अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो. आणि हे भाग एकमेकांपासून जितके जवळ असतील तेवढे त्यांच्यात साम्यही आढळते. त्यामुळे एखादी भाषा स्वत:च्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रदेशांत उत्क्रांत होत गेली तर तिची विभागपरत्वे अनेक रूपे झाल्याचे दिसते.
अहिराणी भाषा म्हणजे अभीर लोकांची भाषा असे समजले जाते. अभिरांची भाषा ‘अभिराणी.’ अभीरचा अपभ्रंश ‘अहिर’ आणि अभिराणीचा अपभ्रंश ‘अहिराणी.’ अभीर नावाचे लोक प्राचीन काळापासून खानदेशात राहत होते असे उल्लेख अनेक ग्रंथांतून व शिलालेखांतून मिळतात. रामायण-महाभारतातही अभिरांचे उल्लेख येतात. इ. स. चौदाव्या शतकात अभीर लोकांची एक वसाहत खानदेशात असल्याचे शिलालेखांवरून दिसते. आजही खानदेशात अहिर िशपी, अहिर ब्राह्मण, अहिर सोनार, अहिर कुणबी अशा जाती आढळतात. अहिरराव, अहिरे ही आडनावे आजही विपुल प्रमाणात दिसतात. प्राचीन काळी हे सगळे अभीर होते. खानदेश हा मूळचा अभीर किंवा अहिर यांचा प्रदेश.
अहिराणी धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांत बोलली जात असली तरी तिचे बोलले जाणारे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. धुळे हा अहिराणीचा केंद्रप्रदेश मानला जातो. नाशिक जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर मराठीचा जास्त पगडा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर गुजरातीचा प्रभाव आहे. गुजरात सीमेला लागून असल्यामुळे हा प्रभाव नवापूर, नंदुरबार भागांत जास्त आढळतो. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषा वऱ्हाडी-वैदर्भी भाषेला जवळची वाटते.
अहिराणीवर अनेक जाती-जमातींच्या पोटभाषांचा हळूहळू प्रभाव पडत राहिल्याने ही भाषा सर्वसमावेशक झाली आहे. याच कारणामुळे अहिराणीत जाती-जमातीपरत्वे पोटभाषा तयार झाल्या आहेत. उदा. अहिराणी भिल्ली, पावरी, नेमाडी, गुजरी, बडगुजरी, लाडशिक्की, घाटोई, महाराऊ, तडवी, काटोनी, परदेशी, घाटकोकणी, डांगकोकणी, ठाकरी, वारली, लेवा पाटीदारी बोली, मुसलमानी बोली, भावसारी, रंगारी बोली, इत्यादी. दुसरीकडे आजची बागलाणी, तपांगी, खाल्यांगी, वरल्यांगी, डोंगरांगी, नंदुरबारी, दखनी, देहवाली असे प्रादेशिक भेदही तीत दिसतात.
खानदेशातील भील, मावची, कोकणा, पावरा, ठाकर यांच्या बोलीभाषेवर अहिराणी भाषेचा प्रभाव जाणवतो. अशा स्थूल साम्यस्थळांमुळे सर ग्रियर्सन यांच्याकडून अहिराणीला भिल्ल लोकांची भाषा असे चुकीने संबोधले गेले. अहिराणी ही एका विशिष्ट जात-जमातीची बोलीभाषा नसून, खानदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्वसामान्य लोकांची (सर्व जाती-जमातींची) लोकभाषा आहे.
अहिराणीची काही ठळक वैशिष्टय़े अशी सांगता येतील :
१. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘य’ वापरतात. मात्र, नाशिक जिल्ह्यातील अहिराणीत ‘ळ’ वापरला जातो.
२. मराठीतल्या ‘आहे’ व गुजरातीतल्या ‘छे’ ऐवजी अहिराणीत ‘शे’ वापरतात.
३. मराठीतल्या षष्ठीत ‘चा’, ‘ची’, ‘चे’ वापरतात, तर अहिराणीतील षष्ठीत ‘ना’, ‘नी’, ‘ने’ आहे.
४. अहिराणीत गुजराती शब्दांचे प्रमाण ठळकपणे आढळते. उदाहरणार्थ- ‘आंडोर’, ‘डिक्रा’, ‘बे’, ‘ना’, ‘नी’, ‘ने’, ‘छे’, ‘चा’, ‘शे’.
५. अहिराणीत जोडशब्द जास्त प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ- तुन्हा, मन्हा, त्यास्ना, आम्ना, तुम्हना, धल्ला, धल्ली, ग्यात, सम्द, बर्हादनी, बठ्ठ, व्हऊ, आदी.
अहिराणी आज फक्त बोलीभाषा म्हणून उरली असली तरी या भाषेचा लिखित असा पहिला पुरावा इ. स. १२०६ चा मिळतो. चाळीसगावपासून दहा मलांवर असलेल्या पाटण या गावातील श्रीभवानीच्या मंदिरात हा शिलालेख आहे. हा लेख ज्ञानेश्वरीच्या पूर्वी ८४ वर्षांचा- म्हणजे शके ११२८ (सन १२०६) मधील आहे. ‘राधामाधवविलासचंपू’च्या प्रस्तावनेत इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी म्हटले आहे- ‘..अनेक भाषा ज्ञातृत्वाचा धागा फार प्राचीन आहे. ज्ञानेश्वराला संस्कृत, मराठी व बागलाणी भाषा येत असत.’ (‘राधामाधवविलासचंपू’ प्रस्तावना पृ. १४)
अहिराणीला एक वेगळा हेल असून वाक्प्रचारापासून म्हणींपर्यंत तिला वेगळाच खुमार आहे. पहिला फरक आहे ‘या’ क्रियापदाऐवजी ‘शे’ हे क्रियापद वापरण्याचा. ‘लग्न कुठे आहे?’ हे वाक्य ‘लगन कुठे शे?’ असे विचारले जाते. ‘कुठे जाई ऱ्हायना?’ म्हणजे ‘कुठे जात आहेस?’ अहिराणीत ‘येस, जास, बसस, करस, चालस, पळस, जेवस’ असे शब्द आहेत.
भाषिक गमतीजमतीही भरपूर आहेत. जसे- एखादी व्यक्ती दुसऱ्याला म्हणेल- ‘बशी घे.’ तेव्हा याचा अहिराणीतला अर्थ माहीत नसलेल्याला वाटेल की, चहा पिण्याची बशी आणायची आहे की काय! पण त्याचा अर्थ आहे- ‘खाली बसून घे.’ तीच गोष्ट ‘येस’ या शब्दाची. त्याचा अर्थ होतो- ‘येतो.’
‘कशे चालंन?’ (म्हणजे- कसं चाललंय?) या प्रश्नाला ‘जथापत चालंन’ (ठीक चाललंय) असं म्हटलं जातं. ‘जोइजे’ म्हणजे ‘पाहिजे.’ ‘त्याचा’, ‘त्याची’, ‘तिचा’ ऐवजी ‘त्याना’, ‘त्यानी’, ‘तिना’ असे म्हटले जाते.
अहिराणीत खूप वेगळे शब्द ऐकायला मिळतात. जे शब्द प्रमाण मराठीत ऐकायला मिळत नाहीत. उदा. आंडोर म्हणजे मुलगा. आंडेर म्हणजे मुलगी. डिकरा म्हणजे पुतण्या. डिकरी म्हणजे पुतणी. कोणी म्हणेल- माले एक डिकरा आणि दोन डिकऱ्या शेतीस. फुई म्हणजे आत्या. सगळे अवगुण फुईवर लादले जातात. घरात एखादी मुलगी वेगळी वागायला लागली की म्हटले जाते, ‘आईवर ना बाईवर, जाई पडी फुईवर.’ फुवा / फुआ म्हणजे आत्याचे पती. हू / ऊ म्हणजे सून. मेव्हनभाऊ/ मेव्हनबहिन म्हणजे मामेभाऊ/ मामेबहीण. धडा/ धडी म्हणजे बाप/ आई अथवा बाप-आईच्या वयाचे.
अहिराणीत दिवसाला ‘याळ’ म्हणतात. ‘याळभर’ म्हणजे दिवसभर. ‘सऱ्याळ’ म्हणजे सारा सारा दिवस. ‘याळ डोक्यावर येणे’ म्हणजे दुपार होणे. ‘हातभर याळ राहणे’ म्हणजे दिवस संपायला थोडासा अवधी उरणे.
अहिराणीत खाद्यपदार्थाची नावेही भिन्न दिसतील. ‘कोंडाळ’ म्हणजे थालिपीट. उदा. आज न्याहारीले कोंडाळा कयथात. ‘समार’ म्हणजे मसाला. भाजीत टाकण्यासाठी समार तयार करतात. लाल मसाला, काळा मसाला यांना लाल समार, काळा समार म्हणतात.
अहिराणीतल्या म्हणीही मजेशीर आहेत. उदा. शेन नं शेनफडं, मोठा घरमा इपडं (कष्टाशिवायची अपघाती श्रीमंती आली की त्या माणसाला गर्व होतो.), येता जाता चरस नि सोमवार धरस (दिवसभर खाणे सुरू असूनही उपवास असल्याचे भासवणे.), गधडाले गुळनी चव (मूर्खाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.), इ.
अहिराणीतील लोकवाङ्मयाची नुसती स्थूल यादी दिली तरी तिचा व्यापक आवाका लक्षात येतो. उदा. लोककथा, नीतिकथा, लग्नाची गाणी, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भारुडे, झोक्यावरची गाणी, आखाजीची गाणी, बारातल्या शिव्या, विविध सणांवरील गाणी, भलरी गीते, मोटेवरची गाणी, खंडोबाची गाणी, तळी भरण्याची गाणी, इत्यादी.
अहिराणीतील लिखित वाङ्मयाचा पहिला उल्लेख ‘लीळाचरित्रा’त मिळतो. ढासलं, रांधलं, पुंजं असे काही अहिराणी शब्द ‘लीळाचरित्रा’त दिसतात. ज्ञानेश्वरांची एक बागलाणी गवळण प्रसिद्ध आहे. तसेच बागलाण नवरीचे रूपकात्मक अभंग व काही अहिराणी पदेही ज्ञानेश्वरांनी लिहिली आहेत..
अ) गवळण : तन्हा मराठी देश मन्ही बागलाणी भाष।
        मन्हा रे कान्हा, मन्हा रे कान्हा।
ब) नवरीचे अभंग : करी वो अद्वैत मला केल्यो इसन्यो
         सिहवर सिद्ध पुरासि गयो।
क) पदे  : यशोदेना बाय तान्हा मले म्हने हादू ले वो
        मी तं बाई साधी भोई गऊ त्याना जवई।
बोलीभाषेत मुद्दाम कोणी ठरवून लिखाण करत नाही. बोलीभाषकांची प्रमाणभाषेकडे असलेली ओढ व वाचकांची वानवा यामुळे बोलीभाषा ‘मातृभाषा’ असूनही अनेक लेखक प्रमाणभाषेत लिखाण करताना दिसतात. अलीकडे वृत्तपत्रांतून अहिराणी भाषेत बऱ्याच प्रमाणात सदरलेखन होऊ लागले आहे. पण हे सर्व रुचिपालट म्हणून होते आहे की काय, अशी कधी कधी शंका येते. कारण त्यात भाषेबद्दलचे गांभीर्य क्वचितच दिसून येते.
अहिराणी बोलायला, ऐकायला गोड अशी भाषा आहे.
जशी दहिमान लोणी
सगळा पारखी ताकना
इले पारखं नही कोणी.

feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..