दिवसभर वेस्टर्न आऊटडोअरमध्ये ऑडिओ व्हिज्युअलचं काम करत होतो. त्यात मी, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वैद्यनाथन व बाकीचे म्युझिशियन्स, प्रख्यात फ्लुटवादक रघुनाथ सेठही होते. रमाकांत म्हापसेकर तबल्यावर होते. माधव पवार, दीपक बोरकर, राजेश देव असे सर्व मोठमोठे वादक होते. शेवटचा पीस संपला की, घरी जायचं म्हणून सर्व खूश होते. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत आमचं काम चाललं होतं.
रात्री साडेनऊच्या दरम्यान ओआरएमचे प्रमुख पियुष पांडेसाहेब आले व नाथनजींना म्हणाले, ‘‘ये कागज लो और मुझे अभी के अभी इस गाने को कविता और सुरेशजी की आवाज में रेकॉर्ड करके दो. कल सुबह कॉन्फरन्स में बजाना है. प्लीज.’’
वैद्यनाथनने माझ्याकडे बघितलं. मी म्हटलं, ‘रात्रीचे १० वाजून गेले आहेत. आता कुठे? डोकंही काम करत नाहीए.’ नाथनचं सर्व काम म्हणजे कम्पोझिशनचं मीच करायचो. त्याच्याकडे काम आलं की तो मला रात्री फोनवरही ते लिहून घ्यायला सांगायचा व ‘टय़ून बनवून उद्या सकाळी अमुक अमुक स्टुडिओमध्ये ये. बाकी सिंगर, म्युझिशियनना सांगितले आहेत,’ असं कळवायचा. हे असं गेली २५ र्वष चालू आहे.
मी म्हटलं, ‘सुरेशजी- कविताला विचारा. ते ‘हो’ म्हणाले तर करू.’ नाथनने त्या दोघांना विचारले. ते म्हणाले, ‘अशोक चाल लावणार ना? मग चालेल!’ कारण माझ्या झटपट कामाची इंडस्ट्रीतल्या सर्वाना कल्पना होती. हातात कागद (स्क्रिप्ट) पडल्यापासून दहाव्या मिनिटाला माझी चाल तयार असायची.
आमचा ए/व्हीचा शेवटचा पीस सव्वादहाला संपला. आम्हाला जिंगलसाठी जे वादक हवे होते, त्यांना थांबवून ठेवलं. बाकीचे निघून गेले.
मी एकदा ते स्क्रिप्ट वाचलं. चक्क तीन अंतऱ्याचं गाणं होतं ते. विनोद शर्मानी लिहिलेलं. सुंदर शब्द, अचूक मीटर, उच्च भाषा.. सकाळचं वर्णन करणारं ते गाणं होतं. मी विचार केला, कोणत्या रागात बनवू बरं? रघुनाथ सेठ तिथं होते. त्यांना म्हटलं, ‘एखादा सकाळचा नवीन राग सांगा. मग मी त्यात कम्पोज करतो.’ कारण भैरव-ललत-भूप अशा प्रचलित रागांमध्येच सकाळची गाणी बनतात. ते म्हणाले, ‘नहीं-नहीं! तुम इतने समझदार हो. तुम्हें क्या बताना?’ म्हणून त्यांनी पाल झटकावी तसा माझा प्रश्न उडवून टाकला. गाण्याचा मुखडा तोवर मला पाठ झाला होता. मी नाथनजींना म्हटलं, ‘जरा फ्रेश होता हूँ! और फिर काम शुरू करते हैं.
मी बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं. कॉफी घेतली. त्याकाळी मी १२० पान खायचो. ते खाल्लं आणि पंधराव्या मिनिटाला स्टुडिओमध्ये परत दाखल झालो. सुरेशजींना, कविताला मॉनिटररूममधून बाहेर यायला सांगितलं. ते म्हणाले, ‘काय? झाली चाल लावून?’ म्हटलं, ‘हो.’ आणि त्यांना भटियार रागात केलेली चाल ऐकवली. चाल ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व प्रसन्नता दिसत होती.
जेव्हा मी बाथरूममध्ये गेलो तेव्हा गाण्याबद्दल माझी काहीही तयारी नव्हती. पण कॉफी पिता पिता मला ‘कटय़ार काळजात घुसली’मधील वसंतराव देशपांडेंचं पं. जितेंद्र अभिषेकींनी केलेलं ‘तेजोनिधी लोहगोल’ हे गाणं आठवलं. अन् माझ्या मनात त्याचक्षणी चाल तयार झाली होती!
रात्री साडेअकरा वाजता तीन अंतऱ्याचं ते गाणं ध्वनिमुद्रित झालं होतं. सगळ्यांनाच दिवसभर काम करूनही फ्रेश वाटत होतं. सुरांमध्ये जादू असते असं म्हणतात, ते त्यावेळी पटलं.
त्यानंतर पियुष पांडे ते गाणं घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्समध्ये काय झालं? गाणं आवडलं की नाही? काही नाही. एक फोनसुद्धा नाही.
त्यानंतर आठ वर्षे निघून गेली. एक दिवस नाथनचा फोन आला. ‘अशोक, वो गाना याद है क्या? पूरबसे सूर्य उगा?’ म्हटलं, ‘हो. का?’ म्हणाला, ‘पियुष पांडेचा फोन आला होता. त्याचं जिंगल करायचं आहे. साक्षरतेच्या फिल्मसाठी.’
आम्ही सारे दुसऱ्या दिवशी एकत्र भेटलो. एक मिनिटाची जिंगल करायची आणि त्यासाठी फक्त मुखडा वापरायचा आणि फ्रेश रेकॉर्डिग करायचं- सुरेश आणि कविताच्या आवाजात असं ठरलं. मग दोघांच्याही आवाजातलं जिंगल क्लायन्ट-एजन्सीकडे पाठवलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा निरोप आला- ‘फक्त कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातच करा.’ फिल्मचा विषय, त्याचं केलेलं शूटिंग याच्या हिशोबाने फक्त कविताच त्यांना हवी होती. मग पुन्हा रेकॉर्ड केलं आणि जेव्हा टीव्हीवर पहिल्यांदा ते आलं तेव्हा मोठमोठे जाणकार लोक चौकशी करायला लागले, ‘कोणी चाल लावलीय?’ याची!
कवी जावेद अख्तर यांना तर ती चाल इतकी आवडली होती की, त्यांनी सगळ्यांना विचारून झालं; पण त्या चालीचा कर्ता कोण, याचं उत्तर त्यांना मिळेना.
मधल्या काळात आमचं ‘सरदारी बेगम’ या श्याम बेनेगलांच्या चित्रपटाचं रेकॉर्डिग होतं. दुपारी जेवताना या जिंगलचा विषय निघाला. जावेदसाहेब म्हणाले,
‘अरे विनोद शर्मा, ये तो बता- वो ‘पूरबसे सूर्य उगा’ किसका कम्पोझिशन है?’ विनोदजी हसून म्हणाले,
‘अरे, ये क्या तुम्हारे बाजू में जो बैठा है. अशोक पत्की- उसनेही बनाया है.’ जावेदजी इतके खूश झाले! उभे राहून त्यांनी मला मिठीच मारली. मला म्हणाले, ‘इतना बेचैन था मैं, कि इसका कम्पोजर कौन होगा? सबको पूछ पूछ कर हैरान हो गया. और आज इतनी आसानी से जवाब मिला. वाह भाई! क्या बात है! जुग
जुग जीओ!’
माझ्या अत्यंत आवडीचं असं हे जिंगल आहे. दरम्यान, कविता कृष्णमूर्तीचं लग्न झालं. एम. सुब्रमणियम तिच्या नवऱ्याचं नाव. जगातला सगळ्यात उत्कृष्ट कर्नाटक व्हायोलीन वाजवणारा अशी त्याची ख्याती आहे. एकदा आजिवासन स्टुडिओत कविताबरोबर ते आले होते. तिथं कविताने माझी ओळख करून दिली. तिच्या मद्रासी भाषेत नवऱ्याला म्हणाली, ‘पूरबसे सूर्य उगा’ या गाण्याचे संगीतकार अशोक पत्की!