एखादा माणूस समजा सारखी कुरकुर करतो आहे की, ‘मला उडय़ा मारता येत नाहीत. मला धावता येत नाही. जरा भरभर चालले की धाप लागते.’ तुम्ही त्याला पाहिल्याबरोबर तुमच्या काहीतरी लक्षात येते आणि तुम्ही त्याला म्हणता, ‘‘अहो, तो एवढा मोठा जड कोट कशाला घातला आहे? तो काढून टाका लगेच.’’ तर तो म्हणतो, ‘‘तो माझ्या वडिलांचा आहे. तो कसा काढणार?’’ मग तुम्ही म्हणता, ‘‘मग ते मोठे गमबूट कशाला घातले आहेत? ते तरी काढा.’’ तर तो म्हणतो, ‘‘ते माझ्या जातीचे प्रतीक आहे. ते कसे काढणार?’’ मग तुम्ही म्हणता, ‘‘ते डोक्यावर एवढे जाड पागोटे कशाला बांधले आहेत? ते तरी काढा.’’ तर तो म्हणतो, ‘‘ते माझ्या धर्माचे प्रतीक आहे. ते कसे काढणार?’’ ‘‘ते पाठीवरचे पोते तरी काढा.’’ ‘‘ते मी नवस बोललो होतो म्हणून आयुष्यभर वागवायचे आहे. ते कसे काढणार?’’
अशा प्रकारे हे संभाषण चालूच राहील. तो माणूस कुरकुर करीतच राहील. मुक्तपणाचा हलकेपणा त्याला कधी जाणवणारच नाही. अशी लोढणी वागवत लाखो लोक आयुष्य कुरकुरत काढत असतात. त्यांना आयुष्यात कधीच मजा येत नाही. आणि समजा, मजेची वेळ आली तरी त्यांना ती झेपत नाही.
असाच एक माणूस डोक्यावर ओझे घेऊन चालला असताना त्या देशाचा राजा त्याला पाहतो. राजाला वाटते- अरे, आपल्या देशाचा नागरिक बिचारा केवढे कष्ट करतो आहे. आपण त्याला मदत करू. राजा त्याला आपल्या रथात बसायला सांगतो. तो माणूस बसतो. पण त्याने ओझे आपले डोक्यावरच ठेवलेले असते. राजा म्हणतो, ‘‘अरे, ते ओझे खाली ठेव. आता ते डोक्यावर घेऊन बसायची काय जरूर आहे?’’ त्यावर तो माणूस म्हणतो, ‘‘नको राजेसाहेब, आधीच तुमच्या घोडय़ांना माझे वजन ओढायला लागते आहे. त्यात आता माझ्याजवळच्या ओझ्याचा त्यांना कशाला त्रास?’’
लोढणी वागवायची एकदा सवय झाली की ती अंगी भिनते. असे म्हणतात की, फ्रान्समधील बॅस्टिलच्या तुरुंगातील कैद्यांना कायम हातात आणि पायात साखळदंड बांधून ठेवलेले असे. वीस-पंचवीस वर्षांनंतर त्यांची सुटका झाली की ते कैदी घरी जात. पण त्यांना झोपच येत नसे. मग त्यांच्या लक्षात येई आणि ते हातापायांत साखळदंड घालून घेत. मग त्यांना झोप येई.
आपण अनेक गोष्टी नकोशा झाल्या तरी बाळगत असतो. त्रास झाला तरी त्या सोडत नसतो. आणि प्राण जायची वेळ आली तरी प्राण देतो, पण ते सोडत नाही. एकदा एक विदूषक भर बाजारात एका खांबाला धरून ओरडत सुटतो, ‘‘सोड मला, सोड मला. कशाला धरून ठेवले आहेस? माझे आयुष्य बरबाद होईल तू असे धरलेस तर. सोड.. मला सोड!!’’ आसपास गर्दी जमू लागते. एकजण पुढे येऊन म्हणतो, ‘‘अरे, खांबाने तुला धरलेले नाही, तू खांबाला धरले आहेस.’’ विदूषक म्हणतो, ‘‘काय राव? मी काय येडा आहे काय? या खांबानेच मला धरले आहे.’’ असे म्हणून तो आणखीनच आरडाओरडा करायला लागतो. शेवटी तो आरडाओरडा असहय़ झाल्याने काही लोक त्याच्याशी झटापट करून त्याला खांबापासून बाजूला करतात आणि विचारतात, ‘आता तरी कळले का तूच खांबाला धरले होतेस म्हणून?’’ त्यावर तो विदूषक म्हणतो, ‘‘मला कळले. पण तुम्हाला कळले का आपण कशाकशाला धरून बसलो आहोत ते? दारू, तंबाखू तर साध्या गोष्टी झाल्या. पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान, जाती, धर्म अशा कित्येक गोष्टींना तुम्ही धरून बसला आहात. दुखते आहे ते कळते आहे, मग आता तरी सोडा की!’’ असे म्हणून तो नाहीसा होतो.
कुणी कुळाचाराच्या नावाखाली परवडणार नाही असा खर्च करून कफल्लक होतो. कुणी धर्माच्या नावाखाली शरीरावर अत्याचार करतो. कुणी अहंकारापायी विशिष्ट कपडेच घालतो.. उकडून जीव चाललेला असतो तरीही! पण आपण असा त्रास का करून घेत आहोत, असा प्रश्न स्वत:ला विचारत नाहीत. हे सारे अहंकारापोटी अगर भीतीपोटी चाललेले असते. लोक काय म्हणतील? पाप लागेल ना? ‘मी असे कसे कपडे घालू?’ असले मूर्ख प्रश्न स्वत:ला करून मुख्य गोष्ट बाजूला टाकणे चालू राहते.
एक वेळ स्वत: लोढणी वाहिली तरी ठीक आहे, पण कित्येकजण आपल्या मुलाबाळांना, लेकी-सुनांना त्यात गोवण्याचे नीच कृत्य करतात. परंपरेने चालत आलेले, पण पूर्णपणे निर्थक आणि वेळकाढू असलेले सणवार, व्रतवैकल्ये, कुळाचार म्हणून नवीन पिढीवर लादत असतात. आपल्या वडिलांनी हत्ती पाळला असेल ते त्यांना परवडत होते म्हणून. आपल्याला स्वत:ला नीट खायला नसेल तर हत्ती विकून टाकणे सर्वथा योग्य असते. कर्ज काढून वडिलांचा हत्ती पोसणे मूर्खपणाचे असते.
आपल्याजवळ असलेली ऊर्जा आपल्याला सतत वाढती ठेवायची असते. जी गोष्ट करताना आपल्याला नकोशी वाटत असते ती सोडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत राहणे आणि तो सापडल्यावर ताबडतोब ते लोढणे सोडून दिल्यास आपल्या ऊर्जेचा ऱ्हास होत नाही. कित्येकजण केवळ भीतीपोटी घरात काही ‘देवाचे’ करीत असतात. त्यांना भीती असते की, आपण असे केले नाही तर ‘देव’ आपले काही वाईट करील. अशा लोकांनी लक्षात ठेवायचे की, ‘देव तारी त्याला कोण मारी?’ हे जितके खरे आहे, तितकेच ‘देव मारी त्याला कोण तारी?’ हे खरे आहे. आपल्याला तंदुरी चिकन खायचे असले की कोंबडी मारली जाते. आपण आणि ती कोंबडी हे मृत्यूसमोर समान असलो तरी आज ती आपल्या पोटात जाण्यासाठी मारली गेलेली असते. तद्वत आपली वेळ आली की जायचेच असते. कोणताही देव, नवस आपल्याला वाचवू शकत नाही.
 गाईबैलांच्या गळय़ात लोढणे बांधतात ते अशासाठी की त्यांनी फार दूर जाऊ नये. प्रयत्न केलाच तर अडखळून पडावे हाच त्याचा उद्देश असतो. हळूहळू अनेक वेळा पडल्यावर बैलबुद्धीलाही लक्षात येते की पळायचा प्रयत्न करायचा नाही. त्यांना बिचाऱ्यांना ते काढून टाकण्याची अक्कल नसते आणि समजा असली तरी ते सोडविण्यासाठी हात नसतात. आपल्या गळय़ातही आपले पूर्वज जात, धर्म, कुळाचार, असली लोढणी अडकवून जातात. आपण ती वागवत असतो. त्यामुळे आपण आपली प्रगती खुंटवून घेतो. जातीचा, धर्माचा अपमान असल्या मूर्ख कल्पनांपायी फिरवून घेतो, वेडेवाकडे वागतो आणि जगण्यातली मजा गमावून बसतो.
आयुष्य मजेत जायला हवे असेल तर एकदम मोकळे शरीरमन हवे, मोकळी हवा हवी. परंपरेचे काही फायदे असले तरी ज्या परंपरांमुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होतो, त्या परंपरांना सत्वर सोडचिठ्ठी द्यायला हवी. जसे वागले असता आपला ऊर्जेचा स्तर वाढता राहतो तसे वागणे श्रेयस्कर. दरवर्षी दिवाळी आली की फटाके फोडायचे. नाकातोंडात धूर घ्यायचा. काही मुलांनी फटाके हातात अगर तोंडासमोर फुटल्याने विद्रूप व्हावयाचे, हवेचे बेसुमार प्रदूषण करायचे आणि हे परंपरेने करीत राहायचे. आपल्याला सर्वाना याचा त्रास होत असला तरी. होळी आली की झाडे तोडून होळय़ा पेटवायच्या. गणेशोत्सवात रस्ते खोदून वाहतुकीला अडथळे करून मंडप उभारायचे. मिरवणुकी निमित्ताने सारे गाव वेठीला धरून हैदोस करायचा, पण गणेश ही बुद्धिदेवता आहे याचा कुणाला मागमूसही लागू द्यायचा नाही. हा देव काही दिवसांनी बुद्धिहर्ता म्हणून ओळखला गेला नाही म्हणजे मिळवले असे म्हणायची वेळ आणायची.
वैयक्तिक लोढणी टाकणे त्या मानाने सोपे कारण फक्त आपल्यातच बदल करायचा असतो. इतर कुणाचा त्यात सहभाग नसतो. त्याकरिता आपण ज्या गोष्टी सतत मनाविरुद्ध अगर भीतिपोटी करीत असतो त्या शोधून काढाव्या. यामध्ये विशिष्ट कपडय़ांपासून व्रतवैकल्ये, पूजापाठ असे काहीही असू शकते. या गोष्टी सोडून देणे जर एकदम जमले तर फारच उत्तम. बरेच वेळा असे धैर्य नसते. अशा वेळी त्या गोष्टी करताना स्वत:ला नीट पाहावे आपोआप त्या गोष्टी सुटून जातात.
सामाजिक लोढणी ही कालौघात नष्ट होतात. त्यांची जागा नवीन लोढणी घेतात. कुठलीही परंपरा ही अनादी अनंत नसते ती हळूहळू नामशेष होते. सती, विधवांचे केशवपन, अस्पृश्यता वगैरे भयानक रूढी कालौघात नष्ट झाल्या असल्या तरी मधूनमधून डोके वर काढतच असतात. अजूनही धर्मजातीची लोढणी शिल्लक आहेत, पण तीही नाहीशी होताना दिसताहेत. जातीबाहेर अगर धर्माबाहेर लग्न केले म्हणून खून करणे वगैरे चालू आहे, पण ते कमी होणारच आहे.
शेपूट तुटलेला कोल्हा आपली विद्रूपता लपवायला इतरांना शेपूट तोडायला सांगत असतो. लोढणी टाकलेला माणूस हा बरोबर उलटे करीत असतो. तो स्वत:च मोकळा झाल्याने इतरांनाही अशी मजा यावी म्हणून सांगत असतो. तर लोढणी शोधा आणि मग टाकून द्या. बघा कसे हलके वाटते ते!