकथा लिहिली. ती ‘नवयुग’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. आणि अगदी अलीकडे तिचा इंग्रजी आविष्कार (भाषांतर माझेच!) खालिद महमदच्या ‘फॅक्शन’ या लघुकथासंग्रहात छापून आला आहे.. जिगोलो.
मी पॅरिसला परतले. आता मायदेशी परतण्याची वेळ समीप आली होती. एलिझाबेथबरोबर खूप खरेदी केली आणि राहून गेलेली प्रेक्षणीय स्थळे घाईने पाहून घेतली. ती तिच्या आईबरोबर तिच्या मायदेशी रुमेनियाला सुट्टीसाठी जाणार होती. ऑगस्ट महिना. अवघे पॅरिस रिकामे होते. रस्ते, बागा, मैदाने ओसाड होतात. दुकानांना टाळे लागतात. जिकडे तिकडे पाटय़ा लागलेल्या दिसतात. फेर्मे! बंद!! सुट्टीसाठी बंद.
रिकाम्या पॅरिसचा मीही निरोप घेतला. भरल्या अंत:करणाने.